Monday, July 15, 2013

’नवरा’ एक खोज - भाग १

वधू-वरसूचक मंडळात माझा फॉर्म जाउन पोहचायच्या आत आमच्या नातेवाईकांमधे ही बातमी अगदी वणव्यासारखी पसरली. दोघी बहिणींच्या सासरकडची मंडळी देखील ह्या कार्यात हातभार लावण्यासाठी सरसावली आणि जवळपास सगळ्याच दिशांमधून विविध ’योग्य’ वरांची माहिती माझ्या आई-बाबा,तायांना फोन अथवा प्रत्यक्ष भॆटीतून मिळू लागली.
मला तर इतकं आश्चर्य वाटलं, विचार आला, अचानक सगळ्या मुलींची लग्न झाली की काय, म्हणजे फक्त मी एकटीच राहिलीये म्हणून सगळ्यांनी इतका प्रचंड प्रतिसाद दिला, हाक न मारताही
असो, तर माझे बाबा लगेच कामाला लागले, तसा तर बाबांना व्यवस्थित अनुभव होता ह्या गोष्टींचा माझ्या मोठया बहिणींच्या लग्नामुळे, मग बाबांनी माझ्यासाठी येणा-या स्थळांची माहिती व्यवस्थितपणे एका फाईल मधे ठेवायला सुरूवात केली. एक-एक प्रोफाईल वाचून त्याची पत्रिका जुळते की नाही, किती गुण जुळते हे सगळं बघून बाबा ठरवत होते की कोणत्या स्थळाला संपर्क करायचा. अस करत करत बाबांनी नातेवाईकांकडून आलेल्या सगळ्या प्रोफाईल्स ची विभागणी केली आणि योग्य ती कारवाई केली.
मी महिन्या-दोन महिन्यातून घरी चक्कर मारते तशी मी त्याही वेळी वीकेन्डला घरी गेले होते. घरी पोहोचल्यावर माझ्या भावाने सांगितलं की तुझ्यासाठी ह्यावेळेस एक सरप्राईज आहे, मला काही कळालं नाही आणि मी जास्त लक्ष पण दिलं नाही.
रविवारी सकाळी निवांत उठायचा विचार होता, पण आईने लवकर उठायला लावलं, मी जरा वैतागतच उठले! भाऊ पुन्हा समोर आला आणि म्हणाला, ’सरप्राईजsss आज तुला बघायला येणार आहेत!! हीहीहीही Party ’, मी पलंगावर ताडकन उठूनच बसले, हे कसलं सरप्राईज!! मला इतका राग आला, सरळ स्वयंपाकघरात जाउन मी आईला जरा चिडूनच विचारलं, ’हा काय प्रकार आहे??’
तसं आई अगदी शांतपणे म्हणाली, ’अगं, काही नाही, आपल्या ओळखीतल्या एकाने ह्या मुलाबद्दल सांगितलं, तर त्याचे आई-वडील आज तुला भेटायला येणार आहेत,एवढंच!’
मी, ’अरे, पण मला तुम्ही सांगितलं का नाही??, आणि मुलगा करतो काय, त्याचा फोटो कुठे आहे??’ आई, ’अगं, आज त्याचे आई-वडील फोटो घेउन येणार आहेत, मुलगा इथे नसतो म्हणून’.
श्याss काय बोअर आहे, रविवारच्या सकाळचा पार मूडच गेला माझा, म्हणजे मला त्या मुलाच्या आई-वडीलांना भेटण्यात काही प्रॉब्लेम आहे असं नव्हतं पण, असं अचानक ’पहिल्या’ कांदा-पोहे कार्यक्रमाला मला सामोरं जावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं Stare
नंतर बाबा म्हणाले, ’तू साडी नेस आज’,
मी - ’बाबा, साडी काय हो, मी नाही नेसणार!’
आई - ’बरं बाई, एखादा चांगला पंजाबी सूट घाल, ठिक आहे.’
मी - ’नाही गं आई, प्लीज ना, तसंही तो मुलगा येत नाहीये, मग मी कुर्ती आणि जीन्स घालते’. लकीली आई रेडी झाली आणि बाबा पण काही म्हणाले नाही हास्य
ते लोक ४ वाजता येणार होते म्हणून आम्ही सगळी आवरा-सावर करून ठेवली आणि तयार होउन बसलो. आईने मला आतमधेच थांबायला सांगितलं होतं आणि आईच चहा आणि खायचं देणार होती. मला खुप बरं वाटलं की, माझा पहिलाच प्रसंग अगदी टीपीकल ’कांदा-पोहे’ नसणार आहे wink
ते लोक ठरलेल्या वेळेनुसार घरी आले, बाबांनी त्यांना बसवलं, ओळख वगैरे झाली, आईने पाणी नेउन दिलं आणि मला बाहेर येण्याची खुण केली. मी बाहेर येउन एका खुर्चीत बसले मग बाबांनी माझी ओळख करून दिली. मग त्यांनी मला एक-एक प्रश्न विचारायला सुरूवात केली.
प्रश्न क्र.१ : शाळा कुठली?
मी थोडी गोंधळले, पण उत्तर दिलं.
प्रश्न क्र.२ : मराठी, इंग्लीश की सेमी-इंग्लीश मिडीयम?
मला थोडं हसू आलं (मनातल्या मनात). मी उत्तर दिलं.
प्रश्न क्र.३ : १० वी ला किती मार्क मिळाले होते?
प्रश्न क्र.४ : १२ वी कुठे केलं?
प्रश्न क्र.५ : सायन्स होतं का?
प्रश्न क्र.६ : आयट्रिपलई ची परिक्षा दिली होती का? आयआयटी साठी प्रयत्न केला होता का?
प्रश्न क्र.७ : १२ वी ला बोर्डात नंबर वगैरे आला होता का?
प्रश्न क्र.८ : इंजिनीयरींग ला नंबर लागला नाही का?
प्रश्न.......
प्रश्न.............
प्रश्न................
आई ग!! मी तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत देत अगदी घामाघूम झाले! माझ्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधे पण इतके प्रश्न नव्हते विचारले गेले माझ्या शिक्षणाबद्दल
जेंव्हा प्रश्नांची ही सरबत्ती संपली त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी स्वत:च्या मुलाबाबत सांगायला सुरूवात केली..
आमचा मुलगा अमुक शाळेत संपूर्ण इंग्लीश मिडीयम मधे शिकला आणि १० वी बोर्डात तमुक क्रमांकाने चमकला!
पुढे १२ वी ला तो ह्या कॉलेजात गेला, त्याने आयट्रिपलई आणि आयआयटी ह्या परिक्षांची तयारी देखील केली आणि तो १२ वीला बोर्डात अमुक क्रमांकाने झळकला!!
त्याने कॉम्प्युटर इंजिनीयरींग केलं एका प्रसिद्ध कॉलेजमधून आणि आता एका ’आयटी’ फेमस शहरात दणकट पगाराची नोकरी करतो!!!
एका दमात त्यांनी ही माहिती पुरवली!!
मी, आई, बाबा सगळे त्यांच्याकडे बघतच बसलो, मला तर कळतच नव्हतं काय प्रकार सुरू आहे म्हणजे कांदा-पोहे कार्यक्रमात असंच होत असतं की हे काहितरी वेगळं घडत होतं, नो आइडिया यार माझी तर पहिलीच वेळ होती Sad
नंतर मग त्यांनी हळूच त्यांच्या मुलाचा फोटो काढला आणि बायकोच्या हातात दिला. त्यांनी तो अगदी कौतुकाने डोळेभरून बघितला आणि माझ्या आईच्या हातात दिला, आईने जस्ट बघितला आणि लगेच मला दिला.
मी तो फोटो बघताना विचार करत होते की ह्या मुलाचा मेंदू किती मजल्यांचा आहे? म्हणजे त्याच्या वडिलांनी इतकं वर्णन केलं त्याच्या बुध्दिमत्तेचं की मी त्याचा चेहरा बघायचं सोडून असं काहितरी शोधायचा प्रयत्न केला wink बाकी, फोटो ठिक होता.
पुढे पाच-एक मिनिटे औपचारिक बोलणं झालं आणि नमस्कार-चमत्कार करून ते जोडपं निघून गेलं. ते दिसेनासे होईपर्यंत मी आणि आईने कसाबसा धीर धरला आणि नंतर जे हसत सुटलो, ओ गॉड !!!
बाबा शेवटी रागावले आम्हाला, खरंतर त्यांना पण हसू येत होतं घडलेल्या प्रकाराबाबत पण ते योग्य वाटत नाही ना; मग आम्ही थोडया शांत झालो.
घडलेला प्रकार काय होता ह्याबद्दल जरा चर्चा केली आणि शेवटी ठरलं की, प्रत्यक्ष मुलगा भेटणार असेल तरंच इथुन पुढे कोणत्याही प्रोफाईल ला होकार दयायचा आणि हो त्याच्या अपेक्षांमधे कुठे मुलीचा बुध्यांक किती हवा हे दिलंय का हे पण बघायचं म्हणजे आजचा प्रकार पुन्हा घडायला नको Big smile
आणि हो, मी घरच्यांना बजावलं की, ’नो मोर सरप्राइजेस प्लीज

2 comments:

  1. Bahu-majali mendu aslela to mulga Newton banayche sodun lagna karanar mhanje rashtriya sampattiche nuksaanch ki...
    Tari bakiche paanchat prashna navte ka?
    e.g. Tumchi unchi kiti? Tumacha rang konta? Tumache aayushyache dheyya kaay? ani asech kahi bhole-bhabade prashana!!

    ReplyDelete
  2. Pratikriyesathi dhanyawad :). aapala naaw nakki liha pudhchya weles pratikriyemadhe.

    ReplyDelete