Monday, July 8, 2013

’नवरा’ एक खोज - पूर्वतयारी भाग २

पहिला जवळपास एक महिना ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्य़ात गेला की लग्न का करायचं, काय गरज आहे लग्नाची, सध्या जे लाईफ सुरू आहे त्यात काय वाईट आहे..नोकरी आहे, मित्र-मैत्रिणी आहेत, वीकेन्ड च शेडयूल एकदम सेट आहे, मग त्या नविन व्यक्तीसाठी जागा कुठे आहे माझ्या दिवसात? मला खरंच गरज आहे का पार्टनरची thinking
ताईशी बोलले, माझ्या लग्न झालेल्या मैत्रिणीशी बोलले त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की, तुमच्या लाईफमधे तुमचं असं कोणीतरी असणं ही एक खुप वेगळी आणि छान भावना आहे, रोज घरी आल्यावर तुमची वाट बघणारं तुमचं हक्काचं एखादं माणूस असणं खुप गरजेचं आहे, आज जरी सगळ्या गोष्टी सेट वाटत असल्या तरी कुठेतरी ह्या पलीकडे तुम्हांला वाटतं की, आपलंही घर,फॅमिली असावी..
पुन्हा काहीही झालं तरी माणूस एकटा नाही राहू शकत आणि आपल्या समाजामधे मुलगी जर बिनलग्नाची असेल तर तिला तर त्रास देतातच पण तिच्या आई-वडिलांना सुद्धा काही कमी मनस्ताप देत नाहीत, हे आणि असे सगळ्या टोकाचे विचार मला ऎकायला मिळत होते आणि माझा गोंधळ वाढतच होता घाबरगुंडी
हिय्या करून एका दिवशी मी स्वत: समोर बसले आणि प्रश्न विचारायला सुरूवात केली.
प्रश्न: मला भिती कशाची वाटतीये? लग्न ह्या इव्हेन्टची?
उत्तर: नाही.
प्रश्न: मग, लग्न करून नविन घरात गेल्यावर तिथे येणा-या जबाबदारीची?
उत्तर: नाही.
प्रश्न: बरं मग, रोज ऑफिस सांभाळून घरी स्वयंपाक करावा लागेल ह्याची? (हा प्रश्न विचारात घेणं भाग होतं, कारण मी गेले १० वर्ष घराबाहेर आहे, जिथे जाते तिथे पेईंग गेस्ट म्हणून राह्ते त्यामुळे स्वयंपाक येत जरी असला तरी प्रॅक्टीस नाहीये ना Sad )
उत्तर: ह्या अजिबात नाही!
प्रश्न: मग प्रॉब्लेम आहे कुठे????
उत्तर: बहुतेक मला भिती ही वाटतीये की, ज्या व्यक्तीसोबत माझं लग्न ठरेल त्याचा नी माझा स्वभाव जुळेल का? मला जे बरोबर वाटतं ते त्यालाही बरोबर वाटेल का? मी त्याच्या गोष्टी सहज अ‍ॅक्सेप्ट करू शकेन का? व्हॉट अबाउट कम्पॅटिबीलीटी?
तर हे होते प्रॉब्लेम्स!!
आतापर्यंत प्रश्नच सापडत नव्हता, आता लकीली सापडला तर मी खनपटीलाच बसले उत्तर शोधण्याच्या हास्य
मग बरीच चर्चासत्रं घडली पुन्हा एकदा घरच्यांशी, मित्र-मैत्रिणींशी आणि कुठेतरी मला थोडंसं उत्तर सापडलं...काहीही झालं तरी दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती सोबत आल्यावर थोडं अ‍ॅडजेस्ट करावचं लागतं दोघांनासुद्धा सो नॉट टू वरी मच, पुढे जायला काही हरकत नाही.
मी स्वत: ला तयार केलं आणि बाबांना फोन करून माझ्या डोक्यात असलेल्या ’पार्टनरची’ अपेक्षा सांगितली, सगळे एकदम खुश झाले.
आता एकच अडचण होती, मुलीचे फोटो!!
आमच्या ताईबाईंनी तो प्रश्नदेखील चुटकीसरशी सोडवला, तिच्या तिथे राहणा-या एका फोटोग्राफर कडे माझ्या ’खास’ फोटोजसाठी वेळ ठरवली.
आदल्या दिवशी बसून मी आणि ताईने, मी कोणते कपडे घालून फोटो काढायचे हे सगळं ठरवलं. दुस-या दिवशी वेळ ठरवली होती ११ वाजताची पण, आमचं सगळं आवरून निघायला आम्हांला चांगलाच उशीर झाला आणि आम्ही तिथे पोहोचले दुपारी ३ वाजता!
पहिला फोटो साडीवर काढायचा म्हणून मी घरूनच तयार होउन गेले होते..आधीच उशीर झाला होता त्यामुळे गेल्या गेल्या फोटोग्राफर ने मला ’पोज’ द्यायला सांगितली.
आजपर्यंत माझे स्वत: चे चिक्कार फोटो काढले गेलेले आहेत ह्या ना त्या कारणामुळे, अगदी साडीमधे सुद्धा पण, आज जेंव्हा त्याने ’पोज’ द्यायला सांगितली, तेंव्हा मला इतकं हसू फुटलं की मला धड उभंदेखील राहता येईना. मला बघून ताईदेखील हसायला लागली. मी कसंबसं स्वत: ला शांत केलं आणि उभी राहिले. फोटोग्राफर म्हणाला ’स्माईल’ आणि मी पुन्हा एकदा जोरजोरात हसायला लागले, तसा तो म्हणतो, अहो, इतकी जास्त नकोय, थोडं नाजूक हसा ना, स्मितहास्य माहितीये ना angery त्याचा वैतागलेला आवाज आणि माझ्या ताईचे मोठे झालेले डोळे बघून मी कसंतरी ते स्मितहास्य दिलं आणि साडीतले फोटो झाले एकदाचे!
त्यानंतर च्या फोटोसाठी मी तयार होउन बाहेर आले तर स्टुडीओ मधे अचानक गर्दी दिसली, पासपोर्ट साठी फोटो काढायला येणा-यांची! २,४ लोकांचे फोटो काढून झाल्यावर माझा नंबर लागला पुन्हा एकदा मी शहाण्या मुलीसारखी स्मितहास्य देण्याच्या तयारीत असतांना समोर सगळी गर्दी माझ्याकडेच बघतीये हे बघून मात्र मला मेल्याहून मेल्यासारखं झालं Puzzled पण, काय करणार, पर्याय नव्हता, कसंबसं फोटोशूट आवरलं आणि आम्ही बाहेर पडलो.
ठरलेल्या दिवशी फोटो मिळाले, ते बघून माझ्या घरच्यांच्या चेह-यावर अगदी पूर्ण समाधान दिसलं. लगेच बाबांनी एक फोटो सिलेक्ट केला आणि वधु-वरसूचक मंडळाच्या फॉर्मसोबत तो पाठवून दिला!!!

क्रमशः

10 comments:

  1. या शनिवारी किंवा रविवारी वेळ काढ आणि "क्रमशः ३ ४ ५ ६ ७ ///" पूर्ण करून टाक.
    :p असं अर्धवट वाचायला मजा येत नाहीये, :p आणि मुख्य म्हणजे थांबवत नाहीये.

    ReplyDelete
    Replies
    1. असं नसतं काही, थोडा धीर धर. दर सोमवारी नविन एपिसोड येईलच :D, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद अक्षय :)

      Delete
  2. Heyyy masttchhh... aavdal mala.. ek familiarty vattey vichararnmadhe.. ;) particularly first half madhe.. ani mala tujh ya sarvakade humorously baghan aavadtay.. :p waiting for next ones :)

    ReplyDelete
  3. खरंतर जोडीदार शोधण्याची ही प्रक्रिया काहीशी संभ्रमात टाकणारी, काहीशी थकवणारी असते पण ती विनोदी पद्धतीनेही मांडल्यामुळे खूपच interesting झाली आहे … waiting for next parts :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मराठीकट्टा :)

      Delete