Sunday, July 21, 2013

’नवरा’ एक खोज - भाग २

काही दिवसातच वधू-वरसूचक मंडळाकडून स्थळांची यादी आली ती बाबांनी नीट वर्गवारी करून काही मुलांच्या पालकांना संपर्क केला, त्यातल्या अर्ध्या लोकांनी उत्तरच दिलं नाही, १/४ लोकांनी प्रतिउत्तर दिलं तर त्यातले काही आई-बाबांना आणि तायांना पटले नाही म्हणून तितके वगळले आणि शेवटी उरले फक्त दोनच हास्य त्यातला मला एकच ठिक वाटला Big smile
मी एकाला भेटायला तयार आहे म्हटलं आणि पुन्हा एकदा आमच्या घरवाल्यांमधे वारं संचारलं.लगेच मग त्या मुलाच्या घरी बोलून वगैरे तारीख ठरली माझ्या पहिल्या-वहिल्या कांदे-पोहे कार्यक्रमाची.मी पण एकदम खुश झाले,माझा पहिला कांदे-पोहे कार्यक्रम काय भूषणावह गोष्ट आहे ना Cool
असो, तर भेटण्याचा दिवस ठरला, मी, आई-बाबा आणि जिजू असे चौघेजण त्यांच्या घरी जायला निघालो. माझ्या बहिणीने मला अगदी सिनेमातल्या नटीसारखं रंगवलं होतं.
गाडीमधे कोणी जास्त काही बोलत नव्हतं, मी पण विचार करत होते की मी काय बोलणार होते त्या मुलाशी? त्याच्या कामाविषयी की आवडी-निवडी बद्दल की अजुन काही? श्या..नुसते प्रश्नच येत होते डोक्यात, काही ठरत नव्हतं.
इतक्यात आम्ही त्यांच्या घराजवळ पोहोचलो, गाडीतून उतरतांना मला अचानक पोटात खड्डा पडला असं वाटलं आणि कपाळावर घामाचे दोन थेंब जाणवले, मला टेन्शन आलं होतं घाबरगुंडी मी सगळ्यांच्या मागे चालत होते, दारातून आत जातांना मला शेजारी प्राजक्ताचं फुल दिसलं आणि एकदम प्रसन्न वाटलं मग मी बिनधास्त आत गेले.
दारात त्या मुलाचे वडील उभे होते, आत गेल्यावर हॉलमधे बाकी सगळी मंडळी बसलेली होती, बसायची व्यवस्था थोडी विचित्र वाटली मला पण, त्यामुळे मला कळेना कुठे बसावं, त्या मुलासमोर बसावं की माझ्या बाबांजवळ शेवटी मी सरळ त्या मुलासमोरच जाउन बसले, विचार आला, वेगळं जाउन बोलण्यापेक्षा असं समोरासमोरच विचारावं.
मग नमस्कार-चमत्कार झाले, दोन्ही कुटुंबांची ओळख झाली आणि मग त्या मुलाच्या वडिलांनी माझ्याकडे बघून पहिला प्रश्न विचारला.
काका : मुंबईमधे कुठे राहतेस?
मी : ....
काका : ऑफिसला कशी लोकल ने जातेस का?
मी : ....
काका : तुझं शिक्षण काय झालंय? ( हा प्रश्न ऎकला आणि एकदम मला ह्या आधी जे घडलं होतं ती प्रश्नावली समोर दिसली पण पुढचा प्रश्न वेगळा होता हास्य )
काका : तिकडे कोणाकडे राहतेस?
मी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत तो मुलगा मला प्रश्न विचारायला लागला, तू कोणत्या टेक्नॉलॉजी मधे काम करतेस?
त्याचा प्रश्न संपत नाही की लगेच त्याची आई म्हणाली, तुम्हाला दोघांना बोलायला वेगळा वेळ दिला जाणार आहे, आता मोठयांना बोलून घेऊ देत, थांब जरा Angry
बापरे, मी तर घाबरलेच त्या काकूंचं ते वाक्य ऎकून, मला कल्पना आली की आता ह्या आपल्यावर बॉम्ब टाकणार आणि खरंच सुरू झालं.
काकू : जेवणाचं काय काय करतेस?
मी: ऑफीस मधे जेवते दुपारचं आणि संध्याकाळी जिथे राहते त्या काकूंकडे...
त्या म्हणाल्या अगं जेवणातलं काय काय बनवतेस?? श्या..मी जीभ चावली आणि म्हणाले की, करता तर येतं सगळं पण सध्या प्रॅक्टीस कमी झाली आहे कारण पीजीच्या काकू गॅस वापरु देत नाहीत..
त्यांच्या कपाळावर उठलेली अठी मला व्यवस्थित दिसली, पण मी जास्त विचार नाही केला कारण पुढचा प्रश्न कान देऊन ऎकायचा होता ना wink
काकू : ऑफीस मधून घरी किती वाजता येतेस?
काकू : ऑफीस किती दिवस असतं?
काकू : शनिवार, रविवार काय करतेस?
काकू : मुंबईहून आई-बाबाना भेटायला किती वेळा घरी जातेस??? (मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारला, हे असले प्रश्न कोणी कांदे-पोहे कार्यक्रमात विचारतात काहो??, काय माहीत बाबा विचारतही असतील माझा तर पहिलाच म्हणजे तसा दुसरा प्रसंग होता ना)
मी काय बापडी उत्तरं देत होते निमूटपणे...
पुढे त्यांनी विचारलं, नेहमी पंजाबी ड्रेसच वापरतेस की साडीपण घालते....मला हसावं की रडावं कळत नव्हतं..मी सांगून टाकलं, मी नेहमीच जीन्स घालते, कधीतरी पंजाबी ड्रेस आणि साडी शेवटची कधी घातली ते आठवत नाही.
आता पुढचा प्रश्न सुईमधे दोरा ओवता येतो का, शिवणकाम, भरतकाम येतं का यापैकी एक असणार अशी माझी खात्री झाली होती पण आश्चर्य म्हणजे त्यांनी माझं उत्तर ऎकल्यावर पुढे काही विचारलच नाही
हूश्श..सुटले
पुढच्याच क्षणी त्या काकू त्यांच्या मुलाला म्हणाल्या की तुम्ही दोघे समोरच्या खोलीत जाउन बोला..
मी त्या मुलाच्या मागे खोलीत गेले आणि आम्ही बसलो..
मला वाटलं तो पहिले बोलेल आणि त्याला वाटलं मी, पण कोणीच बोलेना..मी विचार केला तो मुलगा आहे तर त्याने सुरूवात करावी आणि त्याने काय विचार केला माहीत नाही..
विचित्र शांततेत एखादा मिनिट गेल्यावर मीच विचारलं त्याला तू यू.एस. मधे कुठे राहतोस?
..त्याचं उत्तर
मी: कुठे राहतोस?
तो: ..त्याने खाली कुठेतरी बघत उत्तर दिलं
मी: कोणत्या टेक्नॉलॉजी मधे काम करतोस?
तो: ..पुन्हा खाली बघूनच त्याने उत्तर दिलं..
मी: तुझ्या आवडी-निवडी काय आहेत? वीकएंड ला काय करतोस?
..तो खाली बघुनच बोलत होता म्हणून मी तिकडे वळून बघितलं की तिथे आहे तरी काय, पण काहीच नव्हतं, मला वाटलं मी खूप विचित्र दिसतीये म्हणून तो मला बघायचं टाळतोय की काय, मला काही कळेना Stare
पण, तो बोलत होता, मला ना माझं काम खूप आवडतं, मी दिवस-रात्र काम करू शकतो, अगदी मला खाण्या-पिण्याची सुध्दा शुद्ध राहत नाही, नवीन टेक्नॉलॉजीस, नवीन अ‍ॅप्लिकेशन्स, नवीन क्लाइंट्स, नवीन प्रॉजेक्ट्स सगळं कित्ती एक्साइटिंग असतं ना आणि कधी जर प्रॉब्लेम आला तर मला अगदी आनंद होतो की चला आता काहीतरी डोकं लावायला मिळेल.
मी कधीच थकत नाही काम करतांना उलट मला असे चॅलेंजेस आल्यावर एनर्जी मिळते आणि मी वीकएंड्स ला घरून काम करतो कारण तिथे बाहेर फिरायला जायचं तर सगळं प्लॅनिंग वगैरे करावं लागतं ज्यासाठी मला वेळ नसतो.
पण, हो मी एकदा बाहेर गेलेलो माझ्या ऑफीसच्या लोकांसोबत पण मला बोर झालं तिथे, ते लोक खेळत होते, पण मला काही इच्छा नाही झाली, माझा उगाच वेळ वाया गेला म्हणून मग मी पुन्हा कधी गेलो नाही त्यांच्यासोबत!
तो एका दमात हे सगळं बोलला मी तर त्याच्याकडे अवाक् होऊन बघतच राहीले..
मी ह्यापुढे काय बोलणार होते...त्याचं कामाबद्दलचं प्रेम ऎकून माझा चांगलाच मूड ऑफ झाला!
मग त्याने प्रश्न विचारला मला, तू किती तास काम करतेस?
आता मला त्याच्याकडे बघून बोलायची अजिबात इच्छाच नव्हती पण त्याने काहीतरी विचारलं म्हणून मी सांगितलं की मी फक्त जितके तास आवश्यक आहे तितकंच काम करते!
तो : कोणत्या टेक्नॉलॉजी मधे काम करतेस तू?
मी : .... उदास सुरात उत्तर.
तो : तू किती लोकांची टीम हॅंडल करतेस?
मी : ....
ह्यापुढचा प्रश्न येणार तेवढ्यात काकूंचा आवाज आला म्हणून मी वर बघितलं तर त्या म्हणाल्या, ' आता पुरे तुमच्या गप्पा, थोडं खाऊन घ्या', असं म्हणत त्यांनी फराळाचं ताट आमच्यासमोर धरलं, कांदे-पोहे सोडून बाकी सगळं काही होतं त्यात. चिवडा-फरसाण पासून ते पार गुलाब-जामून पर्यंत Crazy मी ते बघितलं आणि फक्त एक छोटी खोब-याची वडी उचलली. लगेच त्या म्हणाल्या की, अगं घेना, काही जाड नाही होणार तू हे खाल्लस तर!
मला त्यावेळी माझा राग कंट्रोल करून स्मितहास्य करावं लागलं, जे अतिशय अवघड काम होतं!!
नंतर आम्ही पुन्हा आत जाउन बसलो, मी आईकडे बघून माझी रिअ‍ॅक्शन सांगितली आणि तिचा पण चेहरा पडला. त्यानंतर त्या काकूंनी त्यांचा बंगला आम्हाला दाखवला आणि त्यांच्या श्रीमंतीचं कौतुक ऎकत ऎकत आम्ही एकदाचे त्या घरातून बाहेर पडलो.
गाडीमधे बसल्या बसल्या मी माझी नाराजी आणि निर्णय व्यवस्थित पणे मांडला आणि अशा त-हेने माझा पहिला-वहिला कांदे-पोहे कार्यक्रम पार पडला

8 comments:

  1. Good going Priyanka. Eagerly waiting for the next part. June divas aathavle ekdam.

    ReplyDelete
  2. Jeans waparnari mulagi mhanje bhochak, kinva saadi nahi nesli mhanje maha-paapi..!
    Saglyat waait mhanje hi sarv javalpaas kujki ani kaal-baahya mate khote hasat aikavi lagtat hyachi khup cheed yete teva!!
    Pan aaple sanskar asha veli kaami yetat ase mhanayche!!!
    Palllavi

    ReplyDelete
    Replies
    1. hmm agadi barobar, dhanyawad Pallavi pratikriyebaddal :)

      Delete
  3. Perfect varnan aahe. Ashaveli lok kashabaddal bolatil yacha andaj karana kathin aahe. Kahi kahi lok tar asha karykramaat yet nasatana aani garaj nasatana English madhye bolayacha attahas karatat, te pahun tar hasu anavar hote :)

    ReplyDelete
    Replies
    1. hmm agadi barobar MarathiBlogKatta :) pratikriyesathi dhanyawad :)

      Delete