Friday, July 29, 2016

माझं पहिलं घर :) - भाग ४

आता तर माझा घराच्या बाबतीतला उत्साह पूर्णपणे मावळला होता म्हणून मी एक महिना काय दोन महिने होत आले तरी जायचं नाव घेत नव्हते. शेवटी नवरा म्हटला की जे असेल ते असेल बघून तर येऊ काय परिस्थिती आहे. हो-नाही करत शेवटी मी तयार झाले आणि गेलो आम्ही बघायला.

आश्चर्य म्हणजे घराचं सगळं काम व्यवस्थित करून ठेवलेलं होतं :)

तरी माझी खात्री करून घेण्याकरिता मी पुन्हा एकदा कसून तपासणी केली आणि समाधानाचा सुस्कारा सोडला, हाश! झालं बाबा माझं घर तय्यार :)

हं लागले १८ महिने पण झालं एकदाचं :)

मग बिल्डरला तारीख कळवली आणि आई-बाबा, भाऊ, मी आणि नवरा आम्ही किल्ली घ्यायला आणि घरामधे कलश ठेवायला गेलो.

घराच्या दारावर स्वतःच्या नावाची पाटी बघून इतकं भरून आलं ना एक क्षण :) आनंदाश्रू दाटून आले होते आणि नव-याच्या चेह-यावर सुद्धा माझ्याबद्दल दिसून आलेला अभिमान अजूनच सुखावून गेला :)

स्वयंपाकघरामधे गणपती बाप्पाचा फोटो आणि कलश ठेऊन पुजा केली.देवाला साष्टांग नमस्कार करून आधी थॅन्क्स म्हटलं आणि आता घराची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर असं बजावलं :)

घरात फिरून मस्त फोटो-बिटो काढले आणि समाधानाने परत आलो.

आता नविन घरामधे कधी जायचं रहायला ह्याची स्वप्न रंगवायला मी आणि नवरा सज्ज झालो होतो पण!

हो ना! हा 'पण' काही माझी पाठ सोडतच नव्हता :(

नविन घर म्हटल्यावर फर्निचर केल्याशिवाय राहायला कसं जाणार. बरं नुसतं घरामधलं फर्निचर करून उपयोग नव्हता. घर पहिल्या मजल्यावर असल्यामुळे तीन बॅल्कनीज ना जाळी लावावी लागणार होती, सेफ्टी डोअर करावं लागणार होतं. आणि सर्वात महत्त्वाचं होतं ह्या सगळ्याकरता पैसे कसे उभे करायचे!!

एक पर्याय होता परत एकदा एल.आय.सी. कडून फर्निचर साठी लोन घ्यायचं. चौकशीअंती कळालं की, लगेच असं लोन नाही मिळत निदान एक वर्ष थांबावं लागेल. दुसरा पर्याय म्हणजे पर्सनल लोन काढायचं.

हम्म! पण आधी नेमका किती खर्च येईल हे काढायचं ठरवलं. माझ्या ओळखीतल्या एका आर्किटेक्टला आम्ही घर दाखवलं आणि जुजबी फनिर्चर करून घ्यायला किती खर्च येऊ शकतो हे विचारलं. त्याने साधा सरळ हिशोब सांगितला - प्रत्येक खोली निदान १लाख रूपये. ह्याव्यतिरिक्त सेफ्टी डोअर आणि तीन बॉक्स जाळ्या ह्याला अजून पाऊण-एक लाख लागणार. म्हणजे काय तर मला अजून ५लाखाचं कर्ज डोक्यावर घ्यावं लागणार होतं! लोन घ्यावं का परत हा विचार एकीकडे चालू होता आणि दुसरीकडे बिल्डरकडून पझेशन नंतर जी काही महत्त्वाची कागदपत्रं यायला हवी होती त्याची चौकशी करावी म्हणून एकदा भेटायला गेले.

सहज त्याला म्हटलं, की आता माझा फर्निचर करायचा विचार आहे आणि सेफ्टी डोअर वगैरे पण करणार आहे. तर तो म्हटला, घराच्या आतमधे काय हवं ते करा पण सेफ्टी डोअर किंवा बॉक्स जाळी वगैरे काहीही करायच्या भानगडीत पडू नका कारण अजून Q.C. / C.C - क्वालिटी आणि कम्पलिशन सर्टिफिकेट आलेलं नाही!

आता ही काय नविन भानगड असं विचारल्यावर म्हणतो - घर / बिल्डींग बांधून झाली की महानगरपालिका / ग्रामपंचायत येऊन पाहणी करते आणि मग 'ही वास्तू राहण्यालायक आहे' असं सर्टिफिकेट देते त्यानंतरच तुम्ही रहायला जाऊ शकता.

पुढचा ऑब्वियस प्रश्न होता की, हे सगळं कधी घडणार? किती वर्षांनी मिळणार? त्यावर त्याने अगदी सुंदर स्मितहास्य केलं आणि म्हटला की, मी माझ्यापरिने प्रयत्न करत आहे तरी अजून ६ महिने मिळेल असं वाटत नाही.

६ महिने! आता परत थांबणं आलं. ह्याव्यतिरिक्त अजून एक अडचण होती ती म्हणजे माझं ऑफिस हिंजवडी च्या अगदी विरूध्द टोकाला म्हणजे मगरपट्टामधे होतं. जर इथे रहायला आलो तर रोज मला निदान ५०कि.मी. स्वतः गाडी हाकत जावं लागणार होतं!

सरतेशेवटी आम्ही घर भाडेतत्त्वावर द्यायचं ठरवलं आणि तशी जाहिरात दिली. १महिन्यात आम्हांला हिंजवडी भागामधे आय.टी. कंपनी मधे काम करणारी ५ मुलं भेटली आणि ११ महिन्याच्या करारानुसार आम्ही त्यांना घर रहायला दिलं.

खरं तर जीव थोडाथोडा होत होता, स्वतःचं घर ते पण इतक्या महत प्रयासाने मिळाल्यावर असं दुस-याला रहायला देतांना वाईट वाटत होतं पण पर्याय नव्हता. घर नुसतं रिकामं ठेऊन खराब झालं असतं आणि दुसरं म्हणजे आम्ही सुध्दा भाडेतत्त्वावर राहत होतो तर तितकाच आमचा खर्च भागला असता.

एकीकडे घराचा हा प्रश्न सोडवून मी परत सहा महिन्यांनी बिल्डरकडे चौकशी केली की, त्या सर्टिफिकेटच काय झालं. तर त्याने कारणं द्यायला सुरूवात केली. तोवर इकडे बिल्डींगमधे बरीच मंडळी रहायला आली होती.व्हॉट्स-अप ग्रुप बनवून आम्ही सगळे एकमेकांना अडचणी - अनुभव सांगत होतो. प्रत्येकजण कम्प्लिशन सर्टिफिकेट साठी थांबला होता. पण बिल्डर मात्र सगळ्यांना वेगवेगळी कारणं देऊन टोलवत होता.

शेवटी एकदा तुकडा पाडायचा म्हणून मिटींग बोलावली तर त्याने स्पष्टपणे सांगितलं की, माझा प्रोजेक्ट अजून पूर्ण झालेला नाही, जोवर ह्या बिल्डींगच्या आवारात अशीच एक नविन बिल्डींग उभी राहत नाही तोवर मी ग्रामपंचायती मधे सोसायटी फॉर्मेशन साठी अर्ज करणार नाही आणि तोवर ते लोक काहीही बघायला किंवा सर्टिफिकेट द्यायला तयार होणार नाहीत!

झालं! आता आम्ही सगळेच एका नव्या चक्रामधे अडकले गेलो होतो!

आज ३ वर्षे झाली हा तिढा अजुनही सुटलेला नाही..

Thursday, July 28, 2016

माझं पहिलं घर :) - भाग ३

दोन महिने उशीर झाला होता म्हणून बिल्डरने मला दर दिवसाचं व्याज लावलं आणि सरळ सरळ १लाख रूपये मला जास्त भरायला सांगितले :(

आता तर मी रडायचंच बाकी ठेवलं होतं पण नव-याने मला धीर दिला आणि पझेशनच्या वेळेस बघू काय करायचं ते असं ठरलं.

पुढे मग बिल्डरच्या डिमांड्सना 'एल.आय.सी.' कडून चोखपणे चेक्स मिळत गेले.

बिल्डर ने छातीठोकपणे सांगितलं होतं ( जे प्रत्येकच बिल्डर सांगतो ) की ८ महिन्यांमधे पझेशन देतो! पण १० महिने उलटून गेले तरी काम पूर्ण होता दिसत नव्हतं! मी परत एकदा बिल्डरच्या ऑफिसच्या वा-या करायला सुरूवात केली पण हाय रे कर्मा! सगळं मुसळ केरात!

सरतेशेवटी १५ महिन्यांनी मला घराचा ताबा मिळू शकतो असं बिल्डरचं ई-मेल आलं.

आम्ही दोघे धावतच घराची परिस्थिती बघायला गेलो आणि भली-मोठ्ठी यादीच निघाली अव्यवस्थित कामांची!

सगळ्या भिंतींवर असंख्य भेगा पडल्या होत्या, मुख्य दरवाजा तिरपा लावला होता, खिडक्यांच्या फ्रेम्स आणि भिंत ह्यामधे असलेली जागा व्हाईट सिमेंटने भरलीच नव्हती, असे एक ना अनेक प्रश्न समोर होते.असं असतांना मी पझेशन घेणं शक्यच नव्हतं!

मग काय परत एकदा बिल्डरच्या मागे धावणं चालू केलं. साईट वरच्या इंजिनीयर ला सगळं दाखवलं आणि किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलं तर म्हणतो,'दोन दिवसात करून देतो बघा मॅडम तुम्हांला, काही काळजीच नका करू तुम्ही!'त्याचा आवेश बघून आम्हाला वाटलं खरंच करेल हा.

पण इतक्या सहजासहजी मला घर मिळावं असं बहुतेक नियतीला मंजूर नव्हतं ;)

अगदीच दोन नाही पण नेक्स्ट विकांताला आम्ही गेलो तर कळालं, ज्याने इतक्या बिनधास्तपणे आम्हांला 'दोनच दिवसाचं' आश्वासन दिलं होतं तो त्याच दिवशी नोकरी सोडून निघून गेला होता!

सगळी मजाच मजा चालू होती मला तर हसावं की रडावं तेच कळत नव्हतं!

मग त्या दिवशी जो नविन साईट इंजिनीयर होता त्याला शोधून आणला, परत सगळी रामकथा प्रात्यक्षिकासहीत त्याला समजावून सांगितली आणि विचारलं, बाबा रे! कधी करू शकशील हे काम तु?! तर तो म्हटला तुमच्या फ्लॅटचा नंबर अजून एक महिन्याने लागेल कारण ह्या आधी ज्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत त्यांची कामं मला करावी लागतील! झालं आता अजून एक महिना म्हणजे '३० वर्किंग डेज' थांबावं लागणारं होतं!

Monday, July 25, 2016

माझं पहिलं घर :) - भाग २

खेल तो अभी शुरू हुआ था!!!

टोकन मनी देऊन मी आणि बाबा परतलो होतो, त्यापुढे रजिस्ट्रेशन ची मोठी कामगिरी पार पाडायची होती.

त्याआधी बाबांनी एका वकिलातर्फे प्रोजेक्टची सगळी कागदपत्रं तपासून खात्री करून घेतली. मग चांगला दिवस बघून आणि रजिस्ट्रार ऑफिसमधून अपॉईंटमेंट घेऊन आम्ही बिल्डर सोबत गेलो आणि काम फत्ते केलं.

आता मला बँकेच्या माणसाकडून लोनची सगळी प्रोसिजर पूर्ण करून पहिला चेक काढून घ्यायचा होता.

घर घेण्याच्या बाबतीत नविन माणसाला कुठे कुठे म्हणून ठेचा लागू शकतात ह्याची सुरूवात माझ्यासाठी इथपासून झाली.

माझं पहिलंच घर म्हणून आणि लग्न झालेलं नसल्यामुळे माझ्या आणि बाबांच्या नावाने घराचं रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं. मी बुक केलेल्या प्रोजेक्टला Axis Bank फायनान्स करत होतं म्हणून मी त्यांच्याकडेच गेले. त्या बँकेच्या माणसाने माझी आणि बाबांची जी काहि कागदपत्रं हवी होती ती सगळी घेतली आणि ११,५००रू. रोख प्रोसेसिंग फीस घेऊन काम पुढे चालू केलं. तोवर इकडे बिल्डरने पहिला चेक काढला.

मी बँकेच्या माणसाला फोन करून चौकशी केली तसं त्याचं उत्तर आलं की, अजून एक आठवडा लागेल पण तुमचं काम होऊन जाईल. मी एका आठवड्याने परत फोन केला पण तेच उत्तर आलं! इकडे बिल्डरला मी रिक्वेस्ट करून मुदत वाढवून घेतली आणि बँकेच्या मागे तगादा लावला. अजून दोन आठवड्याने मला बँकेने मेल करून कळवलं की, माझ्या अॅग्रिमेंटमधे बाबांचं नाव आहे ज्यामुळे पुढे जाऊन लीगल कॉम्पलिकेशन्स होऊ शकतात म्हणून आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही!! मला पहिला झटका बसला!

ते मेल वाचून मी बँकेच्या माणसाला फोन केला तर तो माणूस म्हणतो की हो बरोबर आहे हे! मी म्हटलं, पहिल्या दिवसापासून तुम्हाला माहित होतं की, जर असं माझ्या वडिलांचं नाव असेल तर बँक लोन देणार नाही तर तुम्ही आधीच का नाही मला कल्पना दिली?? तर निर्लज्ज काहिच बोलायला तयार नाही!

मी मुंबईहून तडक पुण्याला आले आणि त्याच्याशी भांडायला लागले पण तो म्हणतो आता एकच पर्याय आहे की, तुमच्या वडिलांना परत एकदा रजिस्ट्रेशन करून फक्त तुमच्या नावे हा फ्लॅट करायला सांगा. पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन म्हणजे सरळ-सरळ ४लाखाचा खर्च!!

तोवर गिफ्ट रजिस्ट्रेशन हा नियम आला नव्हता ज्यामधे फक्त ५००रू. मधे हे काम होतं, तो नियम ह्या घटनेनंतर दोन वर्षांनी अस्तित्वात आला!

त्याची ही मुक्ताफळं ऐकून माझ्या डोक्याला मुंग्याच आल्या! भरीत भर माझे ११,५००रू. जे त्याने प्रोसेसिंग फीस म्हणून घेतले होते ते पण परत मिळणार नव्हते :( :(

तिकडे बिल्डरने दुस-या टप्प्याचं काम पूर्ण झालं म्हणून नविन चेक ची डिमांड केली होती आणि इथे माझं होम लोन होण्याचा पत्ता नव्हता!

काय करावं सुचत नव्हतं, एकदा वाटलं घर नको घ्यायला का? परत वाटलं, रजिस्ट्रेशन पण करून झालंनंतर, आता मागे फिरलो तर नुकसानच आहे फक्त! मग काय परत डोळ्याला पाणी लावण्यापासनं सुरूवात!

इतर बँकांना मेल करून चौकशी चालू केली. सगळ्या बँकांनी एकच टिमकी वाजवली की तुमच्या एकट्याचं किंवा असेल तर नव-याचं नाव लावा! आणि 'एस.बी.आय' बँकेचं तर जगावेगळंच गणित आहे. त्यांच्याकडे जर प्रोजेक्ट लिस्टेड नसेल तर ते एकतर दारात उभं करत नाहीत. पण आपण जोर लावायचं ठरवलं तर सांगतात कमीत-कमी ६ महिने लागतील सगळं व्हायला. असं ऐकल्यावर कोण थांबणार आहे म्हणजे निदान मला तरी शक्य नव्हतं :(

दरम्यान माझं लग्न ठरलं आणि होणा-या नव-याच्या मित्राने 'एल.आय.सी.' फायन्सान मधून होम लोन घेतल्याची बातमी कळाली. लग्गेच तिकडे चौकशी केली आणि चक्क त्या लोकांनी माझं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट बघून 'हो' म्हटलं :) :)

देवच पावला मला तर :) :)

एल.आय.सी. वाल्यांनी शक्य तितक्या लवकर माझी फाईल प्रोसेस केली आणि पहिला चेक निघाला :) :)

पण!

Friday, July 22, 2016

माझं पहिलं घर :) - भाग १

काल एका मैत्रिणीच्या नविन घराबद्दल वाचलं आणि मी घेतलेल्या पहिल्या-वहिल्या घराच्या आठवणी जाग्या झाल्या.

स्वतःचं घर असावं ही माझी इच्छा पहिली नोकरी लागली तेंव्हापासून मनामधे घर करून होती पण, होम लोनचं गणित जुळवून आणे पर्यंत मी तिस-या कंपनीमधे पोहोचले होते.

नुकतीच पुण्यामधून मुंबईला शिफ्ट झाले होते. पण, घर मात्र पुण्यातच घ्यायचं हा निर्णय पक्का करून मी मुंबई-पुणे-मुंबई अशा खेटा दर विकांताला घालायला सुरूवात केली. सुरूवातीला कोथरूड ह्या माझ्या आवडत्या भागामधे बरीच सेकंड हॅण्ड घरं बघितली पण पसंत पडेना, मग बावधन बघितलं. तिथे एक घर बरं वाटलं म्हणून आई-बाबा आणि जिजूला दाखवलं, पण त्या बिल्डिंगमधे एकूण ६च फ्लॅट्स होते तर जिजू म्हटला इथे सोसायटी होऊ शकत नाही त्याकरता कमीत-कमी ९/१२ फ्लॅट्स लागतात.

मग सर्वानुमते मी नवं कोरं-करकरित घर घ्यावं असं ठरलं आणि 'आय.टी.' च्या पंढरी मधे म्हणजे हिंजवडी भागामधे मी शोधमोहिम आखली.

सगळ्यात आधी मी होमवर्क करायचं ठरवलं. वेगवेगळ्या बँकांना संपर्क करून माझ्या पगारानुसार मला किती होम लोन मिळू शकतं ह्याचा अंदाज बांधला.त्यानंतर हिंजवडी भागामधे किती प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि तिथे काय रेट आहे हे विचारून घेतलं. माझ्या बजेटमधे फक्त १बी.एच.के. बसत होता म्हणून मग ती पण चाळणी लावली आणि एक यादी तयार केली.

त्या यादीनुसार दर विकांताला एक किंवा दोन जसं जमेल तसं प्रोजेक्ट्स ला आणि आजूबाजुच्या परिसराला भेट देत गेले.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात आली की जिथे जास्त अ‍ॅमेनिटीझ तिथे सगळ्यात जास्त रेट!

मी थोडा विचार केला आणि घरातल्यांसोबत चर्चा केली की, सोसायटीमधे असणा-या कोण कोणत्या अशा सुविधा खरंच आपण वर्षभर अगदी न-चुकता वापरतो, वापरू शकतो?

अ‍ॅमेनिटी़झ मधे अंतर्भुत केलेल्या गोष्टी - स्विमिंग पूल, जिम, कम्युनिटी हॉल ( ह्यासाठी अ‍ॅनुअल मेंटेनन्स भरायचा असतो आणि त्याव्यतिरिक्त जेंव्हा प्रत्यक्ष वापरायचा असेल तेंव्हा वेगळं ठराविक भाडं सोसायटीला द्यावं लागतं!), प्ले एरिया फॉर चिल्ड्रेन, एखादं मंदिर, जॉगिंग पार्क आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला बेंचेस.ह्याव्यतिरिक्त पण अजून काही ऑप्शन्स असतात जसं मॉल/ हॉटेल्स/ सिनेमा थियटर इ.

इतकी मोठी यादी बघितल्यावर मी एकच विचार केला की, अगदी १००% खात्रीने मी ह्या पैकी एकाही गोष्टीचा उपयोग नजिकच्या काळात करणार नाही मग कशाला उगाच जास्त पैसे मोजा! त्यामुळे यादी मधून अजून १०-१ प्रोजेक्ट्स गळाले.

राहता राहिलेल्या ठिकाणी मी प्रत्यक्ष जाऊन, हिंजवडीमधल्या ऑफिसेस पासून त्या जागांचं अंतर, तिथे असणारी वस्ती, किराणा मालाचा दुकान असं जे त्या घरामधे राहायला आल्यावर अत्यंत निकडीचं असेल असं सगळं बघितलं आणि शेवटी २ प्रोजेक्ट्स फायनल केले.

आता परत एकदा घरच्यांची बैठक बसली आणि त्यातल्या त्यात कुठे बरं घ्यावं घर ह्याचा खल चालू झाला, शेवटी बराच काथ्या कुटल्यावर मी २बी.एच.के. घ्यावा असं ठरलं. पण त्यामुळे बजेट सॉलिड ताणल्या जाणार होतं माझं!

त्यामुळे माझा निर्णय काही पक्का होत नव्हता. मग माझा मामा म्हटला की सुरूवातीचे काही वर्ष जड जाईल तुला इ.एम.आय. भरतांना पण जेंव्हा लग्न होईल, तुझं कुटुंब असेल तेंव्हा घराला अजून एक खोली असती तर बरं झालं असतं असं सतत वाटत राहिल. पण तेंव्हा हे घर वाढवायचा स्कोप नसेल आणि कदाचित हे विकून नविन मोठं घर घ्यायची वेळ येईल!

हं, पॉईंट तो एकदम बरोब्बर था मेरे मामाजी का लेकीन बजेट!!

मग काय, आहेत नाहीत ते सगळे खिसे झटकले आणि वर लोन पण थोडं वाढवून हिम्मत केली आणि एकदाचा फ्लॅट बुक केला!!

त्या दिवशी आपण आयुष्यामधे खुप मोठ्ठं काहितरी अचिव्ह केलं आहे ह्या खुशीत तरंगतच मी मुंबईला पोहोचले :)

लेकीन...

Sunday, July 10, 2016

सॉरी

Gubbare https://www.youtube.com/watch?v=uy4MRiu1-Dw

 आज सकाळी उठल्यावर फेसबुक चाळतांना कोणीतरी शेअर केलेली ही 'गुब्बारे' नावाची शॉर्ट फिल्म बघितली.अजून बघितली नसेल तर नक्की बघा, खुप सुंदर आहे :)

'sorry' - किती छोटासा आणि सोपा शब्द आहे नं पण दुस-याचा विशेषत: नव-याचा किंवा बायकोचा राग आला असतांनाही म्हणायची वेळ आली तर खुप्पच मोठ्ठा आणि अवघड शब्द!!

रोज असं घडतंच की काहीतरी खुट्ट होतं आणि तो तरी नाराज किंवा मी तरी नाराज..मग आॅफिसमधे आहे म्हणून बोलणं होत नाही आणि घरी आल्यावर नेमकं कशामुळे बिनसलं हे शोधायची ताकद उरलेली नसते. मग वाद दुस-या दिवसावर 'हच्चा' म्हणून चढत राहतो अगदी शनवार उगवेपर्यंत!!

वीकांताला निवांत वेळ मिळाला की काहीही कारण चालतं आणि त्या दिवशी झालेल्या एका क्षुल्लक कारणावरून, जे खरंतर मधे कुठेतरी विरघळून गेलेलं असतं, जे भांडण झालं त्याचं चक्रवाढ व्याज उतरवायला.

पण एकदा का वाद घालून झाला की मग सगळं सरळ होतं!!

पण ह्या सगळयामुळे एक पूर्ण आठवडा घरात अबोलीच्या फुलांचा सडा पडलेला असतो, एकमेकांसोबतचे कितीतरी महत्वाचे क्षण हरवून गेलेले असतात..मग वाटतं एकदा 'साॅरी' म्हटलं असतं तर....

Sunday, July 3, 2016

पावसाळी उकळ्या :p

बाहेर पडणारा सुखद पाऊस..भान हरपुन बघणारी मी, अंगावर शहारे उठवणारा गार वारा..अन.. अलगद मला कवेत घेणारी तुझी ऊबदार मिठी..ह्यालाच म्हणतात सुख :) :)

पावसाच्या एका थेंबाने मनातल्या डोहावर असंख्य आठवण-लहरी उठतात..
एक दुस-यात मिसळते आणि वलय मोठं होत होत ह्या क्षणाला येऊन भिडतं..
पाऊस फार लब्बाड आहे :( त्याच्या बरसण्यासोबत तुझी आठवण येणं अगदी क्रमप्राप्त!
अन मग सुरु होते जीवघेणी स्पर्धा..त्याच्या बरसण्याची आणि मी तुझ्या आठवणीत जळत राहण्याची

पाऊस. पाऊस. पाऊस.
नुसतं बघत बसावं त्याचं मनमोहक नृत्य..
एका लयीत येणारी संततधार किंवा विजेसोबत केलेलं तांडव..
गात्र सुखविणारा पण तितकाच छळणारा पाऊस..
झाडा-पानांवरची धूळ सारत लख्ख करणारा आणि मनात मात्र आठवणींचा काळोख भरणारा..
अतीव उत्साहाने धरित्रिला बिलगणारा आणि तुझा-माझा विरह अधोरेखित करणारा..फार वाईट असतो हा पाऊस..

खिडकीच्या तावदानांवर थपडा मारत हाका मारतोय बाहेरचा पाऊस पण रागावली आहे मी त्याच्यावर..का नेहमी असा वागतो तो..जेंव्हा तू सोबत नसतोस तेंव्हाच का येतो :/ त्याला चांगलंच माहित झालं आहे कि मी त्याच्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते म्हणूनच कि काय असा क्षण साधून येतो हल्ली...

पावसाला ना शिक्षा करायला हवी असा नेमक्या कातरवेळी का येतो तो..सगळ्या सृष्टीवर निळी जादू करतो..घरभर निळसर प्रकाश भरून मलाहि त्या निळाईत भिजवून टाकतो..खिडकीपाशी येऊन मी भान हरखून त्याला बघत राहते आणि तो माझ्याकडे बघून फक्त हसतो..कदाचित मला वेडू म्हणत असेल मनातल्या मनात..कारण.. त्याच्या रुपात मला तुझीच छबि दिसते हल्ली ..तसं म्हटलं तर पावसाचा माझ्यावर पहिला हक्क कारण तुला भेटण्याअगोदर त्यानेच तर मला प्रेम करायला शिकवलं..निस्सिम प्रेम..जे त्याचं धरित्रिवर आहे..कितीही काहीही झालं तरी त्याचं येणं..तिला चिंब भिजवून कवेत घेणं..तिच्या सौंदर्याला खुलवणं हे ठरलेलं आहे..तुम्हा दोघांमधे हे साम्य नक्कीच आहे..

पावसाचा जोर ओसरुन तो शांतपणे काळ्याकभिन्न ढगांमधे विसावला आहे..सभोवतालचा निसर्ग तृप्त तना-मनाने स्तब्ध झाला आहे..शांतता काठोकाठ भरून उरली आहे पण माझ्या मनाची कवाडं घट्ट बंद झाली आहेत. कोणत्याही परक्या गोष्टीला, विचारांना आत येण्याची मुभाच नाही जणू ..
आत प्रचंड उलथा-पालथ सुरु आहे, मनाचा आक्रोश चालू आहे..तुझ्या सगळ्या आठवणींनी थैमान मांडलंय..तुझा स्पर्श, तुझे शब्द..तुझं हसणं आणि आत्ता माझ्यापासून दूर असणं..असह्य होतंय मला..हतबलता आली आहे गात्रांना आणि मनाला शीण..तुझं माझ्यात असणं पण माझ्या मनाला दिलासा देत नाही..नाही शक्य मला तुझ्यापासून दूर राहणं निदान ह्या अशा क्षणी!!