Friday, July 29, 2016

माझं पहिलं घर :) - भाग ४

आता तर माझा घराच्या बाबतीतला उत्साह पूर्णपणे मावळला होता म्हणून मी एक महिना काय दोन महिने होत आले तरी जायचं नाव घेत नव्हते. शेवटी नवरा म्हटला की जे असेल ते असेल बघून तर येऊ काय परिस्थिती आहे. हो-नाही करत शेवटी मी तयार झाले आणि गेलो आम्ही बघायला.

आश्चर्य म्हणजे घराचं सगळं काम व्यवस्थित करून ठेवलेलं होतं :)

तरी माझी खात्री करून घेण्याकरिता मी पुन्हा एकदा कसून तपासणी केली आणि समाधानाचा सुस्कारा सोडला, हाश! झालं बाबा माझं घर तय्यार :)

हं लागले १८ महिने पण झालं एकदाचं :)

मग बिल्डरला तारीख कळवली आणि आई-बाबा, भाऊ, मी आणि नवरा आम्ही किल्ली घ्यायला आणि घरामधे कलश ठेवायला गेलो.

घराच्या दारावर स्वतःच्या नावाची पाटी बघून इतकं भरून आलं ना एक क्षण :) आनंदाश्रू दाटून आले होते आणि नव-याच्या चेह-यावर सुद्धा माझ्याबद्दल दिसून आलेला अभिमान अजूनच सुखावून गेला :)

स्वयंपाकघरामधे गणपती बाप्पाचा फोटो आणि कलश ठेऊन पुजा केली.देवाला साष्टांग नमस्कार करून आधी थॅन्क्स म्हटलं आणि आता घराची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर असं बजावलं :)

घरात फिरून मस्त फोटो-बिटो काढले आणि समाधानाने परत आलो.

आता नविन घरामधे कधी जायचं रहायला ह्याची स्वप्न रंगवायला मी आणि नवरा सज्ज झालो होतो पण!

हो ना! हा 'पण' काही माझी पाठ सोडतच नव्हता :(

नविन घर म्हटल्यावर फर्निचर केल्याशिवाय राहायला कसं जाणार. बरं नुसतं घरामधलं फर्निचर करून उपयोग नव्हता. घर पहिल्या मजल्यावर असल्यामुळे तीन बॅल्कनीज ना जाळी लावावी लागणार होती, सेफ्टी डोअर करावं लागणार होतं. आणि सर्वात महत्त्वाचं होतं ह्या सगळ्याकरता पैसे कसे उभे करायचे!!

एक पर्याय होता परत एकदा एल.आय.सी. कडून फर्निचर साठी लोन घ्यायचं. चौकशीअंती कळालं की, लगेच असं लोन नाही मिळत निदान एक वर्ष थांबावं लागेल. दुसरा पर्याय म्हणजे पर्सनल लोन काढायचं.

हम्म! पण आधी नेमका किती खर्च येईल हे काढायचं ठरवलं. माझ्या ओळखीतल्या एका आर्किटेक्टला आम्ही घर दाखवलं आणि जुजबी फनिर्चर करून घ्यायला किती खर्च येऊ शकतो हे विचारलं. त्याने साधा सरळ हिशोब सांगितला - प्रत्येक खोली निदान १लाख रूपये. ह्याव्यतिरिक्त सेफ्टी डोअर आणि तीन बॉक्स जाळ्या ह्याला अजून पाऊण-एक लाख लागणार. म्हणजे काय तर मला अजून ५लाखाचं कर्ज डोक्यावर घ्यावं लागणार होतं! लोन घ्यावं का परत हा विचार एकीकडे चालू होता आणि दुसरीकडे बिल्डरकडून पझेशन नंतर जी काही महत्त्वाची कागदपत्रं यायला हवी होती त्याची चौकशी करावी म्हणून एकदा भेटायला गेले.

सहज त्याला म्हटलं, की आता माझा फर्निचर करायचा विचार आहे आणि सेफ्टी डोअर वगैरे पण करणार आहे. तर तो म्हटला, घराच्या आतमधे काय हवं ते करा पण सेफ्टी डोअर किंवा बॉक्स जाळी वगैरे काहीही करायच्या भानगडीत पडू नका कारण अजून Q.C. / C.C - क्वालिटी आणि कम्पलिशन सर्टिफिकेट आलेलं नाही!

आता ही काय नविन भानगड असं विचारल्यावर म्हणतो - घर / बिल्डींग बांधून झाली की महानगरपालिका / ग्रामपंचायत येऊन पाहणी करते आणि मग 'ही वास्तू राहण्यालायक आहे' असं सर्टिफिकेट देते त्यानंतरच तुम्ही रहायला जाऊ शकता.

पुढचा ऑब्वियस प्रश्न होता की, हे सगळं कधी घडणार? किती वर्षांनी मिळणार? त्यावर त्याने अगदी सुंदर स्मितहास्य केलं आणि म्हटला की, मी माझ्यापरिने प्रयत्न करत आहे तरी अजून ६ महिने मिळेल असं वाटत नाही.

६ महिने! आता परत थांबणं आलं. ह्याव्यतिरिक्त अजून एक अडचण होती ती म्हणजे माझं ऑफिस हिंजवडी च्या अगदी विरूध्द टोकाला म्हणजे मगरपट्टामधे होतं. जर इथे रहायला आलो तर रोज मला निदान ५०कि.मी. स्वतः गाडी हाकत जावं लागणार होतं!

सरतेशेवटी आम्ही घर भाडेतत्त्वावर द्यायचं ठरवलं आणि तशी जाहिरात दिली. १महिन्यात आम्हांला हिंजवडी भागामधे आय.टी. कंपनी मधे काम करणारी ५ मुलं भेटली आणि ११ महिन्याच्या करारानुसार आम्ही त्यांना घर रहायला दिलं.

खरं तर जीव थोडाथोडा होत होता, स्वतःचं घर ते पण इतक्या महत प्रयासाने मिळाल्यावर असं दुस-याला रहायला देतांना वाईट वाटत होतं पण पर्याय नव्हता. घर नुसतं रिकामं ठेऊन खराब झालं असतं आणि दुसरं म्हणजे आम्ही सुध्दा भाडेतत्त्वावर राहत होतो तर तितकाच आमचा खर्च भागला असता.

एकीकडे घराचा हा प्रश्न सोडवून मी परत सहा महिन्यांनी बिल्डरकडे चौकशी केली की, त्या सर्टिफिकेटच काय झालं. तर त्याने कारणं द्यायला सुरूवात केली. तोवर इकडे बिल्डींगमधे बरीच मंडळी रहायला आली होती.व्हॉट्स-अप ग्रुप बनवून आम्ही सगळे एकमेकांना अडचणी - अनुभव सांगत होतो. प्रत्येकजण कम्प्लिशन सर्टिफिकेट साठी थांबला होता. पण बिल्डर मात्र सगळ्यांना वेगवेगळी कारणं देऊन टोलवत होता.

शेवटी एकदा तुकडा पाडायचा म्हणून मिटींग बोलावली तर त्याने स्पष्टपणे सांगितलं की, माझा प्रोजेक्ट अजून पूर्ण झालेला नाही, जोवर ह्या बिल्डींगच्या आवारात अशीच एक नविन बिल्डींग उभी राहत नाही तोवर मी ग्रामपंचायती मधे सोसायटी फॉर्मेशन साठी अर्ज करणार नाही आणि तोवर ते लोक काहीही बघायला किंवा सर्टिफिकेट द्यायला तयार होणार नाहीत!

झालं! आता आम्ही सगळेच एका नव्या चक्रामधे अडकले गेलो होतो!

आज ३ वर्षे झाली हा तिढा अजुनही सुटलेला नाही..

No comments:

Post a Comment