Thursday, July 28, 2016

माझं पहिलं घर :) - भाग ३

दोन महिने उशीर झाला होता म्हणून बिल्डरने मला दर दिवसाचं व्याज लावलं आणि सरळ सरळ १लाख रूपये मला जास्त भरायला सांगितले :(

आता तर मी रडायचंच बाकी ठेवलं होतं पण नव-याने मला धीर दिला आणि पझेशनच्या वेळेस बघू काय करायचं ते असं ठरलं.

पुढे मग बिल्डरच्या डिमांड्सना 'एल.आय.सी.' कडून चोखपणे चेक्स मिळत गेले.

बिल्डर ने छातीठोकपणे सांगितलं होतं ( जे प्रत्येकच बिल्डर सांगतो ) की ८ महिन्यांमधे पझेशन देतो! पण १० महिने उलटून गेले तरी काम पूर्ण होता दिसत नव्हतं! मी परत एकदा बिल्डरच्या ऑफिसच्या वा-या करायला सुरूवात केली पण हाय रे कर्मा! सगळं मुसळ केरात!

सरतेशेवटी १५ महिन्यांनी मला घराचा ताबा मिळू शकतो असं बिल्डरचं ई-मेल आलं.

आम्ही दोघे धावतच घराची परिस्थिती बघायला गेलो आणि भली-मोठ्ठी यादीच निघाली अव्यवस्थित कामांची!

सगळ्या भिंतींवर असंख्य भेगा पडल्या होत्या, मुख्य दरवाजा तिरपा लावला होता, खिडक्यांच्या फ्रेम्स आणि भिंत ह्यामधे असलेली जागा व्हाईट सिमेंटने भरलीच नव्हती, असे एक ना अनेक प्रश्न समोर होते.असं असतांना मी पझेशन घेणं शक्यच नव्हतं!

मग काय परत एकदा बिल्डरच्या मागे धावणं चालू केलं. साईट वरच्या इंजिनीयर ला सगळं दाखवलं आणि किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलं तर म्हणतो,'दोन दिवसात करून देतो बघा मॅडम तुम्हांला, काही काळजीच नका करू तुम्ही!'त्याचा आवेश बघून आम्हाला वाटलं खरंच करेल हा.

पण इतक्या सहजासहजी मला घर मिळावं असं बहुतेक नियतीला मंजूर नव्हतं ;)

अगदीच दोन नाही पण नेक्स्ट विकांताला आम्ही गेलो तर कळालं, ज्याने इतक्या बिनधास्तपणे आम्हांला 'दोनच दिवसाचं' आश्वासन दिलं होतं तो त्याच दिवशी नोकरी सोडून निघून गेला होता!

सगळी मजाच मजा चालू होती मला तर हसावं की रडावं तेच कळत नव्हतं!

मग त्या दिवशी जो नविन साईट इंजिनीयर होता त्याला शोधून आणला, परत सगळी रामकथा प्रात्यक्षिकासहीत त्याला समजावून सांगितली आणि विचारलं, बाबा रे! कधी करू शकशील हे काम तु?! तर तो म्हटला तुमच्या फ्लॅटचा नंबर अजून एक महिन्याने लागेल कारण ह्या आधी ज्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत त्यांची कामं मला करावी लागतील! झालं आता अजून एक महिना म्हणजे '३० वर्किंग डेज' थांबावं लागणारं होतं!

No comments:

Post a Comment