Friday, July 22, 2016

माझं पहिलं घर :) - भाग १

काल एका मैत्रिणीच्या नविन घराबद्दल वाचलं आणि मी घेतलेल्या पहिल्या-वहिल्या घराच्या आठवणी जाग्या झाल्या.

स्वतःचं घर असावं ही माझी इच्छा पहिली नोकरी लागली तेंव्हापासून मनामधे घर करून होती पण, होम लोनचं गणित जुळवून आणे पर्यंत मी तिस-या कंपनीमधे पोहोचले होते.

नुकतीच पुण्यामधून मुंबईला शिफ्ट झाले होते. पण, घर मात्र पुण्यातच घ्यायचं हा निर्णय पक्का करून मी मुंबई-पुणे-मुंबई अशा खेटा दर विकांताला घालायला सुरूवात केली. सुरूवातीला कोथरूड ह्या माझ्या आवडत्या भागामधे बरीच सेकंड हॅण्ड घरं बघितली पण पसंत पडेना, मग बावधन बघितलं. तिथे एक घर बरं वाटलं म्हणून आई-बाबा आणि जिजूला दाखवलं, पण त्या बिल्डिंगमधे एकूण ६च फ्लॅट्स होते तर जिजू म्हटला इथे सोसायटी होऊ शकत नाही त्याकरता कमीत-कमी ९/१२ फ्लॅट्स लागतात.

मग सर्वानुमते मी नवं कोरं-करकरित घर घ्यावं असं ठरलं आणि 'आय.टी.' च्या पंढरी मधे म्हणजे हिंजवडी भागामधे मी शोधमोहिम आखली.

सगळ्यात आधी मी होमवर्क करायचं ठरवलं. वेगवेगळ्या बँकांना संपर्क करून माझ्या पगारानुसार मला किती होम लोन मिळू शकतं ह्याचा अंदाज बांधला.त्यानंतर हिंजवडी भागामधे किती प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि तिथे काय रेट आहे हे विचारून घेतलं. माझ्या बजेटमधे फक्त १बी.एच.के. बसत होता म्हणून मग ती पण चाळणी लावली आणि एक यादी तयार केली.

त्या यादीनुसार दर विकांताला एक किंवा दोन जसं जमेल तसं प्रोजेक्ट्स ला आणि आजूबाजुच्या परिसराला भेट देत गेले.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात आली की जिथे जास्त अ‍ॅमेनिटीझ तिथे सगळ्यात जास्त रेट!

मी थोडा विचार केला आणि घरातल्यांसोबत चर्चा केली की, सोसायटीमधे असणा-या कोण कोणत्या अशा सुविधा खरंच आपण वर्षभर अगदी न-चुकता वापरतो, वापरू शकतो?

अ‍ॅमेनिटी़झ मधे अंतर्भुत केलेल्या गोष्टी - स्विमिंग पूल, जिम, कम्युनिटी हॉल ( ह्यासाठी अ‍ॅनुअल मेंटेनन्स भरायचा असतो आणि त्याव्यतिरिक्त जेंव्हा प्रत्यक्ष वापरायचा असेल तेंव्हा वेगळं ठराविक भाडं सोसायटीला द्यावं लागतं!), प्ले एरिया फॉर चिल्ड्रेन, एखादं मंदिर, जॉगिंग पार्क आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला बेंचेस.ह्याव्यतिरिक्त पण अजून काही ऑप्शन्स असतात जसं मॉल/ हॉटेल्स/ सिनेमा थियटर इ.

इतकी मोठी यादी बघितल्यावर मी एकच विचार केला की, अगदी १००% खात्रीने मी ह्या पैकी एकाही गोष्टीचा उपयोग नजिकच्या काळात करणार नाही मग कशाला उगाच जास्त पैसे मोजा! त्यामुळे यादी मधून अजून १०-१ प्रोजेक्ट्स गळाले.

राहता राहिलेल्या ठिकाणी मी प्रत्यक्ष जाऊन, हिंजवडीमधल्या ऑफिसेस पासून त्या जागांचं अंतर, तिथे असणारी वस्ती, किराणा मालाचा दुकान असं जे त्या घरामधे राहायला आल्यावर अत्यंत निकडीचं असेल असं सगळं बघितलं आणि शेवटी २ प्रोजेक्ट्स फायनल केले.

आता परत एकदा घरच्यांची बैठक बसली आणि त्यातल्या त्यात कुठे बरं घ्यावं घर ह्याचा खल चालू झाला, शेवटी बराच काथ्या कुटल्यावर मी २बी.एच.के. घ्यावा असं ठरलं. पण त्यामुळे बजेट सॉलिड ताणल्या जाणार होतं माझं!

त्यामुळे माझा निर्णय काही पक्का होत नव्हता. मग माझा मामा म्हटला की सुरूवातीचे काही वर्ष जड जाईल तुला इ.एम.आय. भरतांना पण जेंव्हा लग्न होईल, तुझं कुटुंब असेल तेंव्हा घराला अजून एक खोली असती तर बरं झालं असतं असं सतत वाटत राहिल. पण तेंव्हा हे घर वाढवायचा स्कोप नसेल आणि कदाचित हे विकून नविन मोठं घर घ्यायची वेळ येईल!

हं, पॉईंट तो एकदम बरोब्बर था मेरे मामाजी का लेकीन बजेट!!

मग काय, आहेत नाहीत ते सगळे खिसे झटकले आणि वर लोन पण थोडं वाढवून हिम्मत केली आणि एकदाचा फ्लॅट बुक केला!!

त्या दिवशी आपण आयुष्यामधे खुप मोठ्ठं काहितरी अचिव्ह केलं आहे ह्या खुशीत तरंगतच मी मुंबईला पोहोचले :)

लेकीन...

No comments:

Post a Comment