Sunday, July 3, 2016

पावसाळी उकळ्या :p

बाहेर पडणारा सुखद पाऊस..भान हरपुन बघणारी मी, अंगावर शहारे उठवणारा गार वारा..अन.. अलगद मला कवेत घेणारी तुझी ऊबदार मिठी..ह्यालाच म्हणतात सुख :) :)

पावसाच्या एका थेंबाने मनातल्या डोहावर असंख्य आठवण-लहरी उठतात..
एक दुस-यात मिसळते आणि वलय मोठं होत होत ह्या क्षणाला येऊन भिडतं..
पाऊस फार लब्बाड आहे :( त्याच्या बरसण्यासोबत तुझी आठवण येणं अगदी क्रमप्राप्त!
अन मग सुरु होते जीवघेणी स्पर्धा..त्याच्या बरसण्याची आणि मी तुझ्या आठवणीत जळत राहण्याची

पाऊस. पाऊस. पाऊस.
नुसतं बघत बसावं त्याचं मनमोहक नृत्य..
एका लयीत येणारी संततधार किंवा विजेसोबत केलेलं तांडव..
गात्र सुखविणारा पण तितकाच छळणारा पाऊस..
झाडा-पानांवरची धूळ सारत लख्ख करणारा आणि मनात मात्र आठवणींचा काळोख भरणारा..
अतीव उत्साहाने धरित्रिला बिलगणारा आणि तुझा-माझा विरह अधोरेखित करणारा..फार वाईट असतो हा पाऊस..

खिडकीच्या तावदानांवर थपडा मारत हाका मारतोय बाहेरचा पाऊस पण रागावली आहे मी त्याच्यावर..का नेहमी असा वागतो तो..जेंव्हा तू सोबत नसतोस तेंव्हाच का येतो :/ त्याला चांगलंच माहित झालं आहे कि मी त्याच्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते म्हणूनच कि काय असा क्षण साधून येतो हल्ली...

पावसाला ना शिक्षा करायला हवी असा नेमक्या कातरवेळी का येतो तो..सगळ्या सृष्टीवर निळी जादू करतो..घरभर निळसर प्रकाश भरून मलाहि त्या निळाईत भिजवून टाकतो..खिडकीपाशी येऊन मी भान हरखून त्याला बघत राहते आणि तो माझ्याकडे बघून फक्त हसतो..कदाचित मला वेडू म्हणत असेल मनातल्या मनात..कारण.. त्याच्या रुपात मला तुझीच छबि दिसते हल्ली ..तसं म्हटलं तर पावसाचा माझ्यावर पहिला हक्क कारण तुला भेटण्याअगोदर त्यानेच तर मला प्रेम करायला शिकवलं..निस्सिम प्रेम..जे त्याचं धरित्रिवर आहे..कितीही काहीही झालं तरी त्याचं येणं..तिला चिंब भिजवून कवेत घेणं..तिच्या सौंदर्याला खुलवणं हे ठरलेलं आहे..तुम्हा दोघांमधे हे साम्य नक्कीच आहे..

पावसाचा जोर ओसरुन तो शांतपणे काळ्याकभिन्न ढगांमधे विसावला आहे..सभोवतालचा निसर्ग तृप्त तना-मनाने स्तब्ध झाला आहे..शांतता काठोकाठ भरून उरली आहे पण माझ्या मनाची कवाडं घट्ट बंद झाली आहेत. कोणत्याही परक्या गोष्टीला, विचारांना आत येण्याची मुभाच नाही जणू ..
आत प्रचंड उलथा-पालथ सुरु आहे, मनाचा आक्रोश चालू आहे..तुझ्या सगळ्या आठवणींनी थैमान मांडलंय..तुझा स्पर्श, तुझे शब्द..तुझं हसणं आणि आत्ता माझ्यापासून दूर असणं..असह्य होतंय मला..हतबलता आली आहे गात्रांना आणि मनाला शीण..तुझं माझ्यात असणं पण माझ्या मनाला दिलासा देत नाही..नाही शक्य मला तुझ्यापासून दूर राहणं निदान ह्या अशा क्षणी!!

No comments:

Post a Comment