Monday, June 26, 2017

ॐकार

आज सकाळी ॐकार म्हणून झाल्यावर डोळे बंद करुन बसले होते काही क्षण आणि अचानक असं वाटलं की मी माझ्या शाळेच्या पटांगणात वर्गाच्या रांगेत बसलेली आहे :)
रोज सकाळी प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणून झाल्यावर सगळ्यांना आहे त्या जागेवर मातीमधे बसावं लागायचं. माइकवरुन एक मॅडम सुचना द्यायला सुरूवात करायच्या आणि त्यानुसार आम्ही डोळे मिटून, पाठीचा कणा ताठ करुन ॐकार म्हणायला सुरूवात करायचो.जेंव्हा पटांगणातल्या सगळ्या विद्यार्थिनी ॐकार म्हणत असायच्या तेंव्हा अगदी श्वास संपेपर्यंत होणारा म् चा उच्चार अजूनही कानात घुमत आहे.:):)
मस्त वाटलं खूप वर्षांनी शाळेची अशी आठवण झाली

Wednesday, June 21, 2017

आहे हे असं आहे - गौरी देशपांडे

हुश्श!!
संपवलं एकदाचं 'आहे हे असं आहे' पुस्तक मी!!
गौरी देशपांडे यांचं हे दुसरं पुस्तक वाचलं आणि कदाचित परत त्यांच्या वाटेला जाणार नाही असं वाटतं. मुक्काम कादंबरी वाचली तेंव्हा अगदी पुसटसा अंदाज आला होता आणि वाचतांना काही ठिकाणी बिचकायला झालं होतं. पण जेंव्हा आहे हे असं आहे हा कथासंग्रह हातात घेतला तेंव्हा पहिलीच कथा वाचल्यावर धाप लागली. डोळे नुसतेच फिरत होते अक्षरांवरुन मेंदूला काही समजतच नव्हतं!! किती अबस्ट्रॅक्ट आहे हे लिखाण बापरे! पुढच्या २-३-४ कथा वाचल्या तेंव्हा तर भोवळ, शीण, मेंदूला झिणझिण्या असे सगळे प्रकार झाले आणि मी का विकत घेतलं हे पुस्तक असा आयुष्यात पहिल्यांदाच पश्चात्ताप झाला मला 😳 मी अगदी सामान्य वाचक आहे ( हो हो मला फक्त वपुच कळतात आणि आवडतातही) म्हणून दुसरं काही वाचूच नये असं नाही ना म्हणून हात घातला आणि थेट चटकाच बसला नं!!

काही वर्षांपूर्वी असंच सुनिता देशपांडे यांचं कुठलसं पुस्तक वाचलेलं बहुतेक,'आहे मनोहर तरी' तेंव्हाही त्यातलं बरंसचं माझ्या सामान्य बुद्धीच्या आवाक्याबाहेरचं वाटलं मला:(

मी आजवर जे अगदी साधं, सोपं, गोड-गोड लिखाण वाचलं आहे त्याच्या अगदी विरूद्ध पण धारदार असं सत्य 'आहे..' मधल्या काही कथांमधून वाचायला मिळालं, ते पटलं पण तरी पचवता आलं नाही असं काहीसं झालं बहुतेक. पण विक्षिप्तपणाची झाक मात्र दोन्ही पुस्तकामधे बहुतांश वेळा जाणवली.
चूक की बरोबर असं काही पुस्तकाबद्दल असतं का हे मला नाही कळत पण हे पुस्तक मला पेलवलं नाही इतकंच आत्ता तरी वाटत आहे. त्यातलं लिखाण जाणिवेच्या पातळीवर तरी नाही पोहोचलं पण नकळतपणे काही जर आत झिरपलं असेल तर पुढे क्वचित उलगडा होईलही आणि न-जाणो मला परत एकदा वाचायची इच्छा होऊन आवडेलही

Saturday, June 10, 2017

वर्क-आऊट

पर्वती उतरतांना लोक कसले भन्नाट प्रकार करतात!
जिथे मला साधं चालत उतरता येत नव्हतं रेलिंग ला धरल्याशिवाय तिथे लोक उलट चालत येत होते!! आणि असं करणारे लोक वयस्क किंवा ४०+च असावेत, मानलं ब्वा!!
आज आम्हा आय.टी. वाल्यांचा सुट्टीचा वार तेंव्हा विचार केला जरा पर्वतीवर चक्कर मारायला जावं. सकाळी छान वारा सुटला होता, काही ढग दिसत होते पण पाऊस येणार नाही हे नक्की कळत होतं त्यामुळे छत्री न-घेताच गेले.

सुरूवातीला ४पाय-या चढले नसेन तर पायात गोळे यायला लागले :( मग सगळ्यात आधी तर आॅफिसमधे बैठं काम आहे त्याचा उद्धार करुन झाला, मग ४ महिने केलेलं जिम पाण्यात गेलं हा विचार येऊन मन जरा खट्टू झालं. रोज संध्याकाळी कँटीन मधे खाल्लं जाणार जंक फुड आठवून थोडी लाज वाटली पण मी नेटाने पुढे जात राहिले. ह्या सगळ्या विचारांमधे अर्ध-अधिक अंतर पार झालं होतं. मग एक ग्रुप दिसला, कदाचित एखाद्या शासकीय परिक्षेसाठी फिजिकल फिटनेस वाढवायची तयारी करत असावेत असं वाटलं. त्यांचा ट्रेनर त्यांना पर्वतीच्या पाय-यांवर हं, पर्वतीच्या पाय-यांवर धावायला लावत होता!! इथे मला चढतांना धड चालता येत नव्हतं ते लोक तर धावत होते आणि एका मागोमाग चालू होतं त्यांचं!! ते बघून मग मला पण थोडा हुरुप आला आणि मी १-२ करत चांगलं ३ वेळेस वर-खाली केलं :) :) खाली येतांना धावत पण कसाबसा तोल सांभाळत येत होते दोनेक मिनिटात पण वर चढायचा वेळ मात्र प्रत्येक खेपेला वाढत होता :|

पण ठीके पहिल्यांदाच असा काहीतरी प्रयोग मी केला होता.
तीन प्रदक्षिणा घातल्यावर इतकं मस्त वाटलं ना आणि मुख्य म्हणजे पाय दुखत आहेत असं अज्जिबात जाणवत नाही :) :) मस्त कार्डिओ वर्क-आऊट झालं आज,शाब्बाश रे पठ्ठे :):)

Thursday, June 8, 2017

माहितीचा महासागर

मी फेबु वापरण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ब-याच लोकांचे चांगले लेख इथे अगदी बिनदिक्कत वाचायला मिळतात आणि जर मला काही सुचलं तर तेही सहज मांडता येतं. ह्या सवयी मुळे मी काही लोकांना फ्रेंडरिक्वेस्ट केली आणि नित्यनेमाने त्यांचे येणारे लेख, दोनोळी, चारोळी असे लेखन-प्रकार वाचते आहे.
जेंव्हा त्यातल्या काही गोष्टी आवडल्या त्या फेबुचा शेअर पर्याय वापरून लगेच माझ्या वाॅलवर शेअर पण केल्या. ह्या आॅप्शनमधे ज्याचं ते लिखाण किंवा फोटो किंवा काहीही कंटेन्ट असेल ते नावासकट येतं म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रोफाईलचं जे नाव असेल त्यासकट, तुम्हाला तर माहित आहेच.

तर असंच मी एका प्रतिथयश लेखिकेचं फेबुचं लिखाण ब-याच काळपासून वाचत आहे, कधी जर आवडलं तर लाइक करते. पण आज मला दुर्बुद्धी झाली आणि त्यांची परवानगी न-घेता मी एक पोस्ट शेयर केली ज्यामधे त्यांचं नाव दिसत होतं बरंका, मी अज्जिबात काॅपी-पेस्ट करुन माझ्या नावावर खपवलं नाही! पण तरी त्यांना राग आला आणि त्यांनी मला ब्लाॅक केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यांची परवानगी घेऊन ते शेयर करायला हवं होतं, ठीक आहे. मी मान्य करते की त्यांना न-विचारता ते शेयर केलं पण..जाने दो, त्यांना पूर्ण हक्क आहे मला लिस्ट मधून उडवून टाकण्याचा,असो.

फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्स-अप, गेल्याजन्मीचं आॅर्कुट, तुमच्या ब्लाॅगसाईट्स किंवा एकूणच इंटरनेट हा माहितीचा महासागर आहे. ह्यामधे तुम्ही एखाद्या ओळीची होडी किंवा भलामोठ्ठा लेख असलेलं जहाज एकदा सोडलं की पुढे तुम्ही त्याची दुस-या कोणाच्या वाॅल किंवा लेखामधे किंवा अजून कुठेही जाण्याची दिशा ठरवू शकत नाही. थोडक्यात काय तर तुमचा त्यावर नावापुरता पण हक्क उरत नाही!!

ती पोस्ट नानाविध पद्धतीने तुमचं नाव सपशेल पुसून उपलब्ध असणाऱ्या एक किंवा अनेक माध्यमातून कशाप्रकारे एखादी व्यक्ती वापरून स्वतःचा फायदा करुन घेईल हे सांगणं केवळ अशक्य आहे!!

मला आठवतं मी ब्लाॅग्स लिहायला नुकतीच सुरुवात केली होती.एका ब्लाॅगर्स कट्ट्याला मला एका साईटबद्दल कळालं ज्यावर तुमचं लिखाण कुठे दुसरीकडे वापरलं गेलं आहे का, हे तपासता येत होतं. सुरूवातीचे काही दिवस मी अगदी उत्साहाने त्यात तपासायचे नंतर नंतर वेळ मिळेनासा झाला आणि लिखाण वाढल्यामुळे ते कौतुकही गळून पडलं. मग काही दिवसांनी माझं ई-बुक प्रसिद्ध झालं आणि ते इंटरनेट वर फ्री उपलब्ध आहे.

तेंव्हा मला हा साक्षात्कार झाला की आता जर मी स्वतःहून माझं लिखाण प्रसिद्ध केलं आहे तर ते काॅपी करुन कोणी वापरण्यावर मी कोणताच वचक ठेऊ शकत नाही. अर्थात माझं लिखाण इतकं पण ग्रेट नाही की कोणी काॅपी करायचे कष्ट घेईल, पण तरी मी ही खूणगाठ स्वतःशी बांधून घेतली आणि लिहीत राहिले.
हां तर मुद्दा असा आहे की जर कोणी कधी माझं लिखाण (चुकून) शेअर केलंच तर मला तरी राग-बिग काही यायचा नाही ब्वा :)

Friday, June 2, 2017

#आठवणी_लहानपणाच्या - कांदा

एका बुक्कीत कांदा फोडता येतो का तुम्हाला? काय चव लागते माहित आहे अशा कांद्याची, एकदम रसरशीत , थोडा तिखट थोडा गोडसर वाह्ह : :) सुरीने बारीक चिरलेला किंवा साधे चार काप केलेला कांदा उभ्या जन्मात कधी इतका टेस्टी लागणार नाही :D
लहानपणी आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो की माझे बाबा किंवा मावशी असा कांदा फोडायचे मग मी पण शिकले :) आणि तेंव्हा पिल्लू कांदे पण जास्त मिळायचे आजच्या मानाने त्यामुळे हाताला कधी दुखापत झाल्याचं आठवत नाही.
भाकरी - पिठलं किंवा हरभ-याची भाजी आणि भाकरी असा बेत असेल तेंव्हा तर अशा बुक्कीने फोडलेल्या कांद्याशिवाय चव पूर्णच व्हायची नाही.जेवायला बसल्यावर खूप भूक लागली असतांना जर पोळी किंवा भाकरी बनायला वेळ लागत असेल तर असा कांदा आणि त्यावर थोडंसं मीठ हे पण फार यम्म लागतं हं, चाखून बघा:)
#आठवणी_लहानपणाच्या