मी फेबु वापरण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ब-याच लोकांचे चांगले लेख इथे अगदी बिनदिक्कत वाचायला मिळतात आणि जर मला काही सुचलं तर तेही सहज मांडता येतं. ह्या सवयी मुळे मी काही लोकांना फ्रेंडरिक्वेस्ट केली आणि नित्यनेमाने त्यांचे येणारे लेख, दोनोळी, चारोळी असे लेखन-प्रकार वाचते आहे.
जेंव्हा त्यातल्या काही गोष्टी आवडल्या त्या फेबुचा शेअर पर्याय वापरून लगेच माझ्या वाॅलवर शेअर पण केल्या. ह्या आॅप्शनमधे ज्याचं ते लिखाण किंवा फोटो किंवा काहीही कंटेन्ट असेल ते नावासकट येतं म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रोफाईलचं जे नाव असेल त्यासकट, तुम्हाला तर माहित आहेच.
तर असंच मी एका प्रतिथयश लेखिकेचं फेबुचं लिखाण ब-याच काळपासून वाचत आहे, कधी जर आवडलं तर लाइक करते. पण आज मला दुर्बुद्धी झाली आणि त्यांची परवानगी न-घेता मी एक पोस्ट शेयर केली ज्यामधे त्यांचं नाव दिसत होतं बरंका, मी अज्जिबात काॅपी-पेस्ट करुन माझ्या नावावर खपवलं नाही! पण तरी त्यांना राग आला आणि त्यांनी मला ब्लाॅक केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यांची परवानगी घेऊन ते शेयर करायला हवं होतं, ठीक आहे. मी मान्य करते की त्यांना न-विचारता ते शेयर केलं पण..जाने दो, त्यांना पूर्ण हक्क आहे मला लिस्ट मधून उडवून टाकण्याचा,असो.
फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्स-अप, गेल्याजन्मीचं आॅर्कुट, तुमच्या ब्लाॅगसाईट्स किंवा एकूणच इंटरनेट हा माहितीचा महासागर आहे. ह्यामधे तुम्ही एखाद्या ओळीची होडी किंवा भलामोठ्ठा लेख असलेलं जहाज एकदा सोडलं की पुढे तुम्ही त्याची दुस-या कोणाच्या वाॅल किंवा लेखामधे किंवा अजून कुठेही जाण्याची दिशा ठरवू शकत नाही. थोडक्यात काय तर तुमचा त्यावर नावापुरता पण हक्क उरत नाही!!
ती पोस्ट नानाविध पद्धतीने तुमचं नाव सपशेल पुसून उपलब्ध असणाऱ्या एक किंवा अनेक माध्यमातून कशाप्रकारे एखादी व्यक्ती वापरून स्वतःचा फायदा करुन घेईल हे सांगणं केवळ अशक्य आहे!!
मला आठवतं मी ब्लाॅग्स लिहायला नुकतीच सुरुवात केली होती.एका ब्लाॅगर्स कट्ट्याला मला एका साईटबद्दल कळालं ज्यावर तुमचं लिखाण कुठे दुसरीकडे वापरलं गेलं आहे का, हे तपासता येत होतं. सुरूवातीचे काही दिवस मी अगदी उत्साहाने त्यात तपासायचे नंतर नंतर वेळ मिळेनासा झाला आणि लिखाण वाढल्यामुळे ते कौतुकही गळून पडलं. मग काही दिवसांनी माझं ई-बुक प्रसिद्ध झालं आणि ते इंटरनेट वर फ्री उपलब्ध आहे.
तेंव्हा मला हा साक्षात्कार झाला की आता जर मी स्वतःहून माझं लिखाण प्रसिद्ध केलं आहे तर ते काॅपी करुन कोणी वापरण्यावर मी कोणताच वचक ठेऊ शकत नाही.
अर्थात माझं लिखाण इतकं पण ग्रेट नाही की कोणी काॅपी करायचे कष्ट घेईल, पण तरी मी ही खूणगाठ स्वतःशी बांधून घेतली आणि लिहीत राहिले.
हां तर मुद्दा असा आहे की जर कोणी कधी माझं लिखाण (चुकून) शेअर केलंच तर मला तरी राग-बिग काही यायचा नाही ब्वा :)
No comments:
Post a Comment