हुश्श!! संपवलं एकदाचं 'आहे हे असं आहे' पुस्तक मी!!
गौरी देशपांडे यांचं हे दुसरं पुस्तक वाचलं आणि कदाचित परत त्यांच्या वाटेला जाणार नाही असं वाटतं. मुक्काम कादंबरी वाचली तेंव्हा अगदी पुसटसा अंदाज आला होता आणि वाचतांना काही ठिकाणी बिचकायला झालं होतं. पण जेंव्हा आहे हे असं आहे हा कथासंग्रह हातात घेतला तेंव्हा पहिलीच कथा वाचल्यावर धाप लागली. डोळे नुसतेच फिरत होते अक्षरांवरुन मेंदूला काही समजतच नव्हतं!! किती अबस्ट्रॅक्ट आहे हे लिखाण बापरे! पुढच्या २-३-४ कथा वाचल्या तेंव्हा तर भोवळ, शीण, मेंदूला झिणझिण्या असे सगळे प्रकार झाले आणि मी का विकत घेतलं हे पुस्तक असा आयुष्यात पहिल्यांदाच पश्चात्ताप झाला मला 😳 मी अगदी सामान्य वाचक आहे ( हो हो मला फक्त वपुच कळतात आणि आवडतातही) म्हणून दुसरं काही वाचूच नये असं नाही ना म्हणून हात घातला आणि थेट चटकाच बसला नं!!
काही वर्षांपूर्वी असंच सुनिता देशपांडे यांचं कुठलसं पुस्तक वाचलेलं बहुतेक,'आहे मनोहर तरी' तेंव्हाही त्यातलं बरंसचं माझ्या सामान्य बुद्धीच्या आवाक्याबाहेरचं वाटलं मला:(
मी आजवर जे अगदी साधं, सोपं, गोड-गोड लिखाण वाचलं आहे त्याच्या अगदी विरूद्ध पण धारदार असं सत्य 'आहे..' मधल्या काही कथांमधून वाचायला मिळालं, ते पटलं पण तरी पचवता आलं नाही असं काहीसं झालं बहुतेक. पण विक्षिप्तपणाची झाक मात्र दोन्ही पुस्तकामधे बहुतांश वेळा जाणवली.
चूक की बरोबर असं काही पुस्तकाबद्दल असतं का हे मला नाही कळत पण हे पुस्तक मला पेलवलं नाही इतकंच आत्ता तरी वाटत आहे. त्यातलं लिखाण जाणिवेच्या पातळीवर तरी नाही पोहोचलं पण नकळतपणे काही जर आत झिरपलं असेल तर पुढे क्वचित उलगडा होईलही आणि न-जाणो मला परत एकदा वाचायची इच्छा होऊन आवडेलही
No comments:
Post a Comment