तर आज आहे राणीच्या देशातला सगळ्यात मोठ्ठा आणि एकमेव सण. जिकडे-तिकडे चोहीकडे आनंदाने भारलेलं वातावरण आहे. रस्ते, दुकानं उत्साही माणसांच्या जत्थ्याने ओसंडून वाहत आहेत.घरांवर, बागेमधे आकर्षक रोषणाई केलेली आहे.
जवळपास महिनाभर आधीपासुन 'ख्रिसमस' चा माहोल घरा-घरातून ते अगदी आॅफिस मधे सुध्दा अनुभवायला मिळतो.
दिवसा भलेही ढगाळ वातावरण असेना का पण संध्याकाळ आणि रात्र मात्र अतिशय प्रकाशमान झालेली आहे.
डिसेंबर महिन्यातली गारठवणारी थंडी ह्या सणाच्या निमित्ताने मात्र प्रफुल्लित करणारी वाटायला लागली आहे.
लहान मुलांना जितका उत्साह असतो त्यापेक्षा कणभर जास्त उत्साह त्यांच्या आई-वडिलांच्या वयाच्या लोकांना आणि त्यापेक्षा मणभर जास्त उत्साह त्यांच्या आई-वडिलांच्या वयाच्या म्हणजे आजी-आजोबा जनरेशनला असतो असं मला जाणवलं. सांताबाबाच्या टोपीपासून ते अगदी सुटा-बुटापर्यंतचे कपडे परिधान करुन वावरायची जणू साथ येते.आॅफिसमधे सुद्धा रोजच्या करड्या ब्रिटिश शिस्तीचे कपडे घालून येण्याच्या नियमाला आपसूक बगल देऊन 'ख्रिसमस jumpers' ची रेलचेल वाढायला लागते.
घरी-दारी ख्रिसमस स्पेशल केक्स, चाॅकलेट्स, mince pie या पदार्थांची लयलूट सुरु होते. ओळखीच्या-पाळखीच्या,शेजार-पाजारच्या पासून ते अगदी दूरदेशी राहणाऱ्या नातेवाईकांना स्वहस्ते सजवलेली ग्रिटींग कार्ड्स आवर्जून पाठवली जातात.
रेस्टॉरंटमध्ये, हाॅटेल्स मधे 'ख्रिसमस स्पेशल लंच/डिनर' चे बोर्ड्स दिसायला लागतात. वर्षातून एकदा का होईना पण जे काही 'कुटुंब' असेल ते लोक एकत्र येऊन अशा स्पेशल लंच/डिनरचा आस्वाद घेतात.
हा झाला स्वतः च्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याचा एक भाग पण ह्यासोबतच इथली जनता जे बेघर आहेत, ज्यांना कोणत्याही कारणांमुळे ह्या सणाचा आनंद उपभोगता येणार नाही अशा लोकांसाठी सुध्दा सर्वतोपरी मदत करते.
काही लोक स्वतःच्या घरी अशा लोकांना आवर्जून जेवायला बोलावतात.शेजा-यांपैकी जर कोणी एकटा-दुकटा असेल तर त्याला स्वतःच्या कुटुंबाचा एक सदस्य समजून उत्सवात सामावून घेतात. सुपरमार्केट्स जरी बंद असली तरी गरजू लोकांना खाऊ म्हणून मूलभूत गोष्टी मुबलक प्रमाणात दुकानाबाहेर चकटफू ठेवलेल्या असतात.
हाॅटेल्स देखील अशा वेळेस 'फ्री लंच/डिनर' देऊ करतात.
एकूणात काय तर आपल्यासारखंच प्रत्येकाला या एकमेव सणाचा आनंद लुटता यावा यासाठी इथला प्रत्येक नागरिक सजग वाटतो आणि वागतोही 😊 😊
Wednesday, December 25, 2019
Friday, December 13, 2019
#मुक्कामपोस्टUK : कॅब
आज घरी येतांना कॅबचा ड्रायव्हर पंजाबी होता. माझ्या नावावरून त्याने ताडलं की मी भारतीय किंवा भारतातून आले आहे. आत बसल्या बसल्या त्याने विचारलं are you from India?' मी हसून हो म्हणाले आणि संभाषणाला सुरूवात झाली.
साहजिकच मी त्यालाही विचारलं की तू पण भारतीय आहेस का, तर कळालं त्याचे आजोबा भारतीय आहेत आणि ६०-७० वर्षांपूर्वी इथे येऊन स्थायिक झाले मग ही त्यांची तिसरी पिढी वगैरे.
मी जिथे काम करते तिथे या आधीही बरीच मंडळी भारतातून कामानिमित्त येऊन गेल्याची माहितीही त्याने मला दिली. त्यानंतरचा अपेक्षित प्रश्न की मी इथे नेमकं काय काम करते, मी त्याला कळेल असं सुटसुटीत उत्तर दिलं.म्हणजे मी काही फार जगावेगळं काम करते किंवा अगदीच जटिल स्वरुपातलं करते असं नाही काही. पण आपल्याला कौतुक असतं नं जे काम करतो त्याबद्दल (निदान मला तरी आहेच 😌) त्यामुळे थोडंसं असं नाक उडवत वग्रै 😁
हां तर, असा मायदेशाशी निगडीत कोणीही माणूस इथे यूके मधे भेटला की मला अगदी छान वाटतं बाई आणि समोरचा जर गप्पीष्ट असेल तर मग तर बघायलाच नको, माझ्या बडबडीला जणू ऊधानच येतं 😄 😄
आमचं संभाषण आता मस्त रंगायला लागलं होतं त्यातून कळालं, त्याचा कोणी मित्र चेन्नईचा आहे. ते दोघे प्रोजेक्ट पार्टनर्स आहेत आणि त्याच्या निमित्ताने का होईना हा पठ्ठ्या भारतात जायला सुरूवात झाली.
मी म्हटलं काय शिकता तुम्ही? तो म्हणाला
Quantum physics आणि नुकताच ISRO सोबत एक छोटा प्रोजेक्ट पूर्ण केला.
मी - क क्काय 😳 😳 ?? Oh woww 😃👍👍
तो - शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आणि अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून मी टॅक्सी चालवतो.
पुढे आम्ही भारताबद्दलच्या शक्य तितक्या गोष्टींबद्दल बोललो; माझं घर आले मी उतरले, तो निघून गेला.पण त्याचं शिक्षण, असं काम करणं आणि तरीही इतकं निगर्वी वागणं हे कुठेतरी मनात रेंगाळत राहिलं..
#मुक्कामपोस्टUK
Tuesday, December 3, 2019
अलिप्तता
कमळाच्या पानासारखं मेणाचं कवच स्वतःच्या मनाला चढवायची इच्छा हल्ली सतत होते, जेणेकरून आजूबाजुला घडणाऱ्या वाईट आणि चांगल्या गोष्टींचा सुद्धा मनाला स्पर्शच नको व्हायला..
अलिप्तपणे राहता यायला हवं कोणी कोणत्याही गोष्टीबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया कानांवर आदळूनही!
पण नको नको म्हणतांना सुद्धा मनाचे कान अती तिखट आहेत, डोळे सताड उघडे आहेत आणि त्याची बुद्धी तर नको तितकी तीक्ष्ण आहे🤦 जे जे म्हणून ऐकायला, बघायला आणि लक्षात ठेवायला नको तेच बरोब्बर केलं जातं मनाकडून. आणि एकदा करुन त्याचं पोट भरत नाही तर नको त्या वेळी नको तिथे त्याची उजळणी करायची आणि मग डोळे तयारच असतात त्याबरहुकूम भरून यायला 😒😣😣
म्हणून आताशा सतत हाच विचार येतो की मन नावाच्या या दुष्ट प्राण्याला असं गुळगुळीत प्लास्टिकचं आवरण घालून टाकायचं म्हणजे जे आत आहे त्यात अजून भर पडणार नाही.
मात्र त्याचसोबत असंही काही तंत्र सापडायला हवं जेणेकरून जुनेरी सगळी अगदी पाळा-मुळांसकट उपटून टाकता यायला हवी. मग मात्र लगेचच अशा नितळ, स्वच्छ मनाला त्या प्लॅस्टिक च्या आवरणात झक्कपैकी बंद करून अगदी माळ्यावर टाकून द्यायचं अडगळीत,कायमचं!!!
यामुळे काय होईल तर ऊठ-सूट जो त्रास होतो नं मनाच्या भोचकपणाचा तो संपून जाईल!!
ना कसला त्रास जाणवेल ना कसला आनंद..तेंव्हा कदाचित अशी तरल अलिप्तता ह्या 'आयुष्य' नावाच्या दिव्यातून तरुन जायला उपयोगी पडेल...
#triggeringthoughts
Friday, November 22, 2019
जबाबदारी कोणाची??
'मेरा नाम अमोल है| मेरी माँ को अमोल पालेकर बहोत पसंद है तो जब उनको बेटा याने मैं पैदा हुआ तो उन्होंने मेरा नाम अमोल
रख दिया| अब जिसका नाम ही 'अमोल' हो वो भला मिडलक्लास से बाहर कैसे आ सकता है!!!'
हे ऐकलं की असं वाटतं त्या बोलणाऱ्याच्या आणि त्या ओळी लिहिणाऱ्याच्या कानाखाली चांगला जाळ काढावा!!
लाज कशी वाटत नाही स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर आई-बापावर फोडायला आणि परत टिक्कोजीरावसारखं वर तोंड करुन बोलायला 😤
ह्या ओळी मी ब-याचदा 'रेडिओ मिर्ची' च्या चॅनेलवर ऐकते आणि विचार येतो त्या माणसाला जर इतकाच त्रास आहे अमोल नावाचा आणि लाज वाटते मिडलक्लास असण्याची तर घ्यावं बदलून नाव! पण! तसं जर केलं तर मग स्वतःत नसलेल्या कर्तृत्वासाठी जबाबदार कोणाला ठरवणार ना!
खूप सोपं असतं कोणत्याही गोष्टीसाठी दुस-याला जबाबदार धरणं. विशेषतः आई-बापाला दूषणं देणं तर सगळ्यात सोप्पं आहे. कारण ते आई-बाप असतात आणि वयात आलेल्या पण 'समजदार??' पोराला/पोरीला त्याबद्दल बोलूच शकत नाहीत!!
किती क्षुल्लक गोष्टींपासून ते आयुष्यातल्या अगदी मोठ-मोठ्या चुकांसाठी आपण त्यांना जबाबदार धरतो 😢
जरा विचार करुन स्वतः मधे डोकावलं तर आपल्याला प्रत्येकाला असे प्रसंग सापडतील जेंव्हा नकळतपणे आई-बाबांना आरोपी ठरवून आपण मोकळे झालो आहोत.
अर्थात फक्त आई-बाबाच असं नाही तर बहुतेक वेळा आपल्या वाट्याला आलेल्या कोणत्याही अपयशासाठी आपण स्वतःपेक्षा इतर कोणा व्यक्तीला किंवा परिस्थितीला नाहीतर 'नशिबाला' दोष देतोच देतो.
स्वतः घेतलेल्या निर्णयांमुळे जर वाईट परिणामांना सामोरं जावं लागलं तर आपल्यातले बहुतेकजण कोणातरी दुस-यामुळेच हे घडलं किंवा परिस्थितीच कशी या सगळ्याला जबाबदार आहे असं रडगाणं गायला लागतो.
निर्णय घेतांना भलेही तुम्ही चार जणांना विचारलं असेल पण करतांना शेवटी स्वतःचंच डोकं वापरलं ना? मग होणाऱ्या परिणामांना भोगायची तयारी पण नको का ठेवायला??
पण नाही! त्यामुळे स्वतः च्या मनाला, शरीराला यातना होतील, कष्ट पडतील म्हणून मग दुस-याच्या डोक्यावर खापर फोडलं की मनाला आंजारुन-गोंजारुन माझी तर चूक नव्हतीच हे समजावणं सोप्पं होऊन जातं एकदम्म!!
आयुष्य परोपरीने समजावयाचा प्रयत्न करतं पण ज्यांना स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यायचीच नाही ते त्या अमोल सारखे फक्त रडतच बसतात.
#triggeringthoughts
Tuesday, November 19, 2019
#आठवणी_लहानपाणाच्या # ग्रिटींग कार्ड्स
यूके ला आल्यापासून बघितलेली साधारण कोणतीही गोष्ट असू देत त्याबद्दल सहजच एक विचार मनात येतो,'अरे! हे तर आपल्याकडे पण आहे अगदी असंच!' मग लक्षात येतं की त्यांच्याकडूनच आपल्या देशात जसंच्या तसं आलेलं आहे 😜 . पण आताशा काही गोष्टी आपल्या भोवतालातून लोप पावल्या आहेत ज्या इथे अजूनही तितक्याच सहजपणे दिसतात आणि वापरल्या जातात.
मी इथे आल्यावर ज्या ज्या गावांमधे फिरले किंवा ट्रेनस्टेशनला गेले तिथे हमखास ग्रिटींग कार्ड्स ची दुकानं दिसली. अर्थपूर्ण भाषेतली, साध्या-सोप्या भाषेतली, एक ओळ किंवा अगदी दोनच शब्द लिहिलेली अगदी सुंदर, सुबक तर काही मिश्कील अशी असंख्य कार्ड्स सजवलेली दिसतात.
मी नुकतीच आले होते आणि ३१ मार्चला यूके मधे 'मदर्स डे' होता त्यानिमित्ताने कार्ड्सनी दुकानंच्या दुकानं सजलेली दिसली.प्रत्येक कार्ड हातात घेऊन वाचावंसं वाटत होतं मला तर.
हे सगळं बघतांना नकळत लहानपणात शिरले. मला सगळ्यात पहिले ग्रिटींग कार्ड्स कुठे दिसले असतील तर माझ्या मावशीच्या घरी.वेगवेगळ्या निमित्ताने तिला किंवा काकांना जी काही ग्रिटींग कार्ड्स मिळायची त्यातली सुंदर कार्ड्स मावशी एकाला एक स्टेपल करुन त्याची सुरेखशी माळ बनवायची आणि बेडरूमच्या एका कोप-यात लावायची. मला एक कार्ड अजूनही आठवतं, त्यामधे बर्फाळ प्रदेशातल्या एका घराचा परिसर होता. फार वेगळंच वाटायचं मला ते कार्ड 😀 त्यात असणारं कौलारू घर त्याभोवती पांढराशुभ्र बर्फ आणि त्यात एक काटेरी झाड पण.
इथे आल्यावर बर्फ प्रत्यक्ष बघायचा योग अजून तरी नाही आला पण कौलारू घरं आणि तसं काटेरी झाड पुष्कळदा बघायला मिळतं.
तर, पुढे शाळेत असतांना मैत्रिणींना ग्रिटींग कार्ड्स बनवून द्यायला सुरूवात केली. काही दिवसांनी आर्चिज आणि हाॅलमार्क ह्या दोन ग्रिटींग कार्ड्स स्पेशल गॅलरीजचा शोध लागला आणि जनू खजिन्याची गुहाच सापडली असं झालं मला 😊
त्या गॅलरीज मधे जायचं वेगवेगळी कार्ड्स चाळायची,क्वचित एखादं आवडलं की त्याच्या पाठी असलेल्या बारकोडवरती असणारी त्याची किंमत बघायची.
पुढे जर कधी प्रसंग आला तर आणि बजेट असेल तर मग असं खास बघून ठेवलेलं कार्ड विकत घ्यायचं आणि प्रयत्नपूर्वक अलंकारिक अक्षरात ज्याला द्यायचं त्याचं नाव आणि from लिहून त्याखाली फर्राटेदार सही ठोकायची 😄 😄 😄 कै च्या काही 😜
पुढे काॅलेज ला आल्यावर तर ग्रिटींग कार्ड्सची वेगळी कॅटेगरीच ओपन झाली..हो हो करेक्ट आहे तुमचा गेस ;) गर्लफ्रेंड, बाॅयफ्रेंड ला देण्याची कार्ड्स समोर ठळकपणे दिसायला लागली. त्या कार्ड्समधे असणारे टेडीज आणि बॅकग्राऊंडचे पेस्टल शेड्स मला प्रचंड आवडायचे 😍 😍 ब-याचदा काही कार्ड्सवर चमकी पण लावलेली असायची. मग अशी कार्ड्स हाताळली की आपोआप हात, गाल आणि क्वचित बॅग चमकायला लागायची 😜 .
गुडलक कॅफेच्या समोर एक मोठ्ठी आर्चिज गॅलरी आहे, तिकडे गेलं भटकायला की त्या दुकानात जाणं हा माझा नित्यनियम होता किंबहुना तिथे जायचं म्हणून कित्येकदा मी हाॅस्टेलपासून पायपीट करत तिकडे गेले आहे. तिथे जाण्याचं मुख्य कारण अर्थातच ग्रिटींग कार्ड्स चाळणं होतं आणि दुसरं म्हणजे तिथे आत गेलं की एसीचा सुखद आणि सुगंधित गारवा अंगावर झेलता यायचा. अगदी वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटायचं मला 😍 😍
पण माझ्या काॅलेजमधे किंवा ग्रुपमधे विशेष कार्ड्सी चलती नव्हती त्यामुळे कोणासाठीही किंवा अगदी खास कोणासाठी सुद्धा मी कार्ड्स विकत घेतले नाही.
पुढे आय.टी. विश्वात आले, आॅफिस चालू झालं आणि आॅफिसला 'राम-राम' ठोकणा-यांचे सेंड-आॅफ्स पण अनुभवले, तिथे परत एकदा कार्ड्सची भेट व्हायला लागली. तोवर तळहातावर मावणा-या कार्डचं वय वाढून अगदी ताड-माड वाढल्याचं दिसलं😄 चांगली हातभर लांब अशी कार्ड्स आणायची आणि त्यावर प्रत्येकाने जो/जी सोडून जात आहे त्याच्यासाठी दोन-चार ओळी लिहायच्या 😊 काही वर्षांनी मलाही मिळालं असं भलंमोठ्ठ कार्ड 😁 😁
त्यानंतर ब-याच कंपन्यांमधून उड्या मारत मी बाहेर पडले पण कार्ड्स चा चार्म तोवर उतरला होता.
यूके ला येण्याआधी माझ्या टीम मधल्या एकाचं लग्न होतं तेंव्हा मात्र मी आवर्जून छानसं एक कार्ड आणून त्या जोडप्याला दिलं,ब-याच वर्षांनी संधी मिळाली त्यामुळे दिल गार्डन गार्डन हो गया था 😊
यूकेच्या संस्कृती मधे समोरच्याचे आभार 'कित्ती मानू आणि किती नाही' असा भाव असतो लोकांचा, मग त्याकरता असं छानसं कार्ड देणं ही खचितच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे असं वाटतं मला.
#खट्टामिठ्ठा
#मुक्कामपोस्टUK
Sunday, October 27, 2019
स्वयंपाक ;)
माझा आणि स्वयंपाक करण्याचा संबंध तसा आत्ता आत्ता म्हणजे लग्नानंतर आला. सुरूवात अगदीच जुजबी म्हणजे वेगवेगळ्या भाज्या करण्यापासून केली. त्यानंतर भाताचे थोडेफार प्रकार मग पाव भाजी, मिसळ पर्यंत मजल मारली पण पोळी 😳 😳 😳
पोळी करणं म्हणजे अगदी १०/१२वीच्या परिक्षेपेक्षा पण अवघड काम वाटायचं मला 😢
Fast forward to 2019 in UK - मी pure vegitarian असल्यामुळे बाहेर खाण्याचे पर्याय अज्जिबातच नाही तेंव्हा निदान स्वतः साठी तरी कच्ची-पक्की का होईना पोळी लाटायला सुरुवात केली. आॅफिस चालू झालं तसा आमच्या दोघांचा रोजचा भाजी-पोळी डबा बनवणं चालू झालं त्यामुळे अगदी दोन्ही वेळेला पोळी बनविण्याची आणि एकूणच स्वयंपाक करायची सवय व्हायला लागली.
मग आला 'चैत्र पाडवा' आमच्या घरी 'पुरणा-वरणाचा' नैवेद्य!!
बरं आजवर सासूबाईंनी सगळा भार सांभाळलेला त्यामुळे माझ्यावर फक्त पु.पो. वर ताव मारायची जबाबदारी असायची 😜
पण आता यूके मधे कसं करु 😳 😳 😳 😳
आमच्या मातोश्रींना काॅल करुन परिस्थिती 'गंभीर' आहे ची कल्पना दिली आणि!! नेहमीप्रमाणे माझ्या आईने 'अगं सोप्प आहे, मी सांगते तसं कर होईल सगळं व्यवस्थित', असा शाॅल्लिड काॅन्फिडंस दिला मग काय बघायलाच नको, त्यानंतर तर मी एकदा काय दोनदा काय तीsssन वेळेस पुरणाची पोळी बनवली 😄 😄 😄 😄
कधीकाळी साधी पोळी सुध्दा धड न-बनवता येणारी मी इतकी तरबेज झाले की अगदी पु.पो. सुध्दा सहज बनवू शकले 😁 😁
मला वाटतं पु.पो. बनविणे म्हणजे एका अर्थाने स्वयंपाकामधे PhD मिळवण्यासारखं आहे!!
Fast forward to Pune दिवाळी २०१९ - लक्ष्मीपुजनासाठी आमच्याकडे अनारसे असतात नैवेद्याला, 'अ ना र से!!!!' 😳😞😞
अर्थातच मी आईकडे धाव घेतली! आईने याही वेळेस मला धीर दिला आणि एकदम सोप्पी पध्दत सांगितली, आणि महाराज 'अनारसे' झाले की हो तय्यारsssss 💃💃💃💃
आमची आई ग्रेट म्हणजे ग्रेट म्हणजे अशक्यच ग्रेट आहे स्वयंपाकाच्या बाबतीत 😘 😘 😘
आज तिच्यामुळे मी स्वयंपाकामधे डब्बल PhD होल्डर झाले 😄 😄 😄 😄 😄
बघा बघा फोटो बघा माझ्या गोंडस-खुसखुशीत अनारश्यांचा 😍 😍 😍
Thursday, September 19, 2019
#मुक्कामपोस्टUK : गमती-जमती
यूके मधे आताशा थंडीची चाहूल लागायला लागली आहे. सकाळचं तापमान म्हणजे ७वा साधारण ७° ते ९° असतं..
आजही मी घराबाहेर असणा-या 'चिल्ड' वातावरणात प्रवेश केला अन् तोंडातून उच्छावासासोबत धूssर बाहेर पडायला लागला 😜 हाताची बोटं, नाकाचा शेंडा क्षणाधार्त गारठले!
नाही म्हणायला सूर्यनारायणचं दर्शन झालं खरं पण तोही नुकताच ढगांच्या दुलईतून बाहेर पडत होता 😊
स्टेशनला पोहोचले आणि ट्रेनची वाट बघत होते तेंव्हा अचानक तीव्र इच्छा झाली की ह्या गारठ्यामधे गरमा-गरम ईडली-सांबार, वडा-सांबार किंवा बटाटे वडा खायला मिळाला तर 😍 😍 अहाहा नुसत्या विचारांनीच तोंडाला पाणी सुटलं आणि वाडेश्वर,रूपाली,वैशाली आणि पुण्यातल्या असंख्य ठिकाणी मिळणारी वाफाळलेली ईडली-सांबार डोळ्यासमोर तरळून गेले 😁 😌🤤
पण पण आणि प ण च!!
काय करणार इथे स्टेशनला ना असे स्टाॅल्स असतात ना इथले लोक असं काही गरमा-गरम खाणं पसंत करतात. बघावं तेंव्हा गारढोण सँडविचेस नाहीतर सॅलड किंवा केक्स वगैरे खातांना दिसतात आणि त्यासोबत 'चिल्डssss' पाणी/एनर्जी ड्रिंक/कोक/पेप्सी पितात 😳 😳 मी तर उन्हाळ्यात सुद्धा कधी असं गारेगार पाणी प्यायची हिंमत नाही करु शकले पण इथल्या खाण्याच्या पद्धती म्हणजे 🙏
#मुक्कामपोस्टUK
Wednesday, September 18, 2019
almost सुफळ संपूर्ण
मी आजवर क्वचितच एखादी मराठी मालिका नियमितपणे बघितली असेल.पण यूके ला आल्यापासून दिवसाचा सगळा शीण घालवण्याकरता थोडा विरंगुळा म्हणून 'झी५' अॅप टाकलं आणि 'चला हवा' चे काही भाग बघायला सुरूवात केली, अशातच मला 'almost सुफळ संपूर्ण' ह्या मालिकेबद्दल कळालं.
माझा लहानपणीचा मित्र आणि आजच्या घडीचा प्रतिथयश दिग्दर्शक/लेखक/कलाकार 'शार्दूल सराफ' ह्याची संकल्पना/पटकथा असलेली ही मालिका 'नाव असं का दिलं असावं बरं?' ह्या उत्सुकतेने बघायला सुरुवात केली आणि पहिल्या भागापासूनच ही मालिका माझ्यासाठी best stress buster ठरली!!
ह्या मालिकेमधे 'केतकर कुटुंबीय' आहेत जे फक्त मातृभाषेतच संभाषण करतात आणि स्वदेशी गोष्टींचे नुसते आग्रही नाही तर कटाक्षाने पालन करणारे आहेत.एकत्र नांदणाऱ्या या कुटुंबाचे प्रमुख 'आप्पा केतकर' यांना बाहेरचे लोक 'स्वदेशी केतकर' या टोपणनावाने खिजवत असतात यातच त्यांच्या विक्षिप्त पण गमतीदार स्वभावाचा अंदाज येतो.
या कुटुंबामधे दोन कर्तबगार मुलगे त्यांच्या पत्नी, प्रत्येकी एक अपत्य आणि आज्जी ही इतर मंडळी आहेत.प्रत्येकाचे स्वभाव हा एक स्वतंत्र विषय आहे पण एकूण सुखवस्तू अशा कुटुंबामधे अचानक एके दिवशी वेगळीच घटना घडते!
एक परदेशी मुलगा त्यांच्या शेजारच्या बंगल्यामधे राहायला येतो आणि तिथपासून सगळी मज्जाच मज्जा चालू होते. अर्थातच अप्पा केतकरांना 'परदेशी' लोकांचा प्रचंड राग येत असतो आणि त्या परदेशी मुलाच्या दुर्दैवाने त्याच्या मुंबईतल्या वास्तव्याच्या पहिल्या क्षणापासूनच त्याचं आणि आप्पांचं भांडण चालू होतं!!
ह्या मालिकेमधे आपल्या मराठी भाषेचा केलेला वापर इतका सहज-सुंदर वाटतो नं मला.खरंतर सलग एक वाक्य मराठीतून बोलणं गेल्या काही वर्षात मलाच जमत नाही आणि यूके ला आल्यापासून तर मराठीतून बोलणंसुद्धा दुर्मिळ होत चाललं आहे, त्यामुळे असेल कदाचित पण ही मालिका बघायला मला प्रचंड आवडतं😊 😊
ह्या मालिकेमधले सगळेच कलाकार अगदी नैसर्गिक अभिनय करतात,व्यक्तीरेखेला साजेसं आणि स्वतःच्या घरात आपण जसे वागू तसं वागणं आहे प्रत्येकाचं!
नचिकेत देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारणा-या कलाकाराने एखादा परदेशी माणूस मराठी कशाप्रकारे बोलेल याचा अभिनय योग्यरित्या वठवला आहे.
ह्या परदेशी पाहुण्याला मराठी खाद्य संस्कृती बद्दलची माहिती देणारा एक माहितीपट बनवायचा असतो. त्यासाठी केतकर कुटुंबीय त्याला कशाप्रकारे मदत करतात आणि त्यावेळी काय एकेक दिव्य प्रसंग घडतात ह्याचा निखळ आनंद तुम्हांला मालिका बघतांना मिळतो.
आपली भाषा किती सुंदर आहे आणि तितकीच लवचिक पण वैविध्यपूर्ण आहे ते या कलाकारांच्या विशेषतः आप्पांच्या संवादातून शब्दागणिक जाणवतं.
ह्या मालिकेमधल्या प्रत्येक कलाकाराच्या संवाद आणि रोजच्या भागासाठी असणाऱ्या प्रसंगांसोबतच फ्रेममधे दिसणाऱ्या इतर गोष्टींचाही अगदी बारकाईने विचार केलेला आढळतो. जसं की घरामधे अगदी जुन्या पद्धतीचं दूरध्वनी यंत्र ठेवलेलं आहे, स्वयंपाक घरामधे मिक्सर नाही तर पाटा-वरवंटा आणि खलबत्ता आहे, जेवायला सगळेजण जमिनीवर व्यवस्थित मांडी घालून बसतात, बोन-चायनाचे कप नाही तर स्टीलच्या भांड्यातून चहा पितात.
एक अजून छानशी गोष्ट म्हणजे एक फळा टांगलेला आहे त्यावर रोज नवा सूचक सुविचार लिहिलेला दिसतो. प्रसंगानुरूप जे संगीतसंयोजन केलं आहे तेही योग्य आहे.तर अशा एक ना अनेक बाबींचा लक्षपूर्वक विचार केलेला यातून आपल्याला दिसतो.
रोजच्या भागामधे आप्पा केतकर आणि नचिकेत देशपांडे यांच्या मधलं 'Tom & Jerry' सारखं युध्द बघायला भन्नाट वाटतं. केतकरांच्या पत्नी यादेखील केतकरांना tough fight देतांना बघितल्यावर तर मला अगदी माझ्या आजी-आजोबांचा संवाद आठवतो 😄 😄 😄
एकूण काय तर रोजच्या आयुष्यातल्या कटकटी, इमोशनल ड्रामे, बाहेरख्याली नवरा किंवा कट-कारस्थानं रचून एकमेकांना हैराण करणाऱ्या सासू-सुना या तद्दन फालतू विषयांवर वर्षानुवर्षे चालणाऱ्या मराठी मालिकांपेक्षा 'almost सुफळ संपूर्ण' ही मालिका अतिशय हलकी-फुलकी आणि मनोरंजनपूर्ण वाटते मला.
अजून एकही भाग बघितला नसेल तर नक्की बघा!!
#almostसुफळसंपूर्ण
Saturday, September 7, 2019
#मुक्कामपोस्टUK : महालक्ष्मी
सध्या सगळ्यांच्या घरी अगदी थाटामाटात साज-या होणा-या महालक्ष्म्यांचे फोटोज बघून खूप म्हणजे खूप आनंद होत आहे 😊 😊 माझा सगळ्यात आवडता, लाडका सण आहे हा 😊 😊 हा सण आवडायचं एक कारण हेही आहे की अख्खं कुटुंब ह्या सणाच्या तयारीमधे गुंगलेलं असतं, फक्त 'बायकांचा सण' नसतो हा!
माझ्या माहेरी आणि सासरी पण अतीव उत्साहात आणि साग्रसंगीत पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो.
आम्ही सख्खी चार भावंडं त्यामुळे लहानपणी महालक्ष्मी समोर कोणती खेळणी मांडायची याबद्दल चढाओढ असायची. गणपती बाप्पाचं आगमन झालं की महालक्ष्मींचे वेध लागायचे. माझ्या बाबांनी एक भली-मोठी ट्रंक आणली होती ज्यामधे महालक्ष्मीच्या सणाचं सगळं सामान आम्ही ठेवलेलं असायचं. ती ट्रंक खाली काढून एकेक वस्तू त्यातून सावकाशपणे बाहेर काढायच्या आणि एकेकाने एकेका गोष्टीची जबाबदारी घ्यायची किंवा आई-बाबांना मदत करायची. मग कोणी मुखवटे स्वच्छ करायचे कोणी महालक्ष्म्यांचे धड/कोठी पुसून त्यात गहू, तांदूळ भरायचे,अर्ध्यापर्यंत भरलं की पोटात दोन लाडू असलेली पुरचुंडी ठेवायची. मग त्याला हात खोचायचे. कधी जुन्या बांगड्या काढून नविन भरायच्या. दुसरीकडे आमचे बाबा मखर किंवा आम्ही घर म्हणतो महालक्ष्मीचं ते बनवायला घ्यायचे. बाबांनी एक चौकोनी आकाराचं लोखंडी सळयांचं पोर्टेबल स्टँड बनवून घेतलं होतं. त्याचे सगळे राॅड्स एकमेकांना व्यवस्थित लावायचे मग त्याच्या तीन बाजू झाकल्या जातील असे पडदे टाकायचे. हे एक मोठ्ठं काम झालं की मग त्यामधे एक टेबल ठेऊन त्यावर महालक्ष्म्यांचे धड ठेवायचे आणि सगळ्यात कठीण काम म्हणजे महालक्ष्म्यांना साडी नेसवणे ह्याची तयारी चालू व्हायची! माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींकडे मुख्यत्वे ही जबाबदारी असायची आणि मी त्यांच्या हाताखाली मदतनीस. सेफ्टी पिन्स देणं, साड्यांच्या नि-या व्यवस्थित करणं आणि भारावून ती सगळी गम्मत बघणं ही माझी मदत! कित्येकदा अगदी रात्री उशीरापर्यंत साड्या नेसवायचा कार्यक्रम चालायचा.जोवर अगदी मनाला पटत नाही अशी साडी नेसवून व्हायची नाही तोवर आम्ही कोणीच झोपायचो नाही!!
एकदा ते काम झालं की मग ज्येष्ठा आणि कनिष्ठा दोघींचे साज, दागिने चढवले जायचे.
दुस-या दिवशी मखरामधे बाकी सजावट करणं चालूच असायचं. आम्हा चौघांच्या आवडीच्या काही ठरावीक खेळण्या असायच्या त्या सगळ्या छान मांडल्या की झालं!!!
माझ्या माहेरी तिन्हीसांजेला महालक्ष्म्यांना मिरवून घरामधे आणतात. त्याआधी सगळ्या घरामधे पावलं काढायची असतात. त्याला पण एका विशिष्ठ पद्धतीने म्हणजे दारातून घरामधे मग तुळशीपाशी, आमची बॅल्कनीमधे असायची कुंडी किंवा ज्याच्या घरी जिथे असेल तिथे.त्यानंतर पावलांचे ठसे घरातल्या सगळ्या खोल्यांमधे काढायचे आणि शेवटी मखराकडे. म्हणजे महालक्ष्मी सगळ्या घरामधे फिरुन मग मखरामधे विराजमान होते. कित्ती कित्ती सुंदर कल्पना आहे नं ही 😊 😊 मिरवतांना सुद्धा आम्ही आईच्या मागे उभे राहून हाताने पळी-भांडं वाजवत विचारायचो, कोण आलं? आई म्हणायची 'सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली' 😊 😊
एकदा महालक्ष्म्यांना स्थापन केलं की मग बाबा पूजा करायचे, नैवेद्य दाखवून आरत्या सुरु व्हायच्या. त्यानंतर देवीची स्तोत्र वगैरे म्हणून पहिल्या दिवसाची सांगता व्हायची.
महालक्ष्मी एकदा मखरात बसल्या नं की त्यांच्या चेहऱ्यावरचं ते प्रसन्न स्मितहास्य अगदी मंत्रमुग्ध करणारं वाटतं मला, मी कितीही वेळ बघत बसू शकते त्यांच्याकडे 😍 😍 अगदी दरवर्षी हेच होतं, एकदा महालक्ष्म्या विराजमान झाल्या की मी तासन्तास त्यांच्याकडे बघत बसते आणि मोबाईल मधे जमेल तितक्या अँगल्सने फोटो काढून ठेवते 😄 😄
दुस-या दिवशी मुख्य पूजा आणि पुरणा - वरणाचा महानैवेद्य असतो त्याची लगबग असते. आई सोवळं नेसून सगळा स्वयंपाक करते. संध्याकाळ झाली की बाबा धीर-गंभीर आवाजात पूजेचे मंत्र म्हणायला सुरुवात करतात.त्यावेळेस घरामधे धूप,उदबत्तीचा प्रफुल्लित करणारा तसंच फुलांचा मंद सुगंध आणि नैवेद्याचा स्वादिष्ट वास एकत्र भरून उरलेला असतो, अगदी वेगळंच भारावलेलं वातावरण असतं ☺️☺️☺️
जितकं महालक्ष्म्याचं येणं, सजणं-विराजमान होणं अगदी झोकात असतं तितकाच समृद्ध असतो त्यांच्यासाठी बनवलेला महानैवेद्य-१६ प्रकारच्या भाज्या एकत्र करुन बनवलेली फळभाजी,अळूची अांबट-गोड पातळ भाजी,पुरणपोळी,दाळीची चटणी,कोशिंबीर,पंचामृत,दाण्याची तिखट-कोरडी चटणी,भजे-कुरडया,भाताची मुद त्यावर साधं वरण, साजूक तुपाची धार,कटाची आमटी,कढी आणि खीर..अहाहा
ताट भरून जेंव्हा देवीला नैवेद्य दाखवतो तेंव्हा ऊर अगदी समाधानाने भरून येतो लाडक्या महालक्ष्मीला इतके चविष्ट पदार्थ खाऊ घालत आहे म्हणून 😊 😊
ह्या सणाबद्दलच्या एक ना अनेक अशा सगळ्याच गोष्टींचं मला फार फार कौतुक वाटतं आणि हा सण यथाशक्ती साजरा करुन दरवर्षी अतीव आनंद मिळतो.
महालक्ष्म्या आपल्या घरी येतात, यथोचित पाहुणचार करवून घेतात आणि भरभरून आपल्याला आशिर्वाद देतात, यापेक्षा वेगळं अजून काय हवं ना..
Tuesday, August 27, 2019
#मुक्कामपोस्टUK : मृद्-गंध?
हे सुख फक्त आपल्या देशात आपल्या मातीतच अनुभवता येतं!! युके मधे आल्यापासून केंव्हाही आणि कितीही पाऊस पडतो त्यामुळे दुर्दैवाने त्याचं अप्रूप आणि त्याच्याविषयीचं प्रेम, आसक्ती सगळी लोप पावली 😢 मुळात हा देश बारमाही पावसाचा आणि उरलेले दिवस कडक थंडीचा त्यामुळे पाऊस आणि त्यानंतरचा गारवा जो पुण्यात हवाहवासा वाटतो तितका इथे अज्जिबात नको रे देवाss झाला आहे!!
बरं पावसाची चाहूल घेऊन येणारा मनमोहक सुगंध जरी असता ना इथे तरी इथला पाऊस मी सहन केला असता पण 😒 ना इथे धूळ ना माती ना सूर्य..माती नाही तर आलेल्या चार सूर्यकिरणांनी काय तापणार ती जमीन आणि कसा येणार तो हवाहवासा वाटणारा मृद््गंध 😭 😢
Thursday, August 15, 2019
माई
माई..आमची गोड, क्यूटशी हसरी आज्जी..वयाच्या पंचाहत्तरी नंतरही ipad अगदी सहज हाताळू शकणारी अशी स्मार्ट 😁 आणि संत्री गोळ्या,चाॅकलेट्स वगैरे दिलं की आवडीने खाणारी अशी तिच्या नातू-पणतूंपेक्षा पण लहान वयाची 😄 😄
तिचा उत्साह आम्हा नातवंडांना पण लाजवेल असा होता.
तिला खूप गाणी पाठ होती,सणा-सुदीच्या-मंगलकार्याच्या प्रसंगी अगदी सुरात गायची. 'रमला कुठे गं कान्हा, बाई तिन्हीसांजा झाल्या' हे तिचं सर्वात आवडतं गाणं..मनात आलं की ती सतत गुणगुणत असायची..माझ्या लहानपणी शाळेच्या प्रत्येक सुट्टीत मी आजोळी जायचे. तिथे गेल्यावर जी धमाल यायची त्याची सर कोणत्याच गोष्टीला नाही.
तिच्याजवळ गोष्ट सांग म्हणून हट्ट केला की 'खडकावरच्या कोथिंबीरची' गोष्ट सांगितल्याचं मला अजूनही आठवतं 😄 😄
ती घरातली सगळ्यात मोठी सून त्यामुळे अगदी वयाच्या बाराव्या वर्षी लग्न होऊन आली तेंव्हापासूनच जबाबदारी अंगावर घेत-घेत मोठी झाली. माझ्या आजोबांचं कुटुंब म्हणजे मोठं खटलं होतं.आजोबांना तीन लहान भाऊ आणि दोन बहिणी,सासू आणि शेतात राबणारे गडी इतकी घरातली माणसं यासोबतच येणारे-जाणारे,शेजारी,भावकीतले अगणित लोक. सण-वार, सोवळं-वोवळं सगळं जिथल्या तिथे करत तिने कुटुंबाचा डोलारा सांभाळला. आजोबा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात उतरले तेंव्हा आजीनेच घरच्या सर्व लढाया सांभाळल्या.
तिला प्रत्येक गोष्टीची आवड होती. वर्तमानपत्रं,पुस्तकं जे समोर असेल ते ती वाचायची. टी.व्ही., सिनेमा, नाटक असू देत किंवा कुठे फिरायला जाणं असू देत, सगळ्यांच्या आधी तयार होऊन ती आनंद लुटायला बाहेर पडायची.
घरातल्या छोट्या-मोठ्या सणा-समारंभात तिच्याशिवाय पान हलायचं नाही कधी आमचं. ती आहे म्हणजे सगळं सुरळीतच होणार हा विश्वास प्रत्येकाला असायचा.
तिच्या सगळ्या छान सवयींपैकी सगळ्यात बेस्ट सवय म्हणजे तिने वेळ कधीही वाया घालवला नाही. सगळी कामं झाल्यावर टिवल्या-बावक्या करण्यापेक्षा हातवाती वळणं किंवा देवाला नैवेद्यासाठी लागणारं शेवयांसारखा एक पदार्थ असतो तो हातावर वळून ठेवणं,धान्य निवडणं असं सतत काहीबाही करतच असायची.
वयोमानानुसार तिला काही व्याधी जडल्या, दात काढून कृत्रिम दात म्हणजे कवळी/बचळी 😜 बसवावी लागली.तिचे ते कृत्रिम दात आम्हा एकाही नातवंडाला आवडायचे नाही, भेटल्यावर आधी तिला ते काढायला लावायचो मग ती अगदीच एखाद्या लहान बाळासारखी दिसायची आणि तोंडभरुन हसायची 😍 😍 😍 😍
पण सात वर्षांपूर्वी आजोबा देवाघरी गेल्यावर मात्र तिची तब्येत ढासळायला सुरूवात झाली 😢 शेवटी शेवटी तर तिचं बोलणं समजेनासं झालं पण तिची स्मृती अगदी शाबूत होती. भेटल्यावर अगदी तश्शीच गोड हसायची आणि तिचे डोळे आनंदाने लुकलुकायचे..
पण..काळाने शेवटी त्याचं काम चोख बजावलं आणि तिलापण आमच्यापासून हिरावून घेतलं..तिच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकत नाही..कधीच नाही..
आमचं आजोळच आता हरपलं 😟😞😓😭😭😭😭
Saturday, August 10, 2019
Missing तुळशीबाग
श्रावण चालू व्हायच्या आधी तुळशी बागेत आणि अर्थातच राम मंदिरामधे एक चक्कर तर ठरलेलीच असते माझी दरवर्षी..सणा-वाराचं सगळं सामान घेतलं की मी भिरभिरत्या नजरेने अख्खी तुळशीबाग पालथी घालते नविन काय आलं आहे ते बघत-बघत. मग आपसूकच २-३ पिशव्या भरून ओसंडायला लागतात,हाताला रग लागते धरुन-धरुन..पाय पण आता बाssस म्हणतात तेंव्हा 'आता हे अगदीss शेवटचं हं' म्हणून मी पायांना राम मंदिराकडे वळवते. तिथे असलेल्या माळवदाच्या मंदिरात जाऊन पटकन देवाला नमस्कार करते आणि बाहेर असलेल्या तांबा-पितळेच्या वस्तूंच्या दुकानासमोर जाऊन उभी राहते! एकेक वस्तू न्याहाळत न्याहाळत हळूहळू अगदी गोगलगायीच्या स्पीडने सगळी दुकानं बघत बघत शेवटी बाहेर पडते..
आज कित्येक वर्षं त्या वस्तूंना बघत आले आहे क्वचित कधीतरी त्यातल्या वस्तू घरामधे विराजमान झाल्या पण तरी मला वाटणारं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही..जादूमयी जगात गेल्यासारखं वाटतं मला त्या दुकानांसमोर उभं राहिलं की 😊 😊 😊
Thursday, August 1, 2019
#मुक्कामपोस्टUK - वाॅकिंग धुराडाज्
मी इथे आल्यापासून बहुतेक वेळा ११नंबरच्या गाडीने प्रवास करते. सकाळी स्टेशनला जाणं असो वा वाण-सामान आणायला जाणं असो. रमत-गमत आजूबाजूची घरं-त्यांसमोरचे बगीचे किंवा क्वचित दिसणारी पाळीव मांजरं बघत जाते शांतपणे..आणि एखाद्या वळणावर अचानकच धुराचा लोट दिसायला लागतो..आग लागल्यावर कसे धुराचे ढग तयार होतात तसं काहीसं दिसायला लागतं..सुरूवातीला एक-दोनदा जरा बिचकायला झालं मला पण अंदाज आला हा एकूण काय प्रकार असेल याचा!
तर इथे मी 'वाॅकिंग धुराडाज्' बघते रोज!!
सकाळी छान प्रसन्न मनाने बाहेर पडावं तर अचानकच कोणीतरी भकाभक सिगरेट फुकत जातं बाजूने😒
स्टेशनच्या बाहेर तर विचारायलाच नको, इतकी लोकं असतात सिगरेट्स-ई-सिगरेट्सचे झुरके घेत उभी की, त्या निर्माण होणा-या
धुरामुळे एखादी झुकझुकगाडी सहज चालवता येईल!!
नुकतंच मिसरुड फुटलेलं पोर ते पार ९०-१०० वय असलेल्या आजीबाई पण तितक्याच जोमाने कश मारत असतांना दिसतात 😢 ई-सिगरेट्स वापरणारी लोकं तर रस्त्याने, गाडी चालवतांना आणि शक्य तिथे स्वतःभोवती धुराचं वलय घेऊनच चालत असतात 😣😣 अशा प्रकारे वायू-प्रदूषण करणाऱ्यांना मी 'वाॅकिंग धुराडाज्' नाव ठेवलं आहे 😜
आपल्याकडे जशी बिडी असते ना तसाच इथे प्युवर तंबाखू कागदाच्या पुंगळीमधे भरून ती नळकांडी पेटवून धुर घेणारे बरेच शौकीन आहेत.अशा प्रकारे तंबाखू सुपरमार्केट्स मधे मिळते. दुसरा प्रकार आहे ई-सिगरेट्सचा : ही बॅटरीवर चालणारी सिगरेट आहे. त्यात बहुदा निकोटीन किंवा तत्सम प्रकारचं द्रव्य भरून हुक्क्यासारखं त्याला वापरतात.
पण सिगरेट असू देत वा ई-सिगरेट शेवटी घाणेरडा धूर सोडतेच आणि माझ्यासारख्या नाॅन-स्मोकरला अगदी नाक मूठीत घेऊन तोंड दाबून त्याचा सामना करावाच लागतो 😖😖😖
त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे की ट्रेनस्टेशनला आणि ट्रेनमधे तसंच आॅफिसच्या आवारातही ह्या वाॅकिंग धुराड्यांना हे घाणेरडं कृत्य करण्यास मज्जाव आहे!! नाहीतर 😱😱😱
असो, तर तुम्ही यूके ला फिरायला आल्यावर अचानक धुराचे लोट दिसत आहेत म्हणून घाबरून जाऊ नका, ते वाॅकिंग धुराडाज् असतील, तेंव्हा बिनधास्त नाकाला रुमाल लावा आणि त्या धुक्यातून बाहेर पडा 😆😆😆#मुक्कामपोस्टUK
Tuesday, July 30, 2019
#मुक्कामपोस्टUK - ए.सी.
जगाच्या पाठीवर कुठेही जा पण वातावरणाच्या अगदी विरूद्ध हवा फेकणारा AC माझी पाठ काही सोडत नाही रे देवा!!!
वाटलं होतं भारत हा अजून प्रगत नाही त्यामुळे तिथे असणाऱ्या लोकांना सेंट्रलाईज्ड ए.सी.चं व्यवस्थापन झेपत नसेल पण इथे यूके मधे पण तीच गत 🤦🤦🤦 अरे कुठे फेडाल ही पापं 😭😭😭
बरोबर माझ्या डोक्यावरच ए.सी. आहे, तक्रार करूनही इथे असणाऱ्या लोकांना समजत नाही की काय करावं, शेवटी मला त्यांनी सल्ला दिला बाई तू कानटोपी घालून बस ☹️ किंवा एकावर एक असं जॅकेट घाल. मी काय बोलणार बापडी 😟 बाहेर अगदी ३७° झालं तरी हाफिसात मात्र घोंगडं पांघरूण बसते आता गरज पडली की!
यावर काही लोकांनी मला असा सल्ला दिला की तू नाॅन-व्हेज खा म्हणजे अंगात चांगली शक्ती येईल थंडीपासून बचाव करायला, कोणी म्हणे तू कानात कापूस घालून बस. पण मला नाॅन-व्हेज खाणं काही ह्या जन्मात शक्य नाही आणि कापसाच्या बोळ्यांना इथल्या ए.सी. ची हवा काही दाद देत नाही,करावं तरी काय!
बरं मी थोडं बारकाईने बघितलं तर लक्षात आलं माझ्या आजूबाजूला बसणाऱ्या काही बायकांना पण माझ्यासारखा थंडीचा त्रास होतो 😳 त्या तर नाॅन-व्हेज खातात बरं त्यांचा जन्म पण इथलाच तरीसुद्धा!! म्हणजे ए.सी. काय शाॅल्लिड स्ट्रांग असेल बघा 😜 😄 😄
मला तर वाटतं एकवेळ माणूस सूर्यावर पण जाऊन धडकेल पण ए.सी. व्यवस्थापन 😒 भूल जाओ 😖😖
#मुक्कामपोस्टUK
Thursday, July 25, 2019
#मुक्कामपोस्टUK - कौतुक
सध्या यूरोपमधे सूर्योबा प्रचंड आग ओकत आहे. रोजचं तापमान बघितलं तर मनात विचार येतो '२१°/२२°/३०°/३२°' ह्याला 'बापरेss कित्ती वाढली आहे उष्णता' 😳 असं म्हणायला खुळेच आहेत हे लोक असं वाटतं 😜 आपल्या तिकडे ४२ तर अगदी नेहमीचं झालंय ना 😒 पण जिथे वर्षातल्या १२ महिन्यांपैकी बहुतेक महिने थंडी असते किंवा पाऊस पडतोच अशा वातावरणात वाढलेल्या आणि राहणाऱ्या लोकांना खरंच त्रासदायक आहे.
आणि म्हणूनच ट्रेनस्टेशनला आणि ट्रेन मधे पण पाण्याच्या बाटल्या वाटत आहेत कर्मचारी,हो फुकटच वाटत आहेत. तसंच ब-याच स्टेशन्सला 'प्रवासात पाणी सोबत असू द्या', आशयाच्या पाट्या पण लावलेल्या आहेत. खरंच किती कौतुकास्पद आहे ही कृती!! #मुक्कामपोस्टUK
Wednesday, July 24, 2019
#मुक्कामपोस्टUK - क्यूट आजी
आज्ज्या ह्या प्रचंड गोड असतात 😊 😊 माझी आजी तर अर्थात आहेच क्यूट 😘 वयोमानानुसार तिला हल्ली नीट बोलता येत नाही पण तिचे डोळे अजूनही हसतात आम्हांला भेटल्यावर, आमचा आवाज ऐकल्यावर..
हां तर मी हे सांगत होते की, आत्ता माझ्या शेजारच्या रांगेत एक अशीच क्यूट आजी बसलेली आहे. व्यवस्थित कापलेले सोनेरी केस, गोरा गोरा रंग, त्या रंगाला आणि वयाला साजेशी वेशभूषा, हातात सुरेख घड्याळ आणि एक छानशी पर्स. ट्रेन निघाल्यावर त्या आजीने पर्स उघडली आणि हळूच अगदी छोटूसा मोबाईल हातात धरला, बाहेर नाही काढला हं. पर्समधेच ठेवत शांतपणे एक एक अक्षर शोधून कोणाला तरी मेसेज केला आणि बंद करुन अगदी काळजीपूर्वक परत आत ठेऊन दिला. ती आजी मेसेज करतांना स्वतःशीच छान हसत होती 😊 😊 #मुक्कामपोस्टUK
Sunday, March 10, 2019
#आठवणी_लहानपणाच्या - न्हाव्याचं दुकान
आज जवळजवळ १८-२० वर्षांनी मी न्हाव्याच्या दुकानात गेले!! निमित्त? नव-याला केस कापून घ्यायचे होते म्हणून 😜 आता तुम्ही म्हणाल त्यासाठी तू कशाला गेली होती? कारण हे की, इथे युके मधे छान युनिसेक्स सलाॅन्स असतात.जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी दोघांसाठीच्या सर्व्हिसेस उपलब्ध करुन दिलेल्या असतात. हल्ली आपल्याकडेही अशी दुकानं थाटलेली दिसायला लागली आहेत.
तर, आम्ही सलाॅन मधे म्हणजे आपल्या भाषेत न्हाव्याच्या आधुनिक दुकानात गेलो. नवरा एका छानश्या आॅटोमॅटीक खुर्चीत विराजमान झाला आणि मी दुकान न्याहाळायला लागले.
चार न्हावी पुरुष केस कापायचं काम अगदी सराईतपणे करत होते. दुकानामधे मोठ्ठा टीव्ही लावलेला होता एका बाजूला आणि चार खुर्च्यांच्या समोर पण ३ छोटे टीव्ही होते ज्यावर फुटबाॅल मॅच चालू होती. मोठे छान स्वच्छ आरसे लावलेले होते आणि एका बाजूला कपाटामधे सगळ्या ब्रँड्सची हेअर जेल, क्रीम्स सजवून ठेवलेली होती. केस कापणारे न्हावी पण एकदम टकाटक ब्रँडेड कपडे आणि शूज घातलेले आणि विशेष म्हणजे आकर्षक केशरचना असलेले दिसत होते. चकचकीत असणारं हे केशकर्तनालय बघून माणूस कितीही पैसे मोजायला सहज तयार होईल 😄 😄
नाही नाही मी त्या सलाॅन वाल्याची जाहिरात करत नाहीये हो, गैरसमज नका करून घेऊ हं 😁
हां बरोब्बर, तुमच्यापैकी काही चाणाक्ष वाचकांना प्रश्न पडला असेल की मी १८-२० वर्षांपूर्वी न्हाव्याच्या दुकानात का गेले असेन बरं 🤔
तर गम्मत अशी आहे की लहानपणी म्हणजे मी साधारण ६-७वीत असेपर्यंत न्हाव्याच्या दुकानात जाऊन केस कापून घ्यायचे 😁 मी आणि माझा लहान भाऊ आमच्या बाबांसोबत जायचो महिन्यातल्या एखाद्या रविवारी.
आमच्या भागातलं ते न्हाव्याचं दुकान खूप वर्षांपासूनचं होतं. मला आठवतं तसं बहुदा मळकट हिरव्या रंगाच्या भिंती असाव्यात दुकानाच्या.तीन भिंतींपैकी समोरासमोरच्या दोन भिंतींवर आरसे लावलेले होते. ते सलग आरसे असतात नं, हां सगळ्या न्हाव्यांच्या दुकानात दिसतात तसेच. ज्या आरश्यासमोर बसायचं त्यावर एक ट्यूबलाईट लावलेली होती आणि पाठीमागचा आरसा पारा गेलेला होता.पारा गेलेला म्हणजे त्यात आपलं प्रतिबिंब मजेशीर दिसतं, नसेल माहित तर गुगल करा 😜
वरती पत्र्याचं छप्पर आणि त्याला लटकलेला अंगात अज्जिबात त्राण नसलेला मळकट्ट पांढऱ्या?? रंगाचा स्वतःला वारा घालणारा पंखा!
उरलेल्या तिस-या भिंतीवर कुठल्याशा को-ऑप बँकेचं कॅलेंडर लटकवलेलं.
L आकारामधे ठेवलेली दोन बाकडी ज्यावर केस कापून घ्यायला कमी पण फुकट पेपर वाचायला आणि गावगप्पा करायला बसलेले रिकामटेकडे आणि काही वयस्क लोक.
केस कापून घ्यायला येणाऱ्या माणसांसाठी फक्त एकच खुर्ची कारण एकच काका जे बहुतेक मालक होते दुकानाचे तेच केस कापणे, दाढी करणे ही कामं करायचे. खुर्ची अगदी साधी लाकडी ज्यावर बसायला एक उशी /सीट ठेवलेलं. त्याला डार्क मरून कलरचं लेदरचं कव्हर लावलेलं होतं. ह्या खुर्चीला मागे डोकं टेकवायला एक T शेपचं खाली-वर करता येईल असं काहीतरी लावलेलं असायचं. जेंव्हा लहान मुलांना बसवायचं असेल तेंव्हा खुर्चीच्या दोन्ही हातांवर फळी ठेऊन त्यावर मुलाला/मुलीला बसवलं जायचं.
केस कापणारे काका मात्र स्वच्छ धुवट पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमधे असायचे आणि कायम तेल लावून चप्पट भांग पाडलेले दिसायचे.
केस कापून घ्यायला बसलं की अंगाभोवती काळ्या रंगाचं कापड गुंडाळल्या जायचं आणि एका हातात स्टीलची 'चक् चक्' आवाज करणारी कात्री आणि बारीक कंगवा घेऊन काकांचे दोन्ही हात केसांवर सपासप फिरायला लागायचे.जास्तीत जास्त १०-१५मीनीटांमधे माझे केस कापून व्हायचे. मग दुसरा एक छोटा आरसा हातात घेऊन ते मागच्या बाजूला थोडा तिरपा धरायचे जेणेकरून समोरच्या आरश्यामधे केस कुठवर कापलेले आहेत, व्यवस्थित कापल्या गेले आहेत का ह्याची खात्री करुन घ्यायचे.त्यानंतर ते काका माझ्या गळ्याभोवतीचं कापड काढून टाकायचे आणि मानेवरचे केस स्वच्छ करायला पावडर लावलेला खरखरीत ब्रश फिरवायचे. अशा त-हेने सगळे सोपस्कार झाले की
खुर्चीतून उडी मारून १०रु.त्यांच्या हातात ठेऊन मी घरी धूम ठोकायचे 😄
त्या काकांच्या दोन गोष्टी विशेष लक्षात राहण्यासारख्या होत्या. एक म्हणजे, केस काळे असो वा पांढरे, फक्त केस कापायचे असोत वा दाढी करायची असो, ते त्यापैकी कोणतंही काम इतक्या तन्मयतेने करायचे जणू काही एखादं शिल्प साकारत आहेत किंवा पेंटींग बनवत आहेत 😊 आणि दुसरं म्हणजे त्यांचं जगातल्या सगळ्या विषयांबद्दलचं अगाध 😜 ज्ञान!
ज्या गतीने ते हात चालवायचे त्याच स्पीडने त्यांची तोंडाची तोफ पण चालू असायची. विषय कोणताही असू देत, त्यांना त्यातलं इत्थंभूत माहित असल्यासारखं अगदी आत्मविश्वासाने बोलायचे. कधीकधी तर सपशेल चुकीची माहिती पण इतक्या ठसक्यात सांगायचे की कोणीही सहज विश्वास ठेवेल 😜
तर असा तोंडाचा पट्टा आणि हाताने वस्तरा चालवत ते काका एकेकाच्या डोक्यावरचा भार हलका करायचे.
एकूण काय तर तेंव्हा न्हाव्याच्या दुकानात जाऊन केस कापून घेण्यात पण वेगळी मजा होती,माझ्यासाठी तरी.
अर्थात ते दिवस बरेच बरे होते असं आज म्हणायला हरकत नाही कारण, मी एक मुलगी असून न्हाव्याच्या दुकानात बिनधास्तपणे एका वयस्क पुरुषाकडून केस कापून घेऊ शकत होते. आज मात्र लहान मुलाला जरी पाठवायचं म्हटलं एकट्याला अशा ठिकाणी तरी चार-चारदा विचार करावा लागेल 😢
असो..तर आज युकेमधल्या सलाॅनच्या निमित्ताने माझ्या लहानपणीची ही मजेशीर आठवण मनाच्या तळ्यातून वर डोकावली 😊 😊 आणि एक सांगायचंच राहिलं, ते न्हावी काका जेंव्हा वस्तरा फिरवून मानेवरचे केस बारीक कापायचे ना तेंव्हा एकदम वेलवेट चा फील यायचा केसांना, त्यावरून बोट फिरवायला फार भारी वाटायचं मला 😄 😄
Sunday, February 24, 2019
आनंदी-गोपाळ
UK मधे आम्ही एका छोट्या खेडेगावात राहतो. बघायला गेलं तर हे गाव तसं समृद्ध आहे पण क्षेत्रफळाच्या मानाने खेडंच आपल्या भाषेत. तर मी इथे येण्याच्या काही दिवस अगोदरच आनंदी-गोपाळ सिनेमाचा ट्रेलर बघायला मिळाला आणि प्रदर्शनाची तारीख १५ फेबु!तारीख बघून हिरमुसले कारण तेंव्हा मी UK मधे असणार आणि ह्या इतक्या चांगल्या सिनेमाला मुकणार म्हणून फार वाईट वाटलं होतं 😞 पण जेंव्हा लंडनच्या महाराष्ट्र मंडळ पेजवर ह्या सिनेमाची जाहिरात बघितली तेंव्हा क्षणाचाही विलंब न-करता तिकिटं बुक केली 😁 काल म्हणजे २३ फेबुला हा सुरेख चित्रपट बघायचा योग आला. एव्हाना बहुतेक जणांचा बघून झाला असेलच म्हणा पण तरी, मला पण ह्या चित्रपटाचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. दिग्दर्शन,पटकथा,संवाद,अभिनय,सिनेमॅटोग्राफी सगळ्या बाबतीत अगदी अप्रतिम असा हा चित्रपट आहे. १८००चा भारतातला किंवा परदेशातला काळ दाखवणं असो किंवा तत्कालीन परिस्थितीत असणारी लोकांची मानसिकता असो, सगळे बारकावे व्यवस्थितपणे हाताळले आहेत. ललित प्रभाकरने उभे केलेले गोपाळराव अतिशय भावले. इतिहासातलं हे पात्र ज्याच्याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नसतांनाही ही भूमिका समजून घेऊन तिला ज्या मेहनतीने साकारलं आहे त्याबद्दल हॅट्स-आॅफ! भाग्यश्री मिलिंद हिने साकारलेली आनंदीबाई बघतांना ऊर अगदी अभिमानाने भरून येतो. बीपी सिनेमा मधे तिच्यातल्या उत्तम अभिनेत्री असण्याची चुणूक जाणवली होतीच पण ह्या सिनेमामधे तिने 'आनंदीबाई' साकारण्याचं शिवधनुष्य अगदी लीलया पेललं आहे असंच म्हणावं लागेल. गोष्ट म्हणावी तर अगदी एका ओळीची - भारताच्या पहिल्या महिला डाॅक्टर! पण तिथवर पोहोचण्याचा प्रवास म्हणावा तर अतिशय कष्टप्रद आणि जीव पिळवटून टाकणारा 😢 मला सगळ्यात जास्त आवडलेला सीन म्हणजे - जेंव्हा आनंदी-गोपाळ यांचं बाळ जाऊन दोन महिने लोटलेले असतात आणि गोपाळराव हताश झालेल्या आनंदीबाईंना समजावून सांगतात, परत एकदा अभ्यास सुरु करा.त्यावर ठामपणे आनंदीबाई 'मी डाॅक्टर होऊन दाखवते की नाही बघाच' असं म्हणतात तेंव्हा आनंदीबाईच्या डोळ्यातलं तेज आणि गोपाळरावांचे आनंदाने डबडबलेले डोळे!! व्वाह! बेस्ट सीन अॅण्ड मार्व्हलस अॅक्टींग!! तो सीन बघतांना अंगावर शहारे उठतात, डोळ्यात आनंदाश्रू तरळतात आणि मन आपोआप त्या आनंदीबाईच्या जिद्दीला सलाम करतं!! अजून बरेचसे प्रसंग जसं की, गोपाळरावांच्या सासूबाई दारामधे पडलेली घाण, कचरा टाकणाऱ्यांना सडेतोड उत्तरं देत हाकलवून लावतात आणि आनंदीबाईंना धीर देत शाळेत जायला सांगतात किंवा जेंव्हा गोपाळराव आनंदीबाईंसाठी कलकत्त्याच्या काॅलेजमधे डबा घेऊन जातात आणि त्यांचा बायकोने शिकावं ह्या आग्रहामागचा विचार लहानपणापासून कसा बळकट होत गेला हे सांगतात आणि शेवटच्या सीनमधे जेंव्हा आनंदीबाई समुद्राकडे जायला उभ्या राहतात तर त्यांच्या पदराचं टोक गोपाळरावांच्या सद-याला बांधलेलं असतं...असे कित्येक प्रसंग आपल्याला अंतर्मुख करतात. याचबरोबर ह्या चित्रपटाची गाणीसुध्दा प्रसंगानुरूप अतिशय साजेशी आहेत.वैभव जोशी यांचे चपखल शब्द आणि जसराज जोशी-ऋषिकेश दातार-सौरभ भालेराव ह्या त्रयींनी दिलेलं संगीत कान तृप्त करणारं आहे.ह्या चित्रपटाची सर्व गाणी यूट्युबला किंवा गाना अॅपमधे ऐकता येतील, जरुर ऐका.त्यातलं 'तू आहेस ना-anthem' हे गाणं अशक्य सुंदर आहे. एकूणच प्रचंड मेहनतीने बनविलेल्या ह्या विलक्षण चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध करण्यात मोलाची भर नक्कीच घातली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)