'चुपके चुपके'(१९७५) बघितला आज परत!कितव्यांदा ते काही आठवत नाही.खरं म्हणजे अशा बहारदार सिनेमांच्या पारायणांसाठी मोजणी करायचीच नसते मुळी, हो ना 😄
धर्मेंद्र कसलाsssssss चिकणाsss आणि क्यूsssssट आणि हँडसम 😘😘😘😘😘 दिसतो त्यात हाय 😍😍😍😍😍!!
अमिताभ तर त्यात आहे हे लक्षात पण येत नाही धर्मेंद्र समोर😄
हँडसम आणि हिरो असावं तर धर्मेंद्रनेच😘😘😘! बाकी सब पानी कम चाय, का काय म्हणतात ते😜
एकूणच किती सहज-सुंदर कलाकृती आहे हा सिनेमा म्हणजे!एकापेक्षा एक सरस प्रसंग, हलकाफुलका पण सकस विनोद, सगळ्या कलाकारांचा अभिनय जणू आपल्या घरातली माणसं वाटावीत इतका सुंदर आणि! धर्मेंद्र 😍😍😍😍😍
ओम प्रकाश आणि धर्मेंद्र चे सगळे प्रसंग कितीही वेळा बघितले तरी अज्जिबात कंटाळवाणे वाटत नाहीत😄 आणि चोराचा प्रसंग तर अफलातूनच आहे. मला कधीही, कुठेही आठवला की मी हसत सुटते 😜 😁 😁
आज इतकी वर्षं उलटून गेली आहेत या सिनेमाला पण त्यातला विनोद अजूनही टवटवीत वाटतो मला आणि गाणी तर अहाहा! सगळीच 'लूप'वाली गाणी आहेत!
या सिनेमाचे दिग्दर्शक, संगीतकार, लेखक सगळीच दिग्गज माणसं आणि कलाकृती बद्दल तर वर्णन करायला शब्दच अपुरे आहेत माझ्याकडे!
मला वाटतं, वर्णन करण्यापेक्षा पण ना अशा कलाकृतींचा आस्वाद घेऊन आनंदी व्हावं आणि डोक्यावरचा भार, मनावरचा ताण हलका करुन घ्यावा, बास!
आज परत एकदा या सिनेमाने माझा शुक्रवारचा आणि एकूणच आठवड्याभराचा शीण कुठल्या कुठे पळवून लावला, आता विकेंड मस्त जाणार यात शंकाच नाही 😊
Thursday, August 5, 2021
चुपके चुपके
Sunday, August 1, 2021
१०१ वर्षं! लोकमान्य बालगंगाधर टिळक!
१०१ वर्षं झाली एक वादळ नियतीच्या पोटात गडप होऊन!
काही दिवसांपूर्वी एका स्पर्धेच्या निमित्ताने मी परत एकदा लोकमान्य टिळकांच्या बाबतीतली माहिती वाचण्यासाठी काही संदर्भ चाळले आणि असं लक्षात आलं की, टिळकांविषयी किती थोडी माहिती आहे मला! किंबहुना त्यांच्याबद्दल जितकं वाचावं तितकं नवीन काहीतरी त्यातून कळायला लागतं!
शेंगांची गोष्ट किंव्हा 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', फक्त इतकीच ओळख शालेय पुस्तकातून आपल्याला टिळकांची झाली, लोकमान्यांवरचा सिनेमा आला त्यातून थोडेफार संदर्भ उजळल्या गेले.
पण आज आपल्या घरात वावरणाऱ्या नव्या पिढीला लोकमान्य टिळक कितपत माहित आहेत? मुळात आपण त्यांना किती समजून घेतलंय?
या थोर व्यक्तिमत्वाच्या विचारांची उजळणी करायची गरज पडावी अशी परिस्थिती आहे का आपल्या आसपास?
भारतात शाळेत जो इतिहास शिकवला जातो त्यात अशा थोर स्वातंत्र्यसेनानींची माहिती तरी आहे, भलेही मग परीक्षेनंतर ती अडगळ का होईना, पण परदेशात असणारी मुलं जो इतिहास शिकतात विशेषतः इंग्लंडात शिकणाऱ्या पोरांना काय बरं शिकवत असतील? टिळक हे कसे राणीच्या विरुद्ध वागणारे होते? देशद्रोही होते?
खरंच या लोकांचं बलिदान आपल्याला आज 'गरजेचं' उरलंय का? की फक्त फेसबुक वर अशा नेत्यांचा फोटो आणि २-४ ओळी लिहून विनम्र अभिवादन केलं की संपला विषय?
टिळक, सावरकर किंव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कालातीत आहेत पण जर ते आपल्याला माहित असतील तर ना त्यांचा अवलंब करता येईल?
'जे आहे ते झेपत नाहीए इथे आणि कुठे त्या टिळकांचे आणि सावरकरांचे विचार घेऊन बसलीस', हाही एक आवाज माझ्याच मनातून कानावर आदळला!
खूप स्वार्थी असल्याची भावना टोचायला लागते हे सगळे विचार डोक्यात घोळायला लागले की मग डोक्यातलं हे वादळ अशा २-३ ओळी खरडल्या की शमून जातं!
पण अपराधीपण पाठ सोडत नाही! काहीतरी देणं लागतो आपण या महामानवांचं!
कसलीच बंधनं माहित नसलेल्या आपल्या पिढीला, स्वात्यंत्र मिळवायला काय नरकयातना भोगाव्या लागतात याची कल्पना येऊच शकत नाही!!
पण टिळकांसारख्या हाडामासाच्या आपल्यासारख्याच दिसणाऱ्या माणसाने अशा कठीण परिस्थितीतही काय जीवनशैली अवलंबली होती याबद्दल निदान एक क्षण विचार करण्याचे कष्ट तरी घेऊच शकतो ना?!
टिळकांना मंडालेचा तुरुंगवास सोसावा लागला तेव्हा त्यांची ५०शी उलटून गेली होती, मधुमेहाचा त्रास होत होता आणि त्यात मंडालेचा अशक्य कडक उन्हाळा! पण त्यातही टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.
तुरुंगातून सुटका झाली पण इंग्रजांनी त्यांच्या ग्रंथाची प्रत काही दिली नव्हती, वेळोवेळी मागणी करूनही मिळत नाही म्हटल्यावर लोकांना चिंता वाटू लागली हे जेव्हां टिळकांच्या कानावर आलं, तेव्हा ते म्हणाले, 'हस्तलिखित जरी इंग्रजांकडे असलं तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, दोन महिने उसंत मिळाली तर परत लिहून काढेन'. अचाट बुद्धिमत्ता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती !!
टिळकांचा संघर्ष फक्त इंग्रजांशीच होता असं नाही, तर दुर्दैवाने स्वकियांशीही काही प्रमाणात होताच, ताई महाराज हे प्रकरण त्याचं मोठ्ठ उदाहरण आहे!
पण असं असतानाही, 'मी कोण माहितीए का तुला?' हा विचार त्यांच्या मनात आला सुद्धा नाही मग आचरणाचा तर प्रश्नच नव्हता.
टिळक जेव्हा ६ वर्षांची कठोर शिक्षा भोगून घरी परत आले तेव्हा रात्र झाली होती, गायकवाड वाड्याचं बंद दार त्यांनी ठोठावलं पण दरवानाला टिळक कोण हे माहित नसावे, म्हणून त्याने आधी घरात जाऊन धोंडोपंतांना कळवलं, ते धावतच आले आणि लोकमान्य टिळकांना असं दारात बघून स्तिमित झाले.
पण दरवानावर खेकसले तेव्हां टिळक शांतपणे म्हणाले,'तुरुंगाचं दार उघडायची जिथे ६ वर्षं वाट बघितली तिथे हे दार उघडायला थोडा उशीर झाला त्यात विशेष काही बिघडलं नाही', म्हणत शांतपणे घरात गेले
- संदर्भ : दुर्दम्य, गंगाधर गाडगीळ.
आज फ्रेंडशिप डे पण आहे ना खरं, टिळक आणि आगरकर यांची मैत्री आणि नंतर झालेली फारकत ही पण प्रसिद्ध आहे.
जरी त्यांचे मार्ग वेगवेगळे झाले होते तरी टिळकांच्या मनात आगरकरांबद्दल कधी कटुता नव्हती, उलट संधी मिळेल तेव्हा ते आगरकरांबद्दल अतिशय हृदयपणे बोलत असत, लिहीत असत.
आगरकर निवर्तल्यावरही टिळक त्यांच्या कुटुंबीयांची सतत चौकशी करायचे, एव्हढच नाही तर आगरकरांच्या मुलाचं लग्नही टिळकांनी जुळवून दिलं होतं.
असे कित्येक प्रसंग आहेत ज्यातून टिळकांचा सखोल विचार समोर येतो, म्हणूनच मला वाटतं की मी कितीही वेळा टिळकांबद्दल वाचलं, तरी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सापडत जातं.
थोडंफार समजलंय असं वाटतंही पण उमजलंय का? तर नक्कीच नाही ! अजून प्रयत्न करावे लागणार इतकंच एव्हाना कळालं आहे..
लोकमान्य बालगंगाधर टिळक यांच्या स्मृतीस शतशः नमन 🙏
Sunday, July 25, 2021
#आठवणी_लहानपणाच्या - शिकेकाई रविवार
मेरे घने, लंबे बालोंका राज है..लाॅकडाऊन 😜
लहानपणी बाॅयकट/मश्रूमकट मिरवणारी मी आज चांगले एक-हात लांब केस सांभाळते आहे यावर माझा काय माझ्या आईचा ही विश्वास बसत नाहीए😄
लाॅकडाऊन आणि एकूणच बाहेर गेल्यावर मास्क काढायचाच नाही, या आता लागलेल्या सवयीमुळे, निदान गेल्या १५महिन्यांतमी केसांना कात्री लावलीच नाही!
दोन वेळेस केशकर्तनालयात जायची अपाॅईंमेंट घेतली पण कोरोनाभितीने तो कार्यक्रम ऐनवेळी रद्द करायला भाग पाडलं!!
आता जर ते जमत नसेल तर केसांची व्यवस्थित निगा राखणं हे ओघानेच आलं!त्यासाठी मग शँम्पू हा आजतागायत वापरत आलेला पर्याय होताच, पण केसगळती सुद्धा आंदण आली होती. कधी इतके लांब केस मी वाढवलेच नाही ना त्यामुळे 'केसगळती' या वैश्विक प्रश्नाकडे मी गांभीर्याने बघितलंच नव्हतं!
पण केसांची काळजी घेणं हे काय दिव्य असू शकतं याचि प्रचिती आता मला हळू हळू यायला लागली होती!
म्हणून मग जरा प्रयोग करुन बघायचे ठरवले-सर्वप्रथम कमीत कमी केमिकल्स वाला शँम्पू शोधायचा प्रयत्न केला, काही पर्याय सापडले पण मग नुसत्या शँम्पूने भागत न्हवतं, त्यासाठी त्या कंपनीच्या 'हेअर-स्पेशल पॅक'ची अख्खी पेटी उचलावी लागत होती, जे खिशाला अंमळ जड जायला लागलं!
मग केस धुवायचे साबण वापरून बघितले, त्याने काही दिवस फरक वाटत आहे असं वाटेपर्यंत परत पहिले पाढे पंचावन्न!
मग म्हटलं हे सगळं बास झालं!शेवटी अॅमेझाॅनला मी शिकेकाई शोधायला सुरूवात केली,ती तर सापडलीच पण त्यासोबत ब्राम्ही, आवळा, रिठा काय न काय सापडलं😍फिर देर किस बातकी? लग्गेच सगळं आॅर्डर केलं!
मी लहान असतांना आमच्या घरात शिकेकाई हा एकमेव प्रकार केस धुवायला वापरला जायचा.प्रत्येक रविवार हा 'शिकेकाई' रविवार ठरलेला असायचा.माझ्या आईचे आणि बहिणीचे केस लांबसडक होते. आई स्वतःच्या केसांपेक्षा ताईच्या केसांची फार काळजी घ्यायची.केसांना तेल लावून चापून-चोपून वेणी घालणं हे जितकं महत्वाचं होतं तितकंच महत्वाचं आणि महत्प्रयासाचं काम असायचं केसांना स्वच्छ ठेवणं.
शँम्पूने केस धुवायची पद्धत फार नंतर सुरु झाली खरं आमच्या घरात, कारण केस धुवायला शिकेकाईच वापरतात हेच माहीत होतं आम्हाला तेंव्हा.
तर माझी आई शिकेकाईची पावडर बनवून घ्यायची. म्हणजे जसं वर्षभराचं सामान-सुमान घरात भरून ठेवलं जायचं तसंच, वर्षभर पुरेल इतकी शिकेकाई ही दळून आणली जायची.तेंव्हा बाजारामधे शिकेकाईच्या वाळलेल्या शेंगा मिळायच्या, आताचं मला माहीत नाही.
शिकेकाईच्या या शेंगा, रिठा, नागरमोथा, आवळा असे बरेच जिन्नस एकत्र करुन कांडप केंद्रावरून दळून आणून, ती भुकटी(पावडर) एखाद्या डब्यात साठवून ठेवली जायची.मग प्रत्येक रविवारी सकाळी एकीकडे चहाचं आधण ठेवलेलं असायचं आणि दुसरीकडे एका भांड्यामधे दोन-तीन चमचे शिकेकाई पावडर + पाणी असं मिश्रण उकळत असायचं. जसं जसं पाणी उकळायचं तसा एक वेगळा, किंचित गोडुस पण उग्र सुगंध घरात पसरायला लागायचा आणि जितकं पाणी सुरूवातीला घातलं त्याच्या निम्मं झालं की शिकेकाई तय्यार झाली हे समजायचं.
मग ते कढत मिश्रण गाळणीने गाळून एका भांड्यात काढून ठेवायचं. केस धुतांना त्यात गरजेइतकं पाणी घालून केस धुवायचे आणि भलेही तेल निघायचं नाही पूर्णपणे, पण केसांची मूळं, त्वचा स्वच्छ व्हायची आणि केसांना तेलमिश्रित शिकेकाईचा वेगळाच सुगंध लगडायचा 😊😘 आमच्या आईचे केस इतके सुंदर,काळेभोर आणि लांबसडक होते की आमच्या पैकी कोणा एकीला ते विंचरायला मदत करावी लागायची.माझे केस तेंव्हा भलेही छोटुसे होते पण मला आईचे केस विंचरायला फार आवडायचं.
काहि वर्षांत ताई होस्टेल ला रहायला गेली, तिथे शिकेकाईचं कौतुक करायला जमेना, नंतर तिने केसही कापले. मग तर शिकेकाई वापरणारा एक मुख्य दावेदारच संपुष्टात आला, त्यामुळे आईने सुद्धा शिकेकाई बनवून घ्यायचा घाट घातला नाही.
तोवर शँम्पूच्या छोट्या पाऊचेस ने वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून घरात चंचूप्रवेश केला. तुम्हांला आठवत असेल तर, क्लिनिक प्लस या शँम्पूच्या छोट्या पुड्या रविवारच्या पेपरमधल्या जाहिरातीत चिटकवलेल्या असायच्या.
माझे केस लहान असल्याने एक छोटी पुडी बहुदा ५०पैसे किंमत असावी, पुरायची. शँम्पूने केस पटकन धुतले जायचे आणि एकदम मऊसूत व्हायचे, असलं भारी वाटायचं नं 😍
शिकेकाईसाठी 'करावी' लागणारी एकूणच 'मेहनत' बघता, शँम्पू सर्वार्थाने उजवा वाटायला लागला आणि शिकेकाईची पिछेहाट होत-होत शँम्पू घरात स्थिरावला.आईने सुद्धा शँम्पूची कास धरत केसांना जरा तेलयुक्त दुनियेतून क्वचित मोकळीक द्यायला सुरूवात केली😄
शँम्पू मधे नंतर कित्ती कित्ती प्रकार निघाले.वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या लाटेत उडी घेत अगदी 'आयर्वेदीक' शँम्पूपण बाजारात आणले!त्यातच काही काळ शिकेकाई हा साबण ही ब-यापैकी लोकप्रिय झाला होता.
तसं जरी झालं असलं तरी, बरीच वर्षं क्लीनिक प्लस हाच ब्रँड आमच्या घरात वापरला जायचा. पुढे मग बाजारात येणारे नवनवे पर्याय वापरायला सुरूवात झाली, क्वचितप्रसंगी शिकेकाईची बाजारात मिळणारी तयार पावडरही आईने वापरून बघितली. पण शेवटी आईने स्वतः जिन्नस गोळा करुन कांडप केंद्रातून तयार करुन आणलेल्या शिकेकाईची सर कोणालाच आली नाही, येऊही शकत नाही!!
आज शिकेकाईच्या उकळत्या वाफांच्या उग्र-गोडुस सुगंधाने या सगळ्या आठवणी जाग्या केल्या 😍
मार्केटमधले चिक्कार शँम्पू आणि कंडिशनर्स आजतागायत वापरले होते पण शिकेकाई वापरली नं, की असं वाटतं,आई तिच्या हाताने माझ्या केसांची अगदी छान काळजी घेत आहे
#आठवणी_लहानपणाच्या_शिकेकाई_रविवार
#शिकेकाई
Friday, July 9, 2021
#मुक्कामपोस्टUK - डबा
मेस चा डबा - हे शब्द ऐकले की नेमकं कसं वाटतं हो तुम्हाला 😃
कॉलेज च्या दिवसातला बहुतांश लोकांचा या क्षेत्रातला अनुभव दांडगा, क्वचित माझ्यासारखीला भीती घालणारा तर काही जणांच्या सुखद आठवणी जागवणारा असेल ना 😁
मी कॉलेज ला असताना पेयिंग-गेस्ट म्हणून राहिले सगळीकडे, त्यामुळे स्वयंपाक घराचा पर्याय नव्हता आणि डबा नामक प्रकरण माझ्या आयुष्यात शिरलं!
पहिल्या वर्षी ज्या काकूंकडे राहिले त्या डबे पण करून द्यायच्या म्हणून मी त्यांच्याचकडे सुरुवात केली. आईच्या हातची चव काय असते याची जाणीव काही दिवसातच झाली आणि ताटात वाढलेल्या अन्नाची 'किंमत' पण कळायला लागली!
पहिल्या वर्षी सगळंच नवीन होतं, त्यामुळे 'मेस' किंव्हा 'डबा' या सतत बदलाव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत हे कळायला अंमळ उशीरच लागला. पण, दुसऱ्या वर्षीपासून मात्र, 'शोध नव्या डब्याचा' हे एक काम दर ३-४ महिन्यांनी अंगावर आदळायला लागलं!
माझी रूम पार्टनर उत्तर भारतीय होती, त्यामुळे तिला तर डब्यातलं जेवण असं का असतं? हा प्रश्न अगदी शिक्षण पूर्ण करून घरी जाईपर्यंत सतत छळायचा, बिचारी 😥
दर दोन दिवसांनी पाणीदार बटाटा भाजी आणि दर शनिवारी पाव-भाजी हे खाऊन खाऊन मला बटाटा आणि पाव-भाजी ची इतकी शिसारी बसली होती की, डबा बंद केल्यावर निदान एखादा वर्ष तरी मी त्या भाज्यांकडे पाठ फिरवली होती 😕
वरण किंव्हा आमटी हा प्रकार इतका पाणीदार असूनही डब्यातून अज्जीबात सांडत नाही, ही जादू/कला डबेवाल्याना कशी काय साधते, खरंच मला कायम आश्चर्य वाटायचं!
पोळी/ चपाती/ फुलके इतके पातळ/ ट्रान्स्परन्ट लाटता येणं, हेही एक जगावेगळं स्किल म्हणायला पाहिजे!
एकदा माझी आई आली होती रूमवर आणि तिला माझा डबा खाऊन बघायची दुर्बुद्धी सुचली, मी मागवला मग अजून एक डबा. त्या दिवशी मेसवाल्या काकूंनी 'मेथीचे थेपले' दिले होते. आईने डबा उघडला आणि थेपला बघून म्हणाली,' अगं, हे काय? एकच थेपला दिलाय तुझ्या मेसवालीने डब्यात??' मग मी तिला गम्मत दाखवली - एकाला एक असे ४ थेपले कसे चिटकवलेले होते ते वेगळे करून दाखवले आणि ती जादू बघून आई आणि मी, जे हसत सुटलो ते अजूनही हा प्रसंग आठवला तरी हसत बसतो 😂
पण आईला वाईटही वाटलं, पोरीला असं विचित्र जेवण जेवावं लागतं म्हणून! तरी माझी अवस्था बरीच बरी होती, असं म्हणावं लागेल इतर मुलांपेक्षा!
या मेस वाल्यांचे काही नियम मात्र मला कधीच कळाले नाहीत, जसं की, रविवारी एकच वेळ डबा!
हा जो काही अन्याय हॉस्टेल च्या पोरांवर हे मेस वाले करतात ना, त्यासाठी खरंच त्यांना न्यायालयात खेचलं पाहिजे! अरे परीक्षा सुरु असताना कुठे जायचं रात्रीचं जेवण हुडकायला??
एक वेळ ती बटाट्याची भाजी चालेल पण डबा नाही, हे असहनीय होतं!
सुकी, ओली, पातळ - बटाटा+ वाट्टेल ती भाजी मिक्स = हाच मेनू वर्षानुवर्षे, अगदी कोणताही डबा लावला तरी खावा लागणे याचा अर्थ लक्षात येतोय ना - काय एकी आहे बघा मेसवाल्यांमधे, काय हिम्मत कोणाची नवीन मेनू खाऊ घालेल तर!! खात्री आहे मला, आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मेस चा मेनू 'बटाटामय'च असणार!
त्यातल्या त्यात एक बरं होतं की, मित्र-मैत्रिणी एखादी नवीन मेस सापडली की लगेच तिथून मिळणाऱ्या डब्याबद्दल अहवाल सादर करायचे, म्हणजे मग आपण घेत असलेला डबा आणि तो डबा यात फरक आहे की नाही हे तपासायला जरा सोपं व्हायचं, तरी ते काम कठीणच होतं म्हणा, पण नवीन डबा लावला की निदान काही दिवस जरा बरे जायचे पोटाचे आणि जिभेचेही 😆
माझ्या शिक्षणाच्या ५ वर्षांपैकी ४-४.३० वर्षं मला या ना त्या मेस चे डबे खाऊन खाऊन जिभेला वेगवेगळी चव अजूनही कळते, हा विश्वासच मावळल्यासारखा झाला होता 😭
म्हणून मी शेवटचे काही दिवस कॉलेज च्या कॅन्टीन मधून जेवावं हा आणखीन एक खोल खड्ड्यात जाणारा निर्णय घेतला!
सुरुवातीला चवीत झालेला बदल जरा बरा वाटला पोटाला पण, रोज तेच?! बटाटा, बटाटा आणि बटाटाच!
मग कॉलेज च्या बाहेर एक सरदारजी uncle यायचे त्यांच्याकडचे पदार्थ खाऊन बघितले पण, डोळ्यासमोर दिसणारी 'स्वछता' बघून ते जेवण घश्याखाली उतरेना! मेस च्या डब्यात निदान दृष्टी आड सृष्टी तरी होती!
असो, तर असेच रडत-खडत कॉलेज चे उरले सुरले दिवस ढकलले!
शिक्षण संपलं - एक महत्वाचा टप्पा पार करून नोकरीसाठी मी मुंबई ला रवाना झाले. ते शहर तर माझ्यासाठी अगदीच नवीन होतं त्यामुळे परत एकदा पहिले पाढे ५५! आणि मी पेयिंग गेस्ट म्हणून दाखल! ज्या काकूंकडे राहायचे अर्थात त्यांचाच डबा लावला. पण मेस पेक्षा बरंच बरं जेवण होतं, त्यांच्या हाताला चव होती!
५ वर्षांचा दांडगा अनुभव पाठीशी असल्याने आता ना पोटाने तक्रार केली ना जिभेने आठवण करून दिली!
डब्याच्या भरोशे मग नोकरीची ४ वर्षं पण सरली, मात्र शरीराच्या तक्रारी जोरदार मुसंडी मारून वर आल्या!
तेव्हा मात्र कानाला खडा लावला की आता नो मोर डबा!
मग मी स्वतः स्वयंपाक करायला शिकले - अर्धं कच्चं अर्धं शिजलेलं बनवत, नवनवे शोध लावत कसाबसा स्वतः पुरता डबा बनवता यायला लागला. यथावकाश लग्न झालं आणि 'स्वयंपाक' हा नेमका कसा, किती प्रमाणात, गोडा आणि गरम मसाल्यातला फरक करत करत अजूनही शिकतेच आहे 😉
पण!
आता बास!
I NEED A BREAK!!
UK ला आल्यापासून तिन्ही-त्रिकाळ काय बनवायचं, हा विचार करून करून माझा मेंदू झीजला अक्षरशः 😖
म्हणून आता परत एकदा मी 'डबा' लावायची हिम्मत करणार आहे 👹👹
कारण, आज काय स्वयंपाक करायचा हा प्रश्न झोप पूर्ण व्हायच्या आतच डोक्यात घोळायला लागतो. उठल्यावर पण फ्रिज मधे भाज्या आहेत का आणि कितपत आहेत हे तपासा मग त्या धुवा, चिरून घ्या, शिजवा!
बरं इथे आमच्या गावात ठराविक ४च भाज्या मिळतात आणि या देशातल्या भाज्या काही मला करता येत नाहीत💁 त्यामुळे पर्याय अजूनच कमी!
बरं नुसती भाजी करून भागतंय थोडीच! त्याला पोळी नाहीतर भाकरी करावीच लागते 😏 दुपारी जी भाजी केली ती संध्याकाळी नको असते, मग परत तेच चक्र! धुवा-चिरा-शिजवा-पोळी लाटा, गर्रर्रर्र!!!!
म्हणून आता ठरलं! डबा झिंदाबाद!
डबा लावला की कसं जास्त विचार करायची गरजच नाही, फक्त दिलेल्या पर्यायातून काय हवं ते निवडा आणि ऑर्डर करा.आला डबा की मस्त जेवण करा,अहाहा!
आयतं जेवण मिळणं म्हणजे निव्वळ सुख हो सुख!
हो पण मला तुमच्या शुभेच्छांची अत्यंत गरज आहे हं ह्या दिव्यातून जाण्यासाठी, नक्की मदत करा!
आणि हो तोंडी लावायला जरा तुमच्या मेस चे अनुभव पण येऊ देत की!
#मुक्कामपोस्टUK
Thursday, July 8, 2021
मुरमुरे तेल तिखट मीठ!
हो हे पदार्थाचं नाव आहे 😃 फार चविष्ट पदार्थ आहे हं!
एखाद्या दिवशी समजा तुमचं दुपारचं जेवण नीट झालं नसेल
किंव्हा
ऑफिस चे कॉल्स घेऊन/बोलून खूप दमायला झालं असेल
किंव्हा
उगाच कंटाळा येतो ना आपल्याला कधीतरी, मग सुचत नाही काय करावं?
आणि
भूक पण लागलेली असते पण आणि नसते पण 😝
अशावेळेस ना, हा पदार्थ बनवायचा, पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या मूड मस्त होतो की नाही बघाच ☺️👍
हं तर एका वाटीत मुरमुरे घ्या, त्यात शेंगदाणे टाका - दाणे भाजलेले असतील तर अजूनच मजा, दाळया किंव्हा डाळव असतील तर त्या ही टाका. आता एक छोटासा कांदा छान 'ओबड-धोबड' चिरून घ्या तोही त्या मुरमुरे मिश्रणात घाला. आता त्यात अगदी किंचित तेल + चवीनुसार मीठ + चिमूटभर तिखट घालून मस्त एकजीव करून घ्या आणि!
पहिला घास स्वतःला भरवत एका अत्यंत चवदार, बहारदार आणि मॅजिकल पदार्थाचा आस्वाद घ्या 😋😋😋
मोजून २च मिनिटात बनवता येणारा हा पदार्थ मॅग्गी पेक्षा तर कैक पटीने टेस्टी आहे हे नक्की, आणि हो डाएट चिवडा म्हणून पण खाता येतो 🤭
चला माझी तर आजची संध्याकाळ चविष्ट बनली, तुम्ही पण करून बघा 😃👍
Sunday, July 4, 2021
मूलभूत प्रश्न!
युट्युबला बघितलेल्या रेसिपी व्हिडिओज नंतर मला काही मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत. स्वयंपाकात निष्णात असलेल्या जाणकारांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी शंकानिरसन करावं ही विनंती आहे. १) कोथिंबीर धुवून न-घेता वापरली तर त्यातून जास्त सत्व मिळतं का? २) धने(ज्यांना हा शब्द चूक वाटत असेल किंवा समजला नसेल त्यांनी 'धणे' वाचावा) पूड घातल्यावर परत 'बारीक चिरलेली कोथिंबीर' का घालतात? धन्यांपासूनच कोथिंबीर उगवते ना? तरी दोन वेगळ्या रुपात वापरल्यास काही वेगळा फायदा होतो का शरीराला? ३) कोणतीही भाजी (नाॅन-व्हेज पदार्थ नाही, भाजीच हो)'आलं-लसूण-कांदा-टोमॅटो' (आ.ल.कां.टो) यांचं गरगट वापरुन शिजवली तरच चवदार बनते का? (माझ्या माहेरी-सासरी क्वचितच एखाद्या भाजीचं इतकं कौतुक केलेलं मी बघितलंय हो 😢) अगदी फुलगोबी/फ्लाॅवर च्या भाजीतही लसूण घालायचा असतो का? ४) बिर्याणी करतांना तेलात तूप/ तुपात तेल का घालतात? ५) आ.ल.कां.टो शिजवतांना त्यातून तेल सुटलं पाहिजे इतपत शिजवा, तर मग त्यात काही सत्व उरतं काहो? की फक्त चव चांगली हवी हाच एकमेव निकष असतो पदार्थाचा? ६) पालेभाजी करायच्या आधी धुवून घ्यावी आणि मग चिरावी(हो आमच्यात तरी भाजी चिरतातच कारण गवत कापतात किंवा बोट कापतं) आणि शिजवतांना पण झाकण ठेवावं असं मला आईने शिकवलं. पण, बहुतेक ठिकाणी चिरलेल्या पालेभाजीला आंघोळ घालायची प्रथा दिसते मग बरोबर पद्धत कोणती? ७) हो आणि ते गव्हाच्या पिठात बचकभर मीठ टाकून कणीक मळणे हे कोडं आजतागायत मला उलगडलेलं नाहीए! म्हणजे किती मीठ खायचं ते? पोळीत मीठ-भाजीत मीठ-वरण/आमटी असेल त्यात मीठ-चटणी/कोशिंबीर असली त्यातही मीठ??? आता उरलं सुरलं पाण्यातही घाला मीठ, त्यालाच का अळणी ठेवायचं ना! तुम्हांला माहित आहे की नाही माहीत नाही पण, दूध+मीठ खायचं नसतं त्यामुळे त्वचा रोग होतो असं डाॅक्टर सांगतात. ते चहा-पोळी साॅरी 'चपाती' खाणा-यांना कदाचित माहित नसेल नं, म्हणून फक्त माहिती दिली. ८) तेलात मोहरी टाकून ती तडतडली की मगच बाकी जिन्नस म्हणजे जिरे वगैरे टाकायचे असं असतं ना की त्या सिक्वेन्स ला काही अर्थ नाही? म्हणजे तेलात मोहरी-मेथी दाणे-जिरे असं सगळं एकत्रच टाकलेलं दिसलं. बहुतेक तरी मोहरीला फुटायला वेळ लागतो पण जिरे लवकर फुटतात नं, मग ती अर्धी फुटलेली/कच्ची मोहरी झेपते का पोटाला? मला तर बाई फार फार गोंधळायला झालंय युट्युबच्या एक्स्पर्ट शेफ्स च्या रेसिपीज बघून आणि त्यांनी दिलेलं अगाध ज्ञान ऐकून! म्हणून विचार केला तुम्हांला विचारून बघुया 😊
Thursday, June 24, 2021
अगतिकता
मोठ्या कष्टाने एक एक पाऊल उचलावं लागतं.. मनाची अवस्था फार बिकट झालेली असते, एकदा वाटतं जाऊया पुढे पण.. परत पाय अडखळतात..😢 कसला तरी आधार मिळावा असं सतत वाटत राहतं पण, हातांना मिळणारा तो तात्पुरता आधारही स्वतःचा तोल सांभाळायला पुरेसा नसतो 😩 क्षणोक्षणी अगतिकता जाणवत असते पण काहीच करता येत नाही, शरीर जणू गोठून गेलंय असं वाटत राहतं!! . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . खरं सांगा, दोन महिन्यांच्या अंतराने किंवा खूप दिवसांनी जर खास पायांचा व्यायाम केलात किंवा lower body workout केलंत तर हाच अनुभव येतो ना 😜 विशेषतः Lunges & Suqats चे दोन-दोन सेट्स केले की मग उठता-बसता 'देवच' आठवतात, होना 😁 हं, आता परत पहिल्या ओळीपासून वाचा बरं, म्हणजे गम्मत कळेल 😄
Wednesday, June 23, 2021
#मुक्कामपोस्टUK - मीटिंग इन्व्हाईट
परदेशात राहण्याचे किती अन काय तोटे असू शकतात याचा अंदाज काही चिवित्र अनुभव आल्यावरच येतो! आमच्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर एक आजी राहते. सध्या उन्हाळा सुरु आहे, हो म्हणजे पाऊस नाही पडत त्या दिवसाला 'समर' म्हणायचं असतं हं इथे! तर त्या आजीने घरातला सगळा पसारा गार्डन मधे ठेवला आहे आणि रोज जमेल तसा तो लाकडी पसारा तुकडे करुन बंबात जाळत बसते! भकाभक धूर येतो नुसता आणि इच्छा असूनही खिडक्या घट्ट बंद ठेवाव्या लागतात 😒 असं जर कोणी पुण्यात माझ्या घराच्या खाली किंवा समोर केलं असतं नं, तर मी जाऊन चांगली कानउघाडणी केली असती! अर्थात आपल्या तिथे असलं सामान 'भंगारात' देण्याचा पर्याय असतोच. पण! इथे प्रत्येक गोष्टीला नियम आहेत!! असे सगळेच नियम काही आम्हांला माहित नाहीत म्हणून मी आधी गुगलबाबाचा सल्ला घेत असते, त्यानुसार आत्ताच मला कळालं की असा टाकाऊ कचरा गार्डन मधे जाळायची (आणि दुस-याला त्रास द्यायची) मुभा सरकारने दिलेली आहे! फारच जर त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला मीटिंग इन्व्हाईट पाठवून रीतसर चर्चा करुन तोडगा काढा! कर्म माझं!!🤦 आता 'शेजारच्याला'च फक्त मीटिंग इन्व्हाईट पाठवायचा राहिला आयुष्यात!!😤 #मुक्कामपोस्टUK_गंमतजंमत
Saturday, June 19, 2021
#मुक्कामपोस्टUK - मराठी ईबुक्स अॅप
युके मधे आहे तोवर नविन मराठी पुस्तक हातात घेऊन वाचायला मिळणं माझ्यासाठी तरी 'अशक्य', 'दुर्मिळ', 'दुरापास्त' होऊन बसलं आहे पुष्कळ प्रयत्न करूनही! शेवटी दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून मी किंडल ला जवळ केलं, थोड्या दिवसांत 'बुकगंगा'चा ई-बुक प्लॅटफॉर्म सापडला आणि नुकतंच 'राजहंस'च्या मोबाईल अॅपचा अनुभव आला. या तीनही कंपन्यांच्या अॅपवर पुस्तक वाचनाचा जो अनुभव मला आला, तो तुमच्या समोर मांडणार आहे. जर तुम्हांला या अॅप्समधले काही वेगळे पर्याय सापडले असतील, तर ते मला नक्की सांगा जेणेकरून मला ते वापरता येतील आणि ई-बुक वाचन जरा सुसह्य करता येईल! अॅमेझाॅन किंडल अॅप फायदे : पुष्कळ मराठी ई-पुस्तकं उपलब्ध आहेत. सहज डाउनलोड करुन चाळू शकता. विकत घ्यायची इच्छा झाली तर एका क्लिकवर विकत घ्या, लगेचच ते तुमच्या लायब्ररी सेक्शन मधे दाखल होतं. वाचायला सुरूवात केल्यावर तुम्हांला जर फाॅन्ट मधे बदल करायचा असेल तर पर्याय आहे. तसेच, पुस्तकाचं पान काळ्या, पिवळसर, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगाचं करूनही वाचन सुखावह करु शकता. जर तुम्हांला पुस्तकाच्या पानाचा आकार बदलायचा असेल, अक्षरं लहान-मोठी करायची असतील तर तेही सहज करता येतं. आणि हे सगळे बदल सेव्ह करुन टेंपलेट बनवून वापरता येतात. वाचतांना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून लाईट अॅडजेस्ट करायचा पर्याय पण आहे. या सर्वांपेक्षा महत्वाचा पर्याय म्हणजे, ज्या पानावर तुम्ही वाचन थांबवून अॅप बंद केलंत किंवा दुस-या पुस्तकाकडे वळलात तर पुढच्या वेळेस त्याच पानावर ते उघडतं. बुकमार्क करायची कटकट नाही की शेवटचं पान कोणतं वाचलं बरं मी? म्हणून पानं उलटंत बसायची भानगड नाही!! तोटे : पुष्कळ मराठी शब्द नीट छापलेले नाहीत, त्यामुळे रसभंग होतो आणि जेवतांना दाताखाली खडा आल्याने जसा त्रास होतो ना तसं वाटायला लागतं! मराठी ई-बुक्स कै च्या कैच महाग आहेत!!! बुकगंगा अॅप फायदे : लायब्ररी मधे पुस्तक डाऊनलोड केलं की ते अगदी छान रांगेत कपाटात जाऊन बसतं. मग हवं ते पुस्तक उघडायचं आणि वाचायचं. बुकमार्क करायची सोय आहे. स्वच्छ प्रकाशात हातात घेऊन पुस्तक वाचते आहे असा अनुभव येतो. एकही शब्द चुकीचा छापलेला सापडला नाही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांमधे! ई-बुक्सची किंमत अॅमेझाॅन पेक्षा कैक पटीने कमी आणि सवलती भरपूर! तोटे : बुकगंगाचं पुस्तक चाळायला किंवा शोधायला वेगळं अॅप वापरावं लागतं आणि पुस्तक वाचायला वेगळं. एकाच अॅप मधे हे काम केलं असतं तर मी १००/१०० गुण दिले असते! अर्थात त्यांच्या वेबसाईट वरुन पुस्तक विकत घेऊन, मग तुम्ही लायब्ररी अॅप मधे डाऊनलोड करून पण वाचू शकता. राजहंस प्रकाशन मोबाईल अॅप तोटे : बुकमार्कचा कोणताच पर्याय नाही त्यामुळे पुस्तक बंद करतांना कोणत्या क्रमांकाच्या पानावर आहोत ते लक्षात ठेवावं लागतं. जरी लक्षात ठेवलं तरी पुढच्या वेळेस ते पान शोधायला बरेच कष्ट/पानं उलटत/स्वाईप राईट करत बसावे लागतात. अॅमेझाॅन सारखंच बरेचसे शब्द विचित्र छापलेले आहेत, मागचा पुढचा शब्द वाचून आपल्याला अंदाज बांधावा लागतो, पण विचका होतोच! खूप कमी पुस्तकांचे ई-बुक्स उपलब्ध केले आहेत, विशेषतः जुन्या प्रसिद्ध पुस्तकांच्या ई-बुक्स आवृत्ती नाहीतच! नविन पुस्तकांसाठी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. फायदे : अॅमेझाॅन सारखंच एकाच अॅपमधे पुस्तक बघून लगेच विकत घ्यायची सोय आहे. सवलती पण ठीकठाक असतात. पण मोबाईल अॅपचा सगळ्यात मोठ्ठा तोटा हा आहे की, नव्या-को-या पुस्तकाचा जो सुगंध विशेषतः राजहंस प्रकाशनाचं पुस्तक असेल तर अहाहा! घेता येत नाही 😭😭😭😭😭😭 म्हणूनही मला छापील पुस्तकं हवी आहेत हातात घेऊन वाचायला, अनुभवायला आणि छातीशी कवटाळून पहुडायला 😍 😍 तर, या तीनही अॅप्सपैकी मला 'बुकगंगा'चं लायब्ररी अॅप सगळ्यात जास्तं आवडलं. अगदीच पुस्तक नाही पण निदान डोळ्यांना पुस्तकाचा भास करवणारं अॅप वाटतं, मला ते! तुमचा या अॅप्सबद्दलचा अनुभव काय आहे मंडळी, नक्की सांगा. #मराठी_ईबुक्स_अॅप #मुक्कामपोस्टUK
Saturday, June 5, 2021
The Family Man - Must watch!
कोणत्याही वेबसिरीज चा सिक्वल चांगला किंवा पहिल्या सिझनच्या मानाने बरा असावा अशी अपेक्षा असते. त्या नियमाने 'The Family Man', चा दुसरा सिझन खरंच चांगला वाटला. एखाद्या कलाकाराचा अपवाद वगळता, पहिल्या सिझनचे सगळे कलाकार आहेत, त्यामुळे कथानकातली सुसूत्रता कायम राहिली आहे. या सिझनचं खास आकर्षक आहे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीची आघाडीची अभिनेत्री 'समंथा अकिनेनी'. मनोज वाजपेयी आणि ती अगदी तोडीस-तोड आहेत👌 कमाल अभिनय केलाय तिने, अगदी भावशून्य चेहरा आणि थंड नजर पण खुनशी दिमाग! प्रसंगानुरूप तिचा उफाळून येणारा राग आणि केलेली मारधाड यांत, फक्त हातच 'सलमान खान'च्या सफाईने चालतो असं नाही, तर डोळ्यातून जळते निखारे पडत आहेत असं वाटतं, कमाल! कमाल अभिनय!!😊👏👏👏 बाकी, मनोज वाजपेयी तर ख-या आयुष्यातही हेच काम करत असावा इतका खरा वाटतो आणि वागतोही! पहिला भाग आणि दुसरा भाग यामधे त्याचं वागणं-बोलणं-विचार करणं यात तसूभरही फरक जाणवत नाही. म्हणजे, जर दोन्ही भाग सलग बघितले तर वाटेल एखादा चित्रपट बघत आहोत आपण! पहिल्या भागाची कथा, चित्रीकरण, सगळ्या कलाकरांचा अभिनय हे तर आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतातच पण, दुस-या भागाची कथा सुध्दा अगदी चपखल आहे आणि त्याच उत्कंठेने आपण सलग सगळे भाग बघून कधी संपवतो हे कळतंच नाही! शेवटी 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर आधारित काही प्रसंग पेरले आहेत, सिझन ३ची नांदी असावी कदाचित, कळेलच लवकर. Must binge watch series - The Family Man season 1 & 2
Thursday, June 3, 2021
Happy Bicycle day
Happy Bicycle day 😃🚴 सायकल ही तुम्हां-आम्हां प्रत्येकाच्या आयुष्याचा विशेषतः लहानपणाचा अविभाज्य भाग असते, हो की नाही 😊👏👏 मला आठवतं, आम्ही राहायचो त्या भागात एक सायकलचं दुकान होतंं तिथे ५०पैसे, १रु. तास या हिशोबाने सायकल भाडेतत्वावर मिळायची.छोट्यांसाठी एकदम छोटी, त्याहून मोठ्या म्हणजे ७-८ वर्षांच्या मुलांसाठी त्याहून थोडी मोठी आणि १०वर्षांच्या मुलांसाठी अजून मोठ्ठी सायकल असायची. ती सायकल आणली की, तासभर गल्लीमधे इकडून-तिकडून नुसत्या फे-या मारायच्या आणि एक तास वस्सूल करायचा 😝 बरं, या सायकल साठी घरातल्या भावंडासकट, गल्लीतली मंडळी पण वाटेकरी असायचीच. मग काय सायकल कोणी किती वेळा चालवली यावरून भांडणं पण व्हायचीच 😂😂 धम्माल! धम्माल नुसती! तेंव्हापासून जी सायकलची आणि माझी गट्टी जमली, ती पुढे बरीच वर्षं अगदी लग्नानंतरही सुरु राहिली.लग्नाच्या वाढदिवसाला काय हवंय,यावर मी 'सायकल' दे म्हणाले नव-याला,यावरून तर माझं सायकलबद्दलचं प्रेम तुम्हांला लक्षात येईलच 🤭ही माझी ३री सायकल आहे. मला शाळेत जायला सायकल तशी जरा उशीरा मिळाली म्हणजे हायस्कूल ला गेल्यावर मिळाली. पण तोवर बहिणीच्या, मैत्रिणींच्या सायकल्स दामटणे यावर मी माझी हौस भागवून घ्यायचे. असंच एकदा, आमचा ७वी स्काॅलरशीपचा क्लास संपला आणि मी मैत्रीणीची सायकल खेळायला घेतली, तिनेही एका मित्राची सायकल घेतली आणि आमच्या घिरट्या सुरु झाल्या. कोण जास्त जोरात चालवतं या नादात कसं कुणास ठाऊक पण माझ्या सायकलचं पुढचं चाक आणि तिच्या सायकलचं मागचं चाक एकमेकांना घासले आणि धड्डाम करुन दोघीही डांबरी रस्त्यावर पडलो!!! 😖😰 मी डाव्या हातावर पडले आणि जोरदार कळ आली! नशीब मैत्रिणीला जास्त लागलं नाही पण, माझा हात मात्र गडबडला! हातावर लग्गेच सूज चढायला लागली 🤪आमच्या ट्यूशनच्या मॅडमनी ते बघितलं आणि लगोलग मला घरी सोडलं, बिचाऱ्या त्यांना पण इतकं टेन्शन आलं होतं! घरी गेल्यावर आईने माझा टंब सुजलेला हात बघितला आणि डोक्याला हात लावला🤦 लगेच बाबांना बोलावलं आणि आम्ही सरळ दवाखान्यात. मग काय तपासणी, एक्स-रे आणि सर्जरी करुन भलं-मोठ्ठं प्लास्टर लाऊन मी डावा हात गळ्यात बांधून एकदम्म तय्यार! खरं तर, बाबा मला त्यावर्षी वाढदिवसाला सायकल घेणारचं होते बरंका, पण आमचा उत्साह नडला आणि हात गळ्यात बांधून घेतला!!😟 यथावकाश प्लास्टर निघालं, हात बराच बरा झाला आणि काही महिन्यांतच मला माझी माझी स्वतःची पहिली रेंजर सायकल मिळाली 😊 😊 इतकी सुंदर सायकल होती नं माझी! एकदम दणकट, जाडजूड टायर्स असलेली आणि मुख्य म्हणजे खाली पडले जरी, तरी एक पाय अडकून राहिल अशी रचना असलेली! थोडक्यात काय तर 'लेडीज' सायकल नव्हती ती 😝 सायकल मिळाल्यावर तर मला आकाशच ठेंगणं झालं 😍 कोणतंही काम असेल की, मी लग्गेच सायकलला टांग मारून निघणार 🚴 शाळेत जायला-यायला, ट्युशन्स ला अर्थातच सायकल वर जायला सुरूवात केली. आई-बाबांना धाकधूक वाटायची पण नंतर माझा तसा अॅक्सिडेंट कधीच झाला नाही 😎 माझ्या रेंजरवर बसल्यावर मस्त वारा कानात शिरायचा आणि मी जोरजोरात सायकल हाणत रस्ता कापत पुढे जायचे! या नादात माझ्या हाताला घट्टे पडायला लागले होते पण ते बघून तर अजूनच चेव चढायचा 😄 😜 आई म्हणायची, काय हात झाले आहेत तुझे अगं, कोणी म्हणेल का पोरीचे हात आहेत म्हणून 😄 मी शाळेत असतांना तशीही टाॅमबाॅय सारखीच राहत होते, त्यामुळे आईने असं म्हणल्यावर तर भारीच वाटायचं 😄 😂 ११-१२वीला सायन्स घेतलं, मग काय पहाटे पाच ला क्लास कर, काॅलेजचे प्रॅक्टिकल्स कर, एक ना दोन १०० गोष्टी, मग नाईलाजाने सायकल ला बाजूला करुन गाडी हाताशी घेतली. मात्र, उच्च शिक्षणाला पुण्यनगरीत पाऊल ठेवलं आणि परत माझी सखी, माझी रेंजर सायकल नव्या रुपात माझ्यासोबत हिंडायला सज्ज झाली! पुण्यातल्या गर्दीतून सायकल चालवणं, हे काय दिव्य आहे हे लक्षात आल्यावर मात्र जरा धास्तावले, पण तरी जमवलं! फार दमछाक व्हायची हे मात्र नक्की😤 काॅलेज संपलं, मुंबईला नोकरी लागली तेंव्हा परत एकदा माझी आणि सायकलची ताटातूट झाली 😭 त्यानंतर, तब्बल पाच वर्षांनी जेंव्हा पुण्यात आले, लग्न करुन, तेंव्हा सगळ्यात आधी सायकल घेतली. पुन्हा एकदा जुन्या मैत्रिणीशी सूर जुळवत, वा-याच्या साथीने माझं सायकल चालवणं सुरु झालं ते मग निदान ६वर्षं सुरु राहिलं! युकेला येतांना बिचाऱ्या सायकल ला जड अंत:करणाने कसाबसा निरोप दिला😔 इथेही घेऊया का सायकल🤔 हा विचार मनांत चमकलाच पण इथली थंडी आडवी आली आणि तो विचार मी पुसूनच टाकला! एक मात्र नक्की, जेंव्हा केंव्हा परत घरी जाईन, तेंव्हा मी पुन्हा एकदा नविन सायकल घेईन आणि 'मै और मेरी साईकल, अक्सर ये बातें करतें हैं', म्हणत वा-यासोबत गाणी गात मज्जा करायला बाहेर पडू 😍 😍
Monday, May 31, 2021
Ugears Date Navigator
वेगवेगळे तुकडे जोडून, एकमेकांत गुंतवून बनवायच्या खेळण्या असतात बघा, तसंच एक खेळणं मला मिळालं, म्हणजे मी घेतलं, जमतंय का आपल्याला बनवायला बघावं, म्हणून 🤭 ( आपण पल्डो साधे आय.टी. कामगार, तव्हा जमतंय का नाय, कोणा ठाऊक 😉, तरी बघूच! ) Ugears Date Navigator नावाचं हे खेळणं मी घेतलं. घरी आल्या आल्या ते उघडून बघितलं तर दोन लाकडाच्या पातळ पट्ट्यांवर काही आकार कोरलेले दिसले. सोबत दिलेल्या कागदावर काही आकृत्यांद्वारे कोणता भाग कशाला, कसा जोडायचा ते लिहिलेलं होतं. मी त्याबरहुकूम सगळे भाग आधी त्या लाकडी पट्ट्यांमधून वेगळे केले.आणि एक एक तुकडा घेऊन व्यवस्थित जोडायचा खटाटोप सुरु केला. माझे हात जरा दमानं, जपून प्रत्येक भाग नीट तपासून मग जोडायचा प्रयत्न करत होते पण, माझ्या मनाची इतकी घाई सुरु होती, 'लवकर बनव नं, ते कसं काम करतं मला बघायचंय!'😃😃😃 'अगं, हा भाग असा नाही, तसा लावायचंय!!'🤨🙄 अशी मनात बडबड सुरु असतांना मी पहिला टप्पा पूर्ण केला. दुसरा करतांना त्या वेगवेगळ्या चकत्यांकडेच बघत बसले आणि इतकं सहज त्यातून फिरणारं चक्र तयार झालं की, मला गम्मतच वाटली त्या एकूण कलाकुसरीची! सुरेख दिसत होतं अगदी! तो टप्पा पूर्ण करुन मी तिसरी चकती त्यावर बसवायला गेले तर गडबड झालेली दिसली. मग तो कागद आणि मी बनवलेलं ते माॅडेल याची तपासणी केली. चूक लक्षात आल्यावर दुरूस्ती करुन परत पुढचं पाऊल, परत गडबड, परत तपासणी! असं करत करत चांगला अर्धा-पाऊण तास मान मोडून काम केल्यावर शेवटी एकदाचं ते माॅडेल तयार झालं 😄 😄 अहा! अगदी हुबेहूब जमलं हं 😃👏👏 त्या कागदावर दाखवल्याप्रमाणे 💃💃💃 मग मी त्यावर तारीख कशी बघायची ते शोधू लागले, उदाहरणानुसार करुन बघितलं तर, सापडलंही.पण लीप ईअरचं शोधण्यात जरा कष्ट पडले पण सापडलंच शेवटी, येस्स!🤜🤛 स्वतः असं काहीतरी छानसं, चालू शकणारं, खेळणं बनवायची ही माझी तशी पहिलीच वेळ! याआधी मी अशाच प्रकारच्या गाड्यांचे माॅडेल्स घेतलेले, त्याला चिकटवून तयार करावं लागतं. पण, बनवल्यावर त्याचा अपेक्षित परिणाम दिसला नाही, म्हणूनही मला हे माॅडेल घेतांना जरा शंका होती. पण, माझी शंका चूक ठरली आणि एक छानसं २०१७-२०४४ या वर्षांचं चालतं-बोलतं कॅलेंडर मी बनवलं सुद्धा 😄👏👏👏 या सगळ्या मेहनतीने मला डब्बल आनंद दिला, एकतर हे छोटुसं कॅलेंडर आणि दुसरं म्हणजे तब्बल दोन तास मी माझ्या फोनला विसरून गेले होते!! (त्यामुळेच, वेगवेगळ्या टप्पांचे फोटो नाही काढले, शेवटी तयार झालेल्या माॅडेलचा फक्त फोटो टाकता आला.) गेल्या वर्षभरापासून फोन असा हातावेगळा क्वचितच झाला होता!😰 कसं नं, शाळेत असतांना कार्यानुभव किंवा चित्रकला, हस्तकला, ओरिगामी हे विषय दुय्यम ठरवले जायचे, पण मला तर वाटतं, ख-या आयुष्यात आणि सद्यपरिस्थितीमधे या विषयाची खूप खूप गरज आहे! जेणेकरून निदान दोन घटका स्वतःच्या बुद्धीला चालना देता येईल आणि मन रमवता येईल 😌 #ugears_date_navigator #मुक्कामपोस्टUK
Thursday, May 13, 2021
#मुक्कामपोस्टUK - सौंदर्याच्या कल्पना
#Randomthoughts ह्या लोकांच्या सौंदर्याच्या कल्पना काय असतील बरं 🤔 म्हणजे आपल्याकडे कसं मुलगी गोरीपान, नाकी-डोळी नीटस वगैरे वगैरे..पण इथे तर एकजात सगळ्याच गो-या मुली आहेत 😃 बाहुल्यांचे असतात तसे सगळ्यांचे केस सोनेरी-सोनेरी आणि निळेशार टपोरे डोळे..आपल्या कडे अशा मुलीला अगदी कुठे ठेऊ अन कुठे नाही असं होऊन जातं आई-बापाला आणि पोरं तर..जाने दो. हां, तर मुद्दा हा आहे की इथे जी पोरं असतील ती नेमकं काय शोधत असतील बरं सौंदर्य म्हणून एखाद्या मुलीमधे? कदाचित गव्हाळ किंवा क्वचित काळ्या रंगाकडे झुकणारा रंग आवडत असेल का..केसांच्या रंगाबाबत इथल्या बहुतेक मुली सतत रंगरंगोटी करतांना दिसतात त्यामुळे त्यातल्या त्यात सोनेरी आणि लांब केस हेच बहुदा आवडत असतील का..🤔 डोळे बहुदा काळेशार अथवा तपकिरी रंगाचे आवडत असतील का..🤓 मनुष्य स्वभाव असा आहे की जे समोर दिसतं त्यापेक्षा वेगळं काहीतरी सतत आवडत असतं किंवा हवं असतं, म्हणून मी हा कयास केला की, इथली लोकं आपल्यासारखंच जे नाही दिसत तेच सौंदर्य शोधत असतील बहुदा.. आता थोड्या वेगळ्या गोष्टीबद्दल ..आपल्याकडे शक्यतो अंगभर कपडे घालणं सभ्यतेचं मानलं जातं, अर्थात आता ही गोष्ट आऊटडेटेड आहे पण काही ठिकाणी अस्तित्व दिसतं क्वचित. त्यामुळे, कमी किंवा तंग कपडे किंवा काही वेगळी फॅशन असलेले कपडे घातले विशेषतः मुलींनी तर रस्त्यावर असणा-या बहुतेक, त्यात स्त्री-पुरुष सगळेच आले, वळून बघतात आणि काही-बाही पुटपुटतात किंवा आपादमस्तक न्याहाळतात! पण इथे मुळातच कोणाचं कोणाकडे लक्षच नसतं किंवा मुद्दाम वळून बघणं वगैरे प्रकारच नाही. त्याचा परिणाम असा होतो की, इथे प्रत्येकालाच हवा तसा पेहराव करायची पूर्ण मुभा मिळते 👍 आपल्या बाॅलिवूडकरांनी बहुतेक पोरांना अशी सवय लावली आहे की, मुलगी कसे कपडे घालते, त्यावरून तिला तुम्ही पटवू शकता की नाही ते ठरवू शकता पण इथे तसं काहीच करता येत नाही! मुली इतक्या सहजपणे तोकडे कपडे घालून वावरतात ( थंडीच्या दिवसातही 😳 ) की तुम्ही त्यांना कोणत्याही कॅटेगरी मधे बसवू शकत नाही!! म्हणूनही मला हा प्रश्न पडतो की विशेषतः जी मुलं इथे जन्मणारी आणि ह्या मोकळ्या-ढाकळ्या वातावरणात वाढणारी आहेत, त्यांना एखादी मुलगी कोणत्या गोष्टीमुळे आवडत असेल बरं..😄 आता कदाचित असंही म्हणता येईल की इकडे राहणारी मुलं-मुली तर अगदी कळत्या-नकळत्या वयात शारीरिक जवळीक करायला सुरूवात करतात. मग सौंदर्य काय असतं हे तरी त्यांना कळत असेल का कधी? #Randomthoughts
Sunday, May 9, 2021
#मुक्कामपोस्टUK - #Stonehenge
#Stonehenge बँक हाॅलिडेचा मुहूर्त गाठून आम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीतली पहिली सफर 'Stonehenge' ला करायची ठरवली. Stonehenge हे एक दगडांचं मंदिर म्हणून संबोधलं जातं. सूर्य भ्रमणाच्या नुसार याची रचना सुमारे ५०००वर्षांपूर्वी केली असावी असं म्हणतात. Salisbury या गावी जाऊन पुढे Stonehenge ला जायला वेगळ्या बसेस अाहेत. या ठिकाणी पोहोचायला वेगवेगळे पर्याय आहेत, जसं की तुम्ही लंडनहून टुअर बसने जाऊ शकता किंवा स्वतःच्या गाडीने जाऊ शकता नाहीतर ट्रेन्स आहेतच. आमच्या गावापासून Salisbury जरा आडवाटेला असल्यामुळे आम्हांला मजल-दरमजल करत तीन वेगवेगळ्या ट्रेन्सने जावं लागलं, मज्जा आली (पण परतीच्या वेळेस पार भुस्काट पडलं 🤪) बरं, एक महत्वाची गोष्ट - अशा कोणत्याही ठिकाणी जायच्या आधी तिकिटं बुक करणं अत्यंत गरजेचं असतं! विशेषतः कोरोनोत्तर काळात तर युके मधल्या बहुतांश ठिकाणी आगावू तिकिट काढलं तरंच प्रवेश देणं सुरू आहे. English heritage संस्था Stonehenge आणि अशा ४०० ऐतिहासिकदृष्टया महत्वाच्या ठिकाणांची व्यवस्था बघते. त्यांच्या वेबसाईट वर अशा ठिकाणांची तिकिटं विकत मिळतात. तसंच, Salisbury गावापासून मुख्य ठिकाणी जाण्या-येण्यासाठीच्या बसचं तिकिट सुद्धा असंच वेबसाईट वरुन विकत घेता येतं. या नियमानुसार आम्ही प्रवासाच्या अथपासून ते इतिपर्यंत सगळ्या बाबींसाठी तिकिटं काढून मगच प्रस्थान केलं! Salisbury ला आम्ही पोहोचलो आणि स्टेशनबाहेर येऊन Stonehenge ला घेऊन जाणा-या बसमधे चढून तिकिटं तपासून घेतली. समोर ठेवलेले हेड-फोन्स उचलले आणि बसच्या माडीवर जाऊन बसलो. इथे टुअरच्या बसेस किंवा एकूणच ज्या बस असतात नं, त्यांच्या काचा एकदम चकचकीत स्वच्छ आणि भल्या-मोठ्या असतात. त्यामुळे कुठेही बसलं तरी बाहेरचं जग न्याहाळायला सोपं जातं. आमच्या सीटसमोर एक आॅडिओ प्लेअर लावला होता त्याला हेडफोन्स लावून आम्ही स्थानापन्न झालो. पाच-एक मिनीटांमधे बस भरली आणि निघाली. तसा त्या हेडफोन्समधून आवाज आला, 'Welcome to Stonehenge tour..', आणि बस जसजशी वळणं घेत निघाली तशी त्या रस्त्यावरची वेगवेगळी ठिकाणं काय आहेत, किती वर्षांपूर्वीची आहेत ही माहिती कळायला लागली. शहराचा भाग मागे टाकत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो आणि काही अंतरानंतर उंच-खोल अशा डोंगराळ भागात वसलेली टुमदार घरं दिसायला लागली, ती बाई आम्हांला माहिती सांगत होती. गाव मागे पडला आणि दुतर्फा हिरवीगार कुरणं दिसायला लागली 😍
बसच्या दोन्ही बाजूला नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवाकंच निसर्ग दिसत होता. मधेच कुठेतरी पिवळ्या फुलांनी डवरलेली शेतं दिसली आणि मला तर अगदी धावत त्या फुलांना बिलगायला जायची इच्छा झाली 😄 फार सुरेख दृश्य होतं ते, खरंच! अर्ध्या तासाच्या या निसर्गरम्य सफरीनंतर आम्ही मुख्य ठिकाणच्या बस थांब्यावर उतरलो.तिथे पोहोचतांना माझी नजर सारखी त्या दगडांच्या मंदिराला शोधत होती पण तसं काहीचं दिसलं नाही! घनदाट झाडांचा जणू कडेकोट पहारा लावलेला मात्र दिसत होता. बसमधून उतरलो तर तिथे असणाऱ्या माणसाने आम्हांला visitor centre ला जाऊन तिकिटं घ्यायला सांगितली. त्याबरहुकुम आम्ही दोघे चालत निघालो.अजूनही माझं शोधकार्य सुरूच होतं पण अं हं, इल्ले! काही दिसत नव्हतं 🤓 तिकिट खिडकीवर आम्ही ईमेल मधे मिळालेला तिकिटाचा कोड सांगून प्रिंटेड तिकिट घेतलं.मुख्य ठिकाण तिथून अर्ध्या मैल अंतरावर आहे तर, तुम्ही चालत जाऊ शकता किंवा शटल बसने जाऊ शकता अशी माहीती मिळाली. तिकिटं घेऊन आम्ही जरा तो परिसर न्याहाळला. तिथे एक भली-मोठी शिळा ठेवलेली होती(१), BC(म्हणजे Before Corona हो!) तिला हलवायच्या स्पर्धा व्हायच्या म्हणे! जास्त नाही अगदीच ९९-१०० माणसं लागतात ती शिळा हलवायला 😜😂 मी आपलं दुरुनच फोटो काढले! तिथेच पलीकडे, दगडांचं हे मंदिर बांधायच्या वेळी लोक कसे राहत असतील, याचा जो काही शोध संशोधकांनी लावला त्यानुसार, काही झोपड्यांचे नमुने उभे केलेले आहेत, तिथे फेरफटका मारून आलो. मुख्य ठिकाणी जायची उत्सुकता होती पण पोटातले कावळे टाहोs फोडत होते म्हणून आधी पोटोबा मग दगडोबा 😜 असं ठरलं. लगेच डबा उघडला आणि चीज-आलू पराठा पोटभर खाऊन घेतला. आता पुढे कितीही वेळ लागला तरी बेहत्तर!👍 मग मात्र आम्ही धावत जाऊन 'शटल' मधे बसलो आणि Stonehenge कडे कूच केली! बसमधून उतरून त्या दगडांच्या मंदिरावर डोळे खिळवत आम्ही आपसूक चालायला लागलो.😃😃😃 Sarsen आणि Bluestone अशा दोन प्रकारच्या दगडांच्या शिळा वापरून या मंदिराची रचना केली आहे. Sarsen दगडाच्या एकेक शिळेचं वजन ३०टन आहे😳, तर उंची जमिनीच्या वर ७मीटर आणि जमिनीखाली २-१/५मीटर आहे. तसंच Bluestone दगडाच्या एकेक शिळेचं वजन ३टन आहे😰! यातले Sarsen दगड हे २४किमो वरुन आणले गेले तर Bluestone दगडांची आयात २४०किमी वरुन नदीतुन केली गेली! या एकूणच मंदिराची रचना टप्प्या टप्प्यांमधे केली गेली असावी असं संशोधनाअंती कळालं, काळ असावा BC 3000 - BC 2200 (कोरोना नाही हो, Before Christ)😜 मुख्य ठिकाण ज्याला avenue म्हणतात ते जरी मंदिर म्हणून संबोधलं जात असलं तरी, त्या परिसरात जवळजवळ ३०० छोट-छोटे डोंगर आहेत, ज्यामधे त्याकाळच्या 'अति-महत्वाच्या' व्यक्तींना पुरलं आहे! अशा व्यक्तींचे अवशेष आणि त्यासोबतच काही दागिने,मातीची भांडी पण सापडली आहेत.हे सगळं तिथे असणाऱ्या संग्रहालयामधे बघायला मिळतं. ज्या ठिकाणाहून आम्ही बघायला सुरूवात केली तिथे एक भली मोठी ओबडधोबड शिळा उभी दिसली. ती शिळा Sarsen या प्रकारच्या दगडाची आहे आणि २०मी व्यास असलेली आहे. ह्या शिळेला खूप महत्व आहे. कारण उन्हाळ्यामधे सर्वात मोठ्या दिवसाचा सूर्य या शिळेमागून उगवतो आणि त्याची किरणं या मंदिराच्या मध्यभागी पडतात.😃 तसंच वर्षातला सगळ्यात लहान दिवस जेंव्हा असतो तेंव्हा दोन शिळांच्या मधून सूर्यास्त दिसतो. हे सोहळे बघायला जगभरातून लोक तिथे जातात. या मंदिराची रचना करतांना ३० दगड उभारून त्यावर ३०आडवे दगड ठेऊन गोलाकार रचना केली असावी पण काळाचे घाव सोसत, माणसांच्या हेळसांडपणाचा त्रास सहन करत करत बरेचसे दगड पडले, बांधकामासाठी नेण्यात आले! जर (२) या शिळेचा फोटो बघितला तर ती ओबडधोबड दिसते पण, मुख्य मंदिराच्या शिळा साधारण आयताकृती आकाराच्या आहेत. म्हणजे Sarsen दगडाच्या शिळांना घासून-तासून मग उभं केलं गेलं. त्यावर ज्या आडव्या शिळा आहेत त्याही अशाच तासून योग्य आकाराच्या बनवून मग ठेवल्या गेल्या. काही शिळांवर उंचवटे पण दिसतात. हे सगळं अशा काळातलं बांधकाम आहे जेंव्हा धातूंचा शोध माणसाला लागायचा होता. त्यामुळे, फक्त दगडांच्या आधारे ही कलाकुसर केली गेली. जी हत्यारं त्या लोकांनी वापरली त्यातली काही सापडली आहेत उत्खननात. बाहेरच्या बाजूने Sarsen दगडांच्या शिळा आहेत तर आतल्या बाजूला Bluestone दगडाच्या शिळा रोवलेल्या आहेत.Bluestone => दुर्दैवाने ही सगळी रचना अंमळ दुरूनच बघावी लागते कारण, ज्या ठिकाणी हे मंदिर उभारलं आहे ती जागा लोकांच्या जाण्या-येण्याने, हात लावण्याने इतक्या वर्षांत खराब होत चालली आहे.तसंच, सध्या कोरोनाच्या भितीने नव्या भिंती उभारल्या आहेतच S-D च्या! असो, तर १९४०-५० मधे या मंदिराच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात आलं आणि ज्या दगडांची झीज जास्त झाली आहे त्यांना काँक्रिटचं लिंपण केलं गेलं. एका उभ्या दगडाच्या शिळेला ते स्पष्ट दिसतंही! या संपूर्ण रचनेला बघत-बघत त्याची माहिती घेत घेत कधी आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली कळालंच नाही. जरा जवळ जाऊन बघता आलं असतं तर अजून छान वाटलं असतं, असं मात्र सारखं वाटत राहिलं! पण ठीक आहे, अशा वास्तूंना जपण्यासाठी दुरूनच बघावं, हेही खरं! जगप्रसिद्ध अशा एका तरी ठिकाणाला भेट देता आली याचा आनंद मात्र नक्कीच मिळाला!😃👏💃 जशी प्रदक्षिणा पूर्ण झाली तसे आम्ही 'शटल' कडे धावलो आणि स्टेशन ला नेणाऱ्या बसच्या थांब्यावर येऊन उभे राहिलो. पाच-एक मिनिटांत बस आली, माडीवरच्या सीट्सवर आम्ही विसावलो आणि जो धुवांधार पाऊस आला म्हणून सांगू 😄 बापरे!! आम्ही फार नशीबवान ठरलो नाहीतर, त्या पावसात ना कुठे आडोसा मिळाला असता ना धड काही बघता आलं असतं!😤 (गळका मेला युकेचा पाऊस 😖) परतीच्या प्रवासातही मगासची ती बाई माहिती द्यायला लागली आणि ते मी मगाशी म्हणाले नं ३०० डोंगरासारखे उंचवटे आहेत ते आम्हांला दिसले! पुढे गावातल्या आणखीन काही ठिकांणांची माहिती मिळाली आणि स्टेशन आल्यावर आमची सफर संपली! तर अशा प्रकारे एका दिवसाची आमची सहल छान झाली 😊 #मुक्कामपोस्टUK #travel_blog_stonehenge #StonehengeMonday, May 3, 2021
#आठवणी_लहानपणाच्या - शिदोरी
गेल्या महिन्यात १२ एप्रिलला युके मधे बहुतांश जागा खुल्या झाल्या 😃👏👏👏 मागच्या वर्षी उन्हाळा आणि 'कोरोना' हातात हात घालून आले, त्यामुळे घरातच डांबून राहावं लागलं 😖 यावर्षी तसं होऊ नये यासाठी आधीपासूनच तयारी करत करत शेवटी आम्हांला खुल्या हवेत आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात बाहेर पडायची मुभा मिळाली,अर्थात M-SD-S अनिवार्य आहेच! जसा उन्हाळा सुरु झाला तसं सलग सुट्ट्यांचे दिवसही आपसूक आलेच. इथे ज्या काही सार्वजनिक सुट्ट्या असतात नं त्या शक्यतो शुक्रवारी किंवा सोमवारी असतात जेणेकरून तीन दिवस सलग मिळतात आणि फिरायला जाता येतं 💃 असाच एक बँक हाॅलिडे आम्हांला मिळाला आणि निदान एक दिवसाची सहल करावी म्हणून आम्ही चटकन पटकन प्लॅन बनवून तिकिटं बुक करुन टाकली! जितकी तिकिटं काढणं महत्वाची तितकाच जेवणाचा डबा काय न्यायचा याचाही विचार लग्गेच पक्का करुन टाकला!👍 हम्म, आता तुम्हांला वाटेल जेवणाचा डबा का नेणार आहे ही? युकेमधे बाहेर खायला मिळत नाही की काय 😳🤔 तर हो! निदान माझ्यासाठी तरी या देशामधे 'सहजासहजी' शुद्ध शाकाहारी जेवण मिळत नाही ☹️ मला इतके चिवित्र अनुभव आले एक-दोन ठिकाणी फिरायला गेल्यावर की मी अगदी पक्कं ठरवून टाकलं की, या देशात असेपर्यंत मला कुठेही बाहेर जायचं असेल, मग ते असं सहलीला असो वा कधी काळी आॅफिसला, तर स्वतःसाठी अगदी नाश्त्यापासून ते पार रात्रीच्या जेवणापर्यंतचे सगळे डबे सोबत न्यायचेच 🙄🤦 कारण एकतर मी सामिष अन्न म्हणजे अगदी अंडी सुद्धा खात नाही.त्यामुळे बाहेर पडल्यावर कुठेही गेलो तर माझ्यासाठी शुद्ध शाकाहारी खाणावळ शोधणं अशक्य म्हणजे केवळ अशक्य आहे!! आणि फक्त माझ्यापुरतं नाही तर इतरही माझ्या ओळखीतल्या लोकांना ही महत्वाची गोष्ट मी कायम सांगत असते, असो. त्यामुळे आमच्या या सहलीसाठी सुद्धा मी दुपारचा डबा बनवून घ्यायचा ठरवला.कॅफेज सुरु झाल्यामुळे काॅफी बाहेरच घेऊया असं ठरलं(आॅफिसला जातांना मी काॅफीसुद्धा बनवून घेऊन जायचे🤭 😁) सगळ्यात सोपा-सुटसुटीत आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मला धड जमणारा पदार्थ मी करायचा ठरवला - आलू-चीज-पराठा! रात्री थोडी तयारी करुन ठेवावी म्हणून बटाटे उकडून सगळं मिश्रण तयार करून ठेवलं. बाकी सामानाची तयारी करता करता अचानक आई बनवायची त्या धपाट्यांची आठवण झाली आणि माझं मन अलगद लहानपणाच्या त्या आठवणींमधे जाऊन बसलं 😍 आमचं कुटुंब मोठं त्यामुळे बाहेरगावी जायचं ठरलं की आईची खूप तारांबळ उडायची. एक ना अनेक गोष्टींची तयारी करावी लागायची आणि त्यात अत्यंत महत्वाचं काम म्हणजे सगळ्यांसाठी 'शिदोरी' बनवणे! आम्ही मुख्यत्वेकरुन लाल परीने प्रवास करायचो. तेंव्हा म्हणजे ९०-९५च्या दिवसांत बसमधे खाद्यपदार्थ विकायला येणारे विशेष लोक नसायचे आणि गाड्या पण पेशल धाबे बघून थांबत नसत. क्वचित काही गाड्या थांबायच्याही, पण बाहेरचे कोणतेच पदार्थ खायचे नाहीत असा आमच्या आई-बाबांचा दंडक होता! आणि ते योग्य होतं असं माझं आजही मत आहेच! तर आम्हा ६-८माणसांकरता आई शिदोरी बनवून घ्यायची.निघायच्या एक दिवस आधी किंव्हा निघायच्या दिवशी अगदी मध्यरात्री उठून स्वयंपाकघरात तिचं काम सुरु व्हायचं! घरी विरजन लावलेलं सायीचं घट्ट दही+वेगवेगळी पिठं+गव्हाचं पिठ+ओवा+मीठ यांचं मिश्रण करुन अगदी व्यवस्थित मळून त्यापासून चवदार असे धपाटे आई बनवायची 😋😋 त्यासोबत खायला/तोंडी लावायला आम्हा पोरांसाठी कैरीचं लोणचं आणि मोठ्यांसाठी हिरव्या मिरचीचा ठेचा असा एकूण मेन्यू असायचा. आणि हो कच्चा कांदा पण! एकदा सगळ्यांना जितके हवेत तितके + १ = टोटल धपाटे, बनवून झाले की ते सगळे गार करुन व्यवस्थित एका कापडात बांधून त्यावर चटणी,लोणच्याची पाकिटं, छोटे कांदे ठेऊन ती सगळी शिदोरी दुस-या मोठ्या कापडात बांधून घेतली जायची. ही शिदोरी आणि पाण्याची कापडी पिशवी हे एका मोठ्या पिशवीत घेऊन, आम्हा पोरांपैकी कोणा एकाकडे ती पिशवी सांभाळायची मोठ्ठी जबाबदारी दिली जायची! जर उन्हाळ्यात प्रवास करत असू तर काही ठिकाणी काकडी तेवढी विकत घ्यायचे बाबा मग काय जेवणाला बहार यायची, अहाहा 😘 ते सगळं आठवून पण तोंडाला पाणी सुटलं माझ्या 😋😋 जेवणाची वेळ झाली की, बाबा आम्हा सगळ्यांना पेपर प्लेट्स् किंवा कागदाचे एकसारखे कापलेले तुकडे हातात द्यायचे आणि त्यावर मग आई प्रत्येकाला अर्धं/एक (जितकं धरता येईल हातात) त्यानुसार धपाटं आणि त्यावर लोणचं वाढायची आणि आमचं जेवण सुरु! खिडकीच्या बाहेर बघत, एकमेकांना चिडवत,त्रास देत मस्त पंगत चालायची आमची लाल परीच्या हिरव्यागार सीट्सवर बसून 😆😆 जेवण झालं की मग, पाण्याच्या कापडी पिशवीतलं गारगार पाणी बाबा काढून प्रत्येकाला द्यायचे. ते पाणी प्यायल्यावर, गाडीच्या तालावर डोलत डोलत अशी गाढ झोप लागायची नं, स्वर्गसुखच जणू!! जेंव्हा आम्ही मुलं शाळेच्या सहलीला जात असू तेंव्हा मात्र खास मेन्यू बनवून द्यायची आई - पु-या आणि बटाट्याची भाजी! मला आठवतं तसं बहुतांश मैत्रिणींच्या डब्यात पण साधारण हाच मेन्यू असायचा तेंव्हा 😄 पदार्थ एकच असला तरी प्रत्येकाच्या डब्यातला चाखला की वेगळी चव कळायची, सहलीच्या मजेत ती पण एक वेगळी मजा असायची 😁 मोठं झाल्यावर जसे आम्ही एकेकजण शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलो तेंव्हाही 'शिदोरी' चा हा शिरस्ता चालूच राहिला. मी तर घराबाहेर पडल्यावर शिक्षण सुरु असतांनाच्या पाचही वर्षांमधे बेसनाचे लाडू-चिवडा आणि जितके दिवस अन्न टिकू शकतं तितक्या दिवसांचा पोळी-भाजीचा डबा घेऊनच निघायचे. होस्टेलच्या दिवसांंमधे डब्याचं जेवण जेऊन शिसारी यायची आणि आईच्या शिदोरीची आठवण तीव्र व्हायची. असं वाटायचं कधी एकदा घरी जाऊन आईच्या हातचं जेवते😭 युकेला आल्यापासून आता परत एकदा तशीच अवस्था झाली आहे माझी! फरक इतकाच आहे की इथे डबा नाही तर मीच बनवलेलं जेवण खाऊन कंटाळा आला आहे मला 😰😭😭 कोण कुठला तो बकवास-उपटसुंभ कोरोना आलाय आपल्या पृथ्वीवर आणि मला घरी जाता येत नाहीए 😭 कोणाचं काय तर कोणाचं काय!🙄 असो! तर अशी आहे शिदोरीची मजा मजा. आठवणींच्या या सहलीतून फेरफटका मारून येईतो रात्रीचे बारा कधी वाजून गेले कळालंच नाही! आणि लक्षात आलं, उशीर झाला आहे - दुस-या दिवशी लवकर उठून पराठे बनवायचे आहेत! चला, आता पुढच्या ब्लाॅगमधे उरलेल्या गप्पा मारुया 😊 👋👋
Sunday, April 25, 2021
#आठवणी_लहानपणाच्या : आईस्क्रीम आणि बरंच काही..
आॅफिसचं काम करता करता दुपारी अचानक एक छानसं संगीत कानावर आलं आणि आपसूक नजर खिडकीतून बाहेर शोधायला लागली, कुठून येत असेल हा आवाज🤔 दोन-तीन मिनीटे सतत आवाज ऐकू आला तेंव्हा मी खिडकीपाशी येऊन शोधायला लागले की, असं भोंगा लावून एकच धून कोण बरं वाजवतंय?😃 आणि एक छोटी गाडी येतांना दिसली - तो होता आईस्क्रीम चा मिनी ट्रक 😊 लाल रंगाने सजवलेला आणि छानसं संगीत वाजवत फिरणारा 😊 थोड्या थोड्या अंतरावर तो आईस्क्रीमवाला ट्रक थांबवायचा आणि कोणी आलं नाही तर पुढे जायचा. आठवड्यातले ठरावीक २/३ दिवस या ट्रकची फेरी ठरलेली असते माझ्या भागामधे, पण कधी कोणा मुलांना घराबाहेर येऊन आईस्क्रीम विकत घेतांना बघितलं नाही मी.. पण या आईस्क्रीमच्या गाडीला बघितलं, की मला माझ्या लहानपणी दारासमोर येणाऱ्या आईस्क्रीमवाल्या काकांची आठवण हटकून आलीच! उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की भाजी विकणाऱ्यांपेक्षा इतर गोष्टी विकणारी माणसं आमच्या गल्लीमधे जास्त दिसायला लागायची. त्यात मग खेळण्या विकणारा गाडा यायचा तर कधी आईस्क्रीम-कुल्फिवाला. मला ती आईस्क्रीमची गाडी लक्षात राहण्याचं मुख्य कारण म्हणजे ओळीत मांडलेले स्टीलचे आईस्क्रीम खायचे कप्स आणि त्यात छोटासा स्टीलचा चमचा! एकूणच ती गाडी-ते आईस्क्रीमवाले काका हे इतर वस्तू विकणाऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं होतं म्हणून आकर्षक वाटायचं! ते काका नेहमी पांढरी गांधीटोपी-सदरा-दुटांगी धोतर असा पेहराव करायचे. त्यांच्या गाडीला ना छोटी घंटी अडकवलेली होती आणि त्याला दोरी बांधलेली असायची. ते काका एका हाताने गाडी ढकलायचे आणि दुस-या हाताने सतत ती घंटी वाजवायचे.बहुदा आकाशी-निळसर रंग दिलेला होता त्यांच्या गाडीला सगळीकडे आणि आईस्क्रीमचे ते स्टीलचे कप्स एका शोकेसमधे ओळीने मांडलेले असायचे.तर गाडीच्या मध्यभागी एक मोठा डबा होता ज्यामधे आईस्क्रीम असायचं.यासोबतच एक जर्मनचा मोठा वाडगा/Mug ठेवलेला असायचा ज्यामधे आईस्क्रीमचा स्कुप बनवतात नं, तो चमचा असायचा. कोणी आईस्क्रीम घ्यायला आलं की, ते काका गाडीच्या मधे असणारं आईस्क्रीमच्या डब्याचं, तिजोरीच्या दरवाज्यासारखं छोटुसं झाकण उचलून बाजूला करायचे आणि स्कुप बनवायचा चमचा त्यात घालून खाड-खुड आवाज करत एक गारगार-रंगीत आईस्क्रीमचा गोळा बाहेर काढून त्या स्टीलच्या कपामधे घालून द्यायचे 😍 आईस्क्रीम खाण्याची मजा तर वेगळी होतीच पण ही सगळी प्रक्रिया बघायला मला जास्त आवडायचं! खरं तर, त्या काकांकडून आम्ही क्वचितच कधी आईस्क्रीम विकत घेतलं असावं. कारण, माझी आई घरीच आईस्क्रीम बनवायची 😋😋 आईस्क्रीम बनवायचं आयताकृती भांडं होतं आमच्याकडे. त्याला खाच होती, ज्यात झाकण सरकवून घट्ट बसवावं लागायचं जेणेकरून बर्फ पडणार/साचणार नाही. उन्हाळ्याची सुट्टी लागली की लगेच ते भांडं माळ्यावरुन खाली उतरायचं आणि आईस्क्रीमचं सगळं साहित्य गोळा केलं जायचं. मग कधी पिस्ता कधी टुटी-फ्रुटी तर कधी आंबा असे वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे आईस्क्रीम बनवले जायचे. दूध आटवणे मग त्यात योग्य प्रमाणात साखर,खायचा रंग, सुका-मेवा..असे आवश्यक तितके + प्रत्येकाच्या आवडीनुसार जिन्नस एकत्र करुन आईस्क्रीमचं मिश्रण त्या भांड्यात ओतून, ते भांडं एकदम सील-बंद करून डीप फ्रिजमधे ठेवलं जायचं! मग सुरु व्हायची प्रतिक्षा!! दर तासाने कोणी न कोणी ते भांडं उघडून बघायचा प्रयत्न करायचो आणि मग आई रागवायची 😜 सरतेशेवटी चांगले १०-१२तास वाट बघितल्यावर मस्त आईस्क्रीम तयार झालेलं असायचं 😘 😘 चव चाखायची म्हणून अर्थातच चढाओढ असायची आमच्यात😄 मग एकजण त्या डब्याचं झाकण सावकाश बाजूला करुन, अगदी कोपऱ्यातला थोडासा टवका चमच्याने काढून चाखून बघायचा, हम्म अगदी चविष्ट गारेगार चव जिभेला शहारत जायची 😘 लगेच घरातल्या सगळ्यांसाठी वाट्या घेऊन त्यात प्रत्येकाला एक एक स्लॅब कापून दिला जायचा आणि सर्वजण त्या घरी बनवलेल्या चविष्ट आईसक्रीमची मजा लुटायचे 😍 फार छान दिवस होते ते 😘 😘 तसं बघितलं तर, आईस्क्रीम बनवणं हे मुख्यत्वे आईचं काम असायचं, आम्ही लुडबूड करायचो, पण, ती फक्त चव घेण्यासाठीच 😄 आईस्क्रीम इतकाच जिव्हाळ्याचा विषय होता 'रसना'! मला त्या रसनाच्या जाहिराती अजूनही अगदी ठळक आठवतात 😄 रसनाचं पाकिट आणायचं, एक मोठं भांडं(जे दुधाचं नसेल) ते घेऊन त्यात माठातलं गारेगार पाणी टाकायचं,किलो-किलो साखर टाकायची आणि रसनाच्या पाकीटातलं त्यात मिसळून ढवळsssत बसायचंsss एकदा का साखर विरघळली की छान सुगंधी आणि पिवळ्या रंगाचं-आंबा फ्लेव्हरचं रसना तय्यार व्हायचं! मग ते काचेच्या ग्लासमधे ओतायचं आणि एक एक घोट घेत त्याचा आनंद अनुभवायचा, मला आत्तासुद्धा रसनाची चव आठवते 😘 रसना बनवणं हे काम मात्र हटकून आम्हां पोरांचं असायचं. त्यात नंतर नंतर तर किती काय काय फ्लेव्हर्स आले, पण मला आंबाच आवडायचं. याच 'रसना' ला आम्ही आमच्या कल्पक बालबुध्दीने वेगवेगळ्या साच्यात टाकून त्याला नविन रूपं द्यायचा केविलवाणा प्रयत्न केल्याचं आता आठवलं तर हसू आवरत नाही 😄 'बर्फाचा गोळा' हे प्रकरण अस्वच्छतेच्या कारणामुळे आम्हा सगळ्यांसाठी वर्ज्य होतं. मग आम्ही काय शक्कल लढवली, तर रसना एका स्टीलच्या ग्लासात/वाटीत भरून त्यात चमचा ठेऊन फ्रिजमधे ठेवायचं आणि दोन-तीन तासाने बाहेर काढलं की त्याचा झालेला असायचा बर्फ! 😄 😄 मग त्या पेला/वाटीला थोडावेळ तसंच ठेवायचं आणि ते वितळायला सुरूवात झाली की 'सुर्र-सुर्र' करत चाखून खायचं 😜 😁 😁 काय तरी उद्योग रे देवा! पण मज्जा यायची खूप 😄 😄 दुसरा प्रकार याहून भन्नाट! पेप्सी/पिप्सी म्हणून रंगीबेरंगी प्लॅस्टिकमधे कसलं तरी द्रव भरून त्याचा बर्फ बनवलेला एक प्रकार मिळायचा. आमच्या आईने पेप्सी बनवायला वापरतात तो प्लॅस्टिकचा रोल आणला. आणि आम्ही शास्त्रज्ञ लगेच त्या रोलचे एकसारखे तुकडे केले. कोणाला लहान-मोठी पेप्सी मिळाली म्हणून उगाच भांडण नको! मग प्रत्येक तुकड्याचं एक टोक मेणबत्तीच्या ज्योतीवर फिरवून घट्ट बंद करायचं आणि दुस-या बाजूने त्यात रसना टाकायचं आणि ती बाजू बंद करुन फ्रिजमधे रवानगी करायची की, तासाभरात बर्फ बनून फुगुन टंब झालेली पेप्सी तय्यार! ती घेऊन एका टोकाने फोडून सुं-सुं करत चोखत बसायचं की तासभर निश्चिंती! काय मस्त वेळ जायचा, वाह वा! बरं झालं तेंव्हा मोबाईल्स नव्हते😁 हां आणि एक कुल्फिवाला पण यायचा आमच्या गल्लीत. त्याच्या गाड्यावर पत्र्याचा मोठ्ठा डबा असायचा त्यावर लाल भडक्क रंगांचं कापड अंथरलेलं असायचं. कुल्फि घ्यायला पोरं गोळा झाले की तो माणूस प्रत्येकाला जितक्या पैश्याची/रूपयाची कुल्फि हवी असेल त्यानुसार ते कापड सरकवून बांबूच्या काड्या खोसलेले पत्र्याचेच कोन बाहेर काढायचा. ते सगळे कोन पाणी असलेल्या भांड्यात ठेवायचा. एक एक कोन बाहेर काढून दोन्ही हाताने त्यावर घुसळल्यासारखं करायचा आणि त्यात अडकवलेली काडी ओढून दाणेदार-मलई असलेली पांढरीशुभ्र कुल्फि समोर धरायचा! ती गारेगार कुल्फि दातांना झिणझिण्या आणायची 😜 मग कधी ऊसाचा रस विकणारा गाडा यायचा! आमच्या घरी सगळ्यांना ऊसाचा रस अतिशय आवडतो. असा गाडा दारासमोर आला की लगेच आम्ही मोठं भांडं घेऊन त्या काकांना सांगायचो 'स्पेशल' रस पाहिजे. मग त्या काकांनी जे भांडं लावलेलं असायचं ते स्वच्छ करुन घ्यायला सांगायचो, त्यात बर्फ नाही टाकायचा ही 'अतिमहत्वाची' सूचना द्यायचो! ते काका गाडीत ठेवलेल्या ऊसाच्या ढिगाऱ्यातून दोन मोठ्ठे ऊस काढायचे आणि लाकडी यंत्रात घालून डोक्यावरचं हँडल फिरवायचे. त्या ऊसाचा पार चोथा-चोथा होईतो पिळत बसायचे. आमच्या आर्डरपुरता रस निघाला की आम्ही आणलेल्या भांड्यात द्यायचे आणि आम्ही घरात येऊन तो रस 'रंग' बदलायच्या आत एकेकासाठी ग्लासात ओतून क्वचित कधी बर्फ टाकून घटाघट गट्टम करायचो! लहानपणीची ही रसवाल्या काकांना सूचना द्यायची सवय अजून गेली नाहीए हं माझी 😁 वाह! एक ना अनेक आठवणींची ही लड एकदा सुरु झाली नं, की खूप खास असं मनाच्या तळातून वर घेऊन येते 😍 I'm loving it!
Saturday, April 17, 2021
Straight/Hetro couple : A NEW Minority!!
Disclaimer : I am not at all against anyone's sexual preference & LGBTQ+ community But being an audience this is my humble request to all the writers & directors of 'Bollywood' especially, to stop portraying each couple in a film/webseries to be either a gay or lesbo! It's irritating beyond imagination now!! Can't you write a simple story where a heterosexual couple is shown?? Are such stories outdated? I understand LGBTQ+ community's stories are required to be shown, to be seen, understood n appreciated! But are you really showing what their life is like? Or it's just their sex routine n rotation of partners? I like to watch different content on OTT by investing my time but if you are offering just 1 storyline every now n then, then I am sorry! I obviously HATE IT!!!😖😖😖😖😖 This bombardment has caused such a weird change in my thinking pattern that, if I am watching any advertisement n see 2 girls then my automatic reaction would be, now they'll kiss each other! Oh crap 🤦 मराठी मधे एक म्हण आहे - अति तिथे माती! आजवर LGBTQ+ लोकांबद्दल आपल्या समाजात अज्जिबात माहिती नव्हती, त्यांना होणारे मानसिक, शारीरिक त्रास हे वेगळे असू शकतात हे लोकांच्या खिजगणतीतही नव्हतं, म्हणून चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्यावर बेतलेल्या गोष्टी दाखवायला सुरूवात केली. पण आताशा फक्त त्यांच्या शारीरिक संबंधांबद्दल दाखविणे हाच 'मुख्य' मुद्दा बनत चालला आहे! आणि तो मुद्दा पडद्यावर रंगवण्यासाठी सगळ्या (स्वतःला) दिग्गज समजणा-या कलाकारांची चढाओढ सुरु झाली आहे! असं वाटायला लागलं आहे की प्रत्येक कलाकार फक्त आणि फक्त 'तोच' रोल मिळावा याकडे नजर लाऊन बसला आहे! तुम्हांला जर 'जनजागृती'च करायची आहे नं समाजामधल्या या लोकांबाबत तर ती जीवनशैली असणाऱ्यांना घ्या ना तुमच्या चित्रपटामधे, वेबसिरिज मधे! जी 'गंगा' नामक कलाकार झी मराठीच्या माध्यमातून आपल्यासमोर आली आहे तिला तर लोकांनी स्वीकारलं नाही, मारहाण केली! मग तुम्ही आमच्यावर सतत या गोष्टींचा मारा करुन काही साध्य करु शकला आहात का, यापुढे करु शकाल का?? फक्त शारीरिक संबंध इतकंच आयुष्य नाही त्या लोकांचं! साधी-सरळ माणसं आहेत ती पण! त्यांच्यापैकी असणारे कित्येक जण प्रयत्न पूर्वक तुमच्या आमच्यासारखं सुख-दुःखाचं आयुष्य जगतात! पण, ते जर दाखवलं तर TRP कसा मिळेलं नं तुमच्या सिरिअल/वेबसिरीज ला! याउपर, अधिक काय बोलावे, असो! - एक हताश प्रेक्षक!!
Saturday, April 10, 2021
#खाण्यासाठी_जन्म_आपुला : BBQ Style Cajun Potato
#latepost #खाण्यासाठी_जन्म_आपुला आॅफिसच्या काॅल्समधून डोकं वर काढावं, तोवर शुक्रवारची रात्र अवतरलेली असते! कधी एकदा तो लॅपटाॅप बंद करते असं होऊन जातं आणि मग वाटतं, चला आता काहीतरी खास बनवावं का आज 😃 मग वाटतं, जाऊ देत आज परत काय बनवणार? रोज तिन्ही त्रिकाळ 'काही पण बनव' या जटिल प्रश्नावर काथ्याकूट करत डोक्याचा पार भूगा झालेला असतो 😖 पण तरी 'शुक्रवार'चं एक वेगळं महत्व आहे आम्हा 'आय.टी.' कामगारांच्या आयुष्यात 😜 त्यामुळे कधीही न करुन बघितलेला पदार्थ करायची खुमखुमी निदान चार महिन्यांतून एकदा तरी मला येतेच 😆 तसंच काहीसं मागच्या शुक्रवारी झालं, आम्हांला चार दिवसांची सुट्टी(?) होती म्हणून युट्युब पालथं घालून, शक्य तितक्या 'एक्स्पर्ट शेफ्स'च्या 'रेसिपीज' बघून आणि घरामधे असणाऱ्या सामानात काय बनवता येईल इतका सगळा जामानिमा करुन मी एकदाचा पदार्थ ठरवला! भारतात असतांना BBQ Nation मधे खाल्लेले दोन-तीन पदार्थ मला प्रचंड आवडतात त्यातलाच एक BBQ Cajun Potato हा प्रकार मी करुन बघायचं ठरवलं! युट्युब च्या रेसिपी व्हिडिओज मधे मोजून १०मिनीटांत अगदी रसरशीत दिसणारा पदार्थ तय्यार होतो, काश वो मुझे टीव्ही में से सिधा मेरे डायनिंग टेबल पे मिल जाता तो 😍 😍 😍 कल्पनाविलास पुरे! तर मी त्या Cajun potato च्या असतील-नसतील त्या सगळ्या रेसिपीज बघून घेतल्या आणि दीर्घ श्वास घेत स्वतःला स्वयंपाकघरात घेऊन गेले!🤭 होनं, असं काही वेगळं बनवायचं असेल तर माझा स्वयंपाकातला अजिबात नसलेला काॅन्फिडंस लग्गेच पळूनच जातो बाई 😰 तर, मी काय सांगत होते हं, Cajun potato ची एक त्यातल्या त्यात सोपी रेसिपी मी करायला घेतली. फोन समोर ठेऊन तो व्हिडिओ सुरु केला आणि एकेक साहित्य गोळा करेपर्यंत तो व्हिडिओ संपला पण 🤣🤣 मग काय रिपीट मोड आॅन आणि गोंधळ पण! सगळ्यात आधी ते पिल्लू बटाटे कुकर मधे एकच शिटी करुन उकडून घेतले. ते गार करायला ठेऊन पुढची तयारी करायला म्हणून - काॅनस्टार्च/काॅर्नफ्लाॅवर आणि मैदा घेतला. जितकं प्रमाण सांगितलं तितकंच घेतलं हं मी🙄 आणि पाणी घालून ते एकत्र केलं पण ते अगदीच पाणीदार झालं 😳 आता काय करू? हे तर व्हिडिओ सारखं बनत नाही मग? थोडा मैदा घालून बघूया, म्हणून त्यात थोडासा मैदा टाकला परत हलवलं पण अजूनही पाणी?दारच!🤔 आता थोडा काॅर्नस्टार्च घालू, हलवू, तरी घट्ट?? नाहीच!🙈 परत मैदा घातला, परत हलवलं आणि ??🤦 हे काय य्यार!!! मी तर योग्य प्रमाणात पाणी घातलं नं, तरी इतकं पाणी का आहे यात??🤯🤯 तिकडे तो व्हिडिओ १५व्यांदा Cajun potato ताटलीत छान सजवून परत एकदा रेसिपी सांगायला सज्ज झाला होता 😜 मी विचार केला जाऊ देत जे जसं आहे तसं, जाऊया पुढे! फार फार तर काय होईल ते पाणीदार जे काही आहे स्लरी की काय ते बटाट्याला चिकटणार नाही, ठीके, चालतंय की 😝 आता या पेक्षा कठीण प्रसंगाला सामोरं जायचं होतं, ते पिल्लू बटाटे त्या मिश्रणामधे घोळवून(ज्याला ते मिश्रण चिकटणं अनिवार्य आहे)तळायचे होते!😳🤫 मी परत एकदा बाह्या सरसावून तय्यार झाले, तेल चांगलं कडकडीत झालं आणि प्रयत्नपूर्वक मी एकेक बटाटा त्या मिश्रणात डूबूक डाबूक करुन तेलात सोडला, हुश्श! अगदी बघण्यासारखा नजारा होता हों 😝 एखादा बटाटा मिश्रणाला घट्ट धरुन ठेवत होता तर एखादा मिश्रणाच्या तारा हातात घेऊन तेलात तरंगत होता तर एखाद्याने 'तू कोण?' म्हणत मिश्रणाचं आवरण चक्क भिरकावून लावलं होतं 😜 कसं-बसं करत मी ते सगळे बटाटे एकदाचे तळून घेतले आणि सुटका झाली!😤 आता कसं सोपं काम होतं, फक्त मेयोनीज आणि तिखट-मीठ एकत्र करुन जरासं साॅस सारखं बनवून त्या बटाट्यांवर टाकायचं आणि टडाss😘😘 तसं, मेयोनीजने पण जरासा त्रास दिलाचं पातळ व्हायला, पण त्या स्लरीच्या मानाने अंमळ कमीच!🤭 आणि! आणि! आणि!🎉🎊 शेवटी एकदाचे ते BBQ Style Cajun Potato सजूनधजून ताटलीमधे विराजमान झालेss 💃💃💃💃 हा बघा फोटो, छान दिसत आहेत नं 😍😋😋
नविन पदार्थ केला म्हणून आमच्या बल्लवाचार्यांना त्वरित चाखायला दिला, हो नवरा माझ्यापेक्षा चविष्ट स्वयंपाक करतो त्यामुळे त्याची 'एक्स्पर्ट' कमेंट फार महत्वाची असते बाबा पदार्थ फसला की हसला हे ठरवायला 🤭🤭 तर आमच्या बल्लवाचार्यांनी 'हम्म,चांगला झाला आहे',अशी पावती दिली आणि तीन तासांची मेहनत फळाला आली रे देवा 😃👏👏 असं म्हणत मी देवाला हात जोडले 🙏😁😁 त.टी.: युट्यूबच्या व्हिडिओमधे १० मिनिटात होणारा पदार्थ हा कधीच म्हणजे कधीच, निदान माझ्या तरी उभ्या जन्मात मला १०मिनीटात करता येणार नाही 😜 😁 #मुक्कामपोस्टUK #खाण्यासाठी_जन्म_आपुला #BBQCajunPotatoSaturday, April 3, 2021
टूथपेस्टची गोळी
Saturday, March 20, 2021
खळ्ळखट्याक
अरे थांब 😳 थांब थांब थांssssss😵😵😵😵 म्हणेपर्यंत तो सोनेरी नक्षी असलेला, सुबक ठेंगणा कप ☕ माझ्या हातातून जो सुटला तो गिरक्या घेत, कोलांटउड्या मारत काही क्षणात जमिनीवर जाऊन खळ्ळकन फुटला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!😖😖😖😖😖😖 बिच्चारा!!!😕 हा कितवा कप माझ्या हातातून निसटून फुटला याची गणतीच नाही 😢😰 काचेचं कोणतंही भांडं असू देत, चहाचा कप, बशी, प्लेट्स्, ग्लासेस, बरणी काय वाट्टेल ते! त्याला एकदा का माझ्या हाताचा स्पर्श झाला की त्याचे दिवस भरत आलेच म्हणून समजा 😜 ती भांडी मी धुवायला घेतली की पहिल्या किंवा दुस-या वेळेसच आणि अगदीच एखादं भांडं दणकट आणि नशिबवान निघालं तर तिसऱ्या खेपेपर्यंत कसं-बसं टिकतं पण त्यानंतर? 🤫 अंहं!! त्याचा अंत ठरलेलाच म्हणून समजा 😁 😝😝 माझ्या नव-याने २०१६ला युकेला आल्यावर काही काचेच्या वस्तू घेतल्या होत्या, घरी येतांना त्या सगळ्या एका मित्राकडे ठेवल्या आणि २०१८ला परत आल्यावर घेतल्या. पहिला दिवसच अपवाद असेल(कारण त्यादिवशी भांडी घासायचं काम पडलं नाही) दुस-या दिवशी मी त्यातला एक ग्लास फोडूनच शुभारंभ केला 😄 😄 😄 म्हणजे बघा, भारतात घरात काम करायला येणाऱ्या मावशींना आपण, 'काचेची भांडी जरा जपून स्वच्छ करा', अशी विनंतीवजा धमकी देतो पण माझ्या बाबतीत माझ्या घरी येणाऱ्या मावशी किंवा इथे आता नवरा बजावतो 😜 माझं आणि काचेच्या भांड्यांचं काय शडाष्टक आहे कोणास ठाऊक, माझ्या घरात तर आमची खडाजंगी सुरु असतेच पण इतरांच्या घरी गेल्यावरही माझा हा गुण काही लपत नाही🙄 आतापावेतो मी ओळखीतल्या एका भाभींच्या आवडीच्या, वर्षानुवर्षे जपलेल्या डिनर सेटला नजर लावली आणि एका मैत्रिणीच्या घरी पण खळ्ळखट्याक करून ठेवलं 🙈🙈 पुलंनी जसे विविध 'ग्रहयोग' शोधून काढले तसाच काहिसा 'काचेची भांडी फोडणे' योग माझ्या पत्रिकेत आहे की काय, अशी आता माझी खात्रीच पटायला लागली आहे! तुमच्यापैकी कोणाच्या पत्रिकेत आहे का हो असा काही चिवित्र ग्रहयोग 😳🤔 #चिवित्र_ग्रहयोग_या_सदरांतून
Sunday, February 7, 2021
#खाण्यासाठी_जन्म_आपुला : मॅजिक लाडू
- आईss भूक लागली, काहीतरी खायला देss 😰 - अगं, काही गोड दे बरं खायला, आज जेवण फारच मसालेदार होतं(परत गोड??)🤦 किंवा - डायटींग चालू आहे तर 'लाडू'? कसा खाणार नं 😒 कॅलरीज 😳 नहींsss🙉 या गहन प्रश्नांचं उत्तर शोधायचा प्रयत्न बहुतांश गृहिणी/माता/भगिनी आजतागायत करत आहेत. मला यावर एक मस्त उपाय सापडला आहे 😃 मॅजिक लाडू 🌟 करायला सोप्पा, खाण्यास चविष्ट, शरीराला सुदृढ बनवणारा आणि मनाला प्रसन्नता देणारा असा हा मॅजिक लाडू! हा लाडू खायला काळ-वेळाचं आणि वयाचं बंधन मूळीच नाही 🤓 सकाळी जोरकस व्यायाम 💪 करून झाल्यावर खा, दुपारी जेवणानंतर काहीतरी गोड हवं म्हणून खा😋 किंवा अगदी रात्री झोपेत भूक लागल्यामुळे जाग आल्यावर खाल्लात तरी काहीss हरकत नाही 😁 चला तर बघूया या लाडूची पाककृती काय आहे ते- माझ्या पाकसिद्धिच्या कुवतीनुसार साहित्य सांगत आहे. तुम्ही स्वयंपाकघरातमधे चॅम्पियन असाल तर दिलेल्या प्रमाणात आवश्यक ते बदल करून घेऊ शकता 👍 या लाडूचं वैशिष्ठ्य म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या जिन्नसातूनच हा बनवता येतो. हां, तर आता दोन वाट्या भरून गव्हाचं पीठ घ्या. एक वाटी साजूक तुपामधे हे पीठ खरपूस भाजून घ्यायचं आहे.पीठ भाजण्यासाठी लागणारी कढई/भांडं(नाॅन-स्टीकचं पॅन/कढई वर्ज्य आहे हं, लक्षात असू देत 👊)मंद आचेवर ठेवा आणि त्यात तूप टाका. तूप वितळून हलकासा सुगंध आला की त्यात गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित कालवून घ्या. हे पीठ खरपूस भाजून व्हायला निदान १०-१५मिनीटे लागतील.अगदी सतत भाजायची गरज नाही पण दर ४-५मिनीटांनी एकदा हात चालवा. मॅजिक लाडू बनवायला तसे मुख्य तीनच घटक लागतात - गव्हाचं पीठ, गूळ आणि घरात उपलब्ध असलेला सुका-मेवा किंवा शेंगदाणे. यासोबतच तुम्हांला आवडत असेल तर काळ्या मनुका किंवा बेदाणे घालू शकता. अगदी मूग डाळीचं पीठ,चणा-डाळीचं पीठ,नाचणीचं पीठ हेही थोड्या प्रमाणात घालून या लाडूची पौष्टिकता वाढवू शकता😃 ओ ते गव्हाचं पीठ हलवून घ्या एकदा व्यवस्थित, नाहीतर खरपूस च्या ऐवजी करपेल हों 🤪 माझ्या गप्पा काही संपत नाहीत पण, तुमचं लक्ष राहू देत त्या पीठाकडे 😜 महत्वाचा घटक एकीकडे तयार होत असतांना आता जरा गूळ खिसायला घ्या बरं. जर गुळाची साखर असेल तर अति-उत्तम. दोन वाटी पिठाला १+अर्धा वाटी गुळाची साखर पुरेशी होते. जर तुम्ही गव्हाच्या पिठासोबत अजून कुठलं पीठ घेतलं असेल तर मग दोन वाट्या गुळाची साखर घ्या. गुळाची साखर मिक्सरमधून अगदी बारीक करुन घ्या आणि एका डब्यात ठेऊन द्या.कारण लाडवाचं मिश्रण गार झाल्यावर मग तिची गरज लागेल. अर्र😳 ते गव्हाचं पीठ! लक्ष असू देत जरा तिकडेही🙄 चला आता सुका-मेव्याची तयारी करा बरं. बदाम-काजू-अक्रोड हे जिन्नस मी जास्त प्रमाणात घेते, तुम्ही आवडीनुसार यांचं प्रमाण कमी-अधिक करु शकता.पण, अक्रोड सहसा आवडीने कोणी खात नाही म्हणून अंमळ जास्तच असू देत. याव्यतिरिक्त पिस्ते(खारे नाही) सुद्धा टाकू शकता. अहाहा! काय खमंग सुवास येतोय बघा गव्हाच्या भाजलेल्या पिठाचा 😘 आता एकदा पीठ व्यवस्थित हलवून घ्या आणि गॅस बंद करा. आमच्या घरात नं एक पद्धत आहे, आमची आई असं कोणतंही पीठ किंवा तत्सम् काही भाजत असेल नं, तर १०-१मिनीटांनी विचारते,'वास आला का?', मग बाहेरच्या खोलीत जे कोणी बसलेलं असेल, बाबा किंवा आमच्यापैकी कोणी तर सांगतो,'हो हो, छान वास आला रवा/चण्याच्या डाळीचं पीठ किंवा जे कुठलं पीठ आई भाजत असेल त्याचं नाव घेऊन' 😄 तुम्ही असं विचारायलाच हवं असं नाही पण एक गंमत करुन बघा, गॅस बंद करुन स्वयंपाकघराच्या बाहेर जाऊन दुस-या खोलीत किंवा हाॅलमधे चक्कर मारा - खरपूस भाजलेल्या पिठाचा सुगंध नक्कीच जाणवेल. क्वचित घरातली एखादी व्यक्ती डोकवायला येईलही, काय बनवतेस/बनवतोस किचन मधे म्हणून 😄 😄 बघा परत मी गप्पा मारत बसले, असो. तर आता हे भाजलेलं गव्हाचं पीठ एका मोठ्या ताटामधे किंवा वेगळ्या भांड्यामधे काढून ठेवा आणि गार होऊ देत. आता परत मगाशी वापरलेली कढई घ्या आणि जर दुसरं कुठलं पीठ लाडूमधे टाकायचं असेल तर तेही असंच तुपामधे भाजून घ्या. मी यावेळी लाडूच्या मिश्रणात चण्याच्या डाळीचं पीठ घातलं आहे. हेही पीठ भाजून झाल्यावर गव्हाच्या पीठामधे टाकून एकत्र करुन गार व्हायला बाजूस ठेवा. आता सुका-मेवा घ्या. जर शेंगदाणे घालायचे असतील तर तेही व्यवस्थित भाजून घ्या. काजू-बदाम-अक्रोड भाजायचे की नाही ते तुमच्या आवडीनुसार ठरवा. हा सगळा सुका-मेवा मिक्सर मधून फिरवून घ्या. हो पण एक महत्वाची सूचना लक्षात ठेवा - सुकामेवा भरडून घ्यायचा आहे, अगदी बारीक पीठ नको व्हायला. लाडू खातांना कसं ते क्रंची फील आलं की मस्त वाटतं नं म्हणून 😊 आता, ब्रेक घ्या🤭 लाडवासाठी लागणारा कच्चा माल तयार झाला आहे, तेंव्हा जरा विश्रांती नंतर आपण लाडू वळायला घेऊ. तुम्ही जर नेहमी लाडू बनवत असाल तर तुम्हांला या एकूण प्रकाराची पद्धत माहित असेलच. गरम पिठामधे साखर/गूळ घालून लाडू कधीच वळत नाहीत म्हणूनच ब्रेक टाईम! एक सांगायचंच राहिलं🤦, जर गुळाची साखर नसेल नं, तर नेहमीचा साधा गूळ व्यवस्थित खिसून किंवा चिरुन घ्या. शक्यतो वाटीने प्रमाण मोजून घ्या आणि भाजलेलं मिश्रण + गूळ असं मिक्सरमधून बारीक करुन घ्या.म्हणजे गूळ व्यवस्थित मिसळला जाईल आणि लाडू वळायचं काम सोपं होईल. हं झाली का दिवसाची सगळी कामं स्वयंपाकघरातली,चला आता लाडू वळायला घेऊया👍 भाजून ठेवलेलं पीठ घ्या त्यात भरडलेला सुकामेवा घालून छान मळून घ्या. जर लाडूच्या मिश्रणाला तूप पुरेसं नाही असं वाटलं तर पटकन तुपाचं बुटलं गरम करुन थोडं तूप त्या मिश्रणात घाला, परत मळून घेऊन तपासा.दोन-तीन चमचे तूप टाकावं लागेल कदाचित, पण मग मिश्रण छान मिळून येईल. आता त्यात गूळाची साखर घालून मस्त एकत्र करुन घ्या. जर गूळ+पीठ असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं असेल तर फक्त सुकामेवा टाकून मळून घ्या. त्यात थोडी वेलची पूड किंवा जायफळ तुमच्या आवडीनुसार घाला आणि लाडू वळायला सुरुवात करा. मला नं दोन्ही हाताने लाडू वळायची सवय आहे अगदी लहानपणापासून 😄 आईला लाडू करायला मदत करतांना मी दोन मुठीत मिश्रणाचे गोळे करुन खेळवत बसायचे आणि ओबडधोबड लाडूसदृश गोळा बनवून ठेवायचे.त्यावर आई तिच्या हाताने संस्कार करुन अगदी गोलगरगरीsत असा लाडू बनवायची 😘 एकदम चिकणा लाडू तय्यार व्हायचा 😄 झाले का लाडू वळून तुमचे, हं चला आधी देवाला नैवद्य दाखवा, हो रात्रीचे १२वाजलेले असतील तरी हं, ही पण आमच्या आईच्या संस्कारांची कमाल 😊 आता या पाककृतीची आत्यंतिक महत्वाची गोष्ट! देवाच्या प्रसादाचा किंवा ताटातला एक लाडू उचला आणि अं अं अं असा गपकन नाही खायचा काही हा मॅजिक लाडू🤪 सावकाशपणे हातातल्या लाडूचा सुगंध अनुभवा आणि हळूच एक तुकडा तोडून जिभेवर रेंगाळू द्या..😍 जायफळमिश्रित-गुळाचा गोडवा-क्रंची पिस्ता आणि खरपूस भाजलेल्या पिठाचा अद्वितीय सुगंध आणि अप्रतिम चव जाणवायला लागेल आणि नकळत तुम्ही व्वाह,मस्त असं म्हणत कधी तो लाडू संपवाल ते तुमचं तुम्हांलाही कळणार नाही 😋🤩👌 #खातेरहोजितेरहो #खाण्यासाठीजन्मआपुला
Saturday, January 23, 2021
#मुक्कामपोस्टUK : नेमेचि येतो मग 'फवारणी डे'
मी सज्ज आहे लढायला!👊 मास्क लाऊन!😷 डोळ्यांवर चष्मा चढवून!😎 हातात स्प्रे घेऊन!💨 मी सज्ज आहे लढायला या चिक्कट, जंतूंनी लदबदलेल्या बुरशीचा नायनाट करायला!!😠 मी सज्ज आहे लढायला!👊💪🤜🤛 ते आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे नं तर जरा स्फुरण चढलं आहे म्हणून, बाकी काही नाही 😜 हां तर आज आहे आमच्या घरात 'फवारणी डे', तसा तो दर तीन - चार आठवड्यांनी असतोच. आमच्या घरातच असण्याचं खास काही कारण नाही कारण यूकेमधल्या बहुतांश घरांमधे विशेषतः जी ३०-४० वर्षं जुनी आहेत अशा घरांमधे हा कार्यक्रम असतोच असतो! आपल्याकडे शेतातल्या पिकांवर रोग पडला की कसं जालीम औषध फवारावं लागतं तसंच, इथेही घरामधे उगवणाऱ्या या किळसवाण्या-चिकट-काळ्याशार बुरशीला घालवायला जालीम-जहाल औषधाची फवारणी करावीच लागते! आणि एकदा करुन भागत नाही तर सातत्याने करावी लागते 😰😩 श्शीsss बुरशी 🤮 आणि ती ही घरात 😳🤔 असं वाटलं असेल नं तुम्हांला वाचल्यावर 😕 पण हो युकेमधे बाहेर उगवणाऱ्या बुरशीपेक्षा घरात उगवणारी बुरशीच जास्त आढळते! बरं ही बुरशी अतिशय उपद्रवी आणि आरोग्याला त्रासदायक असते.जर हिचा वेळीच नायनाट केला नाही तर साध्या सर्दीचं निमित्त होऊन तिचं रूपांतर दीर्घकाळ आजारात होतं, तसंच श्वसनाचे वेगवेगळे आजारही जडतात! त्यामुळेच अगदी डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो मला! कारण, आम्ही राहतो ते घरही असंच जुनं आहे. दिसायला एकदम टकाटक आहे बरं, पण एकदा का 'हिवाळा' सुरु झाला की मग या घराचे 'असली रंग' दिसायला लागतात!🤦 कसं आहे की, युके मधे थंडी चालू झाली की घरामधे हिटर लावावा लागतो त्यामुळे घर आतून ऊबदार होतं पण भिंती बाहेरून गारेगारच असतात.त्यामुळे या गरम-गारच्या नादात भिंतींचे कोपरे बाष्पीभवनाचे बळी पडतात आणि मग 'काळीशार' बुरशी ज्याला इथल्या भाषेत mold म्हणतात ती तरारून उगवते!🤮🤮 मग त्यावर वेगवेगळे उपाय करुन तिला घालवावं लागतं. पण ही बुरशी महाबिलंदर! एका ठिकाणी फवारणी करुन घालवली की काही दिवसांतच नविन ठिकाणी हिचा पसारा वाढायला लागतो!😤 म्हणजे रोज सकाळी उठलं की मला नवीनच ठिकाणी या चिवित्र प्रकाराचा प्रत्यय येतो 🤕😵 या घरता माझा पहिला हिवाळा होता तेंव्हा मला हा प्रकार नवीनच होता, मग हळूहळू याबद्दल माहिती मिळाली आणि गुगलबाबाच्या नुस्ख्यांना अजमावून पण, पश्चाताप होऊन शेवटी सुपरमार्केटच्या शेल्फा धुंडाळून एक जालीम औषध मला सापडलंच! मात्र, ते इतकं जहाल आहे की फवारणी करतांना PPE किटच घालावं लागतं!!😰 पण एकदा का मी सज्ज झाले की मग, घरात ज्या ज्या म्हणून कोपऱ्यात गुलाबी-करडे-काळे डाग असतील त्या त्या ठिकाणी फवारा उडवायला सुरूवात करते आणि बुरशीचा नायनाट करते! ही हा हा हा💪💪🧛 पण हाय रे कर्मा!🤦 परत काही दिवसांतच ती काळीकभिन्न बुरशी तिचे हातपाय पसरत नवीनच ठिकाणी उगवते आणि मी माझं गळालेलं अवसान गोळा करत, सज्ज होते शत्रूचा नायनाट करायलाssss 😠👊💨 मी सज्ज आहे लढायला.. #मुक्कामपोस्टUK
Saturday, January 9, 2021
#notoplastictoothbrush
१,०००,०००,००० = १००करोड टूथब्रश 'दरवर्षी' कच-याच्या डब्यात जातात!! 😳😳😳 ही आकडेवारी गुगलने जगातील सर्वात प्रगत देशाची आहे असं सांगितलं आहे! मी-तुम्ही अगदी लहानपणी वापरलेला पहिला-वहिला छोट्टूसा टूथब्रश आठवतोय का?😕 तो आजही ३०-३५-४० वर्षं झाली कच-याच्या ढिगात अगदी तस्साच पडून आहे!🤪 कारण प्लास्टिक चे टूथब्रश हे अमरत्व घेऊन जन्माला आलेले असल्याने कच-याच्या ढिगाची शान वाढवायला तिथेच पडून राहतात!🤦 एक साधा टूथब्रश, जो आपण वापरून खराब झाल्यावर कच-याच्या डब्यात टाकून देतो अगदी सहजपणे, तो पूर्णपणे रिसायकल होत नाही! याबद्दल अनेक पोस्ट्स तुम्ही वाचल्या/बघितल्या असतील पण यावर उपाय काय याचा विचार केला का कधी??🤔 पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की २०२१ पासून सुरु झालेलं हे दशक मानवजातीसाठी शेवटची संधी आहे 'आपलं घर-एकमेव पृथ्वी' वाचवायला!!😐 अकाली पाऊस-अमेझाॅनच्या जंगलातला वणवा-कोरोना ये सब तो ट्रेलर्स है - जागो!! वरना पिक्चर बहोत डरावनी होगी!!!😰 नमनाला घडाभर तेल जाळून झालं, हां तर मुद्दा हा आहे की, आपण सर्वजण एक सवय जर बदलू शकलो तर आपोआप पर्यावरण संवर्धनाला फायदा होईल! तुमचा प्लास्टिकचा टूथब्रश बदला आणि बांबूचा टूथब्रश विकत घ्या! नाही नाही मी कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही! मी गेले ६ महिने स्वतः बांबूचा टूथब्रश वापरत आहे.प्लास्टिकच्या ब्रशसारखाच हा ब्रश असतो, वापरायला काहीच अडचण येत नाही! मुख्य म्हणजे याची किम्मत फार अवास्तव नाही आणि लहान-मोठ्या सर्वांसाठी पर्याय उपलब्ध आहेत. भारतामधे बांबूचं साहित्य बनवणारी bambooindia.com ही कंपनी मला सापडली तुम्ही त्यावरून आॅर्डर करु शकता किंवा 'यात वेगळा रंग नाही का?' असा प्रश्न विचारणा-यांनी अजून पर्याय शोधावेत.😜 आता तुम्ही म्हणाल, बांबूचा टूथब्रश खरंच पूर्णपणे रिसायकल होतो का? तर याचं उत्तर १००% हो, असं फक्त काहीच कंपन्यांच्या बाबतीत म्हणता येईल. कारण, बांबूचा टूथब्रश बनवणा-या बहुतांश कंपन्या, सध्यातरी 'टूथब्रश ब्रिसल्स्-ब्रशचे दात' हे प्लास्टिक पासून बनवत आहेत.त्यामुळे फक्त बांबू वापरलेला भाग पूर्णपणे पुनरुज्जिवीत होऊ शकतो प्लास्टिक नाही! मग कशाला त्या फंदात पडायचं 😏 , जेंव्हा १००% बांबूचा ब्रश येईल तेंव्हा आम्ही घेऊ😒! - कृपा करुन असा विचार करु नका!! नाही अख्खा टूथब्रश पण निदान काडी तर रिसायकल होते ना बांबू ब्रशची? निदान तो तरी वापरायला सुरूवात करा!! मला युके मधे एक कंपनी अशी सापडली आहे जी बांबू पासून बनवलेलेच ब्रिसल्स टूथब्रश वर लावते जेणेकरून तो १००% रिसायकल होऊ शकतो.मी तर बदल केला आहे, तुम्ही कधी सुरु करणार 😃 #notoplastictoothbrush #usebambootoothbrush
Friday, January 8, 2021
Thursday, January 7, 2021
#मुक्कामपोस्टUK : जानेवारी महिन्यातला ख्रिसमस #freezingrain
उणे ६°से. नी आज माझी सकाळ झाली आणि बाहेर बर्फच बर्फ 😍 😍 😍 अहाहा जानेवारी महिन्यातला ख्रिसमस 😄 😄 #freezingrain