Tuesday, November 11, 2014

ब्राम्हण

काल बसमधे माझ्या शेजारी दोन मुली गप्पा मारत उभ्या होत्या..विषय होता त्यांची रूममेट..तिच्याविषयी बोलता बोलता त्यातली एकजण म्हटली ,'ती ब्राम्हण आहे एक रूपया पण कधी सोडत नाही हां' आणि पुढे अजून काही-बाही..

मला एक कळत नाही जर ती तिसरी मुलगी हिशोबी असेल तर मग तो तिचा स्वभाव आहे त्यासाठी जातीवरून बोलायची गरजच काय??

समोरच्या माणसाबद्दल कुठली गोष्ट आवडली नाही की लगेच त्याच्या जातीवरून त्याला बोलायच ह्याला काही अर्थ आहे का? त्याचा स्वभाव, त्याचं वागणं ह्याला त्याची जात कशी काय जबाबदार असू शकते?? ज्याप्रमाणे माणसाचा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो कुठल्याही गोष्टीसाठी प्रतिसाद देणार ना. त्याचा स्वभाव घडण्यासाठी घरातले संस्कार जितके जबाबदार तितकेच बाहेर घडणा-या, त्याच्या आजूबाजूला असणा-या गोष्टीपण जबाबदार असतात मग जातीनंच काय घोडं मारलंय?? जिथे जमेल तिथे तिला वर काढलीच पाहिजे का?

मी पण ब्राम्हणच आहे आणि ब-याचदा मलासुध्दा 'तू ब्राम्हण आहेस?' असं आजवर ब-याच जणांनी अगदी तुच्छतेने विचारलं आहे, जणू काही शिवीच आहे ब्राम्हण म्हणजे!

बरं ह्याबाबतीत काही बोलायला गेलं तर मग पुराणातले दाखले देतात की आमच्या जातीवर ब्राम्हणांनी अत्याचार केले होते म्हणून वगैरे वगैरे..

पण मला एक कळत नाही तुम्ही-आम्ही आजच्या काळामधे जन्माला आलो आणि वावरतोय ना मग पुराणातले संदर्भ देऊन उगाच का म्हणून एकमेकांना जातीवरून हिणवायचं किंवा उगाच का भावना दुखवायच्या??

जग कितीही कुठे गेलं तरी आपण आपल्या अशा खुळचट कल्पना सोडणार नाही असं ठरवूनच टाकलं आहे जणू सर्वांनी.जात-पात ह्या इतक्या क्षुल्लक गोष्टी आहेत ना की, ह्यावर विचार करायची पण इच्छा होत नाही पण, असे काही प्रसंग बघितले की वाटतं आपण तरी का गप्प बसतो आणि स्वतःच्या जातीबद्दल बोलत नाही? आपणही अभिमानाने बोलायला हवं स्वतःच्या जातीबद्दल पण नाही जमत ना कदाचित आमच्यावर तसे संस्कारच केले गेले नाहीत..अर्थात हे कोणाकोणाला म्हणून सांगणार ना..शेवटी काय शहाण्यालाच शब्दाचा मार असतो नं... ;D

Monday, October 27, 2014

UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर

नुकतीच UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर ही योजना भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

ही योजना खासकरून तुमच्या-आमच्यासारख्या नोकरदारांसाठी आहे. ह्या योजनेमुळे आता आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त PF अकाउंट्स लक्षात ठेवायची गरज नाही.
एकदा का तुमचा UAN तयार झाला की भारतामधे असलेल्या कोणत्याही कंपनी मधे गेल्यावर तुम्ही फक्त हा क्रमांक सांगायचा म्हणजे लगेच PF चे पैसे ह्यामधे जमा होत राहतील.
आधी असलेल्या सर्व PF खात्यांचे विलीनीकरण तुम्ही ह्या खात्यामधे करू शकता, ह्याबाबत तुमच्या कंपनीतील संबंधित अधिका-याशी संपर्क साधावा.

तर ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?

तुमच्या HR डिपार्टमेंटला ह्या क्रमांकाबाबतीत विचारणा करा.ज्या कंपनी मधे तुम्ही काम करत आहात त्या कंपनीला तुमच्यासाठी UAN तयार करून घ्यावा लागतो.

एकदा का हा क्रमांक तुम्हांला मिळाला की खाली दिलेल्या दुव्यावर जाऊन तुम्ही त्या क्रमांकाला अॅक्टीव्हेट करू शकता.

http://uanmembers.epfoservices.in/

पुढे "I Have Read and Understood the Instructions" ह्या सुचनेसोबत दिलेल्या खिडकीवर टिचकी मारा.
त्यानंतर येणा-या स्क्रीनवर खालील माहिती भरा.
UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर

मोबाईल क्रमांक

Enter Member ID details - हयामधे तुमचा जुना PF क्रमांक दिलेल्या रकान्यांच्या रचनेनुसार भरा.

तिथे तुम्हाला एक कोड लिहीलेला दिसेल तो त्याच ओळीत असलेल्या रकान्यामधे भरा
आणि Get Pin ह्या बटनावर टिचकी मारा.

दोन मिनीटामधे तुमच्या मोबाईलवर एक कोड येईल तो दिलेल्या रकान्यामधे भरा आणि I Agree ह्या सुचनेसोबत दिलेल्या खिडकीला टिचकी मारा.    
ह्यानंतर तुम्हाला तुमचा UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर अ‍ॅक्टीव्हेट झाल्याचा संदेश दिसेल.
आता तुम्ही UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर ह्या यूझर आयडी म्हणून वापरून व तुम्ही ठरविलेल्या संकेताक्षराचा उपयोग करून आत प्रवेश करू शकता.

UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर च्या साईटमधे तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध आहेत जसे की,

१)UAN card download

२)Member passbook download

३)Updation of KYC(Know Your Customer) information - ही माहिती तुमच्या कंपनीने भरून ठेवलेली असेल, तसे न-आढळल्यास संबंधित अधिका-याशी संपर्क साधावा.

४)Listing all his/her member id(s) to UAN

५)File and view transfer claim(s)

Monday, October 13, 2014

डॉ.प्रकाश बाबा आमटे - दी रियल हिरो



सर्वप्रथम दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि अनेक धन्यवाद की त्यांनी डॉ.प्रकाश आमटे ह्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट बनविला.

हा खरं तर चित्रपट नाही तर डॉ.प्रकाश आमटे ह्यांच्या अविरत कार्याचा घेतलेला अगदी छोटासा आढावा आहे, पण हा आढावा सुध्दा तुमच्या-आमच्यासारख्या सुखवस्तू घरात राहणा-या सुशिक्षित लोकांना खूप काही सांगून जातो. आपल्या आयुष्यामधे येणा-या फुटकळ गोष्टींपुढे हार मानून हातावर हात ठेऊन बसण्याच्या वृत्तीला हसतो.

'प्रकाशवाटा' हे डॉ.प्रकाश आमटे लिखित पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हांला त्यातलेच संदर्भ ह्या सिनेमामधे बघायला मिळतील.पण जितकं कार्य डॉ.प्रकाश आमटे यांचं आहे त्यातला अगदी ठळक भाग ह्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडलेला आहे.

नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी ह्यांनी डॉ.प्रकाश आमटे व मंदाताई यांची भूमिका वठवलेली आहे.दोघेही दिग्गज कलाकार असल्यामुळे त्यांचा अभिनय वगैरे विषय इथे गौण आहेत.

ह्या चित्रपटाचं चित्रीकरण हेमलकसा ह्या डॉ.प्रकाश आमटे यांच्या कर्मस्थळीच झालेलं आहे.तसंच ह्यामधे जे काही प्राणी दाखविले आहेत तेदेखील त्यांच्या प्राणिसंग्रहातील आहेत.

चित्रपट बघतांना किंवा 'प्रकाशवाटा' हे पुस्तक वाचतांना आपल्याला जाणिव होते की डॉ.प्रकाश आमटे व मंदाताई यांची मानसिकता किती वेगळी आहे.हेमलकसा सारख्या जंगलामधे जाऊन अक्षरशः शून्यातून त्यांनी स्वतःसाठी नाही तर तिथल्या आदीवासींसाठी एक नविन जग उभं केलं.अगणित अडचणी आल्या पण धैर्याने, एकमेकांना धीर देत, सुरूवात केलेल्या कामावर आणि बाबा आमटेंना त्यांच्यावर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते पुढे जात राहिले आणि अजूनही चालत आहेत.कोणत्याही देवापेक्षा श्रमावर त्यांची निष्ठा जास्त आहे आणि त्यामुळेच आज हेमलकसाचं रूपडं पालटलं आहे.

डॉ.प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल आजवर ब-याच देशांनी घेतली आहे तसंच भारतसरकारने देखील विविध सन्मान देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांना आता खूप प्रसिध्दी मिळाली आहे पण तरीही, डॉ.प्रकाश आमटे आणि त्यांचे कुटूंबीय ह्या गोष्टीचा गर्व करत नाहीत. उलटपक्षी, अजूनही खूप काम बाकी आहे ही जाणिव ठेवून आपलं काम सातत्याने करत आहेत.

त्रिवार वंदन डॉ.प्रकाश आमटे आणि त्यांच्या कार्याला.

Thursday, October 9, 2014

२००

बँग-बँग चित्रपटाने पाचच दिवसात २०० कोटीची कमाई करत 'एलीट २०० करोर क्लब' मधे आपल्या चित्रपटाची नोंद केली असून आता त्याची घोडदौड किती कोटीपर्यंत जाते ते बघायचं आहे.

२००९ मधे प्रदर्शित झालेला '३ इडियट्स' हा चित्रपट ह्या क्लबचा आद्यजनक. ह्या चित्रपटापासूनच क्लबची सुरूवात झाली आणि त्यानंतर येणा-या प्रत्येक चित्रपटाने ह्या क्लबमधे स्थान मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ह्या क्लबमधे सलमान खानच्या ३ चित्रपटांनी नोंद करून आपला खुंटा अगदी बळकट केला आहे.त्याखालोखाल शाहरूख खान आणि आमीर खानचा नंबर लागतो.

नुसती मारधाड, झिरो फिगर असलेल्या नट्या, परदेशामधील नयनरम्य ठिकाणं, कर्णकर्कशमधुर संगीत, फोडनीला म्हणून थोडासा रोमान्स आणि मग जर लक्षात राहिलं तर, असलीच तर एखाद्या ओळीची 'कथा' असा सगळा बाज उभा केला की झालीच म्हणून ह्या क्लब मधे एंट्री!!

फक्त आणि फक्त पैसा कमावणे हा एकमेव हेतू आहे सध्याच्या बहुतांशी 'बॉलिवूड' चित्रपटांचा.

मुळात चित्रपटाला कथाच नसते त्यामुळे कलाकारांनी अभिनय करणे वगैरे तर दूरच्याच गोष्टी. बरं गाणी किंवा त्याचं संगीत तरी नवं-कोरं असावं तर तिथेही आपली निराशाच होते. हल्ली तर जुन्या गाण्यांना नविन संगीतामधे घोळवून आपल्यासमोर गाण्याचं जणू कॉकटेलच सादर केलं जातं. एक गाणं ओठांवर येतं न येतं की लगेचच दोन-तीन गाणी डोक्यात पिंगा घालू लागतात आणि काही दिवसातच मग त्यातलं कोणतंच गाणं ऐकावसंही वाटत नाही!

सध्या तर एक नविन गायक-गीतकार-संगीतकार-डान्सर-डीजे असा सर्वगुणसंपन्न व्यक्ती प्रत्येक चित्रपटासाठी 'खास' गाणं बनवून देत आहे. त्याच्या प्रत्येक गाण्याचा हेतू एकच, तरूण पिढी झिंगली पाहिजे!! त्याच्या गाण्यामधे जे शब्द वापरलेले असतात ते सगळे तरूण पिढीच्याच शब्दकोशातले असतात.आधुनिक ढोल-ताश्यांचं जोरदार संगीत, उसासे-धापा टाकत म्हटलेलं गाणं आणि अंगविक्षेप करत नाचणारी मंडळी ही त्याच्या गाण्याची वैशिष्ठ्ये!!

काय म्हणावं ह्याला - नुसता सावळा नाही तर काळाकभिन्न गोंधळ!!

खरं तर ३ इडियट्स हा चित्रपट खूप वेगळ्या धाटणीचा होता.भलेही त्याची कथा कोणा लेखकाच्या कथेशी साधर्म्य असणारी होती पण, त्यातला मूळ आशय फारच वेगळा आणि मनाला अगदी भिडणारा, जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याला कुठे ना कुठे स्पर्श करणारा होता. त्यामधे सगळं काही होतं, मैत्री, कॉलेजच्या दिवसामधली मजा, शैक्षणिक पातळीवरची स्पर्धा, रोमँटीक गाणी आणि कानपिचक्या देणारे प्रसंग. एका हिंदी चित्रपटासाठी लागणारा सगळा माल-मसाला होता पण त्याला चव मात्र काहीतरी वेगळीच होती.कधीही तो चित्रपट बघितला तरी दोन घटका करमणूकीव्यतिरिक्त काहीतरी वेगळं त्यातून सापडत जातं.

जर अशाच चित्रपटांची यादी 'एलीट २००' मधे लागत गेली असती तर एक प्रेक्षक म्हणून आपल्याला खरंच खूप कसदार काहितरी बघायला मिळालं असतं पण...असो.

हल्ली तर असं झालं आहे ना की, दर शुक्रवारी ढिगानी हिंदी चित्रपट प्रदर्शित होतात पण त्यातला कुठलाच असा आवर्जून बघावा असा नसतो. मधेच कधीतरी एखादा येतो म्हणा पण सरासरी बघता हेच वाटतं की, चित्रपटामधे काम करणारे कलाकार इतक्या वर्षाच्या अनुभवानंतरही कसे काय तयार होतात 'अशा' चित्रपटामधे काम करायला?! अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर,'हमशकल्स' किंवा बोल बच्चन किंवा ब्ल्यू वगैरे वगैरे..यादी बरीच मोठी आहे.

सुदैवाने मराठी चित्रपटसृष्टीला अशी काही बाधा झाली नाही.अर्थात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पोश्टर बॉईज' आणि 'लई भारी' चित्रपटांनी नाही म्हटलं तरी ब-यापैकी गल्ला जमविला.पण, ही लाट अधिक काळ मराठीमधे राहील असं वाटत नाही.

नशिबाने मराठी मधे आता प्रयोगशील दिग्दर्शकांचा एक नविन चमू आलेला आहे जो अधिकाअधिक वेगळ्या विषयांवरील चित्रपट काढून विविध देशांमधे होणा-या फिल्म फेस्टीव्हल्समधे वाहवा,शाबासकी मिळवत आहे.

सध्या तर असं चित्र दिसत आहे चित्रपट गृहांमधे की मराठीचे ४-५ सिनेमे चालू आहेत आणि सगळे निदान एकदा बघू शकतो असे आहेत हिंदीच्या मानाने :)

एक प्रेक्षक म्हणून फक्त इतकीच अपेक्षा आहे की,दोन घटका करमणूक म्हणून चित्रपट असायला हवा पण जर प्रत्येकजण फक्त मारधाड किंवा थोड्याफार फरकाने तेच तेच दाखवत असेल तर मग कशाला मी माझा वेळ आणि पैसा खर्च करू, त्यापेक्षा इंटरनेटवर पायरेटेड व्हर्जन बघितलेलं बरं, मनात येईल तेंव्हा बंद तरी करता येईल आणि पैसेही जास्त खर्च नाही होणार ;)

असो, आता बघायचं आहे की हिंदीमधे कोण असा माईकालाल आहे जो ३०० च्या घरात चित्रपटाची कमाई करू शकेल!!

Monday, October 6, 2014

चिखलफेक

विधानसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या आणि परत एकदा महाराष्ट्रामधे गोंधळ चालू झाला. ब-याच वर्षांपासून असणा-या पक्षांची युती मोडली आणि मित्रपक्ष एकमेकांसमोर शत्रूपक्ष म्हणून उभे राहिले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी न-भूतो न-भविष्यती अशी पळवापळवी झाली आणि एकदाचे सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले.

प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं आणि खरी चिखलफेक सुरू झाली. प्रत्येकाने बेंबीच्या देठापासून ओरडून सांगायला सुरूवात केली की, माझ्या पक्षाने कसं आजवर महाराष्ट्राचं भलं केलं आणि बाकी पक्षांनी कसं वाट्टोळं! लोकसभेच्या निवडणुकीमधे जे-जे मुद्दे मांडले होते त्याची थोड्याफार फरकाने पुनरावृत्ती घडू लागली. स्थानिक पातळीवरचे उमेदवार ज्यांना आजवर फक्त मोठ-मोठ्या बॅनर्सवर बघितलं होतं ते लोक घरोघर जाऊन प्रत्येकाच्या पाया पडू लागले. आम्ही ह्यावेळेस 'उमेदवार' आहोत हं, लक्षात असू देत,अशी आठवण करून देऊ लागले. गावोगावी जाऊन प्रचारसभा, रस्त्यावरून प्रचारकांनी काढलेल्या बाईक दिंड्या यांनी शहर गजबजून गेलंय आणि मतदान करण्यांसाठी थोडी करमणूक आणि बरीच डोकेदुखी सुरू झाली.

लोकसभेच्या निवडणुकीत एका पक्षाने टेक्नॉलॉजीचा उपयोग अगदी योग्य प्रकारे करून आपलं स्थान यंगस्टर्सच्या मनात पक्क केलं. ते पाहून ह्यावेळेस प्रत्येक पक्षाने आपापली जाहिरात करण्यासाठी सोशल नेटवर्कींग साईट्स ची मदत घेतली आहे. टीव्ही, रेडिओ आणि जमेल त्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्याची अहमहिकाच चालू आहे.

पण इतका भडिमार करून खरंच मतदाता योग्य ते मत देऊ शकेल का?

दिल्लीमधे असणा-या सरकारच्या पक्षाला महाराष्ट्रामधे तसंच काम करता येण्यासाठी खरंच त्या ताकदीचा, ह्या मातीतले प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढणारा माणूस मिळाला आहे का?

ह्याआधी जो पक्ष ह्या राज्याची धुरा सांभाळत होता ते लोक त्यांनी केलेल्या(?)कामाचा डंका वाजवतात पण खरी परिस्थिती काय आहे हे इथल्या जनतेला माहित आहे, तरीही त्यांना, आपण निवडून येणारच हा विश्वास कसा काय वाटू शकतो?

उमेदवार किती शिकलेला आहे, त्याला आपल्या न्यायव्यवस्थेची काही जाण आहे की नाही ह्या आपल्याच संविधानामधे सांगितलेल्या नियमांना बगल देऊन त्याची संपत्ती किती आणि त्याच्याकडे किती सोनं वगैरे गोष्टींना जास्त महत्त्व देऊन उमेदवार ठरवला जातो???

असंही चित्र आहे की, काही पक्ष फक्त निवडणूक होईतो वेगळे झाल्यासारखं दाखवत आहेत पण प्रत्यक्षात मतमोजणी नंतर सरकार स्थापन करायची वेळ आली की ते परत एकत्र येतील आणि पहिले पाढे पंच्चावन!

एक पक्ष असाही आहे की जो स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून 'मराठी अस्मिता - मराठी माणूस - मराठी माणसांचं राज्य' इतकेच शब्द बोलत आला आहे. टोलधाडी आणि मतांची फोड करण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंच काम त्यांना करता नाही आलं तरीही, त्यांना हा विश्वास आहे की, जर महाराष्ट्रातून परप्रांतीय पूर्णपणे हाकलले गेले तर तो पक्ष महाराष्ट्राला परत एकदा सोन्याचे दिवस दाखवेल! खरं तर त्या पक्षाला चांगलं माहित आहे की त्यांच्यामधे हे राज्य चालविण्याची धमक नाही ना त्यांना इतका पाठिंबा मिळू शकतो पण, फक्त तोंडाची वाफ दवडली म्हणजे राज्यातल्या जनतेची मत मिळतील हा त्यांचा भ्रम काही अजून दूर होत नाही.

आज मी, एक मतदार म्हणून सध्या पूर्णपणे संभ्रमित आहे! आताच्या घडीला कोणत्याच पक्षाचा उमेदवार असा दिसत नाही की जो खरंच माझ्या भागातल्या, माझ्या शहरातल्या, माझ्या राज्यातल्या समस्यांवर निदान विचार करून पुढे काय करता येईल ह्या दिशेने पाऊल टाकू शकेल.

पण एक मात्र आहे, मतदान तर करायला जायचंच भलेही 'वरीलपैकी कोणीही नाही' हा पर्याय का निवडावा लागू नये!!!

Monday, September 29, 2014

Drive slowly..

सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान पिवळ्या रंगाच्या ओम्नी गाड्या शाळेतल्या मुलांना घेऊन जातांना दिसतात. त्या सर्व गाड्यांच्या मागे लिहीलेलं असतं 'Drive slowly students on board'.ही सूचना तुम्हां-आम्हांला असते जेणेकरून आपण आपली वाहने सांभाळून चालवावीत.पण!

 हा नियम फक्त आपल्याला लागू होतो त्या गाड्यांना नाही का? सकाळी-सकाळी भरधाव वेगात इकडून-तिकडे धावायची जणू शर्यत लागल्यासारख्या ह्या गाड्या वावरत असतात.स्वतःच्या गाडीवर लिहीलेलं ह्यांना जणू लागूच पडत नाही अशा आविर्भावात ह्यांची सर्कस चालू असते.बरं गाड्या तर पळवतातच पण हॉर्नसुध्दा सतत वाजवत असतात.म्हणजे रस्त्यावरून जातांना सगळ्यांना हे कळायला हवं की शाळेची व्हॅन येत आहे स्वतःचा जीव वाचवा!काय हे विक्षिप्तपणाचं वागणं!!

 आणि बस बद्दल तर काय बोलावं. शाळेची असू देत, ऑफिसची बस असू देत नाहीतर म्युनिसीपाल्टीची बस असू देत.वेगाने गाडी हाकणे हा जणू जन्मसिध्द हक्क असल्यासारखे आणि रस्ता जणू तिर्थरूपांचा असल्याच्या ऐटीतच जात असतात! रस्त्यावर वळतांना आपण शहरात आहोत जिथे समोरून दुचाकी वाहनं, सायकली किंवा पादचारी येत असतील हे तर त्यांच्या खिजगणतीतही नसतं उलट आपण एखाद्या रेसिंग कार ट्रॅकवर आहोत अशा आविर्भावात वळणं घेत पुढे जातात.सिग्नल ला थांबणं वगैरे ह्यांना मान्यच नसतं कारण सिग्नल हा आपल्यासाठी नाहीच ही ह्यांची अगदी पक्की समजूत आहे आणि ट्रॅफिक पोलिसही ह्याला दुजोरा देतात.

 एक मात्र आहे हल्ली काही बसेसच्या मागे ( अर्थात म्युनिसीपालटीची बस सोडून ) लिहीलेलं असतं,'जर तुम्हांला ह्या गाडीच्या वेगमर्यादेबद्दल किंवा चालकाबद्दल तक्रार असेल तर ... ह्या क्रमांकावर संपर्क साधावा' पण तो क्रमांक नोंदवण्या इतपत वेळही ती गाडी देत नाही.सतत धावायचं आणि बसमधे बसलेल्यांचे आणि रस्त्यावरील लोकांचे जीव धोक्यात घालायचे इतकंच ह्यांना माहित!!

Saturday, August 16, 2014

पुराणातली वांगी

ह्यावर्षे गणपती कोणता घ्यायचा हे ठरविण्यासाठी म्हणून मी सगळ्या दुकानांमधे जाऊन बघत होते आणि एका ठिकाणी ही मूर्ती दिसली.


आता तुम्ही म्हणाल ह्यात काय आहे, अगदी नेहमी असते तशी साधी, सोज्वळ अशी ही मूर्ती आहे. नाही! ह्या मुर्तीमधे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की मला काय वेगळं दिसलं. गणपतीची बायको त्याचा पाय मांडीवर घेऊन चेपत बसली आहे असं ह्या मुर्तीचं स्वरूप आहे, आणि इथेच तर मोठी अडचण आहे!!!

का असं दाखवलं आहे कलाकाराने?? गणपतीची बायको ही सुध्दा देवीच एक रूप आहे, तिला सुद्धा दैवी शक्ती आहेत मग तिने का म्हणून पाय चेपायचे?

असं अजून एक उदाहरण आहे हे बघा

ह्यामधे तर देवी लक्ष्मी विष्णूदेवांचे पाय चेपत आहे देवी लक्ष्मी!!??!! पुराणापासून ते आजतागायत आणि पुढेही सगळ्यात शक्तीवान असणारी देवी म्हणजे लक्ष्मी! तिच्याशिवाय जगामधे कोणताच व्यवहार होऊ शकत नाही. तिचा वास असेल ते घर सर्वसुखसंपन्न असतं आणि तरी अशा शक्तीवान देवीने का म्हणून देवाचे पाय दाबायचे?

जो कोणी कलाकार आहे ही असली चित्रं किंवा मूर्ती बनविण्याच्या मागे त्याने काय विचार करून असं दर्शविलं असेल?? ह्यामागे असा विचार तर नसेल ना की, देवी आहे म्हणून काय झालं ती पण एक 'स्त्री'च आहे ना मग तिचं हे कर्तव्यच आहे!!

ग.दि.माडगुळकरांनी रचलेल्या गीतरामायणामधे एक गीत आहे, जेंव्हा राम आणि लक्ष्मण वनवासाला जायला निघतात तेंव्हा श्रीराम आपल्या पत्नीचा-सितेचा निरोप घ्यायला येतात तेंव्हा ती म्हणते,

निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सिता

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचें अखंड पूजन
हें आर्यांचें नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणितां?    

अरे?? हे आर्य नारी जीवन हे कोणी ठरवलं?? का म्हणून स्त्रीने पत्नी झाल्यावर आपल्या पतीची सेवाच करायची?? तिचं हेच कर्तव्य आहे हे ठरविणारे तुम्ही कोण?? ती एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्त्व आहे, तिला तिचं आयुष्य कसं व्यतित करायचं हे सांगणारे आणि तिला तसं वागायला भाग पाडणारे तुम्ही कोण?? देवालासुध्दा हा अधिकार नाही!!!

आपल्याकडे अगदी पूर्वकाळापासून पुरूषालाच महत्त्व दिलेलं आहे मग तो देव मानवी रूपामधे जन्मलेला असू देत नाहीतर ऋषीमुनी असू देत. प्रत्येक ठिकाणी त्याचं कर्तुत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. कोणत्या पोथी-पुराणामधे एखाद्या देवीच्या लहानपणीची गोष्ट दिलेली आहे? तेच तुम्ही श्रीकृष्ण किंवा राम घ्या, त्यांच्या बाळलिलांच्या सुरस कथा पिढ्यानपिढ्या गात आल्या आहेत. 

का म्हणून असा भेदभाव तोही देविदेवतांच्या काळापासून? नाही म्हणायला देवीला 'आदिशक्ती' 'आदिमाया' अशी गोड गोड विशेषणं दिली आहेत आणि असंही दाखवलं गेलं आहे की भगवान शंकर तिचंच ध्यान करत असतात.
पण तरीही अशी चित्रं, अशा कथांमधून सामान्य माणसाने काय बोध घेतला? तर स्त्री ही दुय्यम आहे. जर देवी असून ती देवाचे पाय चेपते तर दानवापेक्षाही क्रूर असणा-या पुरूषाचे, ज्याला देवाच्या नखाचीसुध्दा सर नाही, अशाचे पाय दाबायचे, सगळी सेवा करायची!!! आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की, अशा वागणूकीमुळे एक आई स्वतःच्या मुलीला असंच शिकवत आली गेल्या कित्येक पिढ्या की, तू तुझ्या पतीची सेवा करायची!!!

अरे हट्!! ह्या असल्या गोष्टी आता बास झाल्या. कोणतंही क्षेत्र घ्या स्त्री तिच्या कर्तुत्वाने पुरूषापेक्षा काकणभर सरसच ठरत आहे.

पुरे करा आता ही पुराणातली वांगी चघळणं!! बदला म्हणावं असली ही सडकी-कुजकी मानसिकता!!

Thursday, August 14, 2014

१५ ऑगस्ट प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!?!!

व्वाह! भारीच आहेत हे 'पोश्टर बॉईज'!!

होर्डिंगवर दिसणा-यांना आणि हे होर्डिंग/फ्लेक्स बनविणा-यांना १५ ऑगस्ट काय आहे आणि तो का साजरा(?) करायचा हे माहित तरी असेल काहो? आपण मारे त्यांच्यावर ताशेरे ओढतोय हा फोटो लाईक आणि शेयर करून पण त्यांना म्...हणा किंवा सिग्नल ला झेंडे विकणा-यांना म्हणा खरंच १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचं महत्त्व माहित आहे का? आपल्या देशामधे प्रत्येकच गोष्टीचा इव्हेंट होतोय हल्ली, तसा हा पण एक, अशीच ह्यांची समजूत असणार खात्री आहे माझी!!

सध्या व्हॉट्स अप ह्या मेसेजींग अ‍ॅपवर सुध्दा देशभक्तीचा पुळका येऊन प्रत्येकाने ग्रुपचे किंवा स्वतःचे फोटो म्हणून तिरंगा झेंड्याचा फोटो टाकला आहे आणि दुस-याने तसं करावं असं आव्हानही करत आहेत.पण मला सांगा, स्वातंत्र्यदिन हा काय 'व्हॅलेंटाईन डे' किंवा 'मदर्स डे' आहे का फक्त एक दिवस साजरा करायला आणि देशासाठी प्राण दिलेल्यांची आठवण काढून गाणे वाजवायला?? अरे आपल्या देशाचा अभिमान प्रत्येक क्षणी आपल्या वागण्या-बोलण्यातून झळकला पाहिजे!!

ते पण ठीक आहे मी म्हणेन एकवेळ पण, आपण भारतीय लोक परदेशी लोकांचं विशेषतः अमेरिकेतील लोकांचं जमेल तितकं अनुकरण करतो मग, त्यांना असलेला देशाचा अभिमान आपल्याला दिसत का नाही? ते लोक काहीही झालं तरी त्यांच्या देशाच्या झेंड्याचा अपमान होऊ देत नाहीत आणि करणा-याला जबर शिक्षा करतात आणि आपल्या देशात? आता १५ ऑगस्ट च्या एक आठवडा आधी भरभरून झेंड्यांची विक्री होईल आणि स्वातंत्र्यदिन संपला की तो एक कागदाचा कपटा होऊन रस्त्यांवर इतस्ततः पसरेल. मग त्यावर पाय देऊन आपणच चालत जाऊ आणि गाड्या नेऊन त्याची 'शान' मातीत मिसळवू!! ही आपली देशभक्ती आहे!! क्या बात है!! इसलिए मेरा देश महान है!!! जय भारतमाता! स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

ह्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांना असंच मातीत गाडून त्यावर आपल्या निर्लज्जपणाचे मनोरे उभारू!!!

संस्कृतीरक्षक

लग्न झाल्यावर मुलीच्या घरचं पाणीसुध्दा चालत नाही हो आम्हांला आणि जर सुनेच्या माहेरचं कोणी आलं तर आम्ही देतही नाही!

हो बरोबर वाचलं तुम्ही, विश्वास बसत नसेल तर परत एकदा वाचा!

आज साल२०१४ चालू आहे आणि तरी एका सुशिक्षित,सुसंस्कृत आणि सुखवस्तू घरात हा संवाद ऐकायला मिळाला.

एक आजोबा अगदी संस्कृती रक्षकाचा आव आणत सांगत होते.पुढे म्हटले आम्हांला आमच्या सुनेने नोकरी केलेलं सुध्दा चालत नाही.घरामधे कर्तबगार पुरूष असतांना बायकांना घराबाहेर पडायची गरजच काय म्हणतो मी!! आणि ह्यामुळेच गोल्डमेडल मिळवलेली त्यांची सुन आजही घरामधे भाक-या थापत बसली आहे.

कधी एकदा त्या घराच्या बाहेर पडते असं झालं मला ही सगळी परिस्थिती ऐकल्यावर! मी तर विश्वासच ठेऊ नाही शकत की आजच्या ह्या प्रगत युगामधे अशी घरं अजुनही आहेत?? कधी समजणार आहे ह्या लोकांना की काही गोष्टी काळानुरूप बदलाव्याच लागतात तुमची इच्छा असू देत अथवा नसू देत!!

पण, मुलीच्या माहेरच्यांना अशी अमानुष वागणूक देण्याची पध्दत का निघाली असेल बरं? आधीच्या काळी तर पोरीचं लग्न करायचं म्हणजे आई-बापाला घरा-दारावर कर्ज घेऊन आहे नाही ती पुंजी वापरून करून द्यावं लागायचं.घरामधे जितक्या जास्त पोरी तितका त्यांच्या लग्नानंतर बाप कर्जबाजारी झालेला असायचा.बरं पोरींच्या सासरी जायचं म्हणजे मैलोनमैल प्रवास करायचा आणि तिथे पोहोचल्यावर काय तर साधं पाणी पण नाही मिळणार??!!!?? काय बरं पाप केलं आहे त्या बिचा-या बापाने म्हणून त्याला ही शिक्षा?

हे सगळं ऐकलं की हसायला येतं आणि कीव येते लोकांची जे असं काही मानत होते आणि तसं वागत होते.पण तो काळ वेगळा होता आणि आज २०१४ आहे.आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकूणच जगण्यात आणि प्रत्येकाच्या मानसिकतेत बराच फरक पडला आहे त्यामुळे मुलींच्या सासरी गेल्यावर पाणी प्यायचं नाही वगैरे असं कोणी मानत नसेल अशी माझी समजूत होती.पण! वरती सांगितलेल्या आजी-आजोबांचे वचन ऐकल्यावर माझा गैरसमज अगदी स्वच्छ पुसला गेला आहे!

धन्य धन्य ती संस्कृती आणि धन्य धन्य ते संस्कृतीरक्षक!!

Monday, August 11, 2014

पोश्टर बॉईज

काल पोश्टर बॉईज चित्रपट बघितला. चित्रपटाचा पहिला भाग ठीक-ठाक आहे म्हणजे जगन आबा,मास्तर आणि अर्जुन ह्या तिघांचे पोस्टर्स सगळ्या गावभर झळकल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात काय वादळ निर्माण होतं ते दाखवलं आहे.मध्यांतरानंतर मात्र चित्रपटाला वेग येतो जेंव्हा ते तिघे झालेल्या अन्यायाविरोधात 'उपोषण' करायचं ठरवतात.

दिलीप प्रभावळकर ह्यांनी रंगविलेला आबा एकदम भारी आहे आणि बाकी सगळे कलाकार पण साजेसे आहेत.

मला नेमकं माहित नाही की हल्ली बिनटाक्याची शस्त्रक्रिया करून घेतात की नाही ते निदान शहरांमधे किंवा टीव्ही, रेडियोवर ह्याबाबतीत कधी कोणती जाहिरात ऐकली,बघितल्याचं आठवत नाही.कदाचित हल्ली महागाई इतकी वाढली आहे की एक मुल होऊ देणं हे सुध्दा परवडेबल नाही असं वाटत असेल.असो, तर हा विषय चित्रपटासाठी का निवडला ते कळालं नाही, पण हो चित्रपटामधे शक्य तितका माल-मसाला, गाणी आणि पांचट नसणारे पण प्रसंगांनुरूप विनोद आहेत. ह्यामुळे कुटुंबासोबत बघता येईल असा चांगला चित्रपट आहे.

पुरूष नसबंदी ह्यासोबतच मुलगा/मुलगी भेद नको, सामान्य माणसांचा बळी सरकारी कामांसाठी कसा दिला जातो अशा विषयांवरही ह्या चित्रपटातून भाष्य करण्यात आलेलं आहे.श्रेयस तळपदे ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक छोटंसं भाषणही ठोकलं आहे देव करो नि आपल्या राज्याला असा यंग, डायनामिक आणि जनतेचा विचार करणारा मुख्यमंत्री लवकरच मिळो

हां तर मंडळी तुम्हाला दोन तास निखळ मनोरंजन हवं असेल तर नक्कीच बघा पोश्टर बॉईज

Thursday, July 24, 2014

व्हायरस

लहू एक तो रंग दो क्यूं है

केबीसी ने केलेली जाहिरात किती मोठा संदेश देऊन जाते.तुम्हांला ही जाहिरात बघितल्यावर आवडली तर तुम्ही लाईक करणार आणि शेयर करणार पण खरंच हा विचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे का? काल दिल्लीमधे असलेल्या महाराष्ट्र सदनामधे घडलेल्या प्रकाराला लगेचच हिंदू-मुस्लिम जातीयवादाचं स्वरूप दिलं गेलं!

मरेपर्यंत जातच नाही ती 'जात' हे एकच सत्य आहे का? जात-पात, धर्म ह्या गोष्टी खरं तर खाजगी स्वरूपाच्या असायल्या हव्यात. फार तर घरातल्या देवघरापासून ते तुम्ही मानता त्या देवाच्या घरापर्यंत बास! त्यापुढे समाजामधे, कार्यालयांमधे, सरकारी कामकाजामधे कशाला हवी आहे तुम्हाला जात-पात??

निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक माणसाला बुध्दी,पंचेंद्रिय,शरीराची रचना हे सगळं सारखं दिलं आहे मग भेदभाव का करायचा आणि तोही एका तुच्छ गोष्टीला धरून?? स्पर्धाच करायची असेल तर बुध्दीच्या जोरावर करा ना प्रत्येक वेळेस जातीच्या आरक्षणाच्या आडून काय वार करायचे!!

नुकतंच महाराष्ट्रमधे नविन आरक्षण घोषित करण्यात आलं आहे आणि ते फक्त सरकारी खात्यामधे नकोय तर खाजगी क्षेत्रामधे सुध्दा लागू व्हावं असा आग्रह धरला जात आहे. काय बोलणार ह्या वृत्तीला, कधी मोठे होणार आहोत आपण?

आपल्या देश आज पोलिओमुक्त झाला आहे, येत्या काही काळामधे मेडिकल सायन्सच्या मदतीने आपण दुर्धर रोगांनासुध्दा असंच पळवून लावू पण 'जात' नावाचा हा व्हायरस कधी जाणार आपल्या सगळ्यांच्या डोक्यातून?

Thursday, July 10, 2014

अज्ञानातलं सुख

 माणसाचा मेंदू किती विचित्र वागू शकतो कधीकधी ह्याचं खरंच मला आश्चर्य वाटतं!! नुकतंच मला कळालं की माझ्या राशीला पुढचे १३ महीने गुरूग्रह अनिष्ट आहे आणि ह्या काळामधे आर्थिक नुकसान,मानसिक स्वास्थ बिघडणं वगैरे प्रकारांना तोंड द्यावं लागेल.

 हे माहित झाल्यापासून माझ्या मेंदूला नविन चाळा लागला आहे. माझ्यासोबत घडणा-या प्रत्येक गोष्टीची कारणमिमांसा करण्याऐवजी माझा मेंदू बेधडकपणे एकच उत्तर देतो - 'गुरू अनिष्ट आहे ना म्हणूनच होत असणार हे सगळं'!!

 गर्रर्र!! मला तर वैताग आला आहे ह्या कारणाचा. खूप सुखी होते मी जोवर मला ही गोष्ट कळाली नव्हती. निदान समोर येणा-या प्रश्नासाठी नीट विचार करून काहीतरी मार्ग काढू शकत होते मी पण, ह्या 'गुरू'प्रकरणामुळे आता हात-पाय सुध्दा हलवत नाहीये :(

 खरं तर ना माझा 'भविष्य', राशीफल वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नाही! हातातल्या रेषांपेक्षा हाताने काम करण्यावर माझा जास्त विश्वास आहे आणि तोच माझा नेहमी प्रयत्न असतो. ह्यामुळेच की काय मी आजवर कधीही वर्तमानपत्रातलं म्हणा किंवा कोणत्याही मोठ्या ज्योतिष्याचं माझ्याबद्दलचं भविष्य वाचलेलं नाही. एवढं कशाला माझी रास कोणती आहे हेही मला दोन वर्षांपूर्वी कळालं!!

 भविष्य, ग्रहांची दशा, राहू-केतू यांचे दोष तर शनिची साडेसाती एक ना शंभर किती प्रकार आहेत हे सगळे माणसाला कोड्यात टाकणारे!! ह्यापेक्षा असं काही असतं हेच माहित नसेल तर माणूस स्वतःवर जास्त विसंबून नाही का राहणार?? स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी घ्यायला नाही का शिकणार?

 हं आता तुम्ही म्हणाल की, काही गोष्टी अचानक घडतात आपण त्यात प्रत्यक्ष सहभागी नसतांनाही मग तेंव्हा काय करायचं? अरे यार, आयुष्य हे अशा अचानक घडणा-या गोष्टींनी भरलेलं आहे तेंव्हा जर जगायचं असेल तर त्याला स्विकारावंच लागणार ना! हो पण तुम्हाला स्वतःला थोडं कणखर बनवावं लागेल काही अप्रिय निर्णय / घटना पचवायला आणि ते तितकसं अवघड नाही असं मला वाटतं.

 मी असे बरेच जण बघितले आहेत जे रोज सकाळी उठून एखादं वर्तमानपत्र फक्त 'भविष्य' वाचण्यासाठी विकत घेतात किंवा दिवाळी अंकांमधे पुढच्या पूर्ण वर्षाचं भविष्य येतं ते वाचण्यासाठी धडपडतात. आणि हल्ली तर सगळ्या टी.व्ही.चॅनेल्सवर सकाळी सकाळी एक पूर्ण कार्यक्रम असतो प्रत्येक राशीचं भविष्य सांगण्याचा. मला तर हे सगळं बघून हसूच येतं!

 असे वर्तमानपत्रातून आणि पुस्तकातून येणारे भविष्य खरंच कोणी जाणकार लिहीतो की अजून कोणी ते त्या गोष्टी छापणाराच जाणो. शांता शेळके यांनी एका पुस्तकामधे कुसुमाग्रजांबद्दलचा एक प्रसंग सांगितला आहे - 'कुसुमाग्रज प्रतिथयश साहित्यिक होण्यापूर्वी वर्तमानपत्रासाठी काम करायचे आणि तेंव्हा राशिभविष्यही लिहायचे',.ह्यावरून तुम्हांला समजल असेल मला नेमकं काय सांगायचं आहे ते.

 माझं असं स्पष्ट मत आहे की,जर स्वतःवर विश्वास नसेल तर अशा कुबड्यांची माणसाला गरज पडते. करत असलेलं काम जर मनासारखं झालं नाही तर अशावेळेस खापर फोडायला काहीतरी हवं म्हणून काही लोक हे भविष्य, नशिब वगैरे करत बसतात आणि स्वतःची कुठेतरी चूक झाली असू शकते हे तपासायचं साफ विसरून जातात.

 कधी कधी मला राशीचे खडे घालणा-या लोकांना विचारावसं वाटतं की, ह्या अशा अंगठ्या घालून खरंच तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटले काहो? तुम्हाला आता कशातच अडचण येत नाही का? सगळीकडे तुम्ही यशस्वीच होता का?
असं जर खरंच घडलं असतं ना तर मग प्रत्येक दुसरा माणूस हा टाटा-बिर्ला, अंबानी झाला असता आपल्या देशामधे!

 तुम्ही कधी विचार केला आहे की नाही माहित नाही पण, मला अजून एक प्रश्न नेहमी सतावतो. भारत देश जर सोडला तर अमेरिका, चीन, जपान, दुबई सारख्या देशांमधे जन्मलेले आणि भारतीय वंशाचे नसलेले लोक असे राहू-केतू, शनिची साडेसाती करत असतील का? का पृथ्वीपासून लाखो किमीवर असणा-या ग्रहांचा परिणाम फक्त आणि फक्त भारतवासियांवर होतो?? मजाच वाटते मला ह्या सगळ्याची.

 मी तर ब-याच वेळा हेही बघितलं आहे की वयाने, अनुभवाने मोठी माणसं सुध्दा मूहूर्त बघितल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. एखादं शुभकार्य करायचं आहे म्हणून घराबाहेर जाण्याचा मूहूर्त तुम्ही बघितला तरी एकवेळ चालेल. पण, ऑफिसमधे नविन प्रोजेक्ट चालू करण्यासाठी कोणी मूहूर्त बघू शकतं?? साधा सर्व्हर जो मानवनिर्मित आहे त्याचा आय.पी.अ‍ॅड्रेस सुध्दा संख्याशास्त्रानुसार ठरविला जातो?? कहर आहे हा कहर! ही अतिशयोक्ती नाही हं माझ्या ऑफिसमधे घडलेली घटना आहे!!

 मला माहित आहे की ज्योतिष, ग्रहांची दिशा ह्याचं एक शास्त्र आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालं आहे. पण, हल्ली ह्या शास्त्राचा योग्य ज्ञान देण्यापेक्षा व्यवसाय करण्यासाठी जास्त उपयोग केला जात आहे. आणि अशा व्यावसायिकतेमुळे लोकांमधे अंधश्रध्दाळूपणा वाढत आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्यापेक्षा 'भविष्य/ राशीफल' मथळ्याखाली दिलेल्या शब्दांवर जास्त विश्वास बसायला लागला आहे लोकांचा. पण ह्यामुळे शेवटी काय होणार तर खरोखरच अपयश हाती येणार आणि परत नशिबाला, राशीतल्या ग्रहांना बोल लावला जाणार....

 त्यापेक्षा आपलं अज्ञानातलं सुखच बरं आहे जे समोर येईल ते स्वत:च्या बुध्दीच्या कुवतीनुसार सोडवायचं आणि समाधानी व्हायचं..कधी जर उत्तर सापडलं नाही तरी हार नाही मानायची आणि नविन मार्ग शोधून काढायचा!

Friday, June 27, 2014

आरक्षण

आरक्षण मिळालं! सही है!! मज्जाच मज्जा! आता काय शाळेमधे शिका नाही तर नका शिकू तुम्हांला कॉलेजमधे स्पेशल कोट्यामधे अ‍ॅडमिशन मिळणारच. ज्या काही सवलती कॉलेज देत असेल म्हणजे लायब्ररीतून पुस्तकं, वर्षभराची फीस वगैरे त्यातही सूट मिळणारच. मग पुढे काय तुम्ही इंजिनिअर, डॉक्टरच्या डिग्र्या घेऊन लोकांचे जीव घेणार नाही तर राज समाजकारण करून 'एवढुस्स' पोट भरणार!!!

आमच्यासारखे अनारक्षित कुठे जाणार? शाळेमधून कितीही चांगले मार्क्स घेऊन पास झालो तरी चांगल्या कॉलेजमधे अ‍ॅडमिशन मिळेल की नाही ह्याची धास्ती असणार कारण, आम्हा अनारक्षितांना फक्त आणि फक्त मार्कांच्या बळावरच आत जाता येणार. कमी मार्क्स म्हणजे मग अगदी सुमार कॉलेजात जा. बरं जरी तिथे जाऊन शिक्षण घेतलं तरी पुढे सरकारी नोकरी मिळणं वगैरे तर स्वप्नच होणार कारण परत तिथे आमच्यासारखे अनारक्षित ढिगानी असणार आणि ज्यांची लायकी नाही असे लोक आमच्या नाकावर टिच्चून आरक्षणाची शिडी घेऊन वर-वर चढत जाणार!!

मग आमच्यासाठी काय तर फक्त प्रायव्हेट सेक्टर! म्हणजे इतक्या खस्ता खाऊन घेतलेलं शिक्षण पदरात काय दान देतं तर आयुष्यभराची खर्डेघाशी! हां पण जर तुम्हांला अगदी फारच हौस असेल डॉक्टर किंवा इंजिनीयर बनायची तर मग ओता पैसा! म्हणजे शिक्षणापासून पुढे प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घ्या आणि आयुष्यभर फेडत रहा आणि आपणच का ह्या 'अनारक्षित' जातीमधे जन्माला आलो म्हणून नशिबाला आणि आई-बापाला दूषणं देत रहा!!!

ज्या महान कार्यकर्त्यांनी आरक्षण प्रकरण करवलं आहे त्यांना माझ्यासारख्या अनारक्षित व्यक्तिकडून अगदी कळकळीची विनंती आहे की निदान प्रायव्हेट सेक्टरमधे तरी हा किडा नका सोडू हो नाहीतर आम्हांला खरंच हातामधे कटोरं घेऊन भीक मागावी लागेल!!

Tuesday, June 24, 2014

किंमत

परवा एका कार्यक्रमाला गेले होते,घरगुतीच होता,पण लग्न झाल्यावर हजेरी लावायचा तसा पहिलाच प्रसंग.अलिखित नियमानुसार भरजरी साडी घालायचीच होती त्यामुळे, सगळा जामानिमा करून मी पैठणी नेसून त्यावर साजेसे असलेले दागिने घालून गेले.

कार्यक्रम सुरू झाला,माझ्यासारख्या बघ्यांची संख्या बरीच होती म्हणून गप्पा चालू झाल्या.माझ्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या ब-याच जणी होत्या.गप्पांमधे साहजिकच साडी कुठे घेतली,कोणी दिली वगैरे वरून चर्चा समस्त भारतीय स्त्रीवर्गाच्या जिव्हाळ्याच्या म्हणजेच दागिन्यांच्या विषयावर आली! मला विचारणा झाली मी घातलेले दागिने किती तोळ्याचे वगैरे..मी माझ्या सवयीप्रमाणे काहीही आव न-आणता सांगितलं 'खोटे आहेत'.मी तर सहजच बोलले पण त्या दोन शब्दांनी ऐकणा-यांच्या डोक्यावर घणाघाती वार केल्यासारखं झालं!! चक्क खोटे दागिने??? अगं तुझ्या माहेरच्यांनी,सासरच्यांनी काही दागिने नाही घातले तुझ्या अंगावर?? हे ऐकून मी दचकलेच आणि कसंबसं उत्तर देऊन तिथून निघून गेले.

दिवसभर तोच विषय डोक्यात घोळत राहिला.माझ्या दागिन्यांबद्दलची त्यांची प्रतिक्रिया इतकी भयंकर होती की जणू काही मी काहीतरी पाप केलं होतं खोटे दागिने घालून!

अचानक मला आईसोबत झालेला संवाद आठवला.माझं लग्न ठरलं तेंव्हा आई मागे लागली होती की अगं, आता लग्न आहे तुझं तेंव्हा आता तरी दागिने घे.पण, माझं आपलं एकच,नको गं आई मला काही हौस नाहीये ते सोन्याचे दागिने घालायची आणि सांभाळणार कोण गं त्यांना! नको करूस तू उगाच खर्च! तरी आईने, जे काही जुजबी दागिने असतात ते माझ्या अंगावर लग्नामधे घातले आणि सासरी पण माझा हाच सूर असल्यामुळे त्यांनीही आईचाच कित्ता गिरवला.

बरं लग्न झाल्यावरही माझे सगळे दागिने मी सासूबाईंकडे ठेवले आणि प्रत्येक साडीला शोभून दिसेल अशी वेगळी ट्रेडिशनल,आर्टिफिशीयल ज्वेलरी घेतली.

पण त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाने माझे डोळे खाड्कन उघडले आणि आईचं म्हणणं न-ऐकल्याचा जबरदस्त फटका मला बसला! मात्र एक गोष्ट जी आजवर मला समजली नव्हती ती चांगलीच कळाली! आपल्या देशामधे सोन्याची इतकी मागणी आजही का आहे ते कळालं.म्हणजे, सरकारने सोन्यावर जास्त कर आकारला तरी मागणी काही कमी झालेली नाही कारण, आजही अजूनही लोक अंगावर किती किलो सोनं आहे ह्यावरूनच तुमची किंमत ठरवतात!!

भलेही तुम्ही उच्चशिक्षित असू दे,तुमच्या मालकिची गाडी,मोठ्या शहरामधे फ्लॅट असू देत,लठ्ठ पगाराची नोकरी असू देत किंवा हि-याचे ढीगभर दागिने असू देत पण छे! जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने नाहीत तर तुम्ही कफल्लकच! तुमची किंमत शून्यच!!

पण हे काही आजच्या काळातलं दुखणं नाही अगदी पुराणकाळापासून चालत आलेलं आहे.चातुर्मासाच्या पुस्तकामधे श्रावणातल्या प्रत्येक दिवसाची कहानी दिलेली आहे त्यात मी एक गोष्ट वाचली होती.एक भाऊ आपल्या गरीब बहिणीला विचारतही नसतो पण जेंव्हा ती त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते त्यानंतर तो तिची विचारपूस करतो आणि तिला घरी जेवायला बोलावतो.पण ती बहिण तिच्या अंगावरच्या दागिन्यांना ताटासमोर मांडते आणि न-जेवता निघून जाते! काय ना माणसापेक्षासुध्दा तो पिवळा धातू किती महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे!

हूssह!
बापरे! खूपच गहन की काय विचार केला मी त्या एवढ्याशा प्रसंगावर! पण आता मला चांगलंच समजलं आहे त्यामुळे आता मी ठरवलं आहे आणि नव-याला सुध्दा निटच समजावून सांगितलं आहे की, ह्यावर्षी निदान एक किलो तरी सोनं घ्यायचं म्हणजे घ्यायचंच! उगाच कोणी आपली किंमत कमी नको समजायला!!! हूं!!

Thursday, June 19, 2014

निकाल!

काल हॉस्पीटल मधे गेले होते,हातात टोकन घेऊन बिलिंग काउंटरला वाट बघत होते आणि अचानक थोडी गडबड ऐकू आली. मागे वळून बघितलं तर, स्ट्रेचरवर एका मुलाला घेऊन येत होते.कदाचित बेशुद्ध असावा तो,अंगकाठी अगदी किरकोळ होती त्याची आणि साधारण १५-१६ वर्षांचा असेल असं वाटलं.आत आल्यावर लगेचच त्याला एका रूममधे नेलं आणि त्यासोबत आलेले सगळे नातेवाईक बाहेर थांबले.

सगळेजण तिथेच उभे राहून बोलू लागले तेंव्हा कळालं ज्या मुलाला आत नेलं होतं त्याने 'विष' घेतलं होतं! एकाने सांगितलं की त्याने व्हॉट्स अ‍ॅपला मेसेज टाकला की मी विष घेतो आहे पण माझ्या घरच्यांना ह्याबद्दल काही सांगू नका.दुस-या कोणीतरी विचारलं की,घरामधे झोपेच्या वगैरे काही गोळ्या होत्या का? तर एका बाईने कदाचित त्या मुलाची आई असावी तिने म्हटलं,अशा तर गोळ्या घरात नसतात पण क्रोसीन होत्या घरामधे!

परवा दहावीचा निकाल लागला त्यानंतर घडलेली ही घटना!!

...नंतर माझं काम करून मी बाहेर पडले पण त्या लोकांची चर्चा,तो मुलगा हे मात्र डोक्यातून जात नव्हतं.

दहावीचा निकाल लागल्यावर पेपरमधून हमखास अशा बातम्या वाचल्या आहेत.पण काल जेंव्हा समोर बघितलं तेंव्हा तिडीकच गेली डोक्यात आणि पहिला विचार आला की त्या पोराला जीव द्यायची अक्कल आहे पण मग तीच थोडी वापरून नीट अभ्यास केला असता तर!!

अर्थात, त्या मुलाची नेमकी कहाणी काय आहे मला माहित नाही पण, जीव देणं हा एकमेव पर्याय कसा असू शकतो कोणतेही प्रश्न सोडवायला? इतका स्वस्त वाटतो का जीव ह्या लोकांना? आणि ह्याहीपेक्षा आज ती व्यक्ती ह्या जगामधे ज्यांच्यामुळे आली आहे त्यांचा काही विचार आहे की नाही?? फक्त स्वतःचे प्रश्न सोडवता नाही आले म्हणजे अप्पलपोट्यासारखं असा काहितरी निर्णय घ्यायचा आणि आई-वडीलांना वा-यावर सोडून द्यायचं?

ह्या सगळ्यामधे चूक कोणाची? आई-वडीलांची की त्या मुलाची की आपल्या शिक्षण पध्दतीची की सामाजिक दबावाची??

मला आठवतं माझ्या दहावीच्या परिक्षेनंतर नाही नाही त्या नातेवाईकांनी आमच्या घरी फोन करून निकाल विचारला होता आणि इतकी हुशार पोरगी पण मेरिट मधे नाही आली?? असा शेराही मारला होता!!

मला एक कळत नाही की ह्या १०,१२वीच्या परिक्षांना इतकं महत्त्व का आहे आपल्याकडे? फक्त बोर्डाची परिक्षा आहे म्हणून की अजून काही?

मान्य आहे मला की, १०-१२वी नंतर पुढचं शिक्षण काय घेणार ह्यावर भवितव्य ठरतं पण तरी इतका उहापोह करायची खरंच गरज आहे का?

तसं बघितलं तर शाळेमधे प्रत्येक इयत्तेमधे शिकविला जाणार अभ्यासक्रम हा १०वी इतकाच महत्त्वाचा असतो मग फक्त ह्याच वर्षाला का इतकं महत्त्व द्यायचं?
मला तर वाटतं हे जे सगळे प्रायव्हेट क्लासेस वाले लोक आहेत ह्यांचाच ह्या सगळ्यामधे हात आहे!! कारण गेल्या काही वर्षांमधे क्लासेसचं जे पेव फुटलं आहे त्यामुळे मार्कांची स्पर्धा खूप जोरात चालू झाली आहे. प्रत्येक क्लास निकाल लागल्यावर मोठमोठाले बोर्डस लावून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे फोटो आणि मार्क्स झळकवून 'आमच्या क्लासचे इतके टॉपर्स' वगैरे असं ठणाणा बोंबलत असतात! म्हणजे त्या मुलांनी फक्त अमका अमका क्लास लावला म्हणूनच तो टॉपर झाला असं त्यांना म्हणायचं असतं.याचा अर्थ त्या मुलाची अंगभूत हुशारी वगैरे काहीच नाही फक्त तो तमक्या क्लासचा म्हणून हुशार!! वाह!!

पण ह्या असल्या मार्केटींगला बहुतेक सगळे पालक भुलतात आणि क्लासवर अतिविश्वास ठेवून आपल्या मुलाची कुवत लक्षात न-घेता त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात. पण, सगळीच मुलं काही अशाने टॉपर होत नाहीत आणि शेवटी जर निकाल अपेक्षेप्रमाणे नसेल तर मग कोणीतरी विष घेतं किंवा अजून काही!!

पण हे सगळं चुकीचं आहे!! हे थांबणं शक्य आहे का?

कदाचित हो, पण ह्यासाठी, परत एकदा आई-वडीलांनाच थोडे अजून कष्ट घ्यावे लागणार आहेत स्वतःला समजावण्याचे आणि स्वतःच्या मुलांना समजावून सांगण्याचे. परिक्षेमधे मिळणारे मार्क्स ह्या एकाच गोष्टीवर आयुष्य अवलंबून नाही.ती गोष्ट फक्त एखाद्या लहानशा विटेसारखी आहे, जी महत्वाची आहेच पण त्याचबरोबर जर कष्ट करण्याची तयारी, जिद्द, स्वभाव, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता हे खांब वेळीच बळकट केले नाहीत तर आयुष्य उभं राहू शकत नाही आणि येणा-या वादळांमधे तगही धरू शकत नाही!

Thursday, June 12, 2014

वटपौर्णिमा

तुमच्या घराच्या आजूबाजूला वडाचं झाड नाहीये का? किंवा शोधायला वेळ नाही का? डोण्ट वरी अ‍ॅट ऑल!! आता बाजारामधे १०रू. ला तुम्हाला वडाची फांदी मिळू शकते.ती घेऊन या,त्या फांदीला दोरा गुंडाळून मनोभावे तिची पूजा करा आणि उद्या सकाळी ती फांदी कच-यात फेकून द्या!! काय सोप्प झालं आहे ना हे सगळं हल्ली!

म्हणजे वडाचं झाड असं फांद्या-फांद्या करून तोडून टाकायचं आणि वडाची पूजा केली म्हणून मिरवायचं वाह रे संस्कृतीचं पालन!!

अरे काय संस्कृतीचं गुणगाण गाता आणि नटून-थटून मिरवता! आजच्या पिढीतल्या ज्या काही पोरी,बायका वटपौर्णिमा 'सेलिब्रेट' करतात त्यांना किंवा त्यांच्या आई,सासू,घरातली वयाने मोठी बाई ह्यांपैकी किती जणींना हा सण का साजरा करतात ते माहित आहे?किंवा त्यांच्यापैकी कितीजणींनी कधी प्रयत्न केला आहे का ह्या सणामागचं खरं कारण शोधण्याचा? आपली संस्कृती आहे म्हणून आई,सासू ह्या जनरेशन ने हा सण साजरा केला आणि आता 'आपलं ट्रेडिशन आपणच सांभाळलं पाहिजे ना' म्हणून नविन पिढी एंजॉय करते!

तुम्ही म्हणाल इतकी बडबड करण्यापेक्षा तू सांग तुला माहित असेल कारण तर! हं तर ऐका! अर्थात ही माहिती मला माझ्या आजीने सांगितली आहे.तर आजी म्हणते की,मागच्या काळी चूल-मूल-रांधा वाढा-उष्टी काढा ह्याव्यतिरिक्त देव-देव करणं हा एकच 'टाईमपास' बायकांसाठी होता.तसंच घरातल्या बाईला घरातलं सगळं-सगळं सोडून सारखं बाहेर पडायचा 'चान्स' मिळत नव्हता मग अशा सणांच्या निमित्ताने ती बाहेर जाऊन मैत्रिणींसोबत 'एंजॉय' करू शकायची.बरं त्या काळी स्वयंपाकघर म्हणजे नुसता धूर आणि काळोख त्यामुळे जर वडासारख्या झाडाची पूजा केली तर भरपूर 'ऑक्सिजन' मिळायचा

मग मी विचारलं की मग धागा का बांधायचा आणि सात जन्म वगैरे काय प्रकरण आहे? तर ती म्हटली,'अगं त्या काळी कळत्या न-कळत्या वयात लग्न व्हायची आणि नव-याव्यतिरिक्त कोणी पुरूष आयुष्यात कधी इतका जवळून माहित व्हायचाच नाही.त्यामुळे देवाला सांगायचं की,देवा नारायणा मला हाच नवरा बरा रे बाबा.ते तुमच्या भाषेत म्हणतात ना ते नोन एनिमी इझ बेटर दॅन अन्नोन फ्रेंड का काय ते तसंच बघ अगदी :) आणि दोरा बांधायचं म्हणशील तर नेमकं कारण मलापण आठवत नाही गं पण, ह्या पुजेमुळे झाडं,निसर्ग ह्याचा मानवाने सांभाळ करायला हवा हेही नकळतपणे मनावर बिंबवलं जायचं.

आजी जे म्हटली ते तिचं व्हर्जन होतं पण मला तरी हे वाटतं की,फक्त बायकोनेच नव-यासाठी ही पूजा करण्यापेक्षा दोघांनी जर ह्या सणाकडे एक सामाजिक कर्तव्य म्हणून बघितलं तर हा सण ख-या अर्थाने साजरा होईल.

तर एक असं करता येऊ शकतं की तुम्ही वड,पिंपळ,आंबा ह्यांसारखे भरपूर प्राणवायू देणारे आणि अधिक आयुर्मान असणा-या एकातरी वृक्षाची लागवड करा.नियमितपणे त्याची निगा राखा.अर्थात हल्ली फ्लॅटसंस्कृती असल्या कारणाने गॅलरीमधे तर ही झाडं लावू शकत नाही पण, तुमच्या आजूबाजूला असणा-या एखाद्या टेकडीवर किंवा एखाद्या निसर्ग मित्रमंडळासोबत जाऊन तुम्ही हा प्रयत्न करू शकता.आज तुम्ही सुरूवात केलीत तर तुमच्या आजूबाजूचे आणि तुमची पुढची पिढीसुध्दा ह्या कामात हातभार लावेल.

आज प्रदूषणाची मात्रा इतकी वाढली आहे की वडाची पूजा करण्यासारखे सण दर महिन्यात येण्याची गरज आहे पण ती पूजा फक्त आणि फक्त वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धानातूनच होऊ शकते.मग ख-या अर्थाने आपल्या संस्कृतीचं जतन होऊन मानवजातीचं कल्याण होऊ शकतं.

Tuesday, June 3, 2014

माझी सवत

आमच्या लग्नाचे कौतुकाचे दिवस संपले म्हणजेच ऑफिस वगैरे रूटीन चालू झालं आणि माझ्या सवतीनं आमच्या संसारात प्रवेश केला!

सकाळ म्हणू नका,रात्र म्हणू नका सारखी आपली ती नव-याच्या जवळच! मी अजून तशी नवी नवरी होते पण जुनी व्हायच्या आतच त्या दोघांचं सुत जुळलं.

ऑफिसमधून घरी आल्यावर नव-यासोबत दिवसभरात काय झालं काय नाही हे बोलायला जावं तर नवरोबांचं लक्ष सगळं तिच्याकडेच!

मी एक-दोनदा प्रेमाने सांगून बघितलं पण माझे शब्द वा-यावरच.मग थोडंसं रागावून बघितलं पण छे! माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे नव-याला!! रूसले-फुगले तरी क्काही काही परिणाम झाला नाही मग शेवटी ब्रम्हास्त्र वापरायचं ठरवलं आणि अबोला धरला.मला खात्री होती की हे अस्त्र कधी निकामी जाणार नाही पण हाय रे कर्मा! माझा अबोला असेपर्यंत नव-याने विचारपूस केली पण मी पूर्ववत झाल्यावर परत पहिले पाढे पंच्चावन.

साम-दाम-दंड-भेद सगळं काही वापरून झालं पण कशाचाच उपयोग होईना.काय करू आणि तिला नव-यापासून वेगळं करू हा एकच विचार डोक्यात घुमू लागला पण उत्तर काही सापडेना.ह्यामुळे माझ्या सवतीला जे हवं होतं ते मात्र होऊ लागलं - आमच्यामधे वाद व्हायला लागले.कधी मी गप्प तर कधी तो गप्प,दिवस दिवस संभाषण होईना!

मला तिचं घरात असणं सहन होत नव्हतं पण नवरा काही तिला दूर करायला तयार होत नव्हता.माझी नुसती चिडचिड होऊ लागली पण तिकडे नव-याला त्याची जाणीवही नव्हती.तिच्याविरूद्ध बोललेला एक शब्दही त्याला खपत नव्हता.माझ्यापेक्षा त्याला तिचं महत्त्व जास्त वाटत होतं.सकाळी उठल्यापासून ते रात्री अगदी झोपतांना सुध्दा तीच जवळ, मी असले-नसले तरी काही फरक पडेनासा झाला.

हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जायला लागलं मग मात्र मी ह्या प्रश्नाचा तुकडा पाडायचा ठरवलं आणि नव-याला स्पष्टपणे विचारलं,

मी - तुला तुझ्या आयुष्यात ती हवी आहे की मी?
नवरा ( खवचटपणे ) - दोघीही!
मी - ते आता शक्य नाही. एकतर मी तरी ह्या घरात राहीन नाहीतर ती तरी, ठरव काय ते एकदाचं. मला असं रोज रोजचं मरण नकोय!
नवरा - हम्म विचार करावा लागेल.
मी - विचार करावा लागेल काय?? ठीक आहे! तू करत बस विचार मी ठरवलं आहे जर ती ह्या घरात राहणार असेल तर मी ही निघाले!!
नवरा - लगेच निघत आहेस की उद्या जाणार?
मी ह्यावर काही बोलूच शकले नाही आणि अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिले! तो मात्र शांतपणे स्मीतहास्य करत माझ्याजवळ आला आणि माझ्या हातात एक छानसं गिफ्ट ठेवत म्हटला,' हे बघून ठरवं खरंच जायचं आहे की नाही ते'.

मला तर काही कळतंच नव्हतं हे सगळं काय चाललंय ते!
मी ते गिफ्ट उघडून बघितलं आणि त्यात एक नवा-कोरा टॅबलेट होता!  :)   :)


... आता आमच्याकडे सगळं आलबेल आहे.नवरा त्याच्या मोबाईलमधे आणि मी माझ्या टॅबमधे बिझी आहे :D

Monday, June 2, 2014

'ते' दिवस!

 स्त्री - निसर्गाने तिला मार्तृत्वासारखं वरदान बहाल केलं आहे. हे मार्तृत्व सुकर व्हावं म्हणून निसर्गाने अगदी काळजीपूर्वक एक यंत्रणा तिच्या शरीरात बसवून ठेवली आहे. मुलगी वयात आल्यावर ही व्यवस्था कार्यरत होते आणि योग्य वेळी तिचा कार्यभाग पार पाडते.

 निसर्गानेच जर हे सगळं तिला बहाल केलं आहे आणि त्याची निष्पन्नता एका निरागस जीवाला जन्म देण्यामधे होते तर ती गोष्ट 'घाणेरडी, विचित्र, किळसवाणी' कशी काय असू शकते???

 तुम्ही म्हणता देवाने निसर्ग,पृथ्वी,स्त्री,पुरूष यांना बनवलं मग ह्या देवानेच बनवलेल्या स्त्रीचं 'त्या' दिवसातलं वावरणं त्याला का खटकतं?? का त्या दिवसांमधे स्त्रीने 'बाजूला' बसायचं? का तिने देवपुजा करायची नाही? का तिने देवाचं नाव घ्यायचं नाही? का तिने कुठल्या देवालयात जायचं नाही? इतकंच कशाला तिने साधं कुठल्या घरी होत असलेल्या मंगलकार्यालाही उपस्थित राहायचं नाही?? का??

 एकवेळ असं समजून चालू की, आधीच्या काळी औषधं नव्हती म्हणजे पेनकिलर्स वगैरे आणि स्त्रीयांना पुष्कळ कामं करावी लागायची तर 'त्या' दिवसात शरीराची जास्त झिज होऊ नये म्हणून, त्यांना विश्रांती घ्यायला लावायची याकरता, त्यांनी बाजूला बसायचं.

 पण हे बाजूला बसणं म्हणजे, 'कावळा शिवला' आता तिला कोणी हात लावायचा नाही, तिने वेगळ्या अंधा-या खोलीत बसून राहायचं, तिच्यासाठी पाणी वेगळं, भांडी वेगळी, जेवणाचं ताटही दुरून देणार - अरे काय हा मूर्खपणा!! 'त्या' दिवसांमधे असं काय होतं म्हणून तिला इतकी विचित्र वागणूक?? आणि ही वागणूकही कोण देणार तर एक स्त्रीच म्हणजे सासू किंवा आई, की ज्या स्वतः त्या सगळ्यामधून गेल्या आहेत. त्यांना 'त्या' दिवसांचं महत्त्व आणि कार्यकारणभाव माहित आहे त्यांनी असं वागावं?? काय बोलणार!!

 हल्ली हा प्रकार क्वचितच बघायला मिळतो पण, अजूनही, विशेषत: हिंदू घरांमधे एखाद्या मुलीचं 'त्या' दिवसांबद्दलचं गणित हे तिच्यापुरतं कधीच राहत नाही. जर घरामधे लग्नकार्य किंवा मंगलकार्य असेल तर तिला आईकडून विचारणा होतेच.पुढे तिच्या स्वतःच्या लग्नासाठी तारीख काढतांना किंवा त्यापुढचा 'ऋतुशांती' हा विधी करायचा म्हणूनही चक्क गुरूजी ह्याबाबतीत विचारणा करतात! गुरूजी म्हणजे कुटुंबाबाहेरचा कोणीतरी तिसरा पुरूष आणि त्याला ह्याबाबतीत सांगायचं श्शी! विचार केला तरी किळस येते पण, हो, त्या मुलीला ह्याबाबतीत आईला किंवा सासूला खुलासा द्यावा लागतो आणि मगच मुहूर्ताचे दिवस ठरतात!!!

 विक्षिप्तपणाचा कळस आहे हा सगळा! मला तर समजतच नाही की काय असा फरक पडतो जर 'त्या' दिवसांमधे सुध्दा एखाद्या मुलीने कुठलं मंगलकार्य केलं तर. तुमचा देव काय तिच्याकडून पुजा करायला नाही म्हणणार आहे का? की तो त्या मूर्तीतून पळून जाणार आहे? वर्षानुवर्ष आंधळेपणाने काही गोष्टी आपण पाळत आलो आणि अजूनही त्या पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत व्वाह रे संस्कार!

 वैज्ञानिक माहिती असं म्हणते की ह्या काळामधे स्त्रीच्या शरीरामधे उष्णता ब-याच प्रमाणात वाढते आणि पुरूषामधे असलेल्या जननक्षम कार्यप्रणालीला त्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणून त्या काळापुरतं का होईना स्त्री-पुरूषाने एकत्र असू नये. पण ही तर गोष्ट एखाद्या विवाहीत किंवा लीव्ह-इन मधे असणा-यांसाठी लागू होते. मग ह्या गोष्टीमुळे देवाला कुठे काय प्रॉब्लेम होतो??

 हा त्रागा जर केला तर असं ऐकावं लागतं की, तुमचं सगळं विचार करणंच विचित्र आहे,आम्हाला आमच्या आईने जे सांगितलं ते आम्ही ऐकलं आणि वागलो.आम्हाला नाही असले प्रश्न पडले, तुम्हांला जे करायचं ते करा.

 मग असं ऐकल्यावर स्वतः स्त्री असल्याचीच किळस वाटायला लागते. एक मन म्हणतं आई म्हणते तर ऐकलं तर काय होतं, पण, दुसरं मन म्हणतं की का ऐकायच्या असल्या बिनबुडाच्या गोष्टी! आणि शेवटी काय होतं तर आतल्या आत धुमसतच रहावं लागतं आणि 'ते' दिवस मूड स्विंग्स आणि दुखणी घेऊन आलेलेच असतात!! 

Thursday, April 3, 2014

ग्रंथालय

कृपया कोणीतरी मला एखादं चांगलं ग्रंथालय सांगा हो कोथरूड बस स्टँडच्या आसपास असेल असं, अगदी उपासमार होत आहे पुस्तकं वाचायला न-मिळाल्यामुळे :(

तसं म्हणायला एक दुकान आहे सिग्नलला जिथे म्हणे ते ग्रंथालय चालवतात.पहिल्यांदा दिसलं तेंव्हा डोकावले तर आतमधे रचलेल्या पुस्तकांची अवस्था बघून इच्छाच नाही झाली :( तरी आत जाऊन पुस्तकं शोधायचा प्रयत्न केला पण त्यांनी लावलेली व्यवस्था मला तरी ध्यानात नाही आली आणि तिथे काम करणा-या कोणीही आपणहून पुस्तकांबद्दल काही माहिती नाही दिली. कदाचित तिथे चांगली,काही दुर्मिळ पुस्तकं असतीलही पण इतका थंड प्रतिसाद बघून नकोच वाटलं.

ग्रंथालय कसं असं मस्त असायला हवं म्हणजे आत गेलं की नव्या-जुन्या पुस्तकांचा मंद सुगंध असेल.विविध विषयावरची, विविध लेखकांची पुस्तकं व्यवस्थित रचून ठेवलेली असतील. आपल्याला हवं ते पुस्तक शोधायला क्वचित त्याबद्दल माहिती द्यायला एखादी व्यक्ती असेल तर मग पुस्तक वाचनाचा आनंद व्दिगुणित होतो :)

मला अशीच एक लायब्ररी वनाझला सापडली होती. त्या लायब्ररी चालवणा-या काकांनी जुनी पुस्तकं एका दुस-या लायब्ररीवाल्यांकडून घेतली होती त्यामुळे, अगदी दुर्मिळ पुस्तकंही त्यांच्याकडं उपलब्ध होत. आणि पुस्तकं घ्यायला गेलं की ते नविन आलेल्या किंवा त्यांनी वाचलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल आवर्जून बोलायचे,खूप मस्त वाटायचं :)

ह्याउलट मी पार्ल्याला असतांना एका शाळेतली लायब्ररी लावली होती. तिथे तीन काकू बसलेल्या असायच्या. प्रत्येकीसमोर ढीगभर पुस्तकं पडलेली, शक्यतोवर तुम्ही त्यातून पुस्तकं निवडा असा त्यांचा आग्रह. कारण, रॅकमधून पुस्तक काढून द्यायचा त्यांना येणारा कंटाळा! कधी कोणत्या पुस्तकाबद्दल विचारलं तर त्यांना माहित नसायचं किंवा त्या सांगायच्या नाहीत. मी मात्र माझ्या सवयीप्रमाणे वाचून झालेल्या पुस्तकाबद्दल त्यांना सांगायचे तर त्या कधी त्यावर काही प्रतिक्रिया द्यायच्या पण नाहीत :p

असो, सध्यातरी परिस्थिती अशी आहे की मला अगदी निकड आहे एखाद्या साध्याच पण चांगल्या लायब्ररीची.आता तुम्ही म्हणाल इतकंच वाटतं तर पुस्तकं विकत घे आणि वाच ना! पण, काय करू मला एक वाईट सवय आहे, कुठलंही पुस्तक वाचल्याशिवाय मला ठरवताच येत नाही ते संग्रही ठेवायचं की नाही ते!

म्हणून कृपया जाणकारांनी मदत करावी ही विनंती :)

Sunday, March 23, 2014

जाहिराती

यामी : अगं रूपा 'फेअर अ‍ॅण्ड लव्हली' हरली..
रूपा : अरे देवा असं कसं झालं? असे भाव मग कोण जिंकलं?
यामी : बेस्ट एव्हर 'फेअर अ‍ॅण्ड लव्हली' जिंकलं :)
रूपा+यामी : हाहाहा..

वाह! काय जाहिरात आहे!! सकाळी सकाळी रेडिओवर ही जाहिरात ऐकली आणि डोक्यात सणकच गेली अगदी X-(

फेअर अ‍ॅण्ड लव्हली,लक्स बॉडी वॉश,गार्नियर फेस प्रॉडेक्ट्स,पॅण्टीन शॅम्पू ह्या सगळ्या वस्तूंच्या निरर्थक जाहिराती बंद केल्या पाहिजेत.कसल्या बकवास,बोअरिंग आणि तेच तेच सांगणा-या जाहिराती आहेत ह्या! वर्षानुवर्षं ह्या वस्तू बाजारामधे मिळतात मग कशाला नवनविन प्लास्टीक चेहरे असलेल्या नट्या घेऊन हे १०-२०सेकंदांचं चित्र मांडतात हे मार्केटींगवाले लोक? त्यापेक्षा फक्त एखादीच पण जरा धड जाहिरात दाखवली तर निदान लोक एकदातरी विचार करतील घेण्याचा.

खरं तर, चेहरा उजळविणा-या सगळ्या वस्तूंच्या जाहिराती एकसे एक फालतू आहेत मग कंपनी कोणतीही असू देत.असं काही बघितल्यानंतर वाटतं इतकं सुमार काहितरी सुचतं तरी कसं या लोकांना :-/

कॉलेजमधे असतांना मार्केटींग वाल्यांचं एक लेक्चर ऐकलं होतं त्यामधे वक्ता म्हटलेला की,जाहिरातींच्या जगामधे भारत आणि इतर सर्व देश असे मुख्य दोन भाग आहेत.भारत हा एकमेव देश आहे जिथे जाहिरातींमधे दाखवलेली व्यक्ती कोण आहे ह्यावर ती वस्तू विकली जाईल की नाही ते ठरतं.त्यामुळेच एखादा अपवाद वगळता जवळपास प्रत्येक जाहिरतीमधे कोणीतरी नट-नटी दिसतात.तेच परदेशांमधे जाहिरातींमधे जास्तीत जास्त त्या वस्तूचा उपयोग केलेला असतो - आज माहित नाही परदेशी जाहिरांतींची काय परिस्थिती आहे ते,असो.

व्होडाफोन,एअरटेल यांच्या जाहिराती किंवा सध्या गाजत असलेल्या 'ढोंगरेस'च्या जाहिराती ह्या खरंच बघण्यासारख्या आहेत.
href="http://www.youtube.com/watch?v=WIKiqgCH_bY"  ही जाहिरात तर अगदी टिपीकल मेन्टॅलिटी दाखवते कॉलेजमधल्या मुलांची.

अशा जाहिराती असतील तर मनोरंजन+प्रबोधन आणि अर्थातच तुमच्या वस्तूचं मार्केटींग चांगल्या रितीने होऊ शकतं.

हल्ली टीव्हीवर सिरीयल्स तर बघण्याच्या लायकीच्या नसतातच निदान जाहिराती तरी थोड्या ब-या असायला हव्यात म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवता येईल!

Monday, March 3, 2014

husbands are useless!!

थांबा थांबा थांबा लगेच सगळे पुरूष शर्टाच्या बाह्या सरसावून धावून येऊ नका...आधी मी काय सांगत आहे ते तर ऐका..


हं तर सध्या husbands are useless ह्या नावाने चार जाहिराती फेबुवर फिरत आहेत.तर ह्या जाहिराती केल्या आहेत 'एशियन पेन्ट्स' ह्या कंपनीने त्यांच्या मार्केटींग साठी.

आपल्या सगळ्यांना एशियन पेन्ट्स हे नाव अगदी व्यवस्थित माहित आहे आणि त्यांच्या जाहिराती नेहमीच खास असतात.

तर ह्यावेळेस त्यांनी अगदी कळीच्या मुद्दाला हात घातला आहे तो म्हणजे घर सजावट करतांना पुरूषमंडळींचा शून्य प्रतिसाद!

आता तुम्ही म्हणाल असं कोण म्हणतं!! मी नाही हो ह्या जाहिराती तसं म्हणत आहेत.खाली दिलेल्या लिंका बघा एकदा

१) http://www.youtube.com/watch?v=sAuwpCpeuKo = Husbands are useless : Breakfast

२) http://www.youtube.com/watch?v=LFcVvQszajg = Husbands are useless : Bedtime

३) http://www.youtube.com/watch?v=xijPHTGb-2I = Husbands are useless : Car

४) http://www.youtube.com/watch?v=kohnRXTJsWI = Husbands are useless : Park

तर वेगवेगळ्या चारही जाहिरातींमधे असं दाखवलं आहे की 'नवरा' कसा निरस असतो घर सजावटीच्या बाबतीत! ह्यामधे दाखवलेली प्रत्येक स्त्री घराला असा रंग देऊया का, तसा वॉलपेपर लावूया का वगैरे असे बरेच प्रश्न विचारायचा प्रयत्न करते पण नवरा ढीम्म बोलत नाही! आणि म्हणूनच इथे अशा अरसिक नव-याला दर्शविण्यासाठी विटांची भिंत वापरली आहे :D :D अगदी योग्य, चपखल वस्तू वापरली आहे नाइ.

हं पुरूषमंडळी आवाज वाढतोय तुमच्यामधे..क काय म्हणताय? सगळे पुरूष काही असे नसतात!

हं ठीक आहे, सगळे नसतील पण ९९% तरी असेच असतात...ती क्रमांक ४ची जाहिरात पुन्हा एकदा बघा म्हणजे कळेल ;)

मला तर बाई इतकं कौतुक वाटलं नं ह्या जाहिराती जिच्या सुपीक डोक्यातून अवतरल्या असतील तिचं...हो १००% ती स्त्रीच असणार आणि तेही लग्न झालेली! कारण स्त्रीच फक्त इतक्या बारकाव्यानिशी पुरूषाचे 'हे' गुण दर्शवू शकते, हो की नाही हो मैत्रिणींनो?

तुमचे असे काही खास अनुभव असतील तर सांगा ना मला :)



अरे देवा! अजून एक??!!!

कधी नव्हे ते मला टीव्हीचा रीमोट हातात मिळाला म्हटलं बघावं जरा मराठी चॅनेलवर काय सुरू आहे. बघितलं तर फक्त लग्न, लग्नाच्या आधीचं जीवन आणि लग्नानंतरचं जीवन - प्रत्येक मालिकेचा हा एकच विषय!

अरे काय चाललय काय!!!

एका लग्नाची दुसरी गोष्ट त्यानंतर आता तिसरी गोष्ट ह्यानंतर माहित नाही अजून कितव्या क्रमांकापर्यंत ह्या गोष्टी जातील!

होणार सून मी ह्या घरची,बे दुणे दहा आणि आता नविन येऊ घातलेली 'जावई विकत घेणे आहे!'

अरे काय आहे हे सगळं!! कंटाळा कसा येत नाही फक्त एकाच विषयावरच्या सिरीयल्स बनवायला! आपल्या रोजच्या आयुष्यामधे जे घडतं तेच परत परत वेगवेगळ्या प्लास्टीक चेह-याच्या कलाकारांसमवेत बघायला कसा रस येऊ शकतो एखाद्याला?

हं आता तुम्ही म्हणाल की जर हा विषय सोडला तर मग कशावर बनवायची मालिका ते सांग पाहू...अरे आपल्या मराठी भाषेमधे इतका समृध्द ग्रंथभांडार आहे त्यातली एखादी चांगली कथा घेऊन त्यावर मालिका का नाही बनू शकत?

म्हणजे मग परत एखादी ऐतिहासिक किंवा देवावरची मालिकाच बनवायची ना? किंवा मग एखादा क्रांतिकारक किंवा देशभक्त??

ह्या वर्गवारीपेक्षाही काहीतरी वेगळं नक्कीच सापडेल हं आपल्या साहित्यात पण अर्थात ती मेहनत घेतली गेली पाहिजे..

जाऊ देत! माहित नाही हो मला, अजून कोणत्या विषयावर मालिका बनू शकते ते पण, इतकं मात्र कळतंय की सध्या चालू असलेल्या सगळ्या मालिका एकसुरी आहेत!! ह्यापेक्षा काहितरी चांगलं बघायला,ऐकायला मिळायला हवं!!

अर्थात लहानपणी बघितलेल्या मालिका इथे आठवणं साहजिक आहे.महाश्वेता किंवा दामिनी आठवतात, त्या दोन्ही मालिका टायटल साँग्समुळे जास्त लक्षात राहिल्या बाकी हिंदी मधल्या ब्योंमकेश बक्षी किंवा सुरभी..असं काही सुरू आहे का हो सध्या?

Sunday, February 23, 2014

हायवे...एक भन्नाट प्रवास



इम्तियाज अली हे नाव हिंदी चित्रपटसॄष्टीमधे आता सुपरिचित आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'हायवे'. ह्या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनापूर्वी ट्रेलर्समुळे आणि ए.आर.रेहमान ने बनविलेल्या गाण्यांमुळे जास्त झाली.

विशेष सुचना: अगदी टीपीकल लव्ह स्टोरी किंवा मनोरंजनात्मक चित्रपट नाहीये हा!

चित्रपटाची कथा म्ह्टलं तर फक्त एका ओळीची आहे. पण, प्रत्येक वेळेस काहितरी कथा असलीच पाहिजे का?

फक्त एक कल्पना,रोजच्या धकाधकीच्या पण आरामदायी तरीही कृत्रिम वातावरणापासून कुठेतरी दूर निसर्गाच्या जवळ जायचं..तिथली स्वच्छ हवा, रोजचाच उगवणारा पण वेगळा दिसणारा सूर्य..मधेच कडाक्याची थंडी-बर्फ..खळाळणारी नदी आणि नजर पोहोचणारही नाही इतक्या उंचीवरची हिमाच्छादित शिखरं..बस्स!

चित्रपटामधे जे निसर्गाचं चित्रीकरण केलं आहे ते लाजवाब आहे.. डोंगरातून जाणारा वळणावळणाचा रस्ता..उत्फुल्लपणे धावणारी पण जवळ गेल्यावर जिवाचा थरकाप होईल इतका वेग असणारी नदी..व्वॉव अर्थात मी त्या भागामधे प्रत्यक्ष गेले नाही म्हणून मलातरी असं वाटलं.

चित्रपट वेगवेगळ्या शहरांच्या रस्त्यावरून आपल्याला फिरवत फिरवत 'वीरा' आणि 'अबिराम भाटी' ह्या दोघांची एकमेकांपेक्षा अगदी भिन्न असणारी कहानी सांगतो.वीरा एका अतीश्रीमंत घरातली 'प्रोटेक्टेड' वातावरणात वाढलेली मुलगी.घरामधल्या 'सेफ' पण तरीही अनसेफ वातावरणाचा तिला उबग आलेला असतो.पण तरीही, ती, जे सगळं सुरू आहे ते निमूटपणे सहन करत पुढे जात असते.


अचानक लग्नाच्या आदल्या रात्री ती आपल्या होणा-या नव-याला 'हायवे'वरून फिरून येऊ असा आग्रह धरते आणि सगळं नाट्य सुरू होतं...

रणदीप हुडा ला विशेष काही अदाकारी दाखवायची आवश्यकता नव्हती पण आलिया भट्ट ने चांगलं काम केलं आहे, ह्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे पण तिचं वय ह्या रोलला अगदी सुटेबल आहे म्हणून कदाचित तिची निवड झाली असावी.अर्थात तिला बघतांना कुठेतरी पुजा भट्टची आठवण येत राहते.


बाकी कोणताच ओळखिचा चेहरा चित्रपटामधे वापरलेला नाही.ए.आर.रेहमान यांचं संगीत बहुतकरून ग्रामीण संगीताचा साज ल्यालेलं आहे त्यामुळे गाणी लक्षात राहतात.

Wednesday, January 29, 2014

मेकअप उतरवल्यानंतर


  मृणाल कुलकर्णी यांचं 'मेकअप उतरवल्यानंतर' हे पुस्तक हातात घेतलं तेंव्हा वाटलं लेखिकेने कदाचित तिच्या आयुष्याबद्दल लिहीलं असेल.
पण, वाचायला सुरूवात केली आणि क्षणभर धक्काच बसला.प्रत्येक लेख एक एक प्रखर विचार घेऊन उभा राहतो.रोजच्या धकाधकीमधे आपल्या आजूबाजूला घडणा-या घटना आपल्याला दिसतात तरी का हा प्रश्न विचार करायला भाग पाडतो.साध्या-सोप्या भाषेतून आपल्या समाजाचं भयानक चित्र विशेषतः स्त्रीयांबाबातचं मांडलं आहे.
अगदी दीड पानी आहे प्रत्येक लेख पण वाचल्यावर सुन्न व्हायला होतं.
तासाभरात वाचून झाल्यावर वाटलं पुस्तकाला नाव अगदी योग्य दिलं आहे.आज आपल्यापैकी बरेच जण डोळ्यांवर, मनावर मेकअप करून फिरतोय जणू काही जे खरंखुरं क्वचित बेढब असं सत्य आहे ते आपल्याला दिसू नये जाणवू नये.त्यामुळेच की काय जाणिवांवरचा हा मेकअपचा मुलामा उतरवून सत्याला सामोरं जाण्याचं धाडस आपल्यात आहे का असा प्रश्न तरळत राहतो..



Thursday, January 16, 2014

इक अरसा

इक अरसा हुआ कुछ गुनगुनाए हुए...
इक अरसा हुआ खुदसे बात किये हुए...
इक अरसा हुआ दो शब्द लिखे नहीं,
इक अरसा हुआ किताब छुए हुए..

इक अरसा बीत गया तुमसे हुइ मुलाकात को..

इक अरसा हुआ देखे बरसते हुए बादल को,...
इक अरसा हुआ सुनहरी धुप देखे,
इक अरसा हुआ ठंडी हवा बदन को छुए...

इक अरसा बीत गया आईने में खुदको निहारे..
आज इक अरसा बीत गया खुलकर सांस लिए...

अचानक कहीं से दो बूँदे गिरी मुझपर औरे आवाझ आइ,
एक साल बीत गया उस हादसे को जब तुम हमेशा के लिए चले गये, लेकीन आज भी यकीं नहीं होता.....

Thursday, January 2, 2014

गोs गोs गोवा............

एशियाड मधून रात्रभर प्रवास केल्यावर एकदाचं पणजी दिसलं..अगदी कष्टाने डोळे उघडले आणि खिडकीबाहेर डोकावले तर अहाहा...काय सुंदर दृश्य दिसलं..रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं..मस्त काळाशार स्वच्छ रस्ता आणि टवटवीत रंगांच्या भिंती असलेली घरं...मी तर पाहताक्षणीच प्रेमात पडले गोव्याच्या..

पुण्याच्या गारठवणा-या थंडीच्या मानाने इथे असणारं आल्हाददायक वातावरण मनाला खूपच भावलं :) तिथे असणारे २६ की काय समुद्रकिनारे वगैरे सगळं आहेच छान पण सगळ्यात जास्त मला काय आवडलं तर तिथे असणारी शांतता आणि घरं..

निदान पणजीमधे तरी सकाळी १० पर्यंत अजिबात वर्दळ दिसली नाही म्हणून मी शांततेबद्दल नमूद केलं.


गोवा टुरिझमच्या बसमधून उत्तर-गोवा आणि दक्षिण-गोवा बघतांना घरांमधली विविधता पाहतांना खूप गम्मत वाटत होती.प्रत्येक घर निराळं..घराभोवती ४ झाडांची का होईना पण छोटीशी बाग आणि त्यामधे नारळाची झाडं तर असणारच असणार..घरांचे रंगही असे की शहरामधे तो रंग कोणी घराला लावायचा विचारही करणार नाही पण, त्या घरांना मात्र ते उठून दिसत होते..म्हणजे एखादी सावळी पण नाकी-डोळी निटस असणा-या मुलीला तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसवा ती सुंदरच दिसेल तसं काहीसं...आणि ह्यासोबतच घराच्या अंगणामधे तुळशी-वृदांवन किंवा ख्रिस्ती लोकांचा क्रॉस..कौतुक ह्याचही वाटलं की छोटीशी बंगली जरी बांधलेली होती तरी तिचा आकार-उकार अगदी एखाद्या वास्तूरचनाकाराच्या रचनेतून आल्यासारखा..काही काही घरांवर कोंबडा लावलेला दिसला, त्याचं कारण म्हणजे पोर्तुगीज लोकांमधे असं मानलं जायचं की ज्याच्या घरावर कोंबडा तो अगदी सधन-श्रीमंत :)

दक्षिण-गोवा फिरतांना पोर्तुगीज कसे राहत असत ह्याचा नमूना म्हणून एका घराची सैर घडवली जाते,गोवा सरकारने संग्रहालय करून त्यातली जवळपास प्रत्येक गोष्ट जपली आहे.तिथे देण्यात येणा-या माहितीनुसार कोंबडा हा पोर्तुगीजांमधे राष्ट्रीय पक्षी मानला जात असे.

पुढे एक ख्रिस्ती धर्मस्तळ बघितलं जिथे ४०० वर्षांपासून एका संताचा देह पेटीमधे ठेवलेला आहे.दर दहा वर्षांनी ती पेटी खाली आणून लोकांना दर्शन घेण्याकरता ठेवली जाते.माहिती देणा-याने असं सांगितलं की तो मानवी देह कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना आजही जसाच्या तसा आहे. आम्हांला दुरूनच ती पेटी दिसली त्यामुळे खरंच तसं काही आहे की नाही ते माहित नाही, असो. ते धर्मस्थळ आतून सजविण्यासाठी ख-या सोन्याचा उपयोग केला आहे.आमच्यासारखे बरेच पर्यटक तिथे असल्यामुळे तिथे असणा-या शांततेचा अनुभव घेता नाही आला.

पुढे आम्ही अजून एका ख्रिस्ती धर्मस्थळाला भेट दिली.तिथे असणा-या सगळ्या मूर्त्यांवर मात्र फक्त रडवेला, कारूण्य असणारा भाव दिसला.


मला ते फारसं पटलं नाही, म्हणजे आपल्या मंदिरांमधे गेलं की कसं मस्त प्रसन्न वाटतं गोल-गरगरीत गणू बाप्पाला बघितल्यावर किंवा हसतमुख चेह-याच्या,टपोरे सुंदर डोळे असणा-या देवीला बघितल्यावर तसं त्यांच्या धर्मस्थळात गेल्यावर मन उदास झालं..

बाकी आमच्या गोवा सफरीमधे संध्याकाळी नदीकाठी असणा-या क्रूझची सफर पण होती.खूप अपेक्षेने गेलो होतो पण सगळ्या फोल ठरल्या, विशेष काही बघता नाही आलं आणि वेळ वाया गेला..

गोव्याची शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट ट्रीप आटपून आम्ही परत पुण्याला निघालो तेंव्हा रस्त्यात एका ठिकाणी बस थांबली आणि पोलिस आत शिरले. सगळी जनता झोपेत होती पण तरीही त्यांनी सगळ्यांना बॅग्स उघडून दाखवायला सांगितल्या. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे एका मुलाकडे 'गोव्याचा बाटलीबंद माल' सापडलाच, त्याने गोव्यातून घेतलेलं परमिट पण दाखवलं पण पोलिस म्हटले ते परमिट फक्त मर्यादित सीमेपर्यंत लागू आहे!! पोलिसांनी त्या पोराकडून सगळा माल जप्त केला आणि आमची बस पुढे निघाली.खरं तर परमिट देऊन असा काही नियम लागू करणं ही फसवणूक आहे पण....

असो, गोव्यासारख्या रम्य ठिकाणाची ओळख उशीरा का होईना पण झाली ह्यामुळे २०१३ची सांगता अगदी सुंदर झाली :)