२०२० साल हे सगळ्यांसाठीच चिवित्र गेलं पण माझ्यासाठी तर अगदीच roller coaster ride होती! म्हणजे बघा १ जानेवारी २०२०ला मी बेरोजगार झाले होते, सगळं जग नवीन वर्षाचं स्वागत करत असतांना मी मात्र 'आता पुढे काय'? ह्या विचारांच्या गोंधळात २०२०मधे पाऊल ठेवलं!! जानेवरी मधे युके मधे कोणीही लवकर जागं होत नाही त्यात भरीतभर ब्रेक्झिट झालेलं त्यामुळे नोकरीचं मार्केट सुस्तचं होतं. होता होता फेब्रुवारी पण संपला पण काहीच चिन्ह दिसेनात! नव-याने मदत केली आणि थोडी शिल्लक जमा होती म्हणून घराचे हफ्ते आणि बाकी खर्च निभावले पण नोकरी नसल्यामुळे जबरदस्त डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन यायला लागलं! अभ्यास, नोकरीसाठी तयारी, घरातील कामं, काही काही करावंसं वाटेना 😢 फक्त आला दिवस कोणीतरी नोकरीसाठी काॅल करेल याच विचारात जायला लागला. मार्च उगवला पण एकही काॅल आला नाही, आता तर मी दिवसेंदिवस फक्त रडण्यात घालवायला सुरूवात केली 😭 घरी परत जाऊन नोकरी शोधावी हा विचार जोर धरायला लागला पण नव-याला एकटं सोडून जावंसंही वाटेना! बरं माझ्या ओळखीतल्या जितक्या म्हणून मुली/बायका होत्या त्या सगळ्यांना नविन वर्षात पटापटा नोक-या मिळाल्या त्यामुळे आपल्यालाही आज न उद्या नोकरी मिळेलच असा पिटुकला आशेचा काजवा मनात चमकत होताच 😐 पण! हा पण काही पिच्छा सोडेचना!! ओळखीतल्या होत्या नव्हत्या त्या सगळ्यांना रेझुमे पाठवला, नुसतंच बसून नको राहायला म्हणून माझ्या टेक्नॉलॉजी मधल्या परिक्षा देत सुटले पण कसला उपयोग होईल तर शप्पथ!!😖😖 आता बास, घरीच जायचं आणि नोकरी शोधायची हा विचार पक्का करतच होते की एका कंपनीतून काॅल आला, पहिला इंटरव्ह्यू झाला-चांगला झाला, दुसरा झाला तोही पास झाले आणि आता तिसरा इंटरव्ह्यू चा काॅल येईलच म्हणेतो एक आठवडा गेला- २ गेले- एक महिना गेला पण 😤😤 आणि एके दिवशी जादूची कांडी फिरवल्यासारखं झालं आणि तिसरा इंटरव्ह्यू होऊन मला नोकरीची आॅफर एकदाची मिळाली 💃💃 नोकरी दुसर-या गावात होती म्हणून तिकडे रहायला जागा शोधायला सुरूवात केली, तीनच दिवस झाले जेमतेम आणि कोरोनाने आॅफिसमधे शिरकाव केला आणि 'वर्क फ्राॅम होम' चा फतवा काढला गेला. मी एकदम खुश झाले😄 आयुष्यात पहिली नोकरी लागल्यापासून असणारं स्वप्न, 'घरुन काम करायला मिळावं', हे आता पूर्ण होतांना दिसायला लागलं 😜 एक महिना मस्त गेला, घरुन काम करायचं, ट्रेनचा प्रवास नाही की पहाटे लवकर उठणं नाही 😄 पण घरात बसून काम करणं तेही धड डेस्क नसतांना हे काही सोपं नाही 🤪 अचानक मला पाठदुखीचा त्रास सुरु झाला, थोडे व्यायाम प्रकार करुन बघितले पण विशेष फरक वाटेना. पाठदुखी वर उपाय शोधेतो muscle pain चालू झालं. रोज वेगळ्या ठिकाणी दुखायला लागलं. एक-दोन आठवडे हा त्रास कसा घालवावा याचा विचार करतो न करतो तोच migrain चा जबरदस्त त्रास चालू झाला! डोकं इतकं प्रचंड दुखायचं की मला काही म्हणजे काही सुचायचं नाही! भिंतीवर डोकं आपटायची इच्छा व्हायची नाहीतर दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवावसं वाटायचं पण किमान दोन तास ते कमाल २४तासा पर्यंत डोकंदुखीची मजल गेली 😖😖😖 बरं डाॅक्टर कडे जावं म्हणाल तर कोरोनाचा लाॅकडाऊन चालू झालेला. शेवटी पेनकिलरचा आधार घेत घेत कसंबसं दोन-तीन महिने असह्य त्रास सहन करत करत अचानकच एक दिवस डोकं दुखणं बंद झालं!! 😌 आज नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो इतका भयानक त्रास त्या दिवसांमधे झाला 😡 देव करो अन कोणाला हा आजार नको व्हायला!!🙏 आजवर मी इतक्या पेनकिलर्स कधी घेतल्या नसतील जितक्या त्या दोन-तीन महिन्यांमधे घ्याव्या लागल्या मला 😢 😭 आजारपणातून बाहेर पडत पडत आळशीपणाने मला जकडलं! 😱 आॅफिसचं आणि घरातलं काम करुन इतका कंटाळा यायला लागला की व्यायामाला मी दूर ढकलायला सुरूवात केली! अगदीच बंद करुन टाकला व्यायाम असं नाही झालं, पण सातत्य राहिलं नाही आणि तोंडावरचा ताबा पण सुटला! या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झालाच शेवटी! मी गुटगुटीत दिसायला लागले 😜 तशात दिवाळी महिन्यावर येऊन ठेपली आणि आम्हांला घरी जायचे वेध लागले पण हाय रे कोरोना! अगदी ऐन वेळेवर युके मधे दुसरा लाॅकडाऊन लागला आणि दिवाळी सुद्धा आम्ही युकेतच साजरी केली! दिवाळीच्या फराळावर ताव मारल्यावर मात्र मी आळस झटकून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने व्यायाम-आहार-झोप यांचं गणित बांधलं आणि महिन्याभरात दोन किलो वजन उतरवलं 😘 😘 तर आज ३१डिसेंबर च्या दिवशी मी स्वतःला, स्वतःकडून शाबासकी देत छान छान पदार्थ खाऊन हा आनंद साजरा करणार आहे 😊 😊 अर्थात अजून वजन पूर्णपणे आटोक्यात आलेलं नाहीए त्यामुळे उद्यापासून परत सगळं रेजिम सुरु! या मग मस्त गरमागरम क्रिस्पी पोहा पॅटीस खायला 😍 आणि हो Happy New Year #31st2020celebration #मुक्कामपोस्टUK
Thursday, December 31, 2020
Friday, November 27, 2020
#खाण्यासाठी_जन्म_आपुला #हिवाळास्पेशल : पौष्टिक हलवा
#खाण्यासाठी_जन्म_आपुला हिवाळा आल्याची चाहूल जशी बोच-या हवेतून होते तशीच ती बाजारामधे टोपली टोपलीतून सजवलेल्या लालचुटूक, लांबसडक गाजरांना बघून होते 😃 हे जे गाजर असतं नं त्याला खरी चव असते😋👌 डोळ्यांना सुखावणारा लालसर-गुलाबी रंग आणि गोडुस चव असलेली ही गाजरं बाजारात मिळायला लागली रे लागली की मी किलो-किलो खरेदी करते. कारण हिवाळ्याचे ३-४ महिनेच यांचा आस्वाद घेता येतो,नाहीतर वर्षभर ती शेंदरी-बेचव गाजरं बघून खायची इच्छाच मरून जाते! असो, तर हे गोड-गोजिरे गाजरं बाजारातून आणल्यावर पहिला पदार्थ काय बनतो तर 'पौष्टिक हलवा', येस्स! आज मी तुम्हांला माझ्या या खास पदार्थाची 'सिक्रेट' रेसिपी सांगणार आहे बरं 😄 तर तुम्हांला आवडेल तितकी गाजरं घ्या म्हणजे मी तरी किमान किलोभर घेते. ती स्वच्छ धुवून-पुसून घ्या आणि त्याचा छानसा कीस/खीस करुन घ्या. यासोबतच गाजराइतकाच महत्वाचा घटक किंबहुना गाजरापेक्षा जास्त जीवनसत्त्व असणारा घटक म्हणजे बीटरुट घ्या. एक किलो गाजरासाठी बीटरुट जे वजनात साधारण १५०-२००-२५०ग्रॅ असेल असं घ्या, त्याचाही कीस/खीस बनवून घ्या. हे झाले पदार्थ बनवायला लागणारे दोन मुख्य घटक. आता तुम्ही ज्या भांड्यात गाजराचा हलवा करता ते घ्या.. हां हां हां थांबा!नाॅन-स्टीक पॅन अज्जिबात वापरायचं नाही बरं 👊 तर गॅसवर भांडं ठेवा आणि मोठ्या चमच्याने ३-४ चमचे तूप घालून ते वितळू द्या. तुपाचा सुगंध दरवळायला लागला की मग त्यात गाजराचा आणि त्यावर बीटाचा कीस/खीस घालून त्याला व्यवस्थित एकत्र करुन घ्या. भांड्यावर झाकण ठेवा आणि तूप-गाजर-बीट यांचं मिश्रण वाफेवर मस्तपैकी शिजू द्या. डोन्ट-वरी आपण अधूनमधून झाकण उघडून ते मिश्रण एकत्र करत राहणार आहोत पण आत्ताच ठेवलंय ना, जरा होऊ देत पाच मिनिटं. तर आता आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे. किलोभर गाजराच्या कीसासाठी अर्धा लीटर दूध तापवायला दुस-या भांड्यात ठेवायचं. इकडे 'धीमी आँच'पे हलव्याचं मिश्रण छान तयार होतंय. झाकण उघडून बघा, कसा मस्त बीटाचा रंग घेऊन गाजराचा कीस लालचूटूक्क झाला आहे आणि तूपमिश्रित सुगंध घ्राणेंद्रियाला तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थाची चुणूक देतोय 😘 हां पुरे पुरे - नैवेद्य दाखवायचा आहे म्हटलं आधी देवाला😏 मग तुमच्या पोटोबाला! तर साधारण १५मिनीटात गाजर-बीटाचा कीस तुपात वाफवून मस्त मऊसर तयार होतो, आता त्यात मगाशी तापत ठेवलेलं दूध घालायचं. दूध जितकं आहे तितकं सगळं नका घालू हं, जरा अंदाज घेत घेत पण पौष्टिक हलवा शिजायला मदत होईल इतपत घालायचं. म्हणजे बघा गाजर-बीटाचा खीस आहे नं त्याच्या साधारण अर्धा इंच वर येईल इतपत दूध घालायचं. हां आता या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित हलवून एकत्रित करायचं. परत एकदा झाकण ठेवत पुढच्या तयारीला लागायचं. या पौष्टिक हलव्यामधे एक साखर सोडली तर बाकी सगळ्या जिन्नसांचा वापर अगदी सढळ हाताने + आवडीनुसार तुम्ही करु शकता. आता सुकामेवा चा नंबर - चला आता प्रत्येकी एक मूठ काजू-बदाम-अक्रोड(हो अक्रोड अतिशय महत्वाचा घटक आहे) घ्या आणि त्याची जाडसर पूड करुन घ्या. आता तुम्ही म्हणाल, काप का नको? पूड का करायची? बीटरुट असल्यामुळे या पोष्टिक हलव्याचा रंग अगदी गडद लाल होतो त्यात मग बदाम-काजूचे काप फारच बेरंगी लाल दिसतात, कसं वाटेल मग ते खातांना 😒 आणि आक्रोड जरासे तुरट(मला तरी त्यांची चव तुरटच वाटते) लागतात त्यामुळे त्याचे नुसते तुकडे नकोच म्हणून सोप्पा उपाय आहे पूड 😁 हां झाली का पूड करुन,चला आता झाकण उघडून बघा बरं हलवा कितपत शिजला ते? हां दूध आता ब-यापैकी आटलं आहे, परत एकदा सगळं मिश्रण मिक्स करा आणि झाकण ठेवा. आता साखरेचा नंबर, तर या हलव्यामधे साखर अगदी कमीतकमी घालायची. म्हणजे बघा जर एक किलो गाजर+२५०ग्रॅ बीटरुट असेल तर २००ग्रॅ साखर पुरेशी आहे. कारण मुळात गाजर असतात गोड त्यात परत बीटरुट शिजलं की त्याचाही गोडवा उतरतो त्यामुळे अगदी कमी साखर जरी घातली तरी अतिशय स्वादिष्ट बनतो पौष्टिक हलवा 😊 खूप झाल्या गप्पा, झाकण उघडलं तर अहाहा वाफेवर स्वार होऊन हलव्याचा सुगंध 'मी तय्यार आहे' ची वर्दी देत आला 😊 तरी एकदा निरखून बघा दूध कुठे दिसत नाही नं भांड्यात? हां म्हणजे हलवा छानपैकी शिजला बरं 😊 त्यात आता साखर घाला आणि हलवून घ्या. पदार्थाच्या उष्णतेने साखर लगेच वितळायला लागेल. परत एकदा सगळं मिश्रण एकत्र करा आणि साखर विरघळून हलवा तयार होईतो जरा दम धरा 😜 १०मिनीटांमधे साखरपाक विरघळून हलव्याला चकाकी यायला लागेल. एकदा का सगळा पाक त्या मिश्रणात मिसळला की हलवा छान तयार होईल, भांड्यापासून थोडा वेगळा व्हायला सुरूवात होईल. आता तुमच्या आवडीनुसार अजून पाच मिनीटं त्या मिश्रणाला हलवून ड्राय करु शकता किंवा आत्ताच गॅस बंद केला तरी चालेल👍 १०मिनीटं मिश्रण निवलं की त्यात मगाशी केलेली ती काजू-बदाम-अक्रोडची जाडसर पूड घालून मिक्स करुन घ्या. आता एका वाटीमधे त्यातला दोन-तीन चमचे पौष्टिक हलवा घ्या त्यावर काजू-बदाम लावून जरा सजावट करा आणि देवाला चाखायला द्या🙏 त्यानंतर कुटुंबियांसाठी आणि स्वतःसाठी पौष्टिक हलव्याच्या वाट्या भरून घ्या आणि सुगंधी-चविष्ट-स्वादिष्ट अशा पौष्टिक हलव्याची लज्जत अनुभवा 😋👌👌👌 माझ्या घरी हिवाळ्यात पहिला हा पदार्थ बनतो, तुमच्याकडे काय बनवतात? #हिवाळास्पेशल #पौष्टिकहलवा #गावरानगाजरcravings #खाण्यासाठी_जन्म_आपुला
Sunday, November 15, 2020
#मुक्कामपोस्टUK : लाॅकडाऊन दिवाळी
यंदाची आमची दिवाळी युके ला करायची वेळ आली. अगदी ऐन वेळेवर दुसरा लाॅकडाऊन लागला आणि घरी जाणं स्थगित करावं लागलं 😭 आलं करोनाच्या मनात, तिथे कोणाचं चालणार 😖 मन खट्टू झालं खरं, पण मनाला समजावत म्हटलं, वर्षभराचे सण जसे आनंदात साजरे केले तसंच दिवाळी पण करुया की या घरात-देशात 😃 आंजारुन-गोंजारुन मनाला तयार केलं खरं पण मग आता दिवाळीची तयारी नेमकी कशी करावी बरं हा पेच पडला 🤔 दिवाळी म्हटलं की पणत्या-आकाशकंदिल-दाराला लावायला तोरण-रांगोळी-रंग-पुजेचं साहित्य कित्ती कित्ती म्हणून सामान आणायचं असतं नै! आमच्या कडे दुसरा लाॅकडाऊन चालू झालेला, बरं इथे या सगळ्या वस्तू मिळतात का आणि कुठे हे शोधण्यापासून सुरूवात! काय करावं बरं हा विचार करत गुगल करत असतांना एकेक साईट्स सापडायला लागल्या 😊 माझी इथली पहिली दिवाळी असली म्हणून काय झालं, कैक वर्षांपासून भारतीय इथे आहेतच आणि अगदी आंब्याच्या डहाळी-दुर्वा-शेणाच्या गोव-या काय म्हणाल ते सगळं मिळतं, फक्त शोधायचा अवकाश! या साईट्स सापडल्या आणि माझ्या अज्ञानाचा आणि भीतीचा अंध:कार पळूनच गेला 😁 आता तर मला तुळशीबागच सापडली होती, उत्साहात मी पणत्या काय रांगोळी काय रंग काय दिसेल ते कार्ट मधे टाकायला सुरूवात केली.देवाच्या पूजेला लागणारं सगळं सामान मिळालं बाई, काय खुश झाले मी 👏💃💃 उटणं-सुगंधी साबण-तेल-घरातल्या लावायच्या दिव्यांच्या माळा एक एक गोष्ट समोर आली आणि माझ्या दिवाळी खरेदीची लिस्ट पूर्ण होत गेली 😊 चला बाहेरची आवश्यक खरेदी तर पार पडली पण दिवाळी फराळाचं काय?? अरे देवा!!😰😰 चकल्या-शेव करायची सोय आपलं सो-या नाही आणि नुसत्या लाडू-चिवड्यावर तर दिवाळी भागायची नाही 😳 आता काय करावं बरं असं म्हणत मी परत डोकं खाजवायला सुरूवात केली. तशात अचानकच मला Indieats.in म्हणून माझ्या मैत्रिणीच्या फेबु पेजवर दिवाळी फराळाची आॅफर दिसली आणि मला तर बाई आकाशच ठेंगणं झालं, इतका आनंद झाला म्हणून सांगू 😄 क्षणाचाही विलंब न-लावता मी चकल्या-चिरोटे-शेव-खोब-याच्या वड्या-बालुशाही अशा सगळ्या पदार्थांची आॅर्डर दिली. त्या साइटवर बाकी मसाले-तयार पिठं दिसली, लगे हात ती पण मागवली 😄 हुश्श!!! झाली एकदाची दिवाळीची सगळी तयारी 💃💃 जसजशी दिवाळी जवळ यायला लागली तस रोज काही ना काही सामानचं पार्सल यायला लागलं. नवरा म्हणायचा अगं काय-काय मागवलं आहेस इतकं?? मी फक्त 'आली दिवाळी-दिवाळी-दिवाळी' इतकंच म्हणत उड्या मारत होते 😜😄😄 दिवाळीच्या एक आठवडाआधी रविवारी भल्या पहाटे मी लाडू आणि चिवड्याचा घाट घातला आणि बेसनाचे लाडू, मुरमु-याचा खमंग चिवडा(अर्थात माझ्या आईच्या सुपरव्हिजनखाली) बनवून डब्बे भरून ठेऊन दिला 😄😋 घरामधे मग दिव्यांच्या माळा लावल्या आणि आकाशकंदील नसेना का पण या लुकलुकणाऱ्या ता-यांनी माझं घर उजळून निघालं 😍 रमा एकादशीला रंग-रांगोळीने माझं यूकेच्या घरासमोरचं अंगण सजलं आणि पहिला दिवा दारात लागला 😊 दिवाळी सुरु झाली हो 😊 😊 👏👏🙏 तसं बघितलं तर पुण्याच्या घरासमोर मी इतक्या उत्साहाने सकाळ-संध्याकाळ रांगोळी काढत नव्हते. पण युकेतल्या करड्या आणि निरस वातावरणाला छेद देता यावा म्हणून खास रंगसंगती करत मी रांगोळ्या काढायला सुरूवात केली 😊 नरकचतुर्दशीच्या पहिल्या आंघोळीकरता उटणं-तेल-साबण काढून ताट तयार केलं आणि सुपरिचित वासांनी घरच्या सगळ्या दिवाळींच्या आठवणी मनात फेर धरु लागल्या.गरम-कढत पाण्यात तीळ घालून-उटण्याचा उष्णसुगंधी लेप अनुभवत पहिली आंघोळ उरकली आणि देवाला नमस्कार करत फराळाच्या ताटावर ताव मारायला बसलो. चिवडा-लाडू-चकली-शेव-चिरोटे एकेक पदार्थ जिभेवर विसावत होता आणि अहा क्या बात है, म्हणत दिवाळी संपन्न झाल्याचा आनंद द्विगुणीत होत होता 😋😋😘 मी बनवलेल्या लाडू-चिवड्याला पण नव-याने 'छान झालं आहे'ची पावती दिल्यावर तर मी डब्बल खुश झाले आणि आणखीन एक लाडू फस्त केला(लाॅकडाऊन ने बहाल केलेला गुटगुटीतपणा कमी करायच्या ऐवजी?? ए गपे! दिवाळी आहे,चलता है 😁) दिवाळी म्हटलं की आपल्या आप्तेष्टांना भेटणं-फराळाच्या गप्पा-खरेदी-फटाके अशी सगळी धम्माल असते. यावर्षी ते जरी होऊ नाही शकलं तरी व्हिडिओ काॅलवर मात्र सतत आमच्या गप्पा चालू आहेत त्यामुळे, अगदीच ओकीबोकी वाटत नाहीए ही दिवाळी 😌 बाकी तुमची दिवाळी कशी सुरु आहे, मजा करा-मस्त लाडू-चिवडा खा तुम्हां सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊 🙏
Thursday, November 12, 2020
गुरूद्वादशी : नृसिंहवाडी उत्सव
आज गुरूद्वादशी, नृसिंहवाडी/ नरसिंहवाडीला खूप मोठा उत्सव असतो. यावर्षी करोना मुळे कदाचित नसावा. तर माझ्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणींमधे प्रमुख आठवण ही नरसिंहवाडीच्या उत्सवाची आहे. सुट्टी चालू झाली की मामाच्या गावाला किंवा आजोळी जाण्याच्या ऐवजी आम्ही नृसिंहवाडीला जायचो. औ'बादहून पुण्याला शिवाजी नगर स्थानकाला जायचं तिथून पुढे स्वारगेट स्थानकावर कोल्हापूर किंवा त्यापुढे जाणारी लालपरी पकडायची आणि प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे रात्री १०-११वा. आम्ही नरसिंहवाडीला पोहोचायचो. तिथे एका गुरुजींच्या घरी आमची राहायची सोय केलेली असायची. बसमधूम उतरल्यावर चालत त्यांच्या घरी जाईपर्यंतच थंडीने हुडहुडी भरायची. गुरुजींकडे गेल्यावर एकमेकांची विचारपूस करत दुस-या दिवशी पूजा किती वाजता करायची आहे, इतर कार्यक्रमांची रूपरेषा काय आहे हे सगळं ठरवून, 'पहाटे लवकर उठून नदीवर आंघोळीला जायचं आहे', या सूचनेसकट पांघरूणात दडी मारावी लागायची. पहाटे उठून आमचे आई-बाबा नदीवर आंघोळीला जायचे पण, आमची कधी इतक्या थंडीत पाण्यात पाय ठेवायची हिम्मत नाही झाली. त्यामुळे अगदीच उशीरा नाही पण ७-८वा आम्ही घरुन तयार होऊन जायचो. नदी मधे आंघोळ करणे हा एकूणच किळसवाणा प्रकार वाटत असल्याने मी विशेष कधी प्रयत्न आणि हिम्मत केली नाही. शास्त्र म्हणून दोन थेंब स्वतःवर शिंपडायचे आणि पवित्र व्हायचं असा शाॅटकट मारलेला चालायचा 😜 मंदिराकडे जातांना दुतर्फा दुकानांची रांग आहे. पुजेचं साहित्य, मिठाई, खेळण्या अशा विविध वस्तू मिळणारी ही दुकानं बहुतांश लोकांच्या घराच्या समोरच्या भागात वसवलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला नारायणस्वामींचं मंदिर आहे आणि त्यामागे धर्मशाळा. थोडं पुढे जाऊन डाव्या हाताला वळालं की कृष्णामाईचं विस्तीर्ण पात्र दिसतं आणि ते बघत बघतच आपण पाय-या उतरून कधी नदीपात्रात उतरतो कळतच नाही. नदीच्या पाण्यात हात खळखळत तिला नमस्कार करुन, चार पाय-या चढून मुख्य मंदिराकडे जायला वळायचं. मुख्य मंदिर नदिपात्राच्या अगदी लगत आहे. पण हे मंदिर इतर मंदिरांसारखं नसून एक माणूस जेमतेम डोकाऊ शकतो इतकं छोटुसं आहे.तिथे नृसिंहसरस्वती महाराजांच्या 'मनोहारी पादुका' आहेत आणि त्यावर सावली धरुन औदुंबराचा विशाल वृक्ष वर्षानुवर्षे उभा आहे. कृष्णामाईच्या या नेत्रदीपक पात्राला शोभेल असा सुंदर घाट आणि मंदिराभोवती गोलाकार विशाल सभामंडप आहे. नदीपात्राच्या एका बाजूला नृसिंहवाडी आहे तर दुस-या बाजूला अमरेश्वर म्हणून एक श्री दत्तमहाराजांचं अजून एक मंदिर आहे. नृसिंहवाडीला जितकी भाविकांची गर्दी असते त्यामानाने अमरेश्वरला बरीच शांतता असते. कृष्णामाईच्या पात्रातून बोटीने त्या बाजूला जाता येतं किंवा मुख्य रस्त्याने गाडीने पण जाता येतं. नृसिंहवाडीला मुख्य मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसून पादुकांवर अभिषेक करुन पूजा करायची व्यवस्था केलेली आहे. त्यानुसार आमचे आई-बाबा पुजेला बसायचे आणि आम्ही त्यांच्या अलीकडे-पलिकडे बसून पूजा कशी करतात हे उत्सुकतेने बघत बसायचो. एकदा पूजा झाली की मुख्य आरती होईपर्यंत मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या किंवा मग मुख्य दारापाशी असणाऱ्या दुकांनाकडे फेरफटका मारायचा असा माझा कार्यक्रम असायचा. मंदिरामधे पूजा चालू असतांना मंत्रोच्चारांचा होणारा आवाज दूरवर ऐकू यायचा.एका विशिष्ट लयीत म्हटल्या जाणाऱ्या त्या वेगवेगळ्या स्तोत्रांमुळे सगळं वातावरण इतकं प्रसन्न वाटायचं ना 😊 मला आजही तो आवाज कानात घुमल्यासारखा वाटतो. मंदिर परिसारामधे दगडी रस्ता आहे. त्यावरून चालतांना होणारा गार स्पर्श मला फार मजेशीर वाटायचा. प्रवेशद्वारापासून बाहेर गावात जाणारा रस्ता तेंव्हा मातीचा होता, त्यावरुन चालतांना पण मऊशार मातीचा स्पर्श झाला की गुदगुल्या होतात असं वाटायचं 😄 हां तर प्रवेशद्वारापाशी ना २-३ दुकानं होती, तिथे गोष्टीची पुस्तकं मिळायची. मी तासनतास् उभी राहून ठरवत बसायचे की हे पुस्तक घेऊ की ते घेऊ. मागच्या वर्षी घेतलेलं पुस्तक परत नाही घेतलं जात ना, हे आठवून मग एकाच छानश्या पुस्तकाची निवड मी करायचे आणि बाबांनी घेऊन दिलं की लगेच वाचायला सुरूवात करायचे 😊 पुस्तकांच्या दुकानांमधे खेळणी तर असायचीच त्यातही मला ती पाण्यावर फिरणारी 'टर्र' आवाज करणारी होडी घ्यायची विशेष आवड होती 😜 जशी पुस्तकं-खेळणी घ्यायची उत्सुकता असायची तसंच तिथे मिळणाऱ्या विशेष मिठाईचं सुद्धा आकर्षण असायचं. कंदी पेढे,कवठाची बर्फी आणि भरपूर खोबरं-काजु-किसमिस-खसखस-डिंक-कमी साखर घालून बनवलेली बर्फी(माय फेव्हरेट). ही बर्फी इतकी स्वादिष्ट लागते मी कितीही खाऊ शकते. माझ्या मोठ्या बहिणीला मात्र कवठाची बर्फी जास्त आवडायची. अशा आमच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार + इतरांना प्रसाद द्यायला म्हणून, प्रत्येक जिन्नस किलोभर तरी घ्यावा लागायचा आईला 😄 दुसरं एक आकर्षण वाटायचं ते घरोघरी बनवलेल्या एक से एक सुंदर मातीच्या किल्ल्यांचं! आम्ही ज्या गुरुजींच्या घरी राहायचो त्यांची मुलं तर दरवेळेस इतका सुंदर किल्ला बनवायचे नं की बघतच रहावं.आणि एका वर्षी तर गुरुजींच्या मुलाने महादेवाच्या जटेतून गंगा अवतरली असा देखावा केला होता. छोटी मोटर लाऊन खरंच महादेवाच्या जटेतून पाण्याचा फवारा तयार केला होता, असलं भारी वाटलेलं मला ते सगळं बघून 😁 मंदिरामधे दुपारच्या आरतीला हजेरी लावून झाली की आम्ही घरी येऊन सुग्रास जेवणावर ताव मारायचो आणि ताणून द्यायचो 😄 संध्याकाळ होत आली की पटकन आवरून परत मंदिरामधे जायचो. सकाळच्या पुजेपेक्षा मला संध्याकाळच्या पालखीची जास्त उत्सुकता असायची. जितकी पालखी खास तितकीच त्याआधीची तयारीही खास. नारायणस्वामी मंदिरामधे उत्सवमूर्तींच्या मुखवट्याची सजावट केली जाते. काजळ-चंदन आणि फुलांची सजावट करुन उत्सवमूर्तींना सजवलं जातं. तो सजावट सोहळा बघणं फार आनंददायी आणि डोळे तृप्त करणारा असतो. अतिशय नाजूकपणे आणि निगुतीने केलेली ती सजावट पूर्ण झाली की उत्सवमूर्तींच्या मुखवट्याला सोन्याची झळाळी प्राप्त होते. वर्णन करायला शब्द कमी पडत आहेत माझे खरंतर, इतकं, डोळ्याचं पारणं फिटेल असं दृश्य असतं ते 😍 एकदा सजावट पूर्ण झाली की उत्सवमूर्तींना फुलांची आरास केलेल्या पालखीमधे ठेवलं जातं आणि 'अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त' म्हणत मुख्य मंदिरासमोर पालखी आणली जाते. देवाची आरती करुन पालखी प्रदक्षिणेसाठी सज्ज होते. हातात दिवटी घेऊन पुढे एकजण उभा राहतो, पालखीला सांभाळत चार जण असतात. सगळे गुरुजी एका सुरात आणि अतिशय खणखणीत आवाजामधे पंचपदी म्हणायला सुरूवात करतात आणि पालखी प्रदक्षिणा आरंभ करते. कधी ३ तर कधी ५ प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा करतांना प्रत्येक दिशेला पालखी थांबवून भाविकांना दर्शन घ्यायची संधी दिली जाते. मंदिराभोवती पालखीसोबत प्रदक्षिणा घालायला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय गोळा झालेला असतो. प्रत्येकजण कानात प्राण एकवटून दत्तमहाराजांची स्तुतिपर कवनं ऐकण्यात गुंगून गेलेला असतो. कृष्णामाईचा काठ, संध्याकाळचा हवेतला गारवा, धुपा-दिपाचा सुगंध आणि ब्रम्हवृंदांचा धीरगंभीर आवाज यामुळे एकूणच मंतरलेलं वातावरण असतं आणि तन-मन एका भारावलेल्या पण सुखद अनुभवाची प्रचिती घेत असतं, फार फार मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे ह्या पालखी सोहळ्याचा. प्रदक्षिणा झाली की शेजारती होते आणि मंदीर बंद केलं जातं. दुस-या दिवशी म्हणजे गुरुद्वादशीला खूप मोठा उत्सव असतो. पहाटेपासूनच पूजेला प्रारंभ करतात, असंख्य भाविक दर्शनासाठी रांगा लावून महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत, सोहळ्याचा अनुभव मनात साठवून तृप्त होत असतात. मुख्य पुजा-आरती झाली की महाप्रसादाची लगबग सुरु होते. त्या दिवशी नरसिंहवाडीमधे राहणाऱ्या आणि बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद दिला जातो. गावामधे असणाऱ्या सगळ्या धर्मशाळा, शाळा, पटांगणं अशा ठिकाणी एकाच वेळी पंगती बसवल्या जातात. हजारोंनी भाविक त्या अमृतासमान चविष्ट प्रसादाचा आस्वाद घेतात. प्रसाद म्हणून दोनच पदार्थ पानात वाढतात - गव्हाची गुळ घालून बनवलेली गरमागरम खीर आणि वांग्याची खमंग भाजी - हा प्रसाद इतका चविष्ट असतो की पोट भरलं तरी मनाची भूक काही भागत नाही 😄 महाप्रसाद घेऊन झाला की आमची घरी परतायची लगबग चालू व्हायची. मिळेल त्या गाडीने पुण्याला येऊन लगोलग औ'बादला पोहोचून दिवाळीच्या पहिल्या अंघोळीचा मुहूर्त गाठायचा असायचा! गुरुद्वादशीचा मंत्रमुग्ध करणारा सोहळा मनभरुन बघितला नं की दिवाळीची सुरूवात अतिशय मंगलमय व्हायची 😊🙏 गेल्या काही वर्षात मात्र आम्हांला नरसिंहवाडीला जायचा योग फारसा आला नाही पण, लहानपणीच्या या सुखद आठवणी दर दिवाळीला मनात रुंजी मात्र नक्कीच घालतात 😌
Monday, November 9, 2020
दिवाळी : पोटात दुखणं
Tuesday, October 6, 2020
#मुक्कामपोस्टUK : ट्रेन जर्नी
सहाsss महिन्यांsssssनी आज ट्रेनमधून फेरफटका मारायची संधी मिळाली आणि लहानपणी जसं मावशीकडे ट्रेनने जायचं म्हणून आनंद व्हायचा ना अगदी तस्सा झाला 😄 💃💃💃💃 युकेला आल्यापासून इंटरव्ह्यूजच्या निमित्ताने आणि नंतर नोकरीच्या ठिकाणी जायचं म्हणून ट्रेनने जवळजवळ ६-८ महिने सलग प्रवास केला. रोज सकाळी धावत ७.१५ची फास्ट ट्रेन पकडायची आणि बर्मिंगहॅमला उतरून नोकरीच्या गावी पोहोचायला एका लोकलवजा झुकझुकगाडीतून प्रवास करायचा. जेंव्हा आॅफिसमधल्या कलिग्जना कळालं मी इतक्या?? लांबवरुन मजल-दरमजल करत येते तेंव्हा त्यांना कोण कौतुक वाटायचं आणि थोडं आश्चर्यही🤔 कारण इथे प्रत्येक घरात माणशी एक कार असते. नाही नाही लक्झरी कसली हो गरज आहे इथली. अशी पण काही गावं आहेत जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही(राणीचा देश इतका प्रगत तरीही? ? हम्म आहेत असे काही भाग 😉 ) त्यामुळे तिथे नोकरीच्या इंटरव्ह्यू मधे पहिला प्रश्न 'स्वतःची गाडी आहे का?' हाच विचारला जातो म्हणे 😄 माझ्या मते इथल्या ट्रेनने प्रवास करायची मज्जा का येते तर १) स्वच्छ काचेच्या मोठाल्या खिडक्या, बाहेरचा निसर्ग मनसोक्तपणे बघता येईल अशा 😍 २)बसायला आरामदायी खुर्च्या आणि ३)ट्रेनचं फ्री वाय-फाय 😜 हेही नसे थोडके म्हणून की काय स्टाफ पण इतका आदबशीर असतो की उन्हाळ्यात पाण्याच्या बाटल्या फुकटात काय देतात आणि जर अतिवृष्टीमुळे ट्रेन लेट झाली तर इतक्या वेळा साॅरी म्हणतात की शेवटी वाटतं, रडतो बहुदा हा ड्रायव्हर आता 😄 😄 ट्रेनमधे चढल्यावर बसायला एकदा जागा मिळाली नं की, खिडकीबाहेर बघत बसणे हा माझा अतिशय आवडता छंद. एकतर इथला निसर्ग अशक्य सुंदर आहे.उन्हाळ्यात लख्ख सूर्यप्रकाशात सोन्याहून पिवळंधम्म असणारं ऊन इतकं सुखावून जातं नं डोळ्यांना की मला वर्णन करायला शब्दच सुचत नाहीत 😊 हो पण पावसाळा जो वर्षातले ८ महिने तर नक्कीच त्रास देतो तो मात्र मला अतिशय छळवादी वाटतो 😒 आज त्याच्यावर करवादायची इच्छा नाहीए त्यामुळे 'पावसाळ्यावर (नंतर) बोलू काही'😜 तर अगदी नुकताच चालू झाला आहे autumn 😍 😍 😍 अहाहा झाडांची हिरवी पानं आता अगदी सुरेख अशा पिवळ्या-केशरी-गुलाबी-लालसर रंगांनी नटून बोच-या वा-याला वाकुल्या दाखवत दिवसरात्र खिदळत असतात 😄 😄 मला तर त्यांचं डोलणं बघून असं वाटतं, की लहान मुलींचा घोळका सणावाराला नटूनथटून एकमेकींचे रंगीबेरंगी कपडे बघत कशा उत्साहाने गप्पा मारत असतात तसं या झाडांचं चालू असतं 🤭🤭 माझ्या घरासमोरचं झाड आणि रस्त्याच्या कडेला असणारं, या दोघांचं तर खरंच गुळपीठ असावं इतके दोघे एकत्र डोलत बोलत असतात 😘 अशी सुरेख रंगांनी नटलेली पळती झाडं बघायला ट्रेनमधून फार फार मज्जा येते मला 😍 पण! पण!! पण!!! या कोरोनाने सगळ्यांच्या आयुष्याला अशी काही चिवित्र कलाटणी देऊन टाकली ना की, सहा महिन्यांपूर्वी काय होतं आयुष्य आणि आज काय होऊन बसलं आहे 😢 गरज म्हणजे अगदी खर्रच गरज आहे नं असं स्वतःला १० वेळा विचारून घराबाहेर पडा! घराबाहेर पडायचं तर तेही नाक मुठीत आपलं मास्कमधे घालून बाहेर पडा. बाहेर शक्यतो गरजेनुसारच वस्तूंना हाताळा अन घरी परतल्यावर सगळ्या वस्तूंसकट स्वतःला सॅनिटाईज करा 🤦😤 यामुळे ट्रेन किंवा बसने प्रवास करायचा म्हणजे 'नको बाबा कशाला कोरोनाला आमंत्रण 😳' या विचाराने टेन्शनच आलेलं मला! पण जेंव्हा ट्रेनमधे चढलो तेंव्हा अपेक्षेप्रमाणे अगदी योग्य काळजी घेतली जाते हे दिसलं. दोन सीट्स पैकी एका सीटला कापडी पट्टीवर 'सोशल डिस्टन्स पाळा-कोरोना टाळा' सदृश नम्र विनंतीवजा संदेश लिहिलेला दिसला. ट्रेनचा स्टाफ येऊन सीट्सचे काॅर्नर्स जिथे सतत हात ठेवले जातात, स्वच्छ करत होते. गर्दी तर नव्हतीच,अख्ख्या डब्यात मिळून मोजून चार जण होते! त्यामुळे अगदी बिनधास्त होऊन मी आमची ही छोटेखानी ट्रेन जर्नी एंजाॅय केली 👏👏👏👏😊😊 #मुक्कामपोस्टUK
Friday, September 4, 2020
#मुक्कामपोस्टUK : लाईट गेले!!
आज पहाटे साधारण ४.३० च्या सुमारास मला जाग आली, पाणी प्यावं म्हणून उठले आणि लक्षात आलं लाईट गेलेत. लाईट गेले 😳😱?? डोळ्यावरची झोप खाड्कन उडालीच माझी! कारण यूके वास्तव्यामधे असा प्रसंग एकदाही आला नाही ना आमच्या मित्र-मंडळींपैकी कोणी अनुभवल्याचं ऐकलं! एक क्षण असं वाटलं की कदाचित खोलीतला दिवा गेला असेल म्हणून बाहेर येऊन इतर ठिकाणचे दिवे लावले पण अं हं! खरंचंच लाईट गेले होते!! आता काय करायचं? फ्यूज गेला असेल का? पण आवाज तर नाही आला 🤔 शेजारच्यांकडे, खाली राहणाऱ्या घरांमधे पण झालंय की फक्त आपल्या घरात म्हणून खिडकीतून डोकावून बघितलं तर बाहेर मिट्ट काळोख! रस्त्यावरचे दिवे पण डोळे मिटून गप उभे होते! बापरे! आता काय करायचं म्हणून नव-याला वार्ता दिली तर झोपेतंच त्याने, 'येतील गं, झोप झोप' म्हणत कूस बदलली! पण मला कसली येते झोप 😢 लाईट नाही म्हणजे मोठ्ठा प्रश्न आला इंटरनेटचा! आॅफिसला लाॅगिन कसं करणार? फोनचं हाॅटस्पाॅट वापरायचं म्हटलं तरी स्पीड नाही मिळाला तर?? भरीत भर फोन आणि लॅपटाॅपच्या बॅट-या पुरतील का(२४ तास लाईट असतात त्यामुळे बॅटरी शेवटच्या घटका मोजायला लागली की मगच आम्हांला तिला जीवदान देणाऱ्या चार्जरची आठवण येते चे परिणाम 😟 कोथरूडात राहतांना कसं लोड-शेडिंगची सवय असल्यामुळे सगळे कंदील घासून स्वच्छ करुन ठेवायची म्हणजे आपलं सगळ्या बॅटरीज, पाॅवर बँक्स चार्ज करुन ठेवायची सवय होती हो 😜 )?? हे तर झालं आॅफिसचं पण लाईट नाही मग गिझर चालणार नाही म्हणजे गरम पाणी नाही 😳अरे देवा🤦 एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले आणि अचानक आठवलं की गुगल बाबा आहे की, त्याला विचारूया ना 😃 लगेच गुगलबाबाला पाचारण केलं, माझ्या घराचा पोस्टकोड टाकला आणि सांगितलं लाईट गेले आता काय करू? लगेच एक फोन नंबर मिळाला आणि फोन लावला पण रेकाॅर्डेड मेसेज ने एक एक आॅप्शन द्यायला सुरूवात केली. मी योग्य पर्याय निवडला आणि 'इतक्या फाटे फाटे कोण आॅपरेटर बसला असणार माझी तक्रार ऐकायला 😒', असं म्हणेपर्यंत समोरून एका माणसाने, 'यू आॅलराईट, हाऊ कॅन आय हेल्प यू', म्हणत स्वागत केलं. मी पटकन झालेला प्राॅब्लेम सांगितला. त्याने माझा घर नंबर एकदा परत विचारला आणि सांगितलं की,'हो तुमच्यासारख्या अजून १२५ घरांना हा प्राॅब्लेम झाला आहे, आम्ही दुरूस्ती करत आहोत, तुम्ही काळजी करु नका दोन तासात सगळं पूर्ववत होईल. तुम्हांला होणा-या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो'. हुश्श! चला ही लोकं काम करत आहेत म्हणजे, हे ऐकून माझं सगळं टेन्शन पळालं आणि त्याला धन्यवाद देत फोन बंद केला. या सगळ्या गोंधळात झोपेचं पार खोबरं झालं पण आता दिवस वेळेत उगवतो उन्हाळा संपत आल्यामुळे म्हणून तासभर पहुडले. ७च्या सुमारास खरंच लाईट चालू झाले 😃👏👏 रोजच्याप्रमाणे आमचा दिवस सुरु झाला. साधारण ११वा. मला एक काॅल आला, एक बाई बोलत होत्या, म्हणाल्या तुम्ही आज सकाळी काॅल करुन लाईटचा प्राॅब्लेम झाल्याची तक्रार केली होती त्याबद्दल हा फाॅलोअप काॅल आहे. आता तुमच्याकडे लाईट व्यवस्थित चालू आहेत नं? मी सांगितलं सगळं व्यवस्थित आहे. त्यावर तिने परत एकदा माफी मागत नेमकं काय झालं आणि किती घरांना याचा फटका बसला हे थोडक्यात सांगितलं. तसंच, यापुढे परत कधी असा प्राॅब्लेम आला तर नक्की कळवा ही विनंती पण केली 😊 इतकं छान वाटलं नं हा फाॅलोअप काॅल आहे कळालं तेंव्हा. म्हणजे फक्त तत्पर सेवाच नाही तर झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करणं आहेच शिवाय फाॅलोअप काॅल 😃 ह्याला म्हणतात खरी सर्व्हिस 👏👏👏 #चांगल्याकामाचंकौतुक #मुक्कामपोस्टUK
Friday, August 14, 2020
पिरिएड्स लीव्ह
एका भारतीय कंपनीने 'पिरिएड्स लीव्ह' सुरु केली. लगेच माझ्या पेजवर भूछत्रासारखे वेगवेगळे फोरम्स उगवले आणि 'तुम्हांला याबद्दल काय वाटतं?' असा सवाल विचारू लागले! मला याबद्दल काय वाटलं - एकच वाटलं की माझी 'खाजगी' बाब आता चव्हाट्यावर आली! आता मी अशी सुट्टी घेणार हे माझ्या टीम मधल्या बहुतांश 'मेल कलिग्ज'ना समजणार. माझी पाळी येणं-न-येणं हा माझा, 'फक्त माझ्यापुरता' विषय आता इतर लोकांना सहज कळणार!! तुम्ही कितीही गफ्फा मारा हो इक्वॅलिटीच्या पण एका स्त्रीच्या 'शारीरिक खाजगी गोष्टींबद्दल' किती चवीचवीने बोललं जातं आॅफिस आणि समाजामध्ये ते सगळ्या स्त्रियांना व्यवस्थित माहीत आहे आणि प्रत्येकजण दुर्दैवाने का होईना एकदा तरी ते अनुभवतेचं!! 'सिक लीव्ह' होतीच की आणि अजूनही आहेच नं मग असं धडधडीत नामकरण करुन द्यायची गरजच काय म्हणते मी?? विकली टाईमशीट भरतांना प्रत्येक महिन्यात मी १ सुट्टी जरी घ्यायची म्हटलं तरी माझं 'बिलिंग' नाही होणार म्हणजे प्रोजेक्टला नुकसान 😳 बरं टीम मधे एकापेक्षा जास्त मुली असतील आणि त्याही त्याच दरम्यान किंवा पुढे-मागे ही सुट्टी घेणार म्हणजे एकूणच प्रोजेक्टला किती मोठं नुकसान??? असं प्रत्येक मॅनेजर म्हणेलच. मुळातच एक मुलगी कंपनीमधे काम करते म्हणजे तिची बुद्धी, क्षमता, तिच्यामधे असणारे गुण यापेक्षाही काही दिवसांनी ती लग्नासाठी सुट्टी घेईल, त्यानंतर 'पहिले १०० सण' साजरे करायला सुट्टी घेईल मग प्रेगनन्सी लीव्ह आणि त्यानंतर एक्स्टेन्शन लीव्ह पण द्यावीच लागेल!! त्यात आता भर ह्या 'पिरियड्स' लीव्हची??? कित्ती मोठ्ठा प्रश्न उभा राहिला बघा नं!!! काही जणींना वाटेल, तुला नसेल होत बाई त्रास पण आम्हांला होतो आणि सुट्टीच मिळावी अशी प्रत्येक वेळेस इच्छा होते, आता आयती मिळत आहे तर का नाकारायची! मला त्रास होत नाही असं नाही पण उलट अशावेळेस घरी बसून बोअर होण्यापेक्षा कामात मन जास्त रमतं माझं, अर्थात हे फक्त माझं-माझ्यापुरतं गणित आहे. बाकी अशी सुट्टी घेऊन किती जणींना घरी 'खरंच' आराम करायला मिळेल 🤔 हेही सगळ्यांना नीटच ठाऊक आहे!!
Wednesday, July 29, 2020
My sweet home
काल माझ्या पुण्याच्या घराचा व्हर्च्युअल टुअर करायला मिळाला मला आणि इतकं छान वाटलं नं..कित्ती महिन्यांनी घर बघता आलं मला 😘 घरी काम करणाऱ्या मावशींनी व्हिडिओ काॅल वर जसं जसं दाखवायला सुरूवात केली त्या क्षणी टुणकन उडी मारून घरात जावंसं वाटलं.. काशsss ऐसा हो पाता 😩😩.. मुळात हे घर बघितल्यापासूनच आम्ही दोघेही त्याच्या प्रेमात पडलो. 'घर बघावं बांधून', असं जुनी माणसं म्हणायची, ते सद्य परिस्थितीत माझ्यासारख्या सामान्य माणसाला तरी शक्य नाही, म्हणून मग 'घर बघावं विकत घेऊन' चा प्रयत्न करुन बघितला. हे घर घ्यायचं असं ठरवल्यापासून अनंत अडचणी आल्या ख-या पण ह्या घराने भूरळच पाडली होती आम्हांला, त्याच्याच बळावर मग एक एक करत अडचणींचा डोंगर पार करुन या घराचं दान आमच्या पदरात पाडून घेतलं 😊 माझ्या घराला मिठी मारणं जर शक्य असतं नं तर मी ते रोज केलं असतं 🤗 इतकं प्रेमळ आणि ऊबदार वाटतं मला त्याच्यासोबत राहतांना 😍 माझ्या घराचा भला-मोठा दरवाजा उघडून आत पहिलं पाऊल टाकलं की फरशीचा गार गुळगुळीत स्पर्श पायाला गुदगुल्या करतो..हाॅलमधल्या मोरपंखी भिंतीवरची नक्षी, जी मी माझ्या हातांनी चितारली आहे ती हसतमुखाने स्वागत करते.. हाॅलच्या उजव्या हाताला मोठ्ठी बॅल्कनी आहे. या बॅल्कनीत बसून हिवाळी धुक्यातल्या गारव्याची मजा घेणं किंवा पुणे स्पेशल मखमली पावसाचा अनुभव काॅफीसोबत घेणं यासारखं सुख नाही 😍 आळसावलेल्या रविवारी एखादी पुरवणी किंवा मासिक वाचत बसायला ही जागा अगदी योग्य आहे किंवा रिलॅक्स व्हायला म्हणून नुसतंच उंच दिसणाऱ्या आकाशाकडे बघत बसावं.. पण एक छोटी अडचण आहे या बॅल्कनीची, आमच्या वरच्या फ्लॅटमधे राहणाऱ्या कुटुंबाला सगळं दिसतं त्यामुळे उगाच cctv ची भावना टोचत राहते, असो. जितकं घर मोठं आहे तितकंच आमच्या 'देव'सेनेसाठी सुद्धा सुबक कोरीवकाम असलेलं प्रशस्त देवघर आम्ही बनवून घेतलं.आमच्या कुलदेवीची स्मितहास्य करणारी मूर्ती बघितली की आपोआप हात जोडले जातात आणि एक आश्वस्त करणारी भावना मनात उमलते 'सगळं चांगलं होईल' 🙏 एका खोलीत तर खिडकीमधे रोज सकाळी पोपटांचं त्रिकूट येऊन बसतं न-चुकता. समोरच्या झाडावरून आमच्या खिडकीत आणि परत त्या झाडावर असा त्यांचा खेळ बघायला मज्जा वाटते 😄 त्याच खिडकीजवळ माझ्या पुस्तकांचं छोटंसं दोन खणी कपाट आहे.निगुतीनं ठेवलेली पुस्तकं म्हणजे माझा आजवरचा सगळ्यात मोठा खजिना आहे..जो आत्ता मला हाताळता येत नाहीए याचं पण अतीव दु:ख होतंय मला 😩😩 माझ्या घरातली माझी सगळ्यात आवडती जागा कोणती असेल तर दुस-या बेडरूम मधला माझा खास कोपरा.छानशी खिडकी आहे त्या कोपऱ्यात आणि बसायला कट्टा. त्यावर ऐसपैस बसता यावं म्हणून मी मऊसूत गादी आणि चंद्र-चांदण्या आणि हस-या ढगाच्या आकाराच्या उशा बनवून घेतल्या आहेत 😘 😘 😍 😍 आॅफिसचं काम असो वा एखादं पुस्तक वाचायचं असो मी हमखास तिथेच बसते. याच खोलीला नं एक छानशी आटोपशीर प्रायव्हेट बॅल्कनी आहे. येस्स प्रायव्हेट कारण वरच्या मजल्यावरच्या लोकांचा cctv नाहीए इथे 😜 रोज सकाळचा व्यायाम करायला अगदी उत्तम जागा 👌 संपूर्ण घराला आम्ही मोरपंखी रंगसंगती चे पडदे लावले आहेत.त्यामुळे कितीही प्रखर ऊन असलं तरी हलका निळसर प्रकाश घरभर भरलेला असतो विशेषतः उन्हाळ्यामधे फार गारवा मिळतो डोळ्यांना 😊 माझ्या घराची दिशा इतकी व्यवस्थित आहे नं की उन्हाळ्यामधे उन्हाचा तडाखा अज्जिबात जाणवत नाही पण हिवाळ्यात मात्र ऊबदारपण जाणवत राहतो 🤗 सकाळी उठल्यावर खिडकीचा पडदा बाजूला सारला की समोरच सूर्यनारायणाचं प्रसन्न दर्शन होतं आणि मन ताजतवानं होतं.. आणि दिवसभराची धावपळ आटपून रात्री याच खिडकीतून हसरा चंद्र गप्पा मारायला आला की अलगद डोळे कधी मिटले जातात तेही कळत नाही 😊